गिते यांच्या कसरती ! 

कलंदर
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर... 

कॉंग्रेसच्या फसलेल्या उपोषणाला प्रत्युत्तर म्हणून प्रधान सेवकांच्या नेतृत्वाखाली आणखी एक प्रतिउपोषण आयोजित करण्यात आले. केवळ भाजपपुरते हे मर्यादित होते. 
देशभरात ठिकठिकाणी ते झाले. 
दिल्ली तर मुख्य केंद्रच त्यामुळे केंद्रीय मंत्रीदेखील यात सामील होणे अपरिहार्यच होते. 
पण हे सर्व भाजप पुरस्कृत आणि भाजपचा "शो.' होता. 
पण त्या भाजपच्या "शो.'मध्ये एक बिगर भाजप व्यक्ती आली. 
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते ! गिते हे शिवसेनेचे वरिष्ठ नेते. शिवसेनेचा काही या उपोषणात सहभाग नव्हता. मग गिते पोहोचले कसे ? उपस्थित मीडियाला गंमत वाटायला लागली. 
त्यांनी गिते यांना प्रश्‍न विचारायला सुरवात केली. 
गिते यांनी प्रथम टाळाटाळ आणि मग कसेनुसे उत्तर देताना, "शिवसेना सरकारमध्ये आहे आणि संसद ही सर्वांचीच आहे. सरकारने संसद चालत नसल्याच्या विरोधात उपोषण केले आहे त्यामुळे मीही त्यात सहभागी झालो आहे'. 
पण गिते यांची उत्तरे पटणारी नव्हती आणि त्यांनाही ते अडचणीत येत चालले आहेत याची जाणीव व्हायला लागली. 
हा संवाद होईपर्यंत मराठी वृत्तवाहिन्यांवर "गिते - शिवसेना उपोषणात सामील' अशी ब्रेकिंग न्यूज झळकायलाही लागली. काय चक्र फिरू लागली. 
गिते तिकडे पत्रकारांच्या सरबत्तीला तोंड देत असतानाच त्यांच्या सहाय्यकाने, "साहेब फोन' म्हणून मोबाईल त्यांच्या हाती दिला. 
त्या मोबाईलमधून त्यांच्या कानात कोणते शब्द शिरले कुणास ठाऊक, मोबाईलवरचे ते केवळ एक-दोन वाक्‍यांचे संभाषण संपताक्षणी गिते यांनी उपोषणस्थळापासून शब्दशः पळ काढला. 
पण मीडियाच्या मंडळींना आयती हाती आलेली बातमी निसटू द्यायची नव्हती. 
मीडियाने गिते यांच्या पाठोपाठ त्यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवला. 
पण गिते त्यांच्या घरी नव्हते. 
गिते गायब ! 
मीडिया प्रतिनिधी आपल्या मागावर असतील हे चाणाक्ष गितेंनी ओळखून घरी न जाण्याचे ठरवले असावे आणि ते चक्का गायब झाले. ऑफिसातही नाही आणि घरीही नाही ! 
काही वेळाने मीडियाने नाद सोडला. 
पण या सर्व पळापळीची बातमी तर मिळाली. 
पण गिते गायब कुठे झाले होते ? त्यांना तो फोन कुणाचा आला होता ? 
कळले ते असे ! गिते आगंतुकासारखे उपोषणात सामील झाल्याने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच चिडले आणि त्यांनी अक्षरशः एका वाक्‍यात त्यांनी फोन करून "तत्काळ निघा' असा हुकूमच दिला. 
काय गिते यांनी शिवसेनेच्या एका खासदाराच्या फ्लॅटवर आश्रय घेतला. हे खासदार महोदय उद्धव यांचे विश्‍वासू आहेत. त्यामुळे तेथे जाऊन उद्धव ठाकरेंशी बोलणी आणि पुन्हा मीडियापासून सुरक्षित लपणे हे दोन्ही हेतू त्यांनी यशस्वीपणे साध्य केले. 

