कट्टा

कलंदर
शुक्रवार, 15 जून 2018

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...

वाजपेयी - ना टायर्ड ना रिटायर्ड 
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना युरिनरी संसर्गावरील उपायांसाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान (दिल्लीच्या भाषेत एम्स) संस्थेत दाखल करण्यात आले. सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले. हा त्यांच्या नियमित तपासण्यांचाच प्रकार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 
यापूर्वी देखील एक-दोन वेळा वाजपेयींना अशाच प्रकारे नियमित तपासण्यांसाठी या संस्थेत दाखल करण्यात आले होते. 

माध्यम प्रतिनिधींनी "एम्स'मधील घडामोडींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. परंतु "रेड ऍलर्ट' नव्हता. सायंकाळपर्यंत वाजपेयींना पुन्हा घरी सोडतील असेही सुरुवातीला डॉक्‍टरांनी सूचित केले होते. त्यामुळे माध्यम प्रतिनिधीही काहीसे शांत होते. एवढेच काय पण भाजपची मंडळीही काहीशी बिनधास्त होती. 

अचानक सायंकाळी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे "एम्स'वर जाऊन थडकले. रुग्णाईत वाजपेयींची त्यांनी भेट घेतली, त्यांच्या कुटुंबीयांकडे त्यांची विचारपूस केली. राहुल गांधी यांची ही भेट अचानक आणि काहीशी अनपेक्षित होती. माध्यम प्रतिनिधी काहीशा शिथिल अवस्थेत होते ते खडबडून जागे झाले आणि मग काय... यातून जो "मेसेज' जायचा तो गेला. 

बघा, राहुल गांधी यांनी सौजन्य दाखवले; पण भाजपकडून वाजपेयींची विचारपूस करण्यासाठी कुणीही गेले नाही! आणि मग काय... एकामागून एक भाजपची नेतेमंडळी "एम्स'कडे धाव घेताना दिसू लागली. 

सर्वप्रथम भाजप अध्यक्ष अमित शहा गेले. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा तेथे गेले. खरेतर नड्डा यांनी सर्वप्रथम तेथे जाणे अपेक्षित होते. मागोमाग लाइनच लागली. 

गृहमंत्री राजनाथसिंग गेले. त्यानंतर साक्षात महानायक गेले. त्यांनी वाजपेयींना पाहिले. त्यांच्या कुटुंबीयांबरोबर जवळपास पाऊण तास व्यतीत केला. अखेर भाजपचे भीष्माचार्य (ज्यांना शरपंजरी पाडण्यात आले आहे) लालकृष्ण अडवानी, त्यांच्या मार्गदर्शक मंडळातले दुसरे सहकारी मुरलीमनोहर जोशी या वाजपेयींच्या समकालीन नेत्यांनीही हजेरी लावली. 

या सर्व भेटींमुळे वातावरण बदलले आणि चिंतेचे ढग जमू लागले. 

भाजपच्या ज्या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन वाजपेयींना पाहिले होते त्यांनी परतल्यानंतर सर्व ठीक असल्याचा निर्वाळा दिला होता. सकाळपर्यंत डॉक्‍टरांकडून हिरवा कंदील मिळाला की कदाचित वाजपेयी घरी परततील असेही या नेत्यांनी सांगितले. पण... ! माध्यम प्रतिनिधींना चैन पडत नव्हते आणि "काही होणार नाही' अशी समजूत ठेवून कुणी जुगार खेळण्यासही तयार नव्हते. उशिरापर्यंत माध्यम प्रतिनिधींनी रात्र जागवली. 

आता जी कुजबूज कानावर येऊ लागलीय त्यानुसार राहुल गांधी यांनी सदिच्छा भेट घेतल्याने भाजप नेत्यांच्या गोटात जी अस्वस्थता निर्माण झाली, त्यामुळे साक्षात महानायकांनादेखील वाजपेयींना भेटायला जावे लागले! 

