नर्मदा मला पाव गं. !!
कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात.
अशाच काही गमती सांगणारे सदर...
राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर जुन्या मंडळींच्या पोटात गोळा येणे स्वाभाविकच होते.
"आपला नंबर कधी लागणार' या भीतीने धास्तावलेले हे जीव !
काही जणांचे नंबर लागूनही गेलेत.
आता दिग्विजयसिंह ऊर्फ डिग्गिराजांचेच उदाहरण घ्या ना !
सहा महिन्यांची साडेतीन हजार किलोमीटरची नर्मदा परिक्रमा त्यांनी पूर्ण केली.
ती पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ते यापुढेही सक्रिय राजकारणात राहणार असल्याचे सांगताना, "नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यावर मी पकोडे तळत बसणार नाही' अशी जुमलेबाजीही केली.
म्हणजेच मध्य प्रदेशात येऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीत ते सक्रिय राहणार हे त्यांनी स्पष्ट करून टाकले. असे असले तरी राहुल गांधींच्या नव्या रचनेत त्यांना अद्याप स्थान मिळालेले नाही.
परिक्रमा पूर्ण केल्यानंतर दिल्लीत विश्रांतीसाठी आलेल्या डिग्गिराजांना वाटले पूर्वीसारखे पत्रकार त्यांच्या दरवाजात घोटाळायला लागतील. त्यांचे चुरचुरीत, खमंग बाईट्स घ्यायला टीव्ही पत्रकार येतील !
पण, छे! ! कुणी पत्रकार त्यांच्याकडे फिरायला तयार नव्हते !
बिच्चारे डिग्गिराजा चुपचाप त्यांच्या मोजक्या समर्थकांना भेटत राहिले.
लवकरच आपण मध्य प्रदेशात राज्यव्यापी पदयात्रा करणार असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले आहे.
पण राहुल यांच्या नव्या टीम मध्ये स्थान मिळावे म्हणून त्यांनी त्यांची धडपड सुरू ठेवली आहे.
मध्य प्रदेशात आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही हे त्यांनी जाहीर करून टाकले.
आपण फक्त पक्षाला विजयी करण्यासाठी काम करू असे त्यांनी जाहीर केलेले असले तरी कुणी त्यांच्यावर विश्वास ठेवायला फारसे तयार नाही.
अलीकडेच त्यांनी त्यांची इच्छा काही समर्थकांकडे व्यक्त करताना, "किमान मला प्रदेश प्रचार समितीचे अध्यक्षपद तरी देण्यात यावे' असे म्हटल्याचे सांगतात. पण अद्याप त्यांच्याबाबत नवे नेतृत्व विरघळायला तयार नाही. अर्थात त्यांच्या उपदव्यापांनी व वादग्रस्त विधानांनी पक्षाला वेळोवेळी अडचणीत आणण्याचे त्यांचे प्रताप पक्ष विसरलेला नाही. त्यामुळेच त्यांच्याबाबत सावधानी-------- बाळगली जात आहे.
आता ते पक्ष आपल्याला काही जबाबदारी देत आहे की नाही याची वाट पहात बसले आहेत.
दुसरीकडे कॉंग्रेस महासमिती व संघटनेचे सरचिटणीस असलेल्या अशोक गेहलोत यांची अवस्था अगदी "जल बिन मछली' सारखी झाली आहे.
त्यांचा खरा डोळा आहे तो राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर. पण राहुलने त्यांना अडकवले आहे दिल्लीत त्यामुळे त्यांचा जीव अगदी कसानुसा होतोय !
तरी देखील राजस्थानात जास्तीतजास्त वेळ कसा घालवता येईल त्याची मिळेल ती संधी ते घेत आहेत.
राजस्थानातल्या निवडणुकाही आता वर्षअखेरीला आल्या आहेतच !
मार्क्सवाद्यांचा शब्दच्छल !
कॉंग्रेसचे एक मोठे नेते होते. दांडगे वाचन व व्यासंगामुळे त्यांच्या टिप्पण्या टोकदार असत !
कम्युनिस्ट पक्षाबद्दल ते नेहमी एक टिप्पणी करायचे, "ब्रिलियंट ऍनॅलिसिस, रॉंग कनक्लूजन्स !'