 

उत्तर प्रदेशात मराठी मंडळींचे राज्य ? 
उत्तर प्रदेशचे राज्यपाल मराठी आहेत. राम नाईक ! 
उत्तर प्रदेशाच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिलीप बी. भोसले हे आहेत. तेही मराठी ! 
उन्नाव बलात्कार प्रकरणात त्यांनी जी कडक भूमिका घेऊन आदित्यनाथ सरकारला वठणीवर आणले त्यामुळे कायद्याचे राज्य अद्याप अस्तित्वात आहे आणि सामान्य माणसाला अजून न्याय मिळण्यास वाव आहे हे सिद्ध झाले. 
पण उन्नावच्या घटनेवर राज्यपाल मात्र मौन पाळून बसले. 
त्यांचे मौन विशेष जाणवणारे होते कारण याआधीच्या समाजवादी पक्षाच्या अखिलेश यांच्या सरकारच्या वेळी राज्यपाल विशेष सक्रिय असायचे. 
अखिलेश यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री गायत्री प्रजापती यांच्याविरुद्धही बलात्काराचा आरोप झाल्यावर राज्यपाल महोदयांनी निवेदनावर निवेदन केली होती आणि अखेर प्रजापती यांना मंत्रिमंडळातून जावे लागले, त्यांच्याविरुद्ध केस झाली सर्व काही झाले ! 
चांगले झाले ! 
पण उन्नाव प्रकरण असो किंवा वर्तमान आदित्यनाथ राजवटीतल्या अनेक अयोग्य व अनुचित प्रकारांकडे आधीच्या सरकारमध्ये जागरूक असणार राज्यपाल कानाडोळा करताना आढळतात. 
हे काही बरोबर नाही ! 

 

पियुष गोयल यांचा वाढता आलेख ?? 
सध्या रेल्वेमंत्री व कोळसामंत्री पियुष गोयल यांची बरीच चलती आहे. 
राज्यसभेत पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा प्रवेश झाल्यानंतर तर गोयल यांचे महत्त्व आणखी वाढलेले दिसते. 
अमित शहा यांच्याबरोबर सेंट्रल हॉलमध्ये जाणे, त्यांच्याबरोबर सतत छायेसारखे राहणे ही त्यांची प्रमुख ड्यूटी असल्याचे दिसते. 
जर अमित शहा यांना पक्षाची काही कामे असतील, भेटीगाठी करायच्या असतील तर गोयल यांच्या संसदेतील कार्यालयाचा उपयोग ते करतात. 
गोयल हे मुंबईचे आहेत. उत्तम गुजराती बोलतात. हा देखील गोयल व शहा यांच्यातला आणखी एक जवळिकीचा धागा. गोयल हे पक्षाचे खजिनदारही आहेत. 
त्यामुळेच त्यांना उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीसाठी विशेष निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले होते. भाजपने एक अतिरिक्त म्हणजे आठऐवजी नऊ जागा जिंकून आपली आर्थिक, राजकीय ताकद दाखवून दिली. मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने गोयल हेही पत्रकार परिषदेत हजर झालेले होते व त्यांनीच पत्रकारांना संबोधित केले. 
पक्ष आणि सरकारमध्ये नवनवीन कल्पना-संकल्पना मांडणाऱ्यात गोयल आघाडीवर असतात आणि प्रधान सेवकांनीही त्यांना "आयडिया एक्‍स्चेंज' नावाने असलेल्या सरकार अंतर्गत गटात प्रमुख भूमिका दिलेली आहे. त्यांच्या या वाढत्या महत्त्वामुळे काही आत्मे असंतुष्ट होणे स्वाभाविकच आहे ! 
अर्थमंत्री अरुणे जेटली यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची सक्रियता तुलनेने कमी झालेली आहे. त्यांची जागा गोयल घेत आहेत की काय अशी चर्चा केली जाऊ लागली आहे. 
जेटली यांची प्रकृती नीट नसली तरी त्यांचे स्थानमहात्म्य कमी झालेले नाही. त्यामुळेच राज्यसभेचे नेतेपद त्यांच्याकडेच कायम राखण्यात आले आहे. 
चला, आता गोयल साहेब कितीकाळ "ताईत' राहतात हे पहावे लागेल ! 

 

