कट्टा

कलंदर
गुरुवार, 7 जून 2018

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...

सबकुछ अमित शहा!
सव्वीस मे रोजी केंद्रातील वर्तमान राजवटीला चार वर्षे झाली. आता ही राजवट आपल्या पाच वर्षे मुदतीच्या अखेरच्या वर्षात प्रवेश करती झाली आहे. साहजिकच गेल्या ४८ महिन्यांचा ताळेबंद घेऊन राजवटीचे महानायक आणि उपनायक देशापुढे अवतीर्ण होणे अपेक्षितच होते. दरवर्षी केंद्रीय मंत्री आपापल्या खात्यांच्या पत्रकार परिषदा करून आपापले प्रगतिपुस्तक पत्रकारांपुढे म्हणजेच जनतेसमोर सादर करीत असत.

त्याचप्रमाणे ग्रामीण विकास मंत्री आणि आणखी एका मंत्री महोदयांनी आपल्या मंत्रालयाच्या चार वर्षांचे प्रगतिपुस्तक सादर करण्यासाठी पत्रकार परिषदेची घोषणा केली. पण कुठे काय माशी शिंकली की अचानक या दोन्ही पत्रकार परिषदा रद्द करण्यात आल्या.

त्याऐवजी भाजप अध्यक्ष आणि राजवटीचे उपनायक अमितभाई शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या ग्रामस्वराज्य व इतर पुढाकारांची माहिती दिली. त्यांच्या समवेत गरीब बिचारे ग्रामीणविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर गुपचूप बसून होते.

सगळं बोलून झाल्यावर सौजन्य म्हणून शहांनी ‘तुम्हाला काही बोलायचं आहे का’ म्हणून त्यांना विचारले. पण ते काय बोलणार? सर्व काही तर शहांनी बोलून टाकलेले होते. ‘नाही नाही, ठीक आहे’ म्हणून तोमर बिचारे गप्प राहिले. 

परंतु महानायकांच्या राजवटीला चार वर्षे झाल्याचे जे विविध सोहळे राजधानीत पार पडले त्यामध्ये केवळ एकाच व्यक्तीचे वर्चस्व दिसून आले व ते म्हणजे ‘अमितभाई शहा’ यांचे!

२६ मे रोजी त्यांनी भाजप मुख्यालयात मुख्य पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. काहींना शहांच्या बरोबरीने व्यासपीठावर जागाही मिळाली. परंतु बोलले फक्त ‘शहा जी’!

सर्व मंत्रालयाच्या प्रश्‍नांना त्यांनीच उत्तरे दिली. अगदी परराष्ट्रसंबंधांशी निगडित प्रश्‍नांना देखील त्यांनी उत्तरे दिली. दहशतवाद, सर्जिकल स्ट्राईक असे सर्वच विषय त्यांनी हाताळले. यानिमित्ताने पत्रकारांच्या विविध गटांबरोबर जो संवाद साधण्यात आला त्यामध्येही शहा हेच केंद्रस्थानी राहिले.

पक्ष आणि सरकारमधील त्यांचे वाढते वजन, महत्त्व पाहता त्यांना आता नुसते ‘शहा’ न म्हणता ‘शहेनशहा’ म्हणण्याचा मोह कुणाला झाला तर आश्‍चर्य वाटायला नको ! आणि हो, हे नावही चांगलेच राहील. राजवटीचे ‘महानायक’ एकीकडे आणि दुसरीकडे ‘शहेनशहा’! व्वा, किती चपखल!

सरकारच्या चार वर्षपूर्तीनिमित्त महानायकांनी ओडीशात जाऊन देशाला संबोधित केले व दुसऱ्या दिवशी दिल्ली-मेरठ सुपर एक्‍स्प्रेस हायवे उद्‌घाटनाचे निमित्त करून ‘रोड शो.’ केला.

परंतु चार वर्षपूर्ती सोहळ्यावर ‘शहेन-शहा’ पूर्णपणे ‘छाये हुए थे’! त्यांचीच छाया सर्वव्यापी दिसत होती.

त्यांच्या सोबतीला ते नावाला केंद्रीय मंत्र्यांना म्हणजे उदा. गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थ व रेल्वेमंत्री पियुष गोयल, माहिती व प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांना घेत असत. पण सारा ‘शो.’ त्यांच्याभोवतीच फिरत असे. मंत्री हे ‘पाहुणे कलाकार’ या भूमिकेत असत!

सबकुछ अमित शहा!  अरे विसरलोच, ‘शहेन-शहा’! 

याचा दुसरा अर्थ हा की सरकार व पक्षात महानायकांनंतर केवळ ‘शहेन-शहा’ यांचीच चलती आहे!
जय हो! 