 

प्रणवदांच्या निरनिराळ्या चाली 
बुद्धिबळ खेळणाऱ्यांना "चाली' या शब्दाचा अर्थ अधिक चांगला माहिती असेल. 

प्रणवदा हे मुरलेले, मुरब्बी राजकारणी आहेत. रा. स्व. संघाचे आमंत्रण स्वीकारून ते रेशीमबागेत (संघ मुख्यालय नागपूर) जाऊन आले. तेथे त्यांनी मास्तरकी छापाचे भाषण केले. ते फार काहीतरी क्रांतिकारक भाषण करतील अशा अपेक्षांचा त्यांनी भंगही केला. विशेष म्हणजे सरसंघचालकांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच यानिमित्त झालेल्या वादंगाचा उल्लेख करून "आजच्या या प्रसंगाने फारसा काही फरक पडणार नाही. मुखर्जी हे मुखर्जीच राहणार आहेत आणि संघ हा संघच राहणार आहे' असे स्पष्ट केल्यावर लोकांनी खरेतर टीव्ही बंद करायला हवे होते. पण एका मुखर्जींना आमंत्रित करून संघाने दोन-तीन दिवस भरपूर प्रसिद्धी मिळवली जी त्यांना यापूर्वी कधीही मिळाली नव्हती. राष्ट्रपतिपदावरून पायउतार झालेल्या मुखर्जी यांनाही भरपूर प्रकाशझोत मिळाला. तेही गालातल्या गालात हसले असावेत. 

प्रणवदांच्या संघ भेटीला विरोध करून कॉंग्रेसने केलेला भंपकपणाही उघड झाला. आता राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या "इफ्तार'ला मुखर्जी यांना आमंत्रित केले जाणार काय अशी चर्चा सुरू झाली. पण राहुल गांधी यांनी त्यांना निमंत्रित केले आणि मुखर्जी यांनी त्याचा स्वीकारही केला व हजर राहण्याचेही जाहीर केले. 

यानिमित्ताने मुखर्जी यांनी संघाचे आमंत्रण स्वीकारण्याचे कारण काय यावर राजकीय वर्तुळात तर्ककुतर्क सुरू झाले. काही तर्क हास्यास्पद पातळीवर गेले. 

बिहारमधल्या एका राजकारण्याने सांगितले, की मुखर्जी फार खोल माणूस आहे. पंतप्रधान न केल्यामुळे चिडलेल्या मुखर्जींनी संधी मिळेल तेव्हा गांधी घराण्याला अडचणीत आणले. मग या नेत्याने राहुल गांधी यांनी एका जाहीर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय असलेल्या वटहुकमाचा कागद जाहीरपणे टरकावल्याच्या किश्‍श्‍याचा संदर्भ दिला. राहुल गांधी यांना हा वटहुकूम (लालूप्रसाद यांना मदत करणारा) फाडून टाकण्याचा सल्ला मुखर्जी यांनी दिला होता व त्यासाठी नीतिशकुमार यांनी मुखर्जींचे कान भरले होते अशी कहाणी सांगून या बिहारी नेत्याने मति गुंग करून टाकली. 

शिवसेनेच्या मांजररुपी वाघांनी मुखर्जी यांना भावी पंतप्रधानपद देऊन टाकले आहे. 

अशा अनेक चर्चा चालूच आहेत. हा देशच चर्चाबाज लोकांचा आहे! 

 

अति उत्साह, फाजील उत्साह 
अति उत्साहीपणा, फाजील उत्साह दाखवणे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे हे वाक्‍प्रचार वर्तमान सरकारला तंतोतंत लागू पडतात. या सरकारमधील मंत्र्यांचे वागणे, बोलणे चालणे पाहिल्यानंतर कुणालाही याचा अनुभव येईल. 

