आशा निराशा......अखेर निराशाच !
कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात.
अशाच काही गमती सांगणारे सदर...
परराष्ट्रसचिवपदी असलेले एस.जयशंकर जानेवारी महिन्यात निवृत्त झाले.
नुकतेच ते टाटा समूहाशी संलग्न झाले म्हणजेच रुजू झाले.
खरं तर त्यांच्यासारख्या उच्चपदपावरुन निवृत्त झालेल्यांना किमान एक वर्ष कोणत्याही खासगी नोकरीचा स्वीकार "न' करण्याचे बंधन आहे.
तसा नियमच केलेला आहे. अतिसंवेदनशील पदावर असलेल्यांसाठी पूर्वी तीन वर्षांचा नियम होता. तो मोदी सरकारने कमी करून एक वर्षापर्यंत खाली आणला. त्यामुळे जानेवारीत निवृत्त झालेल्या जयशंकर यांना नियमाप्रमाणे जानेवारी 2019 पर्यंत खासगी नोकरीत रुजू न होण्याचे बंधन होते.
पण तसे घडले नाही ? का घडले नाही ? कानोकानी आलेली खबर अशी............
परराष्ट्रसचिव होण्यापूर्वी जयशंकर हे अमेरिकेत राजदूत होते व त्यापूर्वी ते चीनमध्ये राजदूत होते. अमेरिकेत ते राजदूत असतानाच भारताच्या नव्या पंतप्रधानांच्या पहिल्या अमेरिका भेटीचे यशस्वी संचालन व व्यवस्थापन करून आपली छाप त्यांच्यावर पाडलेली होती.
त्यावेळच्या परराष्ट्र सचिव सुजातासिंग यांना मुदतीपूर्वीच निवृत्त केल्यानंतर त्यांच्या जागी जयशंकर साहेबांची नेमणूक होणे स्वाभाविकच होते.
भारताला अमेरिकेच्या जास्तीतजास्त कच्छपी लावण्याचे काम त्यांच्या काळात झाले.
पण हे करता करता जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितकुमार दोभाल यांच्यात चुरस निर्माण होणे स्वाभाविकच होते.
दोभाल पडले माजी पोलिस सेवेतील हडेलहप्पी अधिकारी आणि जयशंकर हे परराष्ट्र सेवेतील झकपक अधिकारी ! संघर्ष होणारच ना ?
पाकिस्तान असो किंवा चीन, या दोन अधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनात भिन्नता असणेही स्वाभाविकच होते.
जयशंकर यांनी हळूहळू महानायकांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर पोलिसी दोभाल साहेब अस्वस्थ व सावध !
पठाणकोट किंवा चीनबरोबरच्या काही वादग्रस्त मुद्यांवर जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांपेक्षा राजनैतिक पातळीवरून घडामोडी हाताळण्याची पाळी आल्यानंतर "रा.सु.स.'(दोभाल) अस्वस्थ झाले. यातूनच ही चर्चा उच्चस्तरीय वर्तुळात सुरू झाली की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराप्रमाणेच परराष्ट्र संबंधांसाठीही पंतप्रधानांना सल्लागाराची आवश्यकता आहे. पूर्वी अशी व्यवस्था होती. आणि मग त्या पदासाठी जयशंकर यांच्या नावाची चर्चा सुरू होणेही अपेक्षितच होते.
या सर्व चर्चांमुळे दोभालसाहेब आणखीनच अस्वस्थ ! अरेच्चा, आपल्या बरोबरीने कुणी येऊ पहात आहे ? मग आपले स्थान काय ?
असे करता करता जयशंकर साहेब निवृत्त झाले.
आता निवृत्तीनंतर आपल्याला पंतप्रधानांच्या वर्तुळात स्थान मिळेल या आशेवर जयशंकर होते.
पण तसे काही घडताना आढळेना !
जयशंकर साहेबांचा धीर सुटू लागला. तिकडे दोभाल साहेबांनी अशी काही फील्डिंग लावली की जयशंकर यांची पार नाकेबंदीच !
अखेर जयशंकर साहेबांना टाटा समूहाकडून "ऑफर' आली.
आता काय करावे ? ऑफर स्वीकारायची की सरकारी पदासाठी वाट पहात राहायचे ? अखेर जयशंकर साहेबांनी टाटा समूहात सामील होण्याचे ठरवले. पण एक वर्षाची अट मध्ये आली. मग त्यांनी सरकारला पत्र लिहून ही अट शिथिल करावी अशी विनंती केली.
