आनंदीबेन यांचा ‘रंग माझा वेगळा’? 

कलंदर
गुरुवार, 15 मार्च 2018

कट्टा

राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...    –  कलंदर
 

आनंदीबेन यांचा ‘रंग माझा वेगळा’? 
आनंदीबेन पटेल यांनी मध्य प्रदेशाच्या राज्यपालपदाची सूत्रे नुकतीच हाती घेतली. तेव्हापासूनच त्यांनी त्या चाकोरीबाह्य राज्यपाल असल्याचे लोकांच्या मनावर बिंबविण्यास सुरवात केली होती. सूत्रे स्वीकारण्यासाठी त्या गुजरातहून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे गेल्या तेव्हा त्यांनी विशेष विमानसेवा नाकारली. त्याऐवजी त्यांनी चक्क एक बस भाड्याने घेतली. त्या बसमध्ये त्यांचे मित्र, नातेवाईक होते. त्यांच्याबरोबर प्रवासाची मजा चाखत आनंदीबेन यांनी भोपाळ गाठले. वाटेत उज्जैनला महाकालेश्‍वराचे दर्शन घेण्यासही त्या चुकल्या नाहीत. 

भोपाळला गेल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांचा शपथविधी होता. त्यांनी सरकारी लवाजमा असलेला मोटारींचा ताफा नाकारला व एका मोटारीतून त्या शपथविधीसाठी राजभवनावर पोचल्या. त्यांच्या या चाकोरीबाह्य आचरणाने मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या पोटात गोळा उठला असल्याचे सांगतात. कारण चौहान यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत रामनरेश यादव, बलराम जाखड असे बिगर भाजपनेते राज्यपाल असूनही त्यांच्याबरोबर उत्तम संबंध राखलेले होते. परंतु आनंदीबेन यांचा रागरंगच वेगळा असल्याचे त्यांना जाणवू लागल्याने ते अस्वस्थ असल्याचे सांगतात. राज्यपाल म्हणून त्यांनी स्वतंत्ररीत्या कामकाज पाहण्याचे तंत्र आरंभले आहे. त्यामुळेही शिवराजसिंग अस्वस्थ आहेत. ज्याप्रमाणे त्यांनी आधीच्या राज्यपालांची मने जिंकली होती तसे प्रयत्न त्यांनी केले पण आनंदीबेन त्यांना दाद देत नसल्याचे सांगतात. 

नुकत्याच त्या दिल्लीला आल्या होत्या. मध्य प्रदेश भवनमध्ये त्या उतरल्या होत्या. शिवराजसिंगांनी त्यांची विशेष बडदास्त ठेवण्याचे आदेश दिलेले होते. आनंदीबेन यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी लक्षात घेऊन मध्य प्रदेश भवनचे खानसाम्यांनी गुजरात भवनातील बल्लवाचार्यांशी संपर्क साधला. आनंदीबेन या पूर्वी मुख्यमंत्री असल्याने गुजरात भवनातील खानसाम्यांना त्यांच्या आवडीनिवडींची कल्पना असेल असे गृहीत धरून हा संपर्क करण्यात आला होता. आवश्‍यकता भासल्यास काही स्वयंपाकी उधारीवर बोलावण्याचेही ठरविण्यात आल्याचे कळले. परंतु आनंदीबेन यांनी खाण्यापिण्याबाबत कोणतेच वेगळेपण दाखवले नसल्याचे समजते. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.   

रामायणाचे महाभारत! 
ललित नावाच्या नियतकालिकात जयवंत दळवी हे ‘ठणठणपाळ’ या टोपणनावाने लिखाण करीत. मिस्कील, खुमासदार व चुरचुरीत शब्दांत टोप्या उडवण्याचा प्रकार ते करीत. अत्यंत लोकप्रिय झालेले ते सदर होते. थोर समीक्षक प्रभाकर पाध्ये यांनी त्याची समीक्षा करताना, ‘दळवींचा विनोद हा निर्विष असतो’ असे म्हटले होते. 

ही फार मोठी पावती दळवींच्या विनोदाला होती. 
खरेही आहे. विनोदाचे अनेक प्रकार असले तरी निर्भेळ, निखळ आणि जिव्हारी न लागणारा विनोद हा खरा असतो. अन्यथा जहरी विनोदही असतात व ते वर्मीही लागतात. अलीकडेच राज्यसभेत काँग्रेसच्या सदस्या रेणुका चौधरी या प्रधानसवेकांच्या भाषणाच्या वेळी त्यांच्या काही ‘जुमल्यां’वर मुद्दाम मोठ्याने उपहास व उपरोधाने हसल्या. खरे तर त्याची दखल घेण्याचीही गरज नव्हती. परंतु, विनोदाचे वावडे असलेले लोक विलक्षण असतात. पीठासीन अधिकाऱ्यांनीच रेणुका चौधरी यांना चापले आणि काही त्रास होत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या असे सुचवले. त्यावर प्रधानसेवकांनी भर घातली, की पूर्वीच्या रामायण मालिकेनंतर इतक्‍या वर्षानंतर प्रथमच त्यांना असे हास्य ऐकायला मिळाले तेव्हा रेणुका चौधरींना रोखू नका, असे त्यांनी सभापतींना सुचवले. खरे तर हा प्रसंग येथे संपायला हवा होता. परंतु, चाटुकारांची जातकुळी वेगळीच असते. 

गृहराज्यमंत्री किरण रिजिजु यांनी रामायणातील संबंधित प्रसंग (राक्षसीण शूर्पणखा व तिचे विकट हास्य) आणि रेणुका चौधरी यांची एकत्रित चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित केली. 

झाले! मग काय विनोदाचे रूपांतर भांडणात झाले. पार, रिजिजु व पंतप्रधानांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस देण्याच्या इशाऱ्यापर्यंत गोष्ट गेली. हे प्रकरण आणखी किती विकोपाला जाणार हे पाहावे लागेल. 
पण याचा पूर्वेतिहासही आहे.  

फ्लॅशबॅक 
राजीव गांधी यांच्या काळात रेणुका चौधरी तेलगू देशममध्ये होत्या. बोफोर्सचा मामला होता. त्याकाळात तेलगू देशमचे नेते एन. टी. रामाराव होते. त्यांचा काँग्रेसवर विशेष राग होता व तेच विरोधी पक्षांचे नेतृत्व करीत होते. या काळात रेणुका चौधरी राज्यसभेतच होत्या. त्यावेळीही त्या आजच्यासारख्याच आक्रमक असायच्या. पण काँग्रेसच्या विरोधात! त्या काँग्रेसवर आवेशाने तुटून पडत असत. तेव्हा काँग्रेसमध्ये एक ‘शाऊटिंग ब्रिगेड’ होती. कोणी विरोधी सदस्य काँग्रेस व राजीव गांधी यांच्या विरोधात बोलायला लागताच ही ब्रिगेड त्या सदस्यावर ओरडून गोंधळ करून त्यांना गप्प करीत असे. रेणुका चौधरी या आक्रमक असल्याने व महिला असल्याने कधीकधी या ब्रिगेडलाही माघार घ्यावी लागत असे. तेव्हा या ब्रिगेडचे नेते रत्नाकर पांडे आणि इतर सदस्य रेणुका चौधरी यांना ‘ओ शूर्पणखा’ असे म्हणत असत! रेणुका चौधरी आज काँग्रेसमध्ये आहेत. काळाचे चक्र बदलले आहे. आता भाजपचे नेते त्यांना या नावाने संबोधत आहेत.

काळाचा महिमा! 

पक्षाध्यक्षांचा रुबाब
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे राज्यसभेत आल्यापासून भाजपच्या संसदीय पातळीवरही बरेच बदल झाले आहेत. हे अधिकृत नसले तरी सूक्ष्म आहेत. मागोवा ठेवणाऱ्यांच्याच ध्यानात येतील असे आहेत. 

अमितभाई जेव्हा वेळ मिळेल तेव्हा किंवा भोजनाची सुटी झाल्यास संसदेच्या सेंट्रल हॉल ऊर्फ मध्य कक्षात येऊन काही काळ व्यतीत करतात. यावेळी ते प्रामुख्याने पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करतात. आता ते चांगलेच रुळले आहेत. मात्र काळी कॉफी व हलके स्नॅक्‍स याखेरीज ते काही आहार घेताना आढळत नाहीत. याचा अर्थ ते उपवास करतात का? - नाही! 

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या संसदीय कार्यालयात (खोली क्र.६) ते भोजनासाठी जातात. तेथे अत्यंत घरगुती व साधे असे भोजन त्यांच्यासाठी तयार असते. भोजनाबरोबरच ते पक्षाची कामे करीत असतात किंवा कुणाला भेटायची वेळ दिलेली असेल तर गोयल यांच्या कार्यालयातच ते भेटतात. त्यांच्यासाठी वेगळी खोली नसल्याने त्यांनी संसदेत गोयल यांच्या कार्यालयातून काम करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळेच एकेकाळी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यामागे सावलीसारखे असणारे गोयल आता अमितभाईंच्या मागे सावलीसारखे असतात. गोयल नसतील त्यावेळी खासदार भूपेंद्र यादव किंवा कधी अजय संचेती ही मंडळी अमितभाईंची सावली होतानाही आढळतात.

