डिग्गीराजाची पुढची योजना काय?

कलंदर
मंगळवार, 20 मार्च 2018

कट्टा    
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...

डिग्गीराजा म्हणजे आपले दिग्विजयसिंह! काँग्रेसचे नेते. मध्य प्रदेशाचे सलग दोनदा मुख्यमंत्री राहिलेले! आपल्या बोलघेवड्या व वाचाळपणाबद्दल आणि सातत्याने वादग्रस्त विधाने करण्याबद्दल ते ख्यातीप्राप्त आहेत.

आपल्या विधानांमुळे ते प्रकाशझोतात राहतात पण पक्ष मात्र वादामध्ये झाकोळून जातो. पण त्यांना त्याची पर्वा नसते. त्यांच्या या वक्तव्यांमुळे पक्ष हैराण होणे स्वाभाविकच आहे. तर अशा या दिग्विजयसिंह यांनी गेल्या वर्षी १ ऑक्‍टोबरपासून ३३०० किलोमीटर लांबीची नर्मदा परिक्रमा यात्रा सुरू केली. हो सपत्नीक! या यात्रेदरम्यान कोणतेही जाहीर राजकीय वक्तव्य न करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली. तिचे पालनही ते करीत आहेत. (आतापर्यंत). तर, आता त्यांची नर्मदा परिक्रमा जवळजवळ अखेरच्या टप्प्यात आली आहे. 

एप्रिलमध्ये ती पूर्ण होणे अपेक्षित आहे. या ३३०० किंवा ३५०० किलोमीटर अंतरात त्यांचा मध्य प्रदेशातील २३० पैकी ११० विधानसभा मतदारसंघांशी थेट संपर्क आला. त्यांना प्रतिसादही चांगला मिळाला अशा बातम्या आल्या आहेत.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक या वर्षअखेरीस किंवा जास्तीत जास्त जानेवारी २०१९ला सुरवातीलाच होणे अपेक्षित आहे. या गोष्टी लक्षात घेतल्यास दिग्विजयसिंह यांच्या नर्मदा परिक्रमेचा हेतू आध्यात्मिक होता की राजकीय याचा अंदाज शहाणी मंडळीच लावू शकतील. पण काँग्रेस पक्षात त्यांच्या संभाव्य योजनांबद्दल तर्क-कुतर्क लढविले जाऊ लागले आहेत. काहींच्या मते राहुल गांधी यांच्या नव्या टीम मध्ये त्यांना पुरेसे महत्त्व व स्थान न मिळाल्यास ते स्वतःचा प्रादेशिक पक्ष काढतील. हा एक नवाच ‘अँगल’ चर्चिला जाऊ लागला आहे. त्यांनी असे केलेच तर भाजपमध्ये तर हर्षोल्लास होईल. कारण याचा सरळसरळ फायदा भाजपला होईल. सध्या मध्य प्रदेश, राजस्थानात भाजप विलक्षण बचावाच्या पवित्र्यात आहे आणि आगामी निवडणुकीत पक्षाला दणका बसण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दिग्विजयसिंह यांच्या संभाव्य राजकीय हालचालींवर अतिशय बारीक नजर ठेवली जात  आहे.

समाजसेवक आणि संघाची हातमिळवणी?
कुजबूज वर्तुळातून कानोकानी आलेली ही माहिती आहे. केंद्रात सत्तारूढ असलेल्या वर्तमान राजवटीच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक मार्च महिन्याच्या तिसऱ्या किंवा अखेरच्या आठवड्यापासून आंदोलन पुकारणार असल्याच्या बातम्या प्रसारित झालेल्याच आहेत.
त्यासंदर्भातच पुढे आलेली ही माहिती आहे. तुम्हाला आठवतच असेल की ज्येष्ठ समाजसेवकांनी पूर्वी युपीए सरकारच्या अखेरच्या काळात असेच आंदोलन केले होते. त्या आंदोलनात डबलश्री महाराज, रा.स्व.संघ, संघप्रणीत संस्था व संघटना यांनी हिरिरीने भाग घेतला होता.
सत्तेत येण्यासाठी ते प्रयत्न होते. त्यात संघपरिवार यशस्वी झाला.
आता म्हणे हातात आलेली सत्ता टिकवण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवकांच्या आगामी आंदोलनाचा उपयोग करून घेण्याची योजना संघाने आखली आहे.