तिकडे दोभाल साहेब या संधीची वाट पहात दबा धरून बसलेलेच होते.
त्यांनी तत्काळ जयशंकर साहेबांची विनंती संबंधितांना मान्य करायला लावली.
जयशंकर यांना परवानगी मिळाली आणि ते निराशेने पण आशादायी मनाने टाटा समूहात रुजू झाले.
दोभाल यांनीही सुटकेचा निःश्वास टाकला असावा ! हुश्श ! सुटलो बुवा !
सोमनाथ ते विश्वनाथ आणि आता यदुकुल नंदन ?
वेळापत्रकानुसार आता लोकसभा निवडणुकांना जेमतेम एक वर्ष उरले आहे.
संसदेची अधिवेशनेही आता तीनच उरलेली आहेत. या वर्षातील पावसाळी, हिवाळी आणि पुढच्या वर्षीचे अर्थसंकल्पी ! अर्थात सरकार पूर्ण स्वरूपाचा अर्थसंकल्प सादर करणार का किंवा करू शकेल काय हे प्रश्न आहेत.
पण महानायकांनी भाजपच्या खासदारांना त्यांच्या "नमो ऍप'वरून नुकतेच संबोधित केले आणि निवडणुकीच्या तयारीला लागा म्हणून आदेशही देऊन टाकला !
यामुळे आपले तिकीट कापले जाणार नाही अशी बहुतांश खासदारांची समजूत झाली आहे व त्यामुळे पक्षात गडबड करण्याच्या प्रकारांनाही यामुळे आळा बसला आहे. पण ही झाली युक्ती !
आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ती महानायक आगामी निवडणूक कुठून लढवणार ?
आता महानायक कोण हे विचारू नका ! या देशाचे महानायक एकमेवाद्वितीयच आहेत !
2014ची निवडणूक महानयाकांनी दोन मतदारसंघातून लढविलेली होती.
वडोदरा(गुजरात) आणि वाराणसी(उत्तर प्रदेश) !
वाराणसीच्या मतदारांना संमोहित करण्यासाठी त्यांनी "सोमनाथाचा भक्त (गुजरात) विश्वनाथाच्या(वाराणसी) पायाशी आला आहे' असा पुकारा केला आणि पाहता पाहता मतदारांनी महानायकाची झोळी मतांनी भरून टाकली.
परिस्थिती बदलली आहे. आता 2014 सारखे अनुकूल वातावरण राहिलेले नाही. उलट भक्तांमध्येदेखील व्यापक नाराजी पसरलेली आहे.
कुणीतरी सांगितले की आता जो नोटांचा खडखडाट झाला होता तेव्हा वाराणसीमध्ये महानायक, भाजप-रास्वसंघ यांना "परत जा' अशी पोस्टर्स म्हणे लावण्यात आली होती.
एवढेच नव्हे तर तर ते सामाजिक न्यायाची भाषा करणारे दोन पक्षही एकत्र येत आहेत. तेच हो, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष !
या पक्षांनी हातमिळवणी केली आणि पाहता पाहता फुलपूर आणि गोरखपूरच्या पोटनिवडणुकांत अभेद्य अजिंक्य पक्षाला धूळ चारली !
यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचे भरपूर प्रयत्न झाले पण ते निर्माण होऊ न शकल्याने महानायक आणि त्यांचे उपनायक(पक्षाध्यक्ष हो !) यांच्यात चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.
आता काय करायचे ?
आता कानावर चर्चा येत आहे ती महानायकांच्या मतदारसंघ बदलण्याची !
असे समजते की महानायक आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मथुरा किंवा अलिगड यापैकी एका मतदारसंघाची निवड करतील. मथुरेची निवड केली तर ते पुन्हा भगवान श्रीकृष्णाचे नाते सांगून मतांचा जोगवा मागतील. कारण यदुकुलनंदन हे मथुरेहून गुजरातमधल्या द्वारकेला गेले आणि अखेरचे जीवन त्यांनी तेथेच व्यतीत केले होते.
गुजरातमध्येही ते वडोदरा मतदारसंघाऐवजी गांधीनगर, अहमदाबाद किंवा सुरत या तीनपैकी एकाची निवड करतील असे समजते.
