कट्टा

कलंदर
गुरुवार, 28 जून 2018

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर... 

प्रधान सेवकाचा ताठरपणा ? 
देशाच्या महानायकाने पंतप्रधानपद ग्रहण केल्यानंतर विलक्षण ठामपणाने देशाला सांगितले होते, की ते देशाचे प्रधानमंत्री नसून "प्रधान सेवक' आहेत. वा वा काय तो त्यांचा जबरदस्त आविर्भाव होता ! लोकं तर पार प्रभावित झाली होती. पण जसा रंग विटका होऊ लागतो तसे प्रधान सेवकांचे व्हायला लागले. 

त्यांची आश्‍वासने, वचने, विधाने-वक्तव्ये यांच्यातला जोर ओसरत गेला. 
त्यांनी नम्रतेचा आव खूप आणलेला होता पण मूळचा पिंड कसा जाईल ? 

प्रधान सेवक हे लेचेपेचे नाहीत त्यांच्यात विलक्षण रग आहे आणि ती वेळोवेळी दिसून येत असते. 
आता आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हणे प्रधान सेवकांकडे एकवीस वेळा भेटीसाठी वेळ मागितली. पण त्यांना एकदाही मिळाली नाही. अखेर त्यांनी भाजपची व प्रधान सेवकांची साथच सोडण्याचा निर्णय केला. 

केरळचे मुख्यमंत्री पिन्नराई विजयन यांनीही प्रधान सेवकांकडे भेटीची वेळ मागितली होती. किमान चार वेळा तरी त्यांनी राज्याच्या विविध कामांसाठी प्रधान सेवकांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. परंतु त्यांनाही प्रधान सेवकांनी भेटीची वेळ दिली नाही. 

पंतप्रधानांनी कुणाला भेटायचे कुणाला नाही हा सर्वस्वी त्यांचा विशेषाधिकार असला तरी सभ्यता व शिष्टाचारानुसार एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटण्याचे नाकारणे हा शुद्ध असभ्यपणा आहे. 

पिन्नराई हे एकटे नव्हते तर राज्यांच्या विविध प्रलंबित प्रकल्पांच्या संदर्भात ते सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटायला आले होते. मंजूर झालेले प्रकल्पही केंद्र सरकारकडून रखडविले जात असल्याबद्दल त्यांना पंतप्रधानांकडे बाजू मांडायची होती पण प्रधान सेवक एवढे "बिझी' होते की त्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटीसाठी वेळ देता आला नाही. 

अखेर केरळचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ, खासदार यांनी चक्क रेल्वे मंत्रालयापुढे निदर्शने केली आणि मुख्यमंत्रीही त्यात सहभागी झाले. 

केवळ केरळमध्ये बिगर-भाजप आणि विरोधी पक्षाचे सरकार आहे म्हणून अशी सावत्र वागणूक प्रधान सेवकांना शोभणारी नाही. 

संघराज्य पध्दतीला हरताळ फासणारा हा प्रकार आहे. 
सध्या देशात शिष्टसंमत आचरण नसलेली राजवट अस्तित्वात आहे असेच नाइलाजाने म्हणावे लागेल ! 

 

चंद्रशेखर राव यांची वेगळी चाल ? 
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी प्रादेशिक पक्षांच्या "फेडरल फ्रंट'च्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता. अचानकच त्यांना "फेडरल फ्रंट'चा पुळका आला होता आणि त्यांनी ममतादीदींशी संपर्कच साधला नाही तर चक्क विशेष विमानाने ते कोलकता येथे दाखल झाले. 
ममतादीदीदेखील काहीशा शंकित व चकित झाल्या होत्या. त्यामुळेच त्यांचा प्रतिसादही सावध व काहीसा थंडच राहिला होता. 

कर्नाटकात कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने एकत्र येऊन भाजपला मात दिली व सरकार स्थापन केले. त्यावेळच्या सोहळ्याला देशातले तमाम प्रमुख विरोधी पक्षनेते बंगलुरु येथे जमले व त्यांचे ते चित्र भाजपला धास्तावून गेले होते. पण त्या सोहळ्यात चंद्रशेखर राव मात्र गायब होते. 

आपल्याला पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे कारण देऊन त्यांनी एक दिवस आधीच बंगलुरुला जाऊन देवेगौडा पितापुत्रांचे अभिनंदन करून हैदराबादला प्रयाण केले होते. 

आता मात्र दिवसेंदिवस राव साहेबांच्या हालचाली संशयास्पद होत चालल्या आहेत. 
दिल्लीत येऊन त्यांनी नुकतीच प्रधान सेवकांची भेट घेतली. सुमारे सव्वा ते दीड तास ही भेट झाल्याचे सांगण्यात आले. 

जे प्रधान सेवक इतर विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना भेट न देता वाटेला लावतात त्यांना राव साहेबांना भेटायला भरपूर वेळ मिळतो हे विशेष म्हणावे लागेल ! 

असे कानावर आले की विरोधी पक्षांच्या आघाडीत काड्या कशा करता येतील आणि तेलंगणातून भाजपला दक्षिणेत पाय रोवायला कसे मिळतील यावर या नेत्यांमध्ये चर्चा झाली. तेलंगणा काय किंवा आंध्र प्रदेश काय दोन्हीकडे भाजप नगण्य आहे. परंतु तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या मदतीने तर आंध्र प्रदेशात वायएसआर कॉंग्रेसचे जगमोहन रेड्डी यांच्या मदतीने काही जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात भाजप आहे. कर्नाटकात आता भाजपला पूर्वीसारखे यश मिळण्याची शाश्‍वती वाटत नसल्याने हा खटाटