कट्टा

कलंदर
गुरुवार, 24 मे 2018

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर... 

दिल्लीसाठी पालघर मॉडेल?
कुठे दिल्ली?
कुठे पालघर?
चक्रावला ना?

थांबा, लगेचच खुलासा होईल!

पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. भाजपचे चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे ती होत आहे. आगामी राजकीय लढतीसाठी म्हणजेच २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी ती रंगीत तालीम ठरावी अशी रंजकता-उत्सुकता या पोटनिवडणुकीने निर्माण केली आहे.
या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस(संयुक्त) अशी तिरंगी लढत होत आहे.

भाजपने काँग्रेसचे राजेंद्र गावित यांना ‘पळवून’ आपले उमेदवार केले आणि मग काँग्रेसला नाइलाजाने जुन्या दामू शिंगडांना आयत्यावेळचे खेळाडू म्हणून उभे करावे लागले. यात सर्वाधिक चतुराई शिवसेनेने दाखवली आणि दिवंगत चिंतामण वणगा यांचे भाजपवर नाराज असलेले चिरंजीव श्रीनिवास यांना उमेदवारी देऊन भाजपवर कुरघोडी केली.
याखेरीज शिवसेनेने अन्यत्रही काँग्रेसला पाठिंबा देण्याची भूमिका घेऊन आपला भाजपवरील रोष सतत प्रकट केला आहे.

या सर्व राजकारणाचे पडसाद किंवा तरंग उठले कुठे? तर दिल्लीत!
महाराष्ट्रात एकमेकाचे विरोधी असलेले काँग्रेस व शिवसेना एकत्र येऊन भाजपची झोप उडवत असतील तर दिल्लीच्या स्थानिक राजकारणात हे शक्‍य का नाही? काँग्रेस आणि ‘आप’(आम आदमी पार्टी) हे एकत्र येऊन भाजपला मात देऊ शकतात! हे विचार दुसऱ्यातिसऱ्या कुणी नाही तर दिल्लीच्या १५ वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या शीला दीक्षित यांनी व्यक्त केले आहेत. आणि यामुळे सध्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व मुख्यमंत्रिपदाची आस बाळगून असलेल्या अजय माकन यांच्या पोटात गोळा उठलेला आहे.

अजय माकेन यांनी दिल्लीच्या स्थानिक राजकारणात ‘एकला चलो रे’ची भूमिका घेऊन काँग्रेसला स्वबळावर पुन्हा सत्तेत आणण्याचे स्वप्न बाळगले आहे आणि मुख्यमंत्रिपदाचे स्वप्नही त्यांनी मनाशी गोंजारलेले आहे. अशा स्वप्नाचा चक्काचूर शीला दीक्षित त्यांच्या या प्रस्तावाने करतील काय असा धसका त्यांना बसला आहे. थोडक्‍यात काँग्रेस व शिवसेना हे दोन विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र येऊ शकत असतील तर दिल्लीच्या राजकारणात काँग्रेस आणि आप का नाही येऊ शकणार? काही झाले तरी भाजप हा शत्रू क्रमांक १ आहे असा शीला दीक्षितांचा सिद्धांत आहे.
बघू या उत्तराची वाट!

...कर्नाटकू, येणे मज लावीयला वेधू...!!
खरं तर थोर ज्ञानेशांच्या या अभंगाचे विडंबन करणे हा आगाऊपणा राहील.
पण वर ‘वेधू’च्या जागी ‘वेडू’ शब्द घातल्यास कर्नाटकातील ताज्या राजकीय घडामोडींना ते चपखल लागू पडेल ! कर्नाटकात भाजपला स्वबळाचे बहुमत मिळू शकले नाही ही गोष्टच महानायक व त्यांच्या उपनायकांच्या अंगाचा तिळपापड करणारी होती.

निवडणुकांचे जादूगार, हमखास बहुमताचे रणनीतीकार - चाणक्‍य, अल्पमत असूनही सरकारस्थापनेचे किमयागार म्हणून महानायक व उपनायकांनी ख्याती प्राप्त केली होती. पण दिल्ली, बिहार व त्यानंतर कर्नाटकात त्यांची जादू यशस्वी झाली नाही. काहीसा फाजील आत्मविश्‍वासही नडला असावा.
त्यामुळेच भाजपच्या जागांची गाडी अल्पमताच्या १०४ वर अडत असल्याचे लक्षात आल्यानंतर दिल्लीतल्या भाजप मुख्यालयातील जल्लोष थंडावला. दुपारी १ वाजल्यानंतर भाजपचे आलिशान पंचतारांकित मुख्यालय ओस पडले.

