नितीशबाबूंच्या मनात आहे काय?

कलंदर
गुरुवार, 8 मार्च 2018

कट्टा

राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...

नितीशबाबूंच्या मनात आहे काय?
राजकारणात काहीतरी गूढ हालचाली चालूच असतात. एक ताजी खबर आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दिल्लीत बंगला देऊ करण्यात आला आहे. असे अचानक काय घडले? बिहारमध्येही स्वतःला खूप साधे समजणारे, साधी राहणी असणारे नितीशबाबू मुख्यमंत्री या नात्याने दोन दोन बंगले अडवून बसले आहेत. ठीक आहे, ते सोडा! ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत. सर्वेसर्वा आहेत. दोन काय तीन बंगलेही स्वतःसाठी वापरु शकतात. पण दिल्लीत अतिविशिष्ट मंडळींच्या निवासी भागात - ल्युट्येन्स झोनमध्ये त्यांना बंगला मिळण्याचे कारण काय? ते देखील शिस्तबद्ध, नियमपालन करणाऱ्या मोदी-सरकारकडून? काहीतरी गडबड निश्‍चित आहे! कानावर उडतउडत आलेली माहिती फारच रंजक आहे.  नितीशबाबूंनी ज्या काही ‘आगतिकतेपोटी’ लालूप्रसाद यांची साथसंगत सोडून विनाविलंब भाजपशी ‘पाट’ लावला त्याची काही कारणे होती. तुम्हाला आठवत असेल, की नितीशबाबूंनी भाजपबरोबर जाण्याचे संकेत देताना सोनिया गांधी यांनी बोलाविलेल्या भोजन-बैठकीत सहभागी होण्याचे नाकारले होते, पण तेच नितीशबाबू पंतप्रधानांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांसाठी आयोजित भोजनाला पाटण्याहून पळत आले होते. असे सांगतात, की त्यानंतर नितीशबाबूंना भाजपबरोबर जाण्याखेरीज पर्याय राहिला नाही. असे काय घडले? असे सांगतात की, नितीशबाबूंना स्पष्टपणे सांगण्यात आले, ‘लालूप्रसाद यांना तर आम्ही फक्त जेलची हवा खायला पाठवले आहे. तुम्हाला असे काही बदनाम करु की तुम्ही जीवनातून उठाल!’ नितीशबाबूंना बिहारमध्ये चर्चित सृजन घोटाळा आणि इतर काही फायलींचे संदर्भ देण्यात आले. काय? नितीशबाबू आल्या पावली पाटण्याला परतले आणि त्यांनी लालूप्रसाद यांना चक्क दगा दिला आणि भाजपशी ‘पुनर्विवाह’ करुन टाकला. आता नितीशबाबू भाजपच्या इतक्‍या आहारी गेले आहेत की ज्याचे नाव ते! अर्थसंकल्प पूर्ण होत नाही तोच त्यांनी त्याचे गोडवे गाऊन टाकले. गुजरातच्या विजयासाठी व मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी सर्वात आधी रात्रभर जागरण करुन विमानप्रवास करीत ते पोचले व हजेरी लावली.
आता असे सांगण्यात येऊ लागले आहे, की नितीशबाबू भाजपच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले आहेत की आता त्यांना त्यांच्या पक्षाचे वेगळे अस्तित्व देखील नकोसे वाटू लागले आहे. म्हणजे? होय, कदाचित नितीशबाबूंचा पक्ष भाजपमध्ये विलीन होऊ शकतो. नितीशबाबू मग केंद्रात मंत्री म्हणून अवतीर्ण होऊ शकतात. बिहारमध्ये काय? तर, बिहारमध्ये भाजपचे सुशील मोदी पूर्णकालिक मुख्यमंत्री होतील! भाजपचे बिहारमध्येही राज्य निर्माण होईल. तर नितीशबाबूंच्या दिल्ली बंगल्यामागची कहाणी अशा रीतीने सांगितली जाऊ लागली आहे. नितीशबाबूंच्या या कारवायांची माहिती बहुधा त्यांच्या पक्षात अजूनही स्वत्व व स्वाभिमान असलेल्या काहीजणांना लागली असावी. तसेही संयुक्त जनता दलाची प्रतिमाहनन झालेच आहे आणि आगामी निवडणुकीत या पक्षाला कोणतेच भवितव्य उरलेले नाही. त्यामुळे या पक्षातील काही मंडळींनी लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी व काँग्रेस पक्षाशी संपर्क साधण्यास प्रारंभही केला आहे. काहींनी बंडखोर नेते शरद यादव यांच्याशी संपर्क करण्यास सुरवात केली आहे. तर नीतीशबाबू आता नव्या खेळासाठी सज्ज होऊ लागले आहेत. दुर्दैवाने हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला शेवटचा खेळ ठरेल अशी चिन्हे आहेत.
 
