एकजुटीची चर्चा भोजनासंगे
कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात.
अशाच काही गमती सांगणारे सदर...
एकजुटीची चर्चा भोजनासंगे
बॅनर्जी यांनी दिल्लीवर धडक मारून विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या चर्चेची यशस्वी फेरी केली.
आता त्यांच्या मागोमाग आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देशमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंचे दिल्लीत पदार्पण झाले.
त्यांनी त्यांच्या राज्याला-आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी भाजपबरोबरची आघाडीही तोडून टाकली.
आता त्यांनी दिल्लीत एका रात्रिभोजनाचे आयोजन करून बिगर-भाजप, बिगर कॉंग्रेस नेत्यांना बोलावले आहे. अर्थात त्यांनी कॉंग्रेसला अस्पृश्य मानलेले नाही. ते कॉंग्रेसचे लोकसभा व राज्यसभेतील नेत्यांची भेट घेणार आहेत. मात्र सोनिया गांधी किंवा राहुल यांना ते भेटणार नाहीत.
बॅनर्जी यांना आदरातिथ्याची भरपूर हौस आहे.
जेव्हा जेव्हा त्या संसदेत येतात तेव्हा त्यांच्याभोवती पत्रकार, नेते, त्यांच्या पक्षाचे सदस्य यांची नेहमीच गर्दी असते.
यावेळी नुसत्या गप्पा होत नाहीत. त्यांनी बैठक जमवली की तत्काळ कॉफी आणि टोस्टची ऑर्डर दिली जाते.
पण दीदींचे तेवढ्याने समाधान होत नाही.
त्या त्यांच्या सहकाऱ्यांकडे वळून, काय फक्त कॉफी आणि टोस्ट असा प्रश्न करतात.
काय संसदेच्या कॅंटीनमध्ये असतील ते पदार्थ मागवले जातात आणि मग चर्चा - गप्पा रंगत जातात.
तर ममतादीदींनी दिल्लीत येऊन कॉंग्रेससह सर्व भाजपविरोधी नेत्यांच्या भेटीगाठी केल्या.
यामध्ये त्यांचे विशेष मित्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट समाविष्ट होती.
केजरीवाल यांना त्यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावले.
केजरीवाल यांच्यासाठी त्यांनी बंगाली पकोड्यांचा बेत केला होता.
इतर भज्यांबरोबर खास बंगाली "बेगुनी' म्हणजे बंगाली वांगी पकोडेही बनवले होते.
पण काय दुर्दैव !
केजरीवाल यांना अत्यंत कडक पथ्य आहे. मधुमेह व अस्थमा यामुळे त्यांना तळलेले खमंग पदार्थ वर्ज्य आहेत.
काय ? त्यांच्याबरोबर असलेले आम आदमी पार्टीचे प्रवक्ते तरुण राघव चढ्ढा यांच्यावर पकोडे संपविण्याची जबाबदारी आली व ती त्यांनी कशीबशी पार पाडली.
दिल्लीचे राजकारण आता हळूहळू सार्वत्रिक निवडणुकीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे.
या जेवणावळी, भोजने, बैठका ही त्याचीच लक्षणे आहेत !
निरोप घेतानाही दांडी ??
क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर आणि चित्रपट तारका रेखा हे राज्यसभेतले दोन दांडीबहाद्दर!
त्यांनी राज्यसभेचे सदस्य असूनही गैरहजर राहण्याचा विक्रमच केला असावा.
त्यांचे आणखी एक भाऊबंद आहेत. मिथुन चक्रवर्ती !
हो तेच ते सिनेमातले ! पण कमीतकमी त्यांनी राज्यसभेला हजर राहता येत नाही हे पाहून राजीनामा देऊन टाकला.
तर राज्यसभेतल्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ झाला.
या सदस्यांच्या गौरवार्थ उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती, पंतप्रधान, विरोधी पक्षनेते अशा सर्वांचीच भाषणे झाली. त्याचबरोबर निवृत्त होणाऱ्या सदस्यांनीही आपापली कृतज्ञता व्यक्त केली.