त्यांच्या म्हणण्यानुसार कम्युनिस्टांमध्ये एखाद्या लहानशा मुद्यावर देखील प्रदीर्घ चर्चा करण्याची, त्याचे विश्लेषण करण्याची दांडगी क्षमता असते. त्यांची बौद्धिक क्षमताही वाखाणण्यासारखी असल्याने त्यांच्या चर्चाही ऐकण्यासारख्या असतात. पण त्यांची पोथीनिष्ठा अशी असते की चर्चेच्या निष्कर्षावर ते आले की गाडी भरकटते आणि मग भलतेच निष्कर्ष व निर्णय ते करतात.
पण हा प्रकार येथेच थांबत नाही. झालेल्या चुकीचेही ते विश्लेषण करतात आणि मग कालांतराने सर्व काही संपल्यानंतर ते जाहीर करतात "आमची ऐतिहासिक चूक झाली !'
नुकतेच हैदराबादमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन पार पडले.
भाजप शत्रू क्रमांक 1, भाजपचा पाडाव करण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष व लोकशाही शक्तींची एकजूट करून लढणे या दोन मुद्यांवर पक्षात एकमत होते.
पण.............. ! या सगळ्यात कॉंग्रेस पक्षाबरोबर हातमिळवणी करायची, आघाडी करायची की काय करायचे यावर पक्षात घनघोर चर्चा झाली.
सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी नेमस्त किंवा मवाळ व मुख्यतः व्यवहारी भूमिका घेऊन कॉंग्रेसला या व्यापक अशा राजकीय एकजुटीतून वेगळे किंवा बाजूला ठेवता येणार नाही असे उपस्थितांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.
पण प्रकाश कारत यांच्यासारख्या पोथीनिष्ठांना ते सहन झाले नाही.
कॉंग्रेसबरोबर हातमिळवणी किंवा आघाडी न करण्याच्या हट्टावर ते ठाम राहिले.
आता प्रत्यक्ष राजकीय ठरावात या भूमिकेची मांडणी कशी करायची यावरूनही घनघोर चर्चा झाली.
कॉंग्रेसबरोबर कोणतीही प्रत्यक्ष हातमिळवणी किंवा आघाडी करायची नाही पण "स्ट्रॅटेजिक रिलेशनशिप' ठेवायला हरकत नाही अशा पद्धतीची शब्दरचना करण्यात आल्याचे मागाहून सांगण्यात आले.
अरे बाप रे !!
या पक्षाच्या बातम्या लिहिताना देखील दमछाक व्हायला का होते ते आता कळले !
भाजप डाऊन ?? बाकी सारे आउट ???
कर्नाटक विधानसभेसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. म्हणजे प्रचार 10 मे रोजी संपणार आहे.
परंतु अद्याप भाजपचे एकमेवाद्वितीय वलयांकित प्रचारक व महानायक यांनी कर्नाटकात प्रचाराला सुरवातच केलेली नाही हे काहीसे अनपेक्षित मानले जात आहे.
सुरवातीला पक्षाने दिलेल्या माहितीनुसार महानायक आख्खा कर्नाटक पिंजून काढणार होते आणि तब्बल 27-28 प्रचारसभा घेणार होते.
पण कुठे माशी शिंकली देव जाणे सभांचा आकडा 21 पर्यंत खाली आला आणि आता अगदी ताज्या माहितीनुसार महानायक फक्त सतरा अठरा सभाच घेणार आहेत.
29 एप्रिलपासून ते आपला झंझावाती प्रचार सुरू करणार आहेत. म्हणजे 12 दिवसात ते 17-18 सभा घेऊन कर्नाटकातील हवा बदलून टाकणे अपेक्षित आहे.
बिहारमध्ये महानायकांनी बदलती हवा पाहून थातूरमातूर सभा घेतल्या होत्या आणि अंग काढून घेतले होते.
कर्नाटकातूनही महानायकांना फारसे चांगले रिपोर्टस् मिळालेले नसावेत का ? महानायकांचे सहाय्यक अमितभाई शहा वगळता भाजपचे अन्य कोणतेही नेते प्रचारात गेल्याचे ऐकिवात नाही.
योगी आदित्यनाथ यांना कर्नाटकात जागोजाग फिरवून हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याची योजना आखली होती. पण गोरखपूर व फुलपूर पराभवानंतर आणि उन्नाव बलात्कार प्रकरणानंतर योगीमहाराजांच्या नावावर फुली मारली गेली.
राजस्थान आणि कर्नाटक यांच्यात विशेष संबंध आहेत कारण राजस्थानातील धनाढ्य व्यापाऱ्यांचा बंगलोरशी विशेष संबंध आहे. परंतु राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना प्रचारासाठी सांगण्यात आले नाही कारण त्यांची वादग्रस्त प्रतिमा ! मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी ही सर्व मंडळी गेली कुठे ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचाराला गेले तर त्यांना सरकारवर पाणी सोडूनच जावे लागेल.
