राजीव शुक्‍लांची विकेट पडली

 कलंदर
गुरुवार, 22 मार्च 2018

कट्टा

काँग्रेसचे राजीव शुक्‍ला यांना यावेळी राज्यसभेची उमेदवारी मिळू शकली नाही.
त्यांच्यासाठी सोनिया गांधी यांचे वर्षानुवर्षे राजकीय सचिव राहिलेले अहमद पटेल हे फार प्रयत्नशील होते. राजीव शुक्‍ला हे फार पूर्वी म्हणजे ३५ वर्षांपूर्वी साधे स्कूटरवरून जाणारे पत्रकार होते.

पण त्यांनी राजकारणात उडी घेऊन अशी काही प्रगती केली की कुणीही आचंबित व्हावे. या त्यांच्या उत्कर्षामागे कुणी बडे उद्योग घराणे असल्याचे बोलले जाते आणि यावेळी देखील त्यांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी त्या उद्योगघराण्यानेही प्रयत्न केल्याचे समजते.
राजीव शुक्‍ला सर्वप्रथम उत्तर प्रदेशातून राष्ट्रीय लोकतांत्रिक काँग्रेस नावाच्या पक्षातर्फे राज्यसभेवर आले होते. मग त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर महाराष्ट्रातून दोन वेळेस ते राज्यसभेवर निवडून गेले.

या काळात त्यांनी स्वतःची वृत्तवाहिनी, चित्रपट उद्योग, क्रिकेटचे क्षेत्र पादाक्रांत केले.
त्यांच्या या अष्टपैलू कर्तृत्वामुळेच त्यांनी सचिन तेंडुलकर व रेखा या बिनकामाच्या वलयांकित व्यक्तिमत्वांना राज्यसभेवर नियुक्त करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.
भाजपमध्येही त्यांचे चांगले वजन आहे. अर्थमंत्री अरुण जेटलींचे ते खास मित्र आहेत. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांची धाकटी बहीण त्यांची पत्नी(अनुराधा प्रसाद) आहे. तेव्हा अशा अतिशय ‘उपयुक्त’ राजीव शुक्‍ला यांना पुन्हा राज्यसभेवर घेण्यासाठी अहमदभाई प्रयत्नशील राहणे स्वाभाविकच होते.

दुर्दैवाने महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकच उमेदवार निवडला जाणार आहे आणि गेल्या वर्षी चिदंबरम व यावर्षी राजीव शुक्‍ला या महाराष्ट्राबाहेरच्या उमेदवारांना लागोपाठ उमेदवारी देण्याचा ‘मेसेज’ बरोबर जाणार नसल्याने त्यांचा यावेळी महाराष्ट्रातून पत्ता कटला. मग त्यांना पश्‍चिम बंगाल, झारखंड किंवा बिहार येथून प्रयत्न करायला सांगण्यात आले. पण पश्‍चिम बंगालमधून अभिषेक सिंघवी यांचे नाव निश्‍चित झाल्याने शुक्‍ला यांचा तेथूनही पत्ता कटला.

अर्थात राजीव शुक्‍ला हे हरहुन्नरी आहेत व स्वस्थ बसणारे नाहीत. ते प्रयत्न चालू ठेवतील ! 

परराष्ट्र मंत्रालयाच्या कोलांटउड्या
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांचा अलीकडेच झालेला भारत-दौरा वादग्रस्त ठरला होता.

मुंबईत त्यांच्या सन्मानार्थ झालेल्या मेजवानीत खलिस्तान समर्थक आणि पंजाबच्या एका शीख नेत्याच्या(मंत्री) हत्येच्या कटात सामील असलेला कॅनडाचा नागरिक जसपाल अटवल याचा त्रुडो यांच्या पत्नीबरोबरचा फोटो आणि त्यापाठोपाठ दिल्लीतील कॅनेडियन उच्चायुक्त नादिर पटेल यांनी आयोजित केलेल्या रात्रीभोजनालाही अटवल याला दिले गेलेले निमंत्रण या दोन्ही प्रकारांमुळे भारत सरकारतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती. भारताच्या निषेध व नाराजीनंतर अटवल याचे निमंत्रण रद्द करण्यात आले होते.

त्रुडो यांनी देखील असा प्रकार व्हायला नको होता असे मत व्यक्त करून भारताला चुचकारण्याचा प्रयत्न केला होता.

अटवलला भारताचा व्हिसा मिळाला कसा याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने कानावर हात ठेवून या प्रकाराची चौकशी करावी लागेल असे म्हटले होते. कारण व्हिसा जारी करण्याची बाब गृह मंत्रालयाच्या अधिकारातील असल्याने परराष्ट्र मंत्रालयाने चेंडू गृह मंत्रालयाच्या हद्दीत टोलवला होता.