सचिन व रेखा यांचे हे अखेरचे अधिवेशन होते.
परंतु निरोप समारंभालाही उपस्थित राहण्याचे सौजन्य किंवा औचित्य त्यांना दाखवता आले नाही.
कॉंग्रेस पक्षाच्या सरकारने फार मोठ्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाच्या या दोन महान व्यक्तींना राज्यसभेवर राष्ट्रपतिनियुक्त सदस्य म्हणून संधी दिली परंतु त्यांनी ती शुद्ध वाया घालवली.
त्यांच्या सततच्या गैरहजेरीची बाब वादग्रस्त ठरली होती. परंतु त्याचा परिणाम झाला नव्हता.
मिथुन चक्रवर्ती यांना तृणमूल कॉंग्रेसतर्फे राज्यसभेत पाठविण्यात आले होते.
ते प्रकृतीचे कारण दाखवून रजेचा अर्ज करीत असत.
परंतु त्यालाही सदस्यांनी हरकत घेतली होती. मिथुन चक्रवर्ती टीव्हीवर शो करतात आणि राज्यसभेतून रजा मागतात हा हक्कभंग आहे असा मुद्दा काहींनी मांडला.
यावर फारच वादंग होऊ लागला तेव्हा त्यांनी राजीनामा देऊन वाद संपवला.
सचिव व रेखाताईंनी मात्र असे काही केले नाही.
खरं तर राज्यसभेत प्रवेश होणे ही मोठी बाब असते.
पूर्वी प्रख्यात लेखिका अमृता प्रीतम, सतारवादक रविशंकर, लेखक आर.के.नारायणन, चित्रकार एम.एफ.हुसेन हे राज्यसभेत होते व त्यांनी त्यांच्या परीने राज्यसभेत आपले योगदान दिले होते व ते अधिवेशनात पूर्णपणे हजर रहात.
अमृता प्रीतम या फारच सक्रिय होत्या.
त्यांनी जगभरातील संसदेत सदस्य असलेल्या साहित्यिक व कलाकारांची संघटना स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला होता व राजीव गांधी यांनीही ती कल्पना उचलून धरली होती.
असो !
सचिन व रेखा यांनी निरोपालाही दांडी मारून आपला दांडीबहाद्दरपणाचा लौकिक कायम राखला.
भारत महान !
भाजप आघाडीत वाढती अस्वस्थता
आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी तेलगू देशमने भाजप आघाडीचा त्याग केला.
परंतु देशातली सामाजिक परिस्थिती झपाट्याने स्फोटक होत चाललेली आहे.
वर्तमान राजवटीत दलित-आदिवासी, मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालमध्ये कट्टर हिंदुत्ववाद्यांकडून सांप्रदायिक दंगे भडकवले गेले आहेत.
तर अनुसूचित जाति-जमाती या दलित-आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे मान्य करून सर्वोच्च न्यायालयाने त्यात काही बदल सुचवले. त्याच्या विरोधात हे शोषित वर्ग खवळून उठले. त्यांनी भारत बंद केला व त्यात नऊजणांचा बळी गेला.
या सर्व प्रकारांमुळे बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार, केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान, मनुष्यबळविकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह ही भाजपची मित्रपक्षातली नेतेमंडळी विलक्षण अस्वस्थ झाली आहेत.
त्यांच्या टोपीबदलू भूमिकेमुळे त्यांची विरोधी पक्षांकडची पत पूर्णपणे संपलेली आहे.
विरोधी पक्ष आता विचारत नसल्याने आणि भाजपची दडपशाही असा तोंड दाबून बुक्क्यांचा मार या मंडळींना खायला लागत आहे.
यात नीतिशकुमार व रामविलास पासवान यांची तर अक्षरशः गोची झाली आहे.
उपेंद्र कुशवाह यांनी गेल्या एक वर्षापासूनच भाजपच्या विरोधात भूमिका घेण्यास सुरवात केलेली आहे.