वेळापत्रकाप्रमाणे प्रथम साडेतीन वाजता उपनायक म्हणजेच अमित शहा येऊन पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या दक्षिण दिग्विजयाची घोषणा करतील. त्यानंतर साडेपाच वाजता महानायकांचे आगमन, विजयसभा, जयजयकार, आतषबाजी अशा चमकदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मिठायांच्या ऑर्डरी देण्यात आल्या होत्या.
कर्नाटकात बहुमत मिळणार याची भाजपला एवढी कमालीची खात्री होती, की कर्नाटकाची जबाबदारी असणारे मनुष्यबळविकासमंत्री प्रकाश जावडेकर हे दिल्लीतच येऊन बसले होते.

पण काय दैवदुर्विलास ! नशीब रुसले का आणखी काय झाले ?
प्रकाश जावडेकर यांना पडेल चेहऱ्याने आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा आणि पेट्रोलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना घेऊन संध्याकाळी पुन्हा बंगलोरला रवाना व्हावे लागले.

इकडे भाजप मुख्यालयात शुकशुकाटच !
अखेर साडेपाच, सहा, साडेसहा करता करता रात्री आठ वाजल्यानंतर महानायक व उपनायकांचे आगमन झाले. नेहमीसारख्या गगनभेदी भाषणांऐवजी थोडक्‍यातच ती आटोपण्यात आली व मोजक्‍या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा समारंभ कसाबसा पार पडला. ‘कर्नाटकचा विकास थांबू देणार नाही’ असे महानायकांनी सांगितल्यानंतर भाजप सरकारस्थापनेसाठी प्रयत्न करण्याचे स्पष्ट झाले.

परंतु...... ! आशा, इच्छा फलद्रूप झाली नाही.

 

वेंकय्यांची शाब्दिक जादू परदेशातही!
उपराष्ट्रपती झाल्यानंतर वेंकय्या नायडू नुकतेच तीन देशांच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावरून परतले.५ मे ते ११ मे या सहा दिवसात त्यांनी ग्वाटेमाला, पेरू व पनामा या अमेरिका खंडातील देशांना भेट दिली. राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींचे परदेश दौरे हे मुख्यतः सदिच्छा स्वरूपाचे असतात. त्यामध्ये राजनैतिकतेपेक्षा संबंध सुधारणा, बळकटीकरण यावर भर दिला जातो.

वेंकय्या नायडू यांना शब्दांशी खेळण्याचा, शब्दांची यमके जुळविण्याचा आणि कोट्या करण्याचा विलक्षण नाद आहे. यामुळे त्यांचे कोणतेही भाषण रटाळ होत नाही आणि या शाब्दिक कोट्यांमुळे ऐकणारे खळाळून हसत राहतात. राज्यसभेचे संचालन करताना याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. ‘इफ यू कोऑपरेट, हाउस वुइल ऑपरेट स्मूथली’ हे त्यांचे नेहमीचे वाक्‍य! उपराष्ट्रपतिपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा असताना त्यांना त्याबाबत विचारले असता त्यांनी ती शक्‍यता नाकारताना, ‘मुझे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती बनना नही है, मै उषापति हूँ, उषापति रहने दो’ असे सांगितले. त्यांच्या पत्नीचे नाव उषा आहे. तर असे हे ‘कोट्याधीश’ नायडू साहेब परदेश भेटीला गेले आणि तेथे केलेल्या विविध भाषणांद्वारे त्यांनी भारतातील वर्तमान मोदी सरकारची भरपूर भलावण करताना आपल्या भाषा कौशल्याचा यथेच्छ वापर केला. परिणामी परदेशी यजमान देश खूष होऊन गेले. 

नायडू यांच्या या कामगिरीने परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारीदेखील चकित आणि प्रभावित होते. असे कानावर आले की परराष्ट्र मंत्रालयाने नायडू यांच्या या यशस्वी दौऱ्याबद्दल आणि त्यांच्या भाषा कौशल्याबद्दल प्रशंसा करणारी एक नोटच पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवली.

बहुधा नायडू यांच्या या विशेष राजनैतिक कौशल्याचा उपयोग सरकार करून घेईल!

वादळाचा इशारा; पण ते झालेच नाही
राजधानी दिल्लीला २ व ३ मे रोजी धुळीच्या वादळाने झोडपून काढले. उत्तर भारत आणि वायव्य भारतात हा वादळाचा प्रकार घडला आणि शंभरावर बळी त्यात गेले.

यानंतर भारतीय हवामान विभागाने रोजच वेगवेगळ्या हवामान इशाऱ्यांची पत्रके काढून लोकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्याचा सपाटा लावला. त्यातच ८ मे रोजी देखील असेच एक सोसाट्याचे वादळ दिल्लीवर येऊन थडकण्याचा अंदाज विभागाने वर्तविला.