दरम्यान, या सर्व वादाला कारणीभूत ठरल्याबद्दल अटवल याने कॅनडाच्या पंतप्रधानांची जाहीर माफीही मागून टाकली.

तोपर्यंत इकडे भारतालाही बहुधा उपरती झाली असावी.

आता भारत सरकारने एवढा सर्व प्रकार घडल्यानंतर अटवल याचा व्हिसा अधिकृत होता आणि भारतानेच तो जारी केल्याचे मान्य केले. 

एवढेच नव्हे तर वर अशीही मखलाशी केली की दिशाभूल झालेल्या परदेशस्थ भारतीयांशी संपर्क साधणे, त्यांच्याशी संवाद स्थापित करणे आणि त्यांच्या मनातले गैरसमज दूर करण्यासाठी भारत सरकारतर्फे अधिकृत पातळीवर प्रयत्न केले जातात आणि त्या मोहिमेचा एक भाग म्हणूनच अटवल यांना व्हिसा देण्यात आला होता.

हा राजनैतिक पातळीवरील अनागोंदीचा निव्वळ कळस आहे.

त्रुडो यांनी भारतातर्फे त्यांना देऊ केलेल्या थंड स्वागत व प्रतिसादाची बाब खिलाडूपणाने घेतली.

परंतु त्यांच्या देशात त्यांना भरपूर टीकेला तोंड द्यावे लागले.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनाही त्रुडो भेटले. भेटीच्या अखेरीला कॅप्टनसाहेबांनी(मुख्यमंत्री) त्रुडो यांना कॅनडातून खलिस्तानी कारवाया करणारे, त्यांना आर्थिक मदत करणारे अशा लोकांच्या दोन याद्या त्यांना सादर केल्या. त्यांचा स्वीकार करताना त्रुडो यांनी त्यांच्या खिलाडूपणाचा परिचय देत म्हटले, ‘या यादीत माझ्या मंत्रिमंडळातील (शीख) सहकाऱ्यांची नावे नसावीत अशी आशा करतो !’ त्रुदो यांच्याबरोबर त्यांचे संरक्षणमंत्री हरजितसिंग सज्जन होते आणि त्यांचीही खलिस्तानी घटकांना असलेली सहानुभूती लक्षात घेऊन अमरिंदरसिंग यांनी पूर्वी त्यांना भेटण्याचे नाकारले होते.

परंतु भारतीय मुत्सद्देगिरीचा एक आगळावेगळा नवा अध्याय सध्याच्या नेतृत्वाकडून सुरू आहे. त्याबाबत अधिक काय लिहिणार ?

जे जे होईल ते ते पहात राहावे ! 

रफाल विमान सौदा की रफादफा?

रफाल विमानांच्या सौद्याचा मुद्दा गंभीर होत चालला आहे का?

जर हा व्यवहार स्वच्छ असेल तर पारदर्शकतेबद्दल आव आणणारे हे सरकार आणि या सरकारचे प्रमुख मूग गिळून गप्प बसण्याचे कारण काय? या सौद्याबद्दल उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्‍नांवर सरकारतर्फे अद्याप अधिकृत आणि स्पष्ट खुलासा का केला जात नाही याचे गूढ वाढत चालले आहे.

किंबहुना संसदेच्या दोन्ही सभागृहात कामकाज न होता कोणत्या ना कोणत्या कारणावरून गोंधळच व्हावा हे सरकार व सत्तापक्षालाच हवे असल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे. या सौद्याबद्दल काही तर्कसंगत प्रश्‍न विचारले जाऊ लागले आहेत. पहिला मुद्दा किमतीचा. रफाल विमाने तयार करणाऱ्या कंपनीच्या (दासॉ) वार्षिक अहवालावर नजर टाकल्यास या कंपनीने इजिप्त व कतार या दोन देशांनाही ही विमाने विकलेली आहेत आणि त्यांची किंमत ही भारताला विकण्यात येत असलेल्या रफाल विमानांपेक्षा कमी असल्याचे या अहवालावरून निष्पन्न होते. त्याचप्रमाणे या विमाननिर्मितीच्या भागीदारीसाठी संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाचा कोणताही अनुभव नसलेल्या एका खासगी कंपनीची निवड का करण्यात आली हा प्रश्‍नही गंभीर व अनुत्तरित आहे. या क्षेत्रात दांडगा व दीर्घ अनुभव असलेल्या सरकारी क्षेत्रातील हिंदुस्तान एरोनॉटिक्‍सची निवड का केली नाही हा त्यातला खरा कळीचा प्रश्‍न आहे आणि सरकार त्यावर मूग गिळून आहे.