चहाच्या मळ्यात कॉफीचे झाड?
गुजराती लोकांना घट्ट दुधाचा दाट चहा खूप आवडतो. गुजरातमध्ये चहाचा एक मसाला खूप लोकप्रिय आहे. आणि तो घराघरात आढळतो. गुजराती कुटुंबात गेल्यानंतर हा मसालेदार आणि दुधाळ चहा हा आनंददायक असतो. त्यात गोडवाही भरपूर असतो. म्हणजेच साखरही मुबलक असते.पण ..........! हा ‘पण’ महत्त्वाचा असतो. जीवनशैलीशी निगडित अनेक शारीरिक समस्या व आरोग्याच्या प्रश्‍नांशी सध्या समाजातील अनेक मंडळी झुंजत आहेत. मधुमेह हा त्यापैकी एक! राजकारणी मंडळींच्या तर तो पाचवीलाच पुजलेला असतो. तर, मूळ विषयाकडे वळू! भाजपमधले दुसऱ्या क्रमांकाचे नेते, प्रमुख रणनीतीकार व अनेक विजयांचे शिल्पकार असलेल्या पक्षाध्यक्ष अमित शहा यांची ही कथा! एकेकाळी तमाम गुजराती लोकांप्रमाणेच अमित शहांनाही घट मसालेदार चहा आवडत असे. पण हळूहळू दुधातली मलई, साखर याचा परिणाम दिसू लागला. वजनात वाढ आणि मधुमेहाने पकडले. राजकारणाच्या दगदगीने त्यात भरच पडत गेली. डॉक्‍टरांनी वजन कमी करण्यास सांगितले. वर्षानुवर्षे सवयीचा असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गुजराती चहाचा त्याग करण्याची पाळी आली. त्याला पर्याय म्हणजे बिनसाखरेचा, बिनदुधाचा चहा पिणे आले! पण गुजराती माणसाला असा चहा पचणेच अशक्‍य! अखेर नाइलाजाने अमितभाईंनी चहाच्या प्रेमपाशातून सुटका करुन घेण्यासाठी कॉफीचा कप तोंडाला लावणे पसंत केल. हो ! कारण बीन साखर-दुधाचा चहा पिताना मध्येच लहर येऊन पुन्हा तो विशिष्ट चहा पिण्याची तल्लफ आली तर? त्यापेक्षा अमितभाईंनी चहाच सोडणे पसंत केले व कॉफीची व त्याही काळ्या कॉफीची संगत पकडली.
आता अमितभाई काळी कॉफी म्हणजेच ‘ब्लॅक कॉफी’ पितात. संसदेत कॉफी बोर्डाची सुंदर स्वादिष्ट कॉफी मिळते. राज्यसभेत प्रवेश केल्यानंतर अमितभाई आता पत्रकारांबरोबर गप्पा मारताना देखील काळ्या कॉफीचे घुटके घेत राहतात.
असे सांगतात, की गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रधान सेवकांच्या ‘मन की बात’च्या प्रसारणाचे निमित्त साधून ‘चाय के साथ मन की बात’ असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी देखील शहा यांनी चहाचा मोह दूर सारून काळी कॉफी पिणेच पसंत केले होते. अर्थात हे गुपित कानोकानी कळलेले आहे! काळी कॉफी पिऊन शहांचे वजन किती कमी होते ते कळेल ! 

भाजपमध्येही पुत्रोदय !
काँग्रेसच्या घराणेशाहीबद्दल सातत्याने टीका करण्यास भाजपची मंडळी कधीच मागेपुढे पहात नाहीत.
परंतु दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ पाहताना स्वतःच्या डोळ्यातही मुसळ आहे हे ते विसरतात.
भाजपमधील घराणेशाही देखील कमी नाही.
महाराष्ट्रात देखील भाजपच्या नेत्यांवर नजर टाकल्यास ते आढळून येते. आता मध्य प्रदेशातही अशीच घराणेशाही सुरू झाल्याचे आढळून येते. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचे पुत्र कार्तिकेयसिंग यांनी राजकारणात पदार्पण केले आहे.
मध्य प्रदेशात नुकत्याच काही पोटनिवडणुका झाल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही झाल्या.
तर, मुख्यमंत्री-पुत्रांनी हे निमित्त साधून राजकारणात आपली 
बाल-पावले टाकण्यास सुरवात केली.
ते २३ वर्षांचे आहेत आणि त्यामुळे लगेचच निवडणूक राजकारणात येणे शक्‍य नाही. परंतु पंचविशी पार केल्यानंतर ते पात्र होतील व वडिलांचा वारसा खांद्यावर घेतील अशी अपेक्षा आहे. त्यांच्या मातुःश्री याबाबत आग्रही असल्याचे व त्यांचा मुख्यमंत्र्यांवर विशेष प्रभाव असल्याचे कानावर आले आहे.
थोडक्‍यात काय?
कुणी नाकाने कांदे सोलू नयेत!