हिंदू संयुक्त परिवारात फूट ? 
रा.स्व.संघातील एका प्रमुख गटाला भाजप महानायकाने "आपलेसे' करून संघ विभाजनाचा प्रयत्न केल्याची चर्चा गेला बराच काळ ऐकिवात होती. सरकार्यवाहांच्या निवडीच्या वेळी महानायकाने आपले वजन दत्तात्रेय होसबळे यांच्या पारड्यात टाकल्याचे समजले होते. 
परंतु मोहिते-वाडा किंवा रेशीमबागेला तो पर्याय पटलेला नसावा. 
सुरेश तथा भय्याजी जोशींनाच चौथ्यावेळी मुदतवाढ देण्यात आली. एकप्रकारे महानायकाच्या "पसंती'ला "नापसंती' दाखविण्यात आली. संघावरही आपली पकड जमविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. 
पण................! 
विश्‍व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरून प्रवीण तोगडियांना दूर करण्यात महानायक व रेशीमबाग(रा.स्व.संघ मुख्यालय, नागपूर) यशस्वी झाले. 
तोगडिया ही महानायकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची डोकेदुखी होती. अगदी अलीकडे तोगडिया गुजरातमध्ये एका बागेत बेशुद्धावस्थेत सापडल्याची घटना सर्वांनाच माहिती आहे. गुजरात पोलिसांकडून म्हणजेच सरकारकडून आपल्याला मारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याचा रोख महानायकांकडे होता. तोगडियांचे गुजरातमधले महत्त्व व वर्चस्व महानायकाने नेस्तनाबूत केल्याने तोगडिया व महानायकात वितुष्ट आले होते. 
आता संधी मिळताच महानायकाने तोगडिया यांना विश्‍व हिंदू परिषदेचे दरवाजे बंद करून टाकले व आपल्याला अनुकूल व्यक्तीला अध्यक्षपदासाठी पसंती दिली. विष्णू सदाशिव कोकजे हे मध्य प्रदेशातील माजी न्यायाधीश व लोकायुक्त होते. त्यांना विश्‍व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले. 
आता तोगडिया यांनी समांतर संघटना स्थापनेचे सूतोवाच करून राममंदिरासाठी लढा उभारण्याची घोषणा केलेली आहे. थोडक्‍यात हिंदू संयुक्त परिवारात फारच खळबळ माजलेली आहे. 
ही लक्षणे चांगली नाहीत ! 

 

दलित वणव्याचे असह्य चटके ? 
सर्वोच्च न्यायालयाच्या दलितविषयक निर्णयाने पेटलेल्या असंतोषाच्या वणव्याचे भाजप व संघपरिवाराची चांगलीच होरपळ होऊ लागली आहे. 
आतापर्यंत भाजप संसदीय पक्ष आणि सरकारवर अनियंत्रित पकड असलेल्या महानायकालादेखील या असंतोषाचा फटका बसू लागला आहे. 
उदितराज, सावित्रीबाई फुले, छोटेलाल, यशवंतसिंग, अशोक डोहरे अशा पाच दलित खासदारांनी थेट महानयकालाच पत्र लिहून त्यांच्या नाराजीला व असंतोषाला वाट करून दिलेली आहे. 
पूर्वी अशी हिंमतच कुणाला होत नसे. 
पण आता स्फोट होऊ लागला आहे. 
रामदास आठवलेही अस्वस्थ आहेत. 
सावित्रीबाई फुले या तर इतक्‍या नाराज आहेत की त्यांनी संयुक्त जनता दलातून बाहेर पडलेले वरिष्ठ नेते शरद यादव यांचीच भेट घेतली. 
सध्या तर अशी चर्चा आहे की उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची हातमिळवणी एकदा पक्की झाली की आतापर्यंत अभेद्य मानल्या जाणाऱ्या भाजप किल्ल्याला खिंडारे पडू लागतील. सध्या दलित खासदारांची एकंदर आक्रमक मानसिक अवस्था लक्षात घेता ते कधीही बंड करू शकतात असे मानले जाते. 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध झालेल्या भारत बंद आंदोलनात मध्य प्रदेशात सर्वाधिक दलित आंदोलकांचे मृत्यू नोंदले गेले. त्यामुळे संघ परिवारात तर चांगलीच अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना संघ नेत्यांची नाराजी कळताच त्यांनी थेट नागपूर गाठले. 
तेथून मिळालेल्या कानपिचक्‍यांनंतर त्यांनी पुन्हा भोपाळ गाठले तेव्हा ते इतके अधीर व अस्वस्थ होते की त्यांनी विमानतळावरच त्यांच्या सर्व खास अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. तेथे मुख्यमंत्र्यांच्या विमानाच्या हॅंगरमध्येच त्यांनी या अधिकाऱ्यांबरोबर बैठक करून तातडीने परिस्थितीत सुधारणा करण्याच्या सूचना केल्याचे समजते. 
पाच साधूंना राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्याचा शिवराजसिंग चौहान यांचा प्रकार भाजप व परिवारातही कुणाला फारसा पचनी पडलेला नाही. परंतु घसरती लोकप्रियता आणि ढासळणारा जनाधार यामुळे हैराण झालेले शिवराजसिंग हे आता अगतिक होऊन मिळेल तो आधार पकडण्याचा प्रयत्न करून घसरण थांबवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसू लागले आहेत. 

संबंधित बातम्या