त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यांच्याशी जमवून घेतले आहे.
लालूप्रसाद उपचारासाठी दिल्लीत आलेले आहेत आणि त्यांना सर्वप्रथम भेटायला जाणाऱ्या उपेंद्र कुशवाह होते.
जीतनराम मांझी तर आधीच राष्ट्रीय जनता दलाबरोबर गेले आहेत.
अखेर नाइलाजास्तव नीतिशकुमार आणि रामविलास व कुशवाह यांनी नुकतीच एकत्रित बैठक केली आणि भाजपच्या दलित-आदिवासी व अल्पसंख्याक विरोधी धोरणांचा सरकारमध्ये राहून विरोध करण्याचे ठरवले.
तसेच आपल्या सामाजिक न्याय भूमिकेशी तडजोड करायचे नाही असेही त्यांनी ठरवले असल्याचे कळते.
त्यामुळेच केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचा मुलगा अरिजित शाश्वत याला सांप्रदायिक हिंसा भडकविण्याच्या प्रकरणी अटक करण्याचे नीतिशकुमार यांनी ठरवले व कारवाई केली व स्वतःची काहीशी अब्रू वाचवली.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते रघुवंश प्रसाद यांनी तर रामविलास पासवान--- त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही केला आहे आणि पासवान भाजप आघाडी सोडू पहात आहेत असे सांगून टाकले.
थोडक्यात काय ?
राजकीय घरवापसीचा हंगाम येऊ घातलाय ! पहात राहू या !
संतप्त भीष्माचार्य ??
स्वतःकडे बहुमत असूनसुद्धा विरोधी पक्षांच्या अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याचे धैर्य नसलेले, अवसान गळालेले हे 56 इंची सरकार आहे.
संसदेचे कामकाज अत्यंत पक्षपातीपणे सुरू आहे.
काही मूठभर सदस्य आरडाओरडा करत असतात आणि ते निमित्त करून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज मिनिटा-दोन मिनिटात दिवसभरासाठी तहकूब करण्याचा अतिशय चुकीचा, अनुचित असा पायंडा पाडला जात आहे.
संसदीय इतिहासाला या अनुचित प्रकाराची दखल घ्यावी लागणार आहे.
गेल्या आठवड्यात अशाच एका गोंधळी दिवशी लोकसभा अध्यक्षांनी काहीशा वैतागून, "सदस्य काम करू इच्छित नसतील तर सभागृहाचे कामकाज सायने डाय - बेमुदत - तहकूब करून टाकायचे काय ?' अशी विचारणा केली.
सभागृहाच्या पहिल्याच रांगेत बसलेल्या दक्ष लालकृष्ण अडवानी यांच्या कानांनी "सायने डाय' हे शब्द टिपले.
कारण अधिवेशन समाप्तीच्या वेळी हे शब्द उच्चारण्याची प्रथा आहे.
अडवानी यांनी तत्काळ त्यांच्या जवळ बसलेल्या सदस्यांकडे आणि संसदेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली.
पण तोपर्यंत अडवानी यांचा संताप वाढलेला होता.
एकतर कामकाज ज्या पद्धतीने चालू आहे त्याबद्दल त्यांनी अनेकवेळेस तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
आता हे शब्द ऐकल्यानंतर त्यांचा पाराच चढला.
काय ?
त्यांनी सर्व संबंधितांची जी हजेरी घेण्यास सुरवात केली की बास ! "सायने डाय'चा अर्थ माहिती आहे ?', अशा एकतर्फी पद्धतीने कामकाज तहकूब केले जाऊ शकते ? वगैरे वगैरे !
मंडळी अक्षरशः तत पप करू लागली !
अखेर त्यांना समजावून सांगण्यात आले की आत्ता कामकाज बेमुदत तहकूब करण्यात आलेले नाही. पण त्यांचा राग काही शांत झाला नाही व तेथून ते तरा तरा निघूनही गेले.