ज्येष्ठ समाजसेवकांसाठी भ्रष्टाचार व तोही उच्च वर्तुळातला, हा अत्यंत प्रिय विषय आहे.

सामान्य लोकांना हरघडी व पावलागणिक लाच देऊन खालच्या पातळीवर कामे करून घ्यावी लागतात ते मुद्दे उपस्थित करण्याची आणि सामान्यजनांना दिलासा व न्याय देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक कधी पुढे सरसावत नाहीत.

त्यांनाही प्रसिद्धी व प्रकाशझोताची चटक लागली असावी. त्याचा फायदा संघासारख्या संघटनांनी न उठवला तरच नवल!

तर या आगामी आंदोलनातही संघ आपली ताकद ओतणार आहे.

त्याला मिळणारा तो ‘सुनियोजित’ प्रतिसाद मोठाच असणार कारण सुपारी दिलेल्या वाहिन्या त्याचे थेट प्रसारण करणारच असतील.

हा प्रतिसाद पाहून मग ‘प्रधान सेवक’ विरघळणार! ते स्वतःच ज्येष्ठ समाजसेवकांच्या पायाशी जाणार. आशीर्वाद घेणार. आधीच्या सरकारने असा प्रतिसाद दिला होता काय ? अशी विचारणा करणार आणि मग काय झिलकरी जनता ‘हर हर, घर घर’च्या घोषणांनी देश दुदुमवून टाकणार!

व्वा, पहा राज्यकर्ते कसे संवेदनशील आहेत असे सर्टिफिकेट मिळाल्यावर त्याच्या आदर मतांचा जोगवा मागायला ते रिकामे! ज्येष्ठ समाजसेवकही मग पुन्हा रिकामे!

असे सांगतात की ज्येष्ठ समाजसेवकांच्या कोअर ग्रुपमध्ये संघाच्या काही अतिशय कर्मठ माणसांनी प्रवेश केला आहे. कुणीतरी एक व्यक्ती तर म्हणे ‘सनातन’शी देखील संबंधित आहे. पण ज्येष्ठ समाजसेवकांचे आगामी आंदोलन व सत्तारूढ राजवट यांचा अंतःस्थ काहीतरी संबंध असावा या अटकळीस दुजोरा देणारी एक घटना घडत आहे. कारण अचानकपणे केंद्र सरकारने लोकपाल नियुक्तीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. चार वर्षे प्रधान सेवकांना वेळ मिळाला नव्हता आणि आता अचानक त्यांना लोकपालाची आठवण झाली आहे. त्यामुळेच त्यांनी सर्व संबंधितांची बैठक बोलावून विचारविनिमय सुरू केला आहे. काहीतरी शिजतंय हे खरं!

आग असल्याखेरीज धूर निघत नाही!

मुख्यालय लाभणार?
पूर्वीची गोष्ट आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी मोठ्या हौसेने राजेंद्र प्रसाद मार्गावर जवाहरलाल नेहरू भवन उभारले. या वास्तूत काँग्रेसचे मुख्यालय हलविण्याची त्यांची योजना होती. पण...... ! 

या वास्तूचे वाजतगाजत उद्‌घाटन झाल्यानंतर लगेचच १९८९च्या लोकसभा निवडणुका झाल्या आणि राजीव गांधी पराभूत झाले. ही वास्तू लाभकारक नसल्याने काँग्रेसचे मुख्यालय मूळ जागी २४ अकबर मार्गावर कायम राहिले. 

जुने ते सोने!
भाजपच्या नव्या आलिशान व भव्य अशा मुख्यालयाचे नुकतेच उद्‌घाटन झाल्यानंतर भाजपमधील काही मंडळींच्या मनात या योगायोगाच्या शंका व पाली चुकचुकू लागल्या आहेत. 

१९८९ची पुनरावृत्ती तर होणार नाही?
उद्‌घाटनाच्या दिवशी संगमरवरी शिलेवरील पडदा रिमोटने दूर करण्यासाठी प्रधान सेवकांनी बटण दाबले पण केवळ एकाच बाजूचा पडदा दूर झाला. 