असे अनेक प्रश्‍न आहेत आणि काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष त्यावर चर्चा करू इच्छितात आणि पंतप्रधानांनी केलेल्या या सौद्याबाबत त्यांच्याकडूनच उत्तरे मागू इच्छितात. हे घडत का नाही? संसदेत हल्ली थोडासा गोंधळ झाला की दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी हे क्षणार्धात सभागृहाचे कामकाजच तहकूब करून टाकतात. लोकसभेत तर ही विशेष जाणवणारी बाब आहे. कारण गेल्या अधिवेशनापर्यंत काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी कितीही गोंधळ केला तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कामकाज चालविण्याचा परिपाठ चालू होता. विरोधी पक्ष कितीही का ओरडेनात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, ओरडून दमल्यावर बसतील गप्प असे त्यांना खिजवणारे धोरण अवलंबिले जात होते. आता मात्र विस्मयकारकरीत्या विरोधी पक्षांनी किंचितसा गोंधळ करताच कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले जात आहे. तोच प्रकार राज्यसभेत घडत आहे ! केवळ विस्मय नव्हे तर चकित करणारा हा प्रकार आहे.

बहुधा फ्रान्सचे अध्यक्ष भारतात चार दिवसांच्या भेटीवर आलेले असल्याने त्यांच्या समोर संसदेत चर्चा नको असाही हेतू कदाचित यामागे असावा.परंतु चाललेला प्रकार उबग आणणारा आहे. 

 

महिला दिनाच्या विविध छटा

आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो.

हल्ली प्रत्येक दिवस किंवा प्रसंग हा उत्सवी स्वरूपात साजरा करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे.

तर केंद्रीय मंत्रिमंडळातील महिला मंत्रीही यात मागे कशा राहतील ?

आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी यावर्षी त्यांची छबी असलेले चहा-कॉफीचे मग आपल्या महिला कर्मचाऱ्यांना वाटले. गेल्या वर्षी त्यांनी केवळ गुलाबाचे फूल दिले होते पण यावर्षी त्यांनी त्यात वाढ केली.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजही दरवर्षी महिला पत्रकार, अधिकारी वगैरेंना चहा व अल्पोपाहारास बोलावून हा दिवस साजरा करीत असत.

यावर्षी सुषमा स्वराज यांनी नेहमीप्रमाणे महिला अधिकारी, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील अग्रगण्य महिलांना निमंत्रित केलेच होते. परंतु यावर्षी त्यांनी सीमासुरक्षादलाच्या ‘सीमा-भवानी’ या विशेष पथकातील शूर व धाडसी महिला चमू, बिहारमधील दलित महिलांचे ढोल-पथक ‘सरगम बॅंड’ आणि दाक्षिणात्य वाद्य ‘घटम्‌’ वादक सुकन्या रामगोपाल यांना विशेषत्वाने निमंत्रित केले होते. यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आतापर्यंत पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपले अस्तित्व प्रस्थापित केले. 

सीमा-भवानी पथकाने आतापर्यंत केवळ पुरुष जवान करीत असलेल्या मोटारसायकलच्या चित्तथरारक कसरतीचे प्रात्यक्षिक प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात करून चकित केले होते.

सरगम बॅंडच्या दलित महिलांनी सवितादेवी यांच्या नेतृत्वाखाली या संचलनातच ढोलवादन केले होते.

तर आतापर्यंत केवळ पुरुषांपुरतेच मर्यादित असलेल्या घटम्‌ वादनाच्या क्षेत्रात सुकन्या रामगोपाल यांनी पदार्पण करून महिलांचा ठसा उमटविला.

बिहारमधील सरगम बॅंडसाठी आणखी खूषखबर म्हणजे परराष्ट्रमंत्रालयाच्या अधिकारात येणाऱ्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे त्यांचा जागतिक दौरा आखण्यात आलेला आहे आणि या महिला लवकरच विश्‍वपर्यटनाला जातील. या महिलांना विमानाने दिल्लीला पाचारण करण्यात आले होते आणि त्यांचा हा पहिला विमानप्रवास होता असे त्यांनी सांगितले. 

दिल्ली पोलिसांनी देखील महिला सन्मान करताना आता अतिविशिष्ट भागात संपूर्ण महिला कमांडोंचा समावेश असलेली पथके (स्वॅट -स्पेशल वेपन्स अँड टॅकटिक्‍स) तैनात करण्यास प्रारंभ केला आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी फिरत्या गस्ती पथकात महिला पथकांचा समावेश केलेलाच आहे.

जय हो ! 

संबंधित बातम्या