थाप मारून थापाड्या गेला...

कलंदर
शुक्रवार, 16 मार्च 2018

कट्टा

राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...    –  कलंदर
 

तुम्हाला परदेशात जायचे असेल तर पासपोर्ट, व्हिसा, विमानाचे तिकीट या तीन प्रमुख गोष्टी लागतात. या तिन्ही गोष्टींसाठी तुमचे सर्व वैयक्तिक तपशील द्यावे लागतात. विमानतळावर तुमचा पासपोर्ट, व्हिसा व तिकीट तपासले जाते. परदेशात जायचे असल्याने त्याची तशी नोंदही केली जाते. म्हणजेच, तुम्ही कोणत्या देशात, कोणत्या शहरात जाणार याची पूर्ण माहिती सरकारी दस्तावेजात नोंदलेली असते. तरीसुद्धा नीरव कुठे गेला याचा पत्ताच नसल्याचे सांगून वर्तमान सरकार चक्क कानावर हात ठेवू लागले आहे की हो ! परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने तर हे काम आमच्या मंत्रालयाचे नाही, तपास संस्थांना विचारा म्हणून हात झटकले !

तर मित्रों... पंजाब नॅशनल बॅंकेला ११ हजार ४०० कोटी रुपयांना गंडा घालून परागंदा झालेल्या नीरव मोदीच्या सुरस कथा चवीने चर्चिल्या जाऊ लागल्या आहेत.
‘नीरव’ म्हणजे आवाज-ध्वनिविरहित अवस्था ! आपण नीरव शांतता म्हणतो ते याच अर्थाने !

तर हा नीरव इतक्‍या शांतपणे पळूनच कसा गेला ?
नीरवच्या पलायनाच्या निमित्ताने अनेक किस्से सोशल मीडियावर प्रसारित होऊ लागले आहेत.
परंतु सरकार हादरले आहे असे दिसून येऊ लागले आहे.

या वादग्रस्त प्रकरणी सरकारची बाजू मांडण्यासाठी भाजपने साक्षात संरक्षणमंत्र्यांनाच पाचारण केले. संरक्षणमंत्री देशाचे आहेत की पक्षाचे व सरकारचे असा प्रश्‍न पडत आहे.
इतर वेळा स्वतःची फुशारकी - बढाई मारण्यासाठी ट्‌वीटरवर ज्यांची बोटे सतत शिवशिवलेली असतात त्यांची बोटे अचानक निष्क्रिय झालेली आढळत आहेत.
संरक्षणमंत्र्यांना बहुधा इतर कोणती कामे नसावीत त्यामुळे त्यांना सरकारचे संरक्षण करावे लागत आहे.
या घोटाळ्याचा थेट संबंध पोचतो ते अर्थखाते मूक-मौन झाले आहे.
अर्थमंत्री दोन दिवसांच्या सौदी अरबस्तानच्या दौऱ्यावर निघून गेले.
त्यांचे अधिकारीही मुके झाले आहेत. नीरवाने प्रधानसेवकांपासून सर्वांनाच नीरव करून टाकले आहे!

शू....! नाव घेण्यास मनाई आहे!
या   नावामुळे भाजपच्या मंडळींची फारच पंचाईत झालेली आहे.
याआधी आयपीएल घोटाळ्यात अडकलेल्याचे नाव ललित मोदी.
बिहारमधील सृजन घोटाळ्यात ज्यांच्याकडे संशयाची सुई रोखली गेली ते उपमुख्यमंत्री सुशील मोदी. आता पंजाब नॅशनल बॅंकेला गंडा घालणाराही नीरव हा मोदीच निघावा ??
हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर भाजपतर्फे तीन केंद्रीय मंत्र्यांना बचावासाठी तैनात करण्यात आले होते.

कायदामंत्री रविशंकर प्रसाद, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन! या मंडळींना या पैशाचा अपहार केलेल्या नीरव मोदी याचे नाव घेताना अडचण होत होती. कारण त्यांचे सर्वेसर्वा नेते देखील नरेंद्र मोदीच आहेत. त्यांना नुसते ‘मोदी’ म्हणण्याची सवय नाही. ‘मोदीजी’ म्हणूनच त्यांना संबोधले जाते.

वाणी व जिव्हेला इतकी सवय झालेली आहे की भाजपच्या मंडळींच्या तोंडात ‘मोदी’ नाव येताच आपोआपच पुढे ‘जी’ लावले जाते. आता नीरव मोदीच्या पुढे ‘जी‘ लावले गेले असते तर ? मीडियाने तत्काळ पकडले असते.
जावडेकरांची तर एवढी पंचाईत झाली की त्यांनी एकदा नीरव मोदीचा उल्लेख ‘नीरव शहा’ असा केला. त्यावर एकच हशा झाला. कानावर उडत उडत आलेल्या माहितीनुसार या घोटाळ्याबाबत मीडियाशी बोलताना शक्‍यतोवर मोदी हे नाव टाळण्याच्या सूचना प्रवक्‍त्यांना देण्यात आल्या होत्या म्हणे !