प्रत्यक्षात वादळ आलेच नाही.

त्यानंतर १४-१५ मे रोजी पुन्हा अशाच एका वादळाने दिल्लीला दणका दिला.

परंतु हवामान विभागाने वादळाच्या पूर्वसूचना देण्याबाबत दाखविलेली तत्परता आणि प्रत्यक्षातील स्थिती यात फार विसंगती आढळून येऊ लागली. 

पूर्वी हवामान विभागाने पावसाचा अंदाज सांगितला की लख्ख ऊन पडायचे अशी जी टिंगल व्हायची तसाच काहीसा हा प्रकार होतो की काय अशी शंका येऊ लागली.

एवढेच नव्हे तर हवामान विभागाच्या काही अधिकाऱ्यांनीच पत्रकारांशी खासगीत बोलताना विनाकारण तत्परता आणि फाजील सावधगिरीच्या पोटी हा अतिउत्साहीपणा चालू आहे.
आता खरे खोटे हवामान विभागच जाणो !

हल्ली छोट्या छोट्या गोष्टींचेही भांडवल व गवगवा करायची, एवढेसे काहीतरी काम करायचे पण त्याचा डांगोरा मात्र असा पिटायचा की जणू फार मोठी बाजी मारली आहे किंवा देखावेगिरीची राष्ट्रीय साथ व लागण सर्वत्र झालेली आहे. बहुधा त्याचाच हा परिणाम असावा व त्यामुळेच हवामान विभागालाही त्याचा संसर्ग झाला असावा.

या देखावेगिरीच्या रोगापासून देशाची कधी सुटका होणार आहे कोण जाणे !

बोलावताय? मग भोगा फळं!
रेल्वे व कोळसा मंत्री पियुष गोयल हे अतिउत्साही मंत्री म्हणून ओळखले जातात.
यापूर्वीही त्यांनी ऊर्जा, कोळसा, अपारंपरिक ऊर्जा अशी तीन-चार खाती एकावेळी सांभाळली होती. आकडेवारी, नवनव्या कल्पना या सतत त्यांच्या तोंडातून धबधब्यासारख्या वहात असतात. अरुण जेटली यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांची दोन खाती अर्थखाते व कॉर्पोरेट मंत्रालयाची जबाबदारीही गोयल यांना तात्पुरती देण्यात आली आहे.

आता गोयल यांना रेल्वे मंत्रालय ते नॉर्थ ब्लॉक(अर्थखाते) अशा चकरा मारायला लागणार काय अशी चर्चा असतानाच असे कानावर आले की गोयल हे काही जेटली यांच्या खुर्चीत जाऊन बसणार नाहीत. त्याऐवजी ते अर्जंट असलेल्या फायली रेल्वे मंत्रालयातच मागवून घेऊन त्यावर निर्णय करतील. गेल्या आठवड्यात देशातील सरकारी बॅंकांच्या प्रमुखांची नियोजित बैठक झाली. आता या बैठकीला हजर राहायचे की नाही याबाबत गोयल यांचा निर्णय होईना. आपण जवळपास हजर राहणारच नाही असे त्यांनी सांगितले. परंतु आग्रह होऊ लागल्यावर त्यांनी हजर राहण्याचे ठरवले.

मंत्री हजर राहणार असले तरी ते काही काळ किंवा पहिल्या भागापुरते म्हणजे दुपारच्या भोजनापर्यंत हजर राहतील आणि नंतरच्या भागात अधिकारी व बॅंक प्रमुख चर्चेला बसतील व संध्याकाळी सर्वजण परतायला रिकामे अशी सर्वांची अटकळ होती. काही बॅंक प्रमुखांनी तर संध्याकाळच्या विमानांची परतीची तिकिटे देखील काढलेली होती. तर, आग्रहाचा मान राखून गोयल सकाळच्या म्हणजे पहिल्या सेशनला हजर राहिले. त्यानंतर ते परतले पण तीन-चार वाजता ते पुन्हा बैठकीला हजर झाले. सगळेच त्यांच्या त्या उत्साहाने चक्रावून गेले. गोयल यांनी बैठकीचा ताबाच घेतला आणि मग सायंकाळी सहाच्याही पुढे बैठक व चर्चा लांबली. ज्या बॅंक प्रमुखांनी संध्याकाळच्या विमानांची परतीची तिकिटे काढली होती त्यांना ती रद्द करून पुन्हा नव्याने दुसरी तिकिटे काढावी लागली. गोयल यांनी त्यांना हजर राहण्यासाठी केलेल्या आग्रहाचे पुरेपूर उट्टे काढले!

संबंधित बातम्या