अलीकडे ‘पकोडेवाला’ आणि ‘रोजगार’ असा जो नवा वाद निर्माण झाला त्यासंदर्भात एका माजी काँग्रेस खासदाराने अमितभाईंना विनोदाने संसदेतही पकोडे सुरू करा असे सुचवले. पण, अमितभाईंना तो विनोद रुचलेला नसावा. दुसऱ्या दिवशी या खासदाराने त्यांना अभिवादन केल्यावर अमितभाईंनी त्यास प्रतिसाद देण्याचेही टाळले. गेल्या आठवड्यात तर अमितभाईंनी संसदेचे कामकाज उशिरापर्यंत चालत असल्याने पक्षाची बरीच कामे संसदेतूनच केली. काही नेमणुकांच्या घोषणादेखील त्यांनी येथूनच केल्या. 

अमितभाईंचा दबदबा दिवसेंदिवस वाढतानाही दिसतो. 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सर्वसाधारणपणे सत्तापक्षाचे सभागृहातील नेते असलेल्या व्यक्तीस बोलण्याची संधी दिली जाते. परंतु यावेळेस ती संधी अमित शहा यांना देण्यात आली. अर्थमंत्री अरुण जेटली हे अद्याप सभागृहाचे नेते आहेत परंतु अमित शहांच्या आगमनानंतर परिस्थिती बदलताना दिसून येते. आसनव्यवस्थेनुसार जेटली व पंतप्रधान एका बाकावर बसतात. परंतु त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या आसनावर अमित शहा यांना जागा देण्यात आली आहे. 

आता जेटली यांची राज्यसभेची मुदत संपत आलेली आहे. त्यांना पुन्हा राज्यसभेत आणण्यात येईल. परंतु आता जेटली यांचा रुबाब पूर्वीचा राहिलेला नाही हे स्पष्ट होताना दिसू लागले आहे.   

सत्तापक्षाचा कित्ता गिरवा
अचानकपणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व संसदीय पक्ष प्रमुख सोनिया गांधी यांचे गेल्या आठवड्यात संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आगमन झाले. सर्वांना आश्‍चर्य वाटणे स्वाभाविकच होते. पण गांधी कुटुंबीय कोणतीही गोष्ट, कृती उगाचच आणि विनाहेतु आणि विना-योजना करत नसतात. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा संसदेच्या अधिवेशन काळात जवळपास दररोजच सेंट्रल हॉलमध्ये येऊन पत्रकार आणि पक्षाच्या खासदारांबरोबर वार्तालाप करीत असतात. हा लोकसंपर्क असतो व यातून पक्ष-प्रतिमेबाबत, वैयक्तिक त्यांच्या प्रतिमेबाबत जे काही समज-अपसमज तयार झालेले असतात ते दूर होण्यास मदत होत असते. हा एक उत्तम लोकसंपर्काचा मार्ग व माध्यम मानले जाते. विशेषतः राजकीय वर्तुळात सेंट्रल हॉलचे माहात्म्य हे लोकसंपर्काच्या दृष्टीने विशेष मानले जाते. आता सत्तापक्षाचे असूनही अमित शहा जर सेंट्रल हॉलमध्ये वेळ व्यतीत करीत असतील तर विरोधातील पक्षांनी मागे राहून कसे चालेल?
तसे अधूनमधून मुलायमसिंह येतात, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील अधिवेशनकाळात दिल्लीची एक वारी तरी हमखास करतात आणि त्यामध्ये सेंट्रल हॉल आणि तेथील वार्तालाप न चुकता करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्‍सवादी नेते सीताराम येचुरी, बहुजन समाज पक्षाचे सतीश मिश्रा, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, भाजपचे मुरली मनोहर जोशी हेही न चुकता येथे हजेरी लावत असतात. तर अमित शहांच्या या संपर्काची माहिती बहुधा काँग्रेसच्या गोटात पोचलेली असावी. लगेचच शहांचा कित्ता गिरवण्याची योजना आखून त्यावर तामिली करण्यात आली. सोनिया व राहुल आले आणि त्यांनी कॉफी, टोस्ट व ढोकळा यांचा आस्वाद घेतला. अनौपचारिक गप्पाही मारल्या. अर्धा तास व्यतीत करून ते परतले. जाताना काही पत्रकारांनी सोनिया गांधी व राहुल यांना वारंवार अशा भेटी देण्याचे सुचविले. सोनिया गांधी यांनी ‘हो, म्हणूनच आम्ही आज आलो’ असे म्हटले. पण पत्रकारांनी पुन्हा त्यांना ‘वारंवार, नियमित येत जा’ अशी आठवण करून देताच त्यांनी त्यास होकार दिला व काढता पाय घेतला. 

सत्तापक्षाच्या पावलावर पाऊल टाकणे की कित्ता गिरवणे? 
पण विरोधात गेल्यावर काँग्रेसनेत्यांना कोषाबाहेर येण्याची सुबुद्धी झाली हे काय कमी! 

संबंधित बातम्या