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याला नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द करण्याच्या संदर्भात पत्रकारांनी प्रश्‍न केल्यावर त्याने हुशारीने नीरव मोदीचे नाव घेण्याचेच टाळले. त्याऐवजी त्याने नीरव मोदीचा उल्लेख इंग्रजीत ‘दॅट जंटलमन’, ‘द. जंटलमन इन क्वेश्‍चन’ असा करून वेळ मारून नेली.
शेक्‍सपिअरने ‘नावात काय असते’ असे वचन अजरामर करून ठेवले. पण येथे मात्र नावातच सर्व काही असल्यासारखे मानून केवळ नामसाधर्म्यामुळे त्याचे नाव घेणे टाळण्याचे उद्योग सुरू आहे.
आपण फार विरक्त आहोत असे दावे करणाऱ्यांना या गोष्टी कितपत शोभतात ??

तळमळती अंतरात...
व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाले खरे, पण अद्याप त्या नव्या भूमिकेशी जुळवून घेण्यात त्यांना यश आलेले नसावे! हे निरीक्षण त्यांच्याच पक्षातील काहीजणांचे आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती म्हणून व्यंकय्या नायडू यांची तार-सूर जुळताना आढळत नाही. अद्याप ते अवघडल्यासारखे वावरतात असे त्यांना रोज पाहणाऱ्यांचे मत आहे. राज्यसभेचे संचालन करताना सभापती या नात्याने संयम, सहनशीलता, लवचिकता दाखविणे अपेक्षित असते. परंतु व्यंकय्या यांना त्यात अडचण येत असावी असे समजते. नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात तेलगू देशम पक्षाच्या सदस्यांनी शेवटचे दोन-तीन दिवस गोंधळ घालून कामकाज बंद पाडले होते. यामुळे नायडू खूपच अस्वस्थ झाले होते. असे समजले की एके दिवशी नायडूंनी हे सदस्य गोंधळ घालत असतील तर ते सभागृहातच जाणार नाहीत असा पवित्रा घेतला. सगळ्यांचेच धाबे दणाणले. अखेर दादापुता करून त्यांना सभागृहात जाण्यासाठी पटविण्यात आले. असे सांगितले जाते की नायडूंना खरा रस होता तो राष्ट्रपतिपदात. प्रत्यक्षात लॉटरी लागली रामनाथ कोविंद यांची! त्यानंतर नायडू यांना उपराष्ट्रपतिपदात रस उरला नव्हता पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि त्यांना उपराष्ट्रपतिपदासाठी काहीसे जबरदस्तीनेच उभे करण्यात आले. आता अशा मनाविरुद्ध झालेल्या गोष्टींचा त्रास होणारच ना ? मग त्याचा राग, नाराजी ही अशी बाहेर निघत राहते. एका भाजपच्या नेत्याने या प्रकारावर चपखल टिप्पणी केली, ‘नायडू जी उपराष्ट्रपती तो बन गये मगर एन्जॉय नही कर पा रहे है !’

आता नायडूंना ‘रायसीना हिल’वर म्हणजेच राष्ट्रपतिभवनात प्रवेश करण्यासाठी वाट पहावी लागेल. त्यात २०१९मध्ये भाजपचे बहुमत गेल्यास त्याचीही शाश्‍वती नसेल ! तर बिचाऱ्या नायडूंना प्रतीक्षेतच राहावे लागेल अशी चिन्हे दिसतात ! 

नीतीशबाबू पेचात?
रंगबदलू नीतिशकुमार यांना अडचणी भेडसावू लागल्या! सध्या देशभरात सत्तापक्ष व सत्तापक्षाचे वरपासून खालपर्यंतचे नेते यांच्या विरोधात नाराजी वाढताना दिसू लागली आहे. राजस्थानात तीन पोटनिवडणुकांद्वारे जनतेची नाराजी तीव्रतेने प्रकट झाली. त्यामुळे सत्तापक्ष व सत्तापक्षाच्या नीतीशकुमारांसारख्या बांडगुळांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होणे स्वाभाविकच आहे. बिहारमध्ये अररिया लोकसभा मतदारसंघात व अन्य दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या तिन्ही जागा राष्ट्रीय जनता दलाशी संबंधित आहेत. या पक्षाचे खासदार तस्लिमुद्दिन यांच्या निधनामुळे अररिया लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. अन्य दोन विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रीय जनता दलाचेच उमेदवार होते. तर, आता सत्तारूढ पक्ष या नात्याने आणि विधानसभेच्या दोन जागा व लोकसभेची एक जागा लालूप्रसाद यांच्याकडून हिरावून घेण्यासाठी मुख्यमंत्री नीतीशबाबू प्रयत्न करतील असे अपेक्षित होते. पण...... !