भाजपची किती अडचण ?
भरपूर नेते असून शेवटी सगळी जबाबदारी बिचाऱ्या महानायकांवरच ?
चला आता महानायकांचा झंझावात कसा होतो ते पाहू !
राष्ट्रपती नाराज ?
देशातील राज्यपालांची एक वार्षिक परिषद होत असते.
सर्वसाधारणपणे ती दिल्लीतच राष्ट्रपतिभवनात घेण्याची प्रथा आहे.
पण यावर्षी राष्ट्रपतींना ती चंडीगढ येथे घेण्याची इच्छा झाली. 19 व 20 मे या तारखाही निश्चित करण्यात आल्या.
परंतु ती इच्छा फलद्रूप होऊ शकली नाही.
चंडीगढ विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीच्या निर्मितीचे काम सुरू असल्याने 12 ते 31 मे या काळात हा विमानतळ अंशतःच चालू राहणार आहे.
या परिषदेला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, वरिष्ठ मंत्री येणार असल्याने एवढ्या सर्व व्हीव्हीआयपी लोकांच्या वाहतुकीला हा दुरुस्तीत असलेला विमानतळ पुरा पडणे शक्य नव्हते. त्यामुळे ही परिषद रद्द करण्यात आली.
आता दिल्लीतच 3 व 4 जूनला ती होणार आहे. 30 राज्यपाल व उपराज्यपाल त्याला येणार आहेत.
परंतु तमिळनाडूतील राज्यपालांमुळे राष्ट्रपती नाराज असल्याचे कळते.
तेथील विद्यापीठातील लैगिंक छळ प्रकरणी त्यांनी नियमानुसार राष्ट्रपतींची परवानगी न घेता परस्पर पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर एका महिला पत्रकाराचा गालगुच्चा घेतला. यामुळे जो वाद निर्माण झाला त्यामुळे राष्ट्रपती अत्यंत अस्वस्थ आहेत.
त्यामुळे या आगामी परिषदेत राज्यपालांच्या आचरणाचा व विशेषतः साध्या राहणीची शिकवण देण्याचा मुद्दा विषयपत्रिकेत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे समजते.
भाजप सरकार नियुक्त सध्याचे अनेक "महामहिम' हे वादग्रस्त ठरले आहेत. कुणी मोदींची स्तुती करते तर कुणी सांप्रदायिकतेचे समर्थन करतात. आनंदी आनंद गडे चालू आहे !
जेटलींबद्दल अफवा !
अरुण जेटली हे मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी आहेत.
सध्या आठवड्यातून दोन वेळेस त्यांना डायलिसिस करावे लागते.
त्यांच्यावर बहुधा मूत्रपिंड आरोपणाची शस्त्रक्रियाही होण्याचा अंदाज आहे.
या आजारात रुग्णाला कशाचा संसर्ग होऊ द्यायचा नसतो व त्यामुळेच त्याला एकांतात ठेवण्यात येत असते.
त्यामुळे जेटली यांच्या निवासस्थानाबाहेर सध्या ते कुणालाही भेटत नसल्याची पाटी लावण्यात आली आहे.
पण या पाटीमुळे लोकांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल नाना तर्ककुतर्क लढवायला सुरवात केली.
जेटली यांची प्रकृती व्यवस्थित आहे.
ते रोज सकाळी चालण्याचा व्यायाम घेतात.
सुमारे दोन तास त्यांच्या मंत्रालयाशी निगडित फायली हातावेगळ्या करतात.
याच काळात त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ देखील सभापतींच्या कक्षात जाऊन घेतली.
त्यांच्या फुप्फुसात थोडा कफाचा संसर्ग असल्याने त्यांना थोडा त्रास आहे. परंतु बाकी त्यांचे आरोग्याचे मापदंड व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले.
जेटली यांच्या आजारपणामुळे काही महत्त्वाच्या मुद्यावर सरकारतर्फे जी बाजू लढविण्यात येते त्यात काहीशी त्रुटी निर्माण झाली आहे. पण विरोधी पक्षांनी महाभियोगाच्या दिलेल्या नोटिशीला त्यांनी फेसबुकद्वारे ब्लॉग लिहून उत्तर दिले.
त्यामुळे घरूनदेखील सक्रिय आहेत आणि लवकरच पूर्ववत होतील असे सांगण्यात आले आहे.