सामाजिक शक्तींच्या उदयामुळे या कट्टर धार्मिक शक्ती व विशेषतः धर्माच्या आधारे ध्रुवीकरण करू पाहणाऱ्या शक्ती चांगल्याच अस्वस्थ झाल्या आहेत त्याचा तर हा पुरावा नव्हे ? की काही मंडळींच्या तोंडून ऐकले त्याप्रमाणे महानायक जास्त जोखीम घेण्याच्या भानगडीत न पडता फक्त गुजरातमधूनच निवडणूक लढवतील ?????
दलितांचा कळवळा
भाजप आता ब्राह्मण-बनियांची पार्टी राहिलेली नाही, तर सर्वसामान्य गरीब, पददलित, आदिवासी यांचा तो पक्ष झालेला आहे असे महानायकांनी नुकतेच सांगितले.
सध्या त्यांचा सारा जोर हा गरिबांना पक्षाकडे आकर्षित करण्यावर असतो. गरीब म्हणजे प्रामुख्याने दलित समाज !
नुकतीच त्यांनी कर्नाटकमधील भाजप उमेदवारांशी त्यांच्या "ऍप'वरून संपर्क साधला. त्यातही त्यांनी गरीब समाजाला आकर्षित करा असा आदेश त्यांना दिला.
भाजप खासदारांनादेखील त्यांनी हाच संदेश देऊन आता गावागावात जाऊन सरकारच्या कामाचा प्रसार करा व त्यामध्ये सरकारने गरीब माणसाला केंद्रस्थानी कसे ठेवले आहे हे लोकांवर बिंबवा असेही त्यांना सांगितले.
या खासदारांशी संपर्क साधताना त्यांनी कोणी खासदाराने दलित वस्तीत जाऊन मुक्काम केला आहे का अशी विचारणा केली.
त्यांच्या दुर्दैवाने खासदारांमध्ये एकही हरीचा लाल निघाला नाही.
पण एकमेव हरीचा लाल होते कृषिमंत्री राधामोहन सिंग. त्यांनी या सांगितले की त्यांनी त्यांच्या दौऱ्यात आवर्जून दलित वस्तीत मुक्काम केला होता व त्याचे तपशीलही त्यांनी दिले.
आता महानायक स्वतः एखाद्या दलितांच्या घरी गेले होते की नाही ?
तसे फोटो किंवा तसा प्रचार अद्याप दिसून आलेला नाही.
त्यामुळे बहुधा त्यांच्या भारतातील मुक्कामात सर्व भारतीयांना दलितांच्या घरी महानायकांचा मुक्काम, जेवण असा विलक्षण नाट्यानुभव लवकरच येण्याची शक्यता नाकारता येत नाही !
नवीन खासदार नाराज ?
राज्यसभेच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून आले.
राज्यसभेवर येण्याचा आनंद सर्वांनाच होताच पण त्यांचे दुर्दैव हे की त्यांना त्या आनंदाचा उपभोग घेता आला नाही.
एकतर गोंधळामुळे - विरोधी पक्ष किंवा कॉंग्रेसच्या नव्हे - सभागृहाचे कामकाजच होऊ शकले नाही. हा गोंधळ त्यांच्या पक्षातर्फेच पुरस्कृत होता. आणि वर काय तर गोंधळामुळे कामकाज न चालल्याची शिक्षा स्वतःला लावून घेण्याचा निर्णय भाजपने केला.
गोंधळामुळे कामकाज न चाललेल्या तेवीस दिवसांचा पगार न घेण्याचा निर्णय भाजपने जाहीर करून टाकला.
यामुळे नव्याने आलेल्या खासदारांची झाली पंचाईत.
त्यांना पूर्ण पगारही मिळालेला नसल्याने तो सर्वच्या सर्वच व तोही पहिलावहिला खासदार म्हणून मिळालेला पगार त्यांना पक्षाच्या नावाने वाहायला लागल्याने सगळे भलतेच चिडले होते.
नेमके एका खासदाराला कुणीतरी विचारले, "क्या पार्टी कब दोगे ?
त्यावर पहिलाच पगार न मिळाल्याने चिडलेल्या त्या खासदाराने, "अरे, पहले पैसे तो हाथ में आने दो, तनख्वाह होने दो फिर सोचेंगे !'
केवळ भाजपचे खासदारच चिडले नाहीत तर भाजपचे मित्रपक्षही या एकतर्फी घोषणेवर संतापलेले होते.
सुब्रह्मण्यन स्वामींनी, शिवसेनेने तर पगार कापू देणार नाही म्हणून सरळ जाहीर करून टाकले होते.