नीतीशबाबूंमध्ये या जागा लढण्याची हिंमत होत नसल्याचे आढळून येत आहे. या जागांवर आधीच्या निवडणुकीत संयुक्त जनता दलाचे उमेदवार नव्हते व निवडणूक समझोत्यात त्या जागा राष्ट्रीय जनता दलाकडे होत्या, तसेच त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या निधनाने त्या रिक्त झालेल्या असल्याने तेथे उमेदवार देणे उचित ठरणार नाही अशी अत्यंत मानभावी भूमिका नीतीशाबूंनी घेतलेली आहे. त्यामुळेच या जागा न लढण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाने जाहीर केला. पण आता ज्या भाजपशी त्यांनी पाट लावला आहे त्या भाजपने मात्र नीतीशबाबूंच्या मागे या जागा लढविण्यासाठी लकडा लावण्यास सुरवात केली आहे. भाजपने ‘तुम्ही लढा, तुम्ही लढा’चा धोशा लावल्याने नीतीशबाबू वैतागले आहेत. त्यांना पूर्ण खात्री आहे की या पोटनिवडणुका लढल्यास त्यांची हार पक्की आहे. परिणामी भाजप  त्यांच्यावर आणखी शिरजोरी करण्यास सुरवात करील ही भीती त्यांना भेडसावत आहे. त्यामुळेच त्यांनी अगदी मोठा आव आणून निधनाने रिकाम्या झालेल्या जागा लढविणे उचित नसल्याची भूमिका घेतली आहे. प्रत्यक्षात भाजप आणि नीतीशबाबूंचा पक्ष दोघांचीही या पोटनिवडणुका लढण्याची हिंमत होत नाहीये हे वास्तव आहे.
बघूयात, काय होते ते ! गंमतच गंमत ! 

सोनिया गांधींचे आता चाललंय काय? 
काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा चिरंजीव राहुल यांच्याकडे सोपविल्यानंतर सोनिया गांधी यांनी काही काळ आपल्या अतिव्यग्र, अतिव्यस्त वेळापत्रकाला काहीसा फाटा दिला असल्याचे समजते. 
काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी सोडलेले असले तरी युपीएच्या त्या अद्याप अध्यक्षा आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेस संयुक्त संसदीय पक्षाच्याही त्या अध्यक्षा आहेत. परंतु तरीही त्यांनी आता काहीसा आराम करण्याचे ठरविलेले दिसते. 

अलीकडे त्या त्यांच्या काही आवडत्या छंदांकडे वळल्या आहेत. विशेषतः राजधानीत विविध ठिकाणी भरण्यात येणारी चित्रप्रदर्शने, शिल्पकला-हस्तकला प्रदर्शने यांना त्या भेटी देताना आढळतात. त्याचप्रमाणे साड्यांच्या दुकानांनाही त्या भेट देतात. याखेरीज त्या त्यांच्या काही आवडत्या भारतीय भोजनगृहांनाही भेटी देऊ लागल्या आहेत. येथील डिफेन्स कॉलनीतील सागररत्न हे त्यांचे दाक्षिणात्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेले उपाहारगृह आवडते आहे. त्या, राहुल, प्रियंका तेथे जात असतात. आता सोनिया गांधी यांना इतर काही विशेष उपाहारगृहात जाण्यासही वेळ मिळू लागल्याचे सांगितले जाते. त्यांनी आता राजकीय किंवा पक्षाच्या नेत्यांना भेटण्याचा कार्यक्रम जवळपास थांबवल्यात जमा आहेत. कुणी आग्रह केलाच तर ‘राहूलजींशी बोला’ म्हणून त्या सल्ला देतात.  याच मालिकेत अलीकडे त्यांच्या ‘१० जनपथ’ या निवासस्थानी राजकीय मंडळींपेक्षा त्यांच्या मित्रमंडळींचा, कुटुंबाशी संबंधित नातेवाईक व मित्रांचा राबता वाढू लागला आहे. अंतःस्थ गोटातील माहितीनुसार अलीकडे सायंकाळी या मंडळींबरोबर बिगर राजकीय व अवांतर गप्पांचा अड्डा असतो आणि जोडीला गरमागरम चहा व अन्य चविष्ट खाद्यपदार्थांची संगतही असतेच !    

संबंधित बातम्या