 

राहुल गांधी आणि भक्त मंडळी
राहुल गांधी यांचे परदेशात जाणे हा भाजपच्या व भक्तमंडळींच्या टिंगलीचा विषय !
राहुल परदेशात गेले, की त्याचा खुलासा करताना काँग्रेसच्या प्रवक्‍त्यांच्याही पोटात गोळा उठत असे. कारण त्यांच्या परदेशगमनाचे समर्थन करणे ही फारशी सुखावह बाब नाही.
कर्नाटकातील निवडणुकीनंतरही राहुल गांधी परदेशात जातील काय आणि पुन्हा त्यावर खुलासे करत बसण्याची पाळी येणार काय असा धसका मनात असतानाच राहुल गांधी परदेशात जाणार असल्याची माहिती आली.

पण यावेळी राहुल गांधी यांनी स्वतःच त्यांच्या परदेशगमनाची घोषणा ट्‌वीटरद्वारे करून टाकली.

‘भक्तमंडळी’ असा खोचक उल्लेख करतानाच त्यांनी सांगितले की ‘मी लवकरच परत येत आहे. मी माझ्या आईबरोबर तिच्या प्रकृतीविषयक वार्षिक चाचण्यांसाठी जात आहे.’ 

राहुल यांनी खिलाडूपणे भक्तमंडळींचाही समाचार घेतल्याने त्याचीही चांगली प्रतिक्रिया झाली.

विशेष म्हणजे प्रवक्‍त्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. परंतु तिकडे मध्य प्रदेशातील काँग्रेस नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

कारण मंदसोर येथे गेल्या वर्षी शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार व त्यात सहा ते सात शेतकरी मृत्युमुखी पडले होते व त्या घटनेला ६ जूनला वर्ष होत असल्याच्या निमित्ताने राहुल गांधी शेतकरी मेळावा घेणार आहेत. ६ जूनच्या आता राहुल गांधी परततात की नाही यावर मध्य प्रदेशचे काँग्रेसनेते अस्वस्थ झाले आहेत.

पण राहुल गांधी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परततील असे सांगण्यात येते.
हुश्‍श !!!!! 

 

रोड शो आणि भाडोत्री गर्दी!
दिल्ली-मेरठ हा ६७ किलोमीटरचा सुपर एक्‍स्प्रेस हायवे तयार होत आहे. तो पूर्ण होण्यास पुढचे वर्ष उजाडणार आहे. बहुधा पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत तो सुरू होणे अपेक्षित आहे. आता तुम्ही विचाराल की २७ मे रोजी महानायकांनी कोणत्या सुपर एक्‍स्प्रेस हायवेचे उद्‌घाटन केले?

प्रश्‍न अचूक आणि अगदी बरोबर आहे!

होय, महानायकांनी याच सुपर एक्‍स्प्रेस हायवेचे उद्‌घाटन केले! 

गोंधळात पडलात ना ? एकीकडे हा रस्ता पूर्ण होण्यास पुढचे वर्ष उजाडणार आणि दुसरीकडे या रस्त्याचे उद्‌घाटन? तुमचा जसा गोंधळ उडला ना तसाच देशातील जनतेच्या मनाचा गोंधळ उडवायचा आणि राज्य करायचे ही तर महानायकांची हुकमी युक्ती नाही का?

नुसती देखावेबाजी, स्वतःच्या फुशारक्‍या, बढाई आणि खोटारडेपणा किंवा अर्धसत्य बोलून जनतेला फसवायचे आणि भासवायचे, की ते फार काही तरी भव्यदिव्य करत आहेत.

तर मंडळी, या ६७ किलोमीटरपैकी १९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले. त्याचे उद्‌घाटन महानायकांनी केले. त्याच्यासाठी भर उन्हातान्हात ४५-४६ सेल्सिअस तापमानात लोकांना उभे करायला लावले! याहून नौटंकीपणा काय असू शकतो? हा आटापिटा किंवा कासावीसपणा का?

तर हे १९ किलोमीटर जेथे संपतात त्याला लागूनच असलेल्या कैराना लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत होती. २८ मे रोजी मतदान होते. पोटनिवडणुकीच्या प्रचाराला पंतप्रधान न जाण्याचा प्रघात असल्याने अडचण होती. पण गोरखपूर व फुलपूरमध्ये जो मार मिळाला व पराभवामुळे मानहानी झाली होती त्याची पुनरावृत्ती होण्याची भीती पण होती. प्रत्यक्ष कैरानामध्ये जाण्याऐवजी शेजारच्या गावात जाऊन प्रचार करायचा आणि विजयासाठी प्रयत्न करायचा व त्यासाठी अर्धवट पूर्ण झालेल्या रस्त्याचे उद्‌घाटन करण्यासही या महानायकांनी मागेपुढे पाहिले नाही.

सत्तेसाठी आतुरलेल्यांना विधिनिषेध रहात नाही त्याचे हे ढळढळीत उदाहरण मानावे लागेल. एवढेच नव्हे तर या साहेबांनी भर उन्हात रोड शो. केला. त्यासाठी दिल्ली भाजपला लोकांना जमा करणे भाग पडले. चक्क बसगाड्या भरून लोकांना आणले गेले.