रेल्वेमंत्री पियुष गोयल हे अशाच एका अतिउत्साही मंत्र्यांमध्ये समाविष्ट होतात. त्यांना मोबाईल ऍप मंत्रीही म्हटले जाते. ते ज्या मंत्रालयाचे काम पाहतील त्यासंबंधीची असंख्य "ऍप' तयार करून लोकांना मोबाईलवर माहिती पुरविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या या उत्साहीपणामुळेच त्यांच्या अर्थमंत्रिपदाची चर्चाही बराच काळ सुरू होती. पण अरुण जेटली यांच्यासारखा नेता त्या पदावर असल्याने गोयल त्याबद्दल विचार करू शकत नाहीत. 

पण त्यांच्या प्रयत्नांना किंचितसे यश मिळाले. जेटली यांच्यावर मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया झाली आणि हंगामी स्वरूपात त्यांच्याकडे अर्थखात्याची जबाबदारी आली. नॉर्थ ब्लॉकमध्ये जाऊन त्यांनी तात्पुरती जबाबदारी स्वीकारली. 

काय त्यांच्या उत्साहाचा झरा खळाळून वाहू लागला. त्यांनी कार्यालयाबाहेर त्यांच्या नावाची पट्टी लावली. ते गणपतिभक्त असल्याने एका गणपतीच्या मूर्तीची स्थापना झाली. जणू काही आता तेच पूर्णकालिक अर्थमंत्री झाल्याच्या थाटात ते वावरू लागले. 

याचा परिणाम व्हायचा तो झाला.  त्यांच्या या अतिउत्साहीपणाला लगाम घालायच्या सूचना त्यांना मिळाल्या. आता असे सांगितले जाते, की जेटली यांच्या कार्यालयात गोयल जातात तेव्हा मंत्र्यांच्या खुर्चीत न बसता सोफ्यावर बसून अत्यावश्‍यक कागदपत्रे पाहतात आणि त्याहीपेक्षा अर्थखात्याची सूत्रे त्यांनी रेल्वेमंत्र्यांच्या त्यांच्या कक्षातूनच चालवतात. 

आता जेटलींची प्रकृती पण सुधारू लागली आहे आणि विरोधी पक्षांवर तोंडसुख घेणारे दोन ब्लॉग लिहून त्यांनी त्यांचे नाणे अद्याप चलनी असल्याचे दाखवून दिले. 

गोयल पुन्हा आपल्या झुक झुक गाडीत बसतील... 

 

संपर्क फॉर समर्थन 
घोषणा तयार करण्यात भाजपचा हात कुणी धरू शकणार नाही. 
गुड, शायनिंग इंडिया, अच्छे दिन, सब का साथ सब का विकास वगैरे वगैरे. 

आता पोटनिवडणुकांमधल्या सततच्या पराभवांमुळे धास्तावलेल्या भाजपने आता घसरता जनाधार सावरण्यासाठी "संपर्क फॉर समर्थन' नावाने संपर्क मोहीम सुरू केली आहे. यामध्ये भाजप अध्यक्षांपासून प्रमुख केंद्रीय मंत्र्यांना समाजातल्या प्रमुख-प्रतिष्ठित नावलौकिक असलेल्या व्यक्तींना भेटण्याचा समावेश आहे. 

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीतून या मोहिमेची सुरुवात केली. पहिली भेट माजी लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांच्याशी ठरविण्यात आली. लष्करप्रमुख अद्याप त्यांना सेनेतर्फे मिळालेल्या दिल्ली छावणी परिसरातच राहतात. पण नावाच्या गफलतीमुळे गुडगावमध्ये राहणाऱ्या दलबीरसिंग सुहाग नावाच्या व्यक्तीच्या घरी जाण्यासाठी अमित शहा निघाले. हा घोटाळा त्यांच्या सहाय्यकांनी केला होता. परंतु वेळेवर तो उघडकीस आल्याने शहा यांच्यावर आलेली फजितीची वेळ टळली आणि अखेर ते योग्य त्या माजी लष्करप्रमुखांच्या घरी पोचले. 

सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास टाकला. 

परंतु भाजपच्या या धेडगुजरी म्हणजेच अर्धवट इंग्रजी व हिंदी घोषणा प्रभावी ठरताना आढळत नाहीत. मुंबईत शहा यांनी माधुरी दीक्षित यांची भेट घेतली पण लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर या दोन भारतरत्नांची भेट त्यांना मिळू शकली नाही. या त्यांच्या मोहिमेबद्दल खुद्द पक्षातही फार उत्साह नाही. या प्रकाशातल्या लोकांना भेटून मते मिळणार आहेत काय असा सरळ प्रश्‍न काही नेत्यांनी खासगीत केला. 

पण उघड बोलण्याची अद्याप कुणात हिंमत नाही. 

त्यामुळे सध्या भाजपमध्ये महानायक आणि त्यांचे सहनायक जे काही करतील त्याला "हो' म्हणायचे आणि सोडून द्यायचे असा काहीसा तुटक प्रकार सुरू झाला आहे. 

 

बिहारमध्ये भाजपची कसोटी 
बिहारमधील लोकसभेचे जागावाटप भाजपनेतृत्वाचा घाम काढणार आहे. तशी चिन्हे साफ दिसू लागली आहेत. 

बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. यासाठी इच्छुक पक्षांची संख्या चार आहे. भाजप, लोकजनशक्ती पक्ष (रामविलास पास्वान), संयुक्त जनता दल (नीतिशकुमार) आणि राष्ट्रीय लोकसमता पक्ष (उपेंद्र कुशवाह). याखेरीज पप्पू यादव यांच्यासारख्या एकट्यादुकट्या शिलेदारांनाही जागा द्याव्या लागल्या तर आणखीनच पंचाईत. 

सध्या चाळीसपैकी 21 जागा भाजपकडे आहेत. त्यातील दोन जागांवर त्यांचे दोन बंडखोर खासदार आहेत - शत्रुघ्न सिन्हा आणि कीर्ती आझाद. तरीही भाजप स्वतःला किती जागा कमी करणार हा प्रश्‍न आहे कारण नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान व्हायचे असल्याने वाटेल ते करून लोकसभेला अधिकाधिक जागा लढविणे व जिंकणे हे मोदी-शहा जोडगोळीचे उद्दिष्ट आहे. 

असे सांगतात, की नीतिशकुमार यांनी केंद्रात मंत्री व्हावे यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. नीतिशकुमार यांनी तो दबाव झुगारलेला आहे. उलट संयुक्त जनता दलास सर्वाधिक जागा मिळाव्यात असे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत. परंतु संयुक्त जनता दलास जास्त जागा देण्याची तयारी भाजपची नाही. 

भाजपच्या गोटातून पसरविण्यात आलेल्या माहितीनुसार भाजप स्वतः वीस जागा लढवू इच्छित आहे. 

उरलेल्या वीस जागांमध्ये सात जागा पास्वान यांना, आठ ते नऊ जागा नीतिशकुमार यांना व तीन ते चार जागा कुशवाह यांना देण्याची हालचाल आहे. यातच पप्पू यादव यांना "ऍडजस्ट' करण्याची योजनाही आहे. 

संयुक्त जनता दलाने आणखी एक अट टाकून अडचण उभी केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक नीतिशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढविली जावी. ही कल्पना भाजपने साफ नाकारली आहे. विधानसभा निवडणूक नीतिशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढणे मान्य आहे; पण लोकसभा निवडणूक मोदी यांच्या चेहऱ्याखालीच लढविल्या जातील. आता नीतिशकुमार व त्यांचे अनुयायी हे कसे मान्य करतात त्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 

थोडक्‍यात महाराष्ट्र, बिहार येथील जागावाटप भाजपला चांगलेच अडचणीचे जाण्याची चिन्हे आहेत.

संबंधित बातम्या