दुसरीकडचा अर्धा झालाच नाही. अखेर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी हाताने तो दूर सारला आणि मग उद्‌घाटन जाले. पण त्या एका प्रसंगाने अनेकांना तो शकुन चांगला नसल्याचे जाणवू लागले आहे.

दरम्यान, भाजपच्या कार्यालयाजवळच काही अंतरावर असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयाच्या बांधकामानेही आता जोर पकडलेला आहे...

बहुधा या वर्षाच्या अखेरीपर्यंत ते पूर्ण होऊन हा पक्षही नव्या वास्तूत स्थलांतरित होण्याचे स्वप्न पाहू लागला आहे. 

भाजपच्या कार्यालयाचा पत्ता ६ दीनदयाळ उपाध्याय मार्ग असा आहे आणि तो त्यांना फारच शुभशकुनी वाटतो कारण त्यांच्या संस्थापकांच्या नावाचाच तो रस्ता आहे. पण काँग्रेसला मात्र त्यात अडचण वाटल्याने त्यांनी त्यांचे मुख्य प्रवेशद्वार विरुद्ध दिशेला म्हणजे कोटला म्हणून भाग आहे 
तेथे केले आहे. त्यामुळे काँग्रेसचा पत्ता कोटला मार्ग असा झाला आहे. 
अंधश्रद्धेला सीमा नसते !
भारत महान!

मौन सोडून ते बोलले
पंतप्रधान मनमोहनसिंग हे फारसे बोलके नेते नाहीत. बोलघेवडेपणा त्यांना जमत नाही. पण जेव्हा बोलतात तेव्हा तोलून मापून, मोजके आणि नेमके बोलतात.
राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच काँग्रेस कार्यकारिणीची म्हणजे हंगामी सुकाणू समितीची बैठक झाली. अध्यक्ष या नात्याने राहुल गांधी यांची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत बोलताना मनमोहनसिंग यांनी पक्षाला नव्या व 
बदलत्या सामाजिक परिस्थितीची दखल घेऊन शहरी भाग व 
शहरी समाजाला योग्य ते महत्त्व देण्याची आवश्‍यकता व्यक्त 
केली.

शहरीकरणाची गति वाढत असताना शहरी वर्गाची दखल घेणे, त्यांच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंबही पक्षात असणे व त्यांच्या मुद्यांनाही पक्षाच्या ध्येयधोरणात समाविष्ट करणे गरजेचे आहे असे सिंग यांनी सांगितले आणि त्यानुसार नव्या नेतृत्वाखालील नव्या पक्षाने धोरणे आखावीत असे सुचवले.
काँग्रेस पक्षाने देशात आर्थिक सुधारणांचे युग सुरू केले आणि त्याचा फायदा शहरी वर्गाला कसा झाला याची असंख्य उदाहरणे आहेत आणि पक्षाने त्याचा प्रचार करण्याची गरज आहे असा सल्लाही सिंग यांनी दिला. सिंग यांच्या सूचनेचे सर्वांनीच स्वागत केले.

राहुल गांधी यांनी देखील या कर्त्यासवरत्या नेत्याच्या सल्ल्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
परंतु याच बैठकीत मावळत्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी सहज काढलेल्या उद्‌गारांमुळे मात्र बैठकीचे वातावरण काहीसे तंग झाले किंवा त्या विधानामुळे अनेकांच्या पोटात गोळा उठण्याची भावना झाल्याचे मानले जाते. बैठकीत आल्यानंतर सर्वांकडे पाहून सोनिया सहजपणे उद्‌गारल्या, ‘अरे, सर्व जुनीच मंडळी दिसत आहेत!’

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कार्यकारिणी विसर्जित करून तिचे रूपांतर हंगामी सुकाणू समितीत केले आहे. काँग्रेसच्या आगामी महाअधिवेशनात नवी कार्यकारिणी निवडणुकीने निवडण्याचे राहुल गांधी यांच्या मनात असल्याचे समजते. त्यामुळे अनेक वरिष्ठांचे धाबे दणाणणे स्वाभाविक आहे. तसेही अनेक वरिष्ठ नेते आता गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांनी तशी मानसिक तयारी पण केलेली आहे.

पण सोनिया गांधी यांनी सहज म्हणून काढलेल्या उद्‌गारांमुळे बैठकीतले वातावरण तंग होऊन गेलं.

संबंधित बातम्या