कानावर आले, की उन्हाचे लोक येण्यास तयार नव्हते अखेर त्यांना विविध आमिषे दाखवून हा ‘शो.’ पार पाडण्यात आला. सर्वसाधारणपणे रस्ता पूर्ण झाला, की त्याचे उद्‌घाटन व तो देशाला अर्पण केला जातो.

याठिकाणी अर्धवट रस्ताच अर्पण केला गेला. कारण महानायकांना देखावा करायचा होता. कैरानासाठी प्रचार करायचा होता. त्यामुळे रस्ता राहिला बाजूला. त्यांच्या भाषणात त्यांनी गांधी परिवारावर व काँग्रेसवर नेहमीच्या पद्धतीने तोंडसुख घेतले. गांधी परिवार व रस्त्याचा अर्थाअर्थी संबंध काय? पण महानायकांच्या मनात आले ते अंतिम!

धन्य धन्य महानायक!!!!

 

राजीनाम्याचे गौडबंगाल?
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल १५ मे रोजी लागले.

भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी.एस.येद्युरप्पा आणि त्यांचे उजवे हात बी.श्रीरामुलु हे दोघेही लोकसभेचे सदस्य होते आणि आता विधानसभेवरही निवडून आल्याने त्यांना दोन्हीपैकी कोणते सदस्यत्व राखायचे याचा निर्णय  नियमाप्रमाणे पुढील १५ दिवसात करावा लागणे अपेक्षित होते. परंतु दोघांना कसली घाई झाली होती कुणास ठाऊक त्यांनी तत्काळ लोकसभा सदस्यत्वाचे राजीनामे सादर केले.

दुसऱ्या दिवशी त्यांचे लोकसभा सदस्यत्वाचे राजीनामे मंजूर झाल्याचे प्रसिद्ध झाले. एवढेच नव्हे तर आता भाजपचे संख्याबळ २८२ वरून घसरून २७२ पर्यंत म्हणजेच काठावरच्या बहुमताइतकेच राहिल्याच्या बातम्याही पाठोपाठ प्रसिद्ध झाल्या. २७२ ही संख्या लोकसभेच्या वेबसाइटवरदेखील उल्लेखित करण्यात आली होती.

विशेष म्हणजे या दोघांचे राजीनामा मंजूर झाल्याचे लोकसभा सचिवालयातर्फे जारी करण्यात येणाऱ्या ‘बुलेटिन’ मध्ये देखील प्रसिद्ध झाल्याने त्याबाबत शंकेला जागाच उरली नव्हती.

संसदीय कामकाज पद्धतीत बुलेटिनमध्ये एखादी बाब प्रसिद्ध होणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघच मानली जाते. पण कुठेतरी काहीतरी गडबड झाली. अचानक असे सांगितले जाऊ लागले की या दोघांचे राजीनामे मंजूरच झालेले नाहीत आणि ते लोकसभा सदस्य म्हणून कायम आहेत. आता पंधरा दिवसांच्या आता ते विधानसभा सदस्यत्व सोडणार की लोकसभा सदस्यत्व हे स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

पण हा गडबड घोटाळा झाला कसा याबद्दल अनेक तर्ककुतर्क चालू झाले आहेत. अनेक प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. येद्युरप्पा व श्रीरामुलु यांनी दिल्लीत येऊन प्रत्यक्ष राजीनामे दिले का? कारण लोकसभेचा राजीनामा स्वतःच्या हस्ताक्षरात व स्वतःच अध्यक्षांकडे सादर करण्याचे बंधन असते. आणि जर त्यांनी तसे केले नसेल तर स्वतः हजर न राहता राजीनामे त्यांना कारण काय होते? तसेच लोकसभा सचिवालयानेही त्वरित ते मंजूर झाल्याचे सांगणे, तसा उल्लेख बुलेटिनमध्ये करण्याची कृती कशी व कशाच्या आधारे केली?

भाजपला आपले संख्याबळ साध्या बहुमतापेक्षाही खालावण्याची भीती वाटल्याने त्यांनी त्यांचे राजीनामे रद्द करवले का? सरकारला तसा धोका नसताना अशी धास्ती बाळगण्याचे कारण काय?

एक ना अनेक प्रश्‍न व शंका विचारल्या जाऊ लागल्या आहेत आणि लोकसभा सचिवालयाने याबाबत चक्क कानावर हात ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे.

आम्हाला जे कळविण्यात आले ते आम्ही प्रसिद्ध केले, आमची त्यात कोणतीही भूमिका नाही असे सांगण्यात येत आहे.

हे प्रकरण मजेदार निश्‍चितपणे नाही. गंभीर आहे व ते हक्कभंगाचे देखील होऊ शकते. चला वाट पाहू आणखी या प्रकरणातून काय काय बाहेर पडते ते !

संबंधित बातम्या