परराष्ट्रमंत्र्यांची काटेकोर व्यवस्था
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना भले, मंत्रालयाच्या किंवा देशाच्या परराष्ट्र धोरणनिर्मितीत फारसे स्थान न मिळो पण मंत्रालयात जे मिळेल ते काम नेकीने व काटेकोरपणे करण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांना संसदेत पंतप्रधानांच्या वतीने निवेदने वाचणे, परदेशात कुणी भारतीय संकटात सापडला असेल तर त्याला मदत करणे, ट्‌वीटर, फेसबुकवरुन कामे करणे अशी फुटकळ कामे किंवा जबाबदाऱ्या त्या पार पाडताना आढळतात अशीच चर्चा ऐकू येत असते. बाकी मुख्य परराष्ट्रधोरण व संबंध सांभाळणे व हाताळणे ही कामे खुद्द प्रधानसेवकच करीत असतात.
अलीकडेच प्रजासत्ताक दिनाच्या वेळी प्रधानसेवकांनी ‘आसिआन’ या अग्नेय आशियायी राष्ट्रसमूहाच्या दहा राष्ट्रप्रमुखांना खास आमंत्रित केले होते. काहीतरी आगळेवेगळे करुन दाखवण्याची प्रधानसेवकांना सतत हौस असते. त्याचाच हा भाग होता. नेमक्‍या यावेळेच दिल्लीत थंडीने आपला तडाखा दाखविला होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर संचलन होते व हे दहाही  राष्ट्रप्रमुख व काहीजण सपत्नीक हे संचलन पाहण्यासाठी तेथे आलेले होते.
या पाहुण्यासाठी वातानुकूलीत म्हणूच ऊबदार असा विशेष काचेचा कक्ष उभारण्यात आलेला होता कारण थंडीचा कडाका खूप होता. तरीही थंडी कुठून कशी घुसेल याचा नेम नसल्याने या सर्व अभ्यागतांना विशेष ऊबदार शाली देण्यात आल्या होत्या. या शालींमुळे त्यांना त्यांचे पायही ऊबदार ठेवणे शक्‍य होणार होते.  
सांगण्यात आले, की या सर्व सुखसोयींमागे परराष्ट्रमंत्र्यांच्या काटेकोर आयोजनाचा भाग होता. आलेल्या पाहुण्यांना कुठेही कसलीही कमतरता भासू नये यासाठी त्या तत्पर होत्याच आणि लहानसहान तपशीलाची त्यांनी काळजी घेतली होती असेही त्यांची प्रशंसा करणाऱ्यांनी सांगितले. अगदी ताजे उदाहरण! प्रधानसेवकांनी म्हणे विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी तणावमुक्त कसे रहायचे यावर एक  पुस्तक किंवा गाईडच लिहून टाकले. पण या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी कुणावर? तर परराष्ट्रमंत्र्यांवर! आता या पुस्तकाचा व परराष्ट्रमंत्र्यांचा संबंध काय ? पण काहीतरी त्यांना काम नको का? तर हे देऊन टाकलं! खरंच, असं महत्त्व त्यांना परराष्ट्र धोरण व नीती निर्मितीत दिलं तर किती चांगलं होईल ना?

सूटबूट ते बरबरी जॅकेट !
पंतप्रधानांनी त्यांचे नाव विणलेला अतिशय किमती व मूल्यवान असा कोट परिधान करुन एकदा देशभरात खळबळ उडवून दिली होती.
काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी ‘सूट बूट की सरकार’ असा प्रचार करुन भाजपला चांगलेच ‘बॅकफुट’वर नेले होते. ही त्यांची टीका वर्मी लागलेली भाजपची मंडळी राहूल गांधीही अशा मूल्यवान पोशाखात कधीतरी सापडतात काय याची वाट पहात दबा धरुन बसलेले होते. ती संधी त्यांना अलीकडेच मिळाली. ईशान्य भारतातील राज्यात निवडणुकीच्या प्रचाराला गेलेल्या राहूल गांधी यांनी एक भारी जॅकेट परिधान केलेले या दबा धरुन बसलेल्या मंडळींच्या दृष्टीस पडले. बरबरी नावाच्या जगप्रसिद्ध कंपनीचे ते जॅकेट असल्याचा दावा करुन टीका सुरू झाली. राहूल गांधी यांनी त्यांना ते जॅकेट भेट मिळाल्याचे सांगितले. परंतु त्यामागील खरा गौप्यस्फोट काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांनी केला. त्या म्हणाल्या, त्यांच्या परिचयाचा एक कपड्यांचा निर्यातदार आहे. तो अशी जाकिटे तयार करतो आणि भारतात विकतो. त्याची किंमतही कमी असते पण ती ‘बरबरी’ सारखीच असतात व ऊबदारही असतात. या जाकिटांची किंमत मात्र ७०० रुपये आहे आणि हे सांगून त्यांनी भाजपला त्यांच्या नेहमीच्या बिनाधास्त शैलीत टोला लगावताना म्हटले, ‘हे तर मेक इन इंडिया’ आहे भाजपला अभिमान वाटला पाहिजे. आणि भाजपच्या नेत्यांना अशी जाकिटे हवी असतील तर त्यांनी ऑर्डर द्यावी मी त्यांना आणखी स्वस्तात मिळवून देईन!’  झालं, मग यानंतर मंडळींचा आवाज पुन्हा शांत झाला! 

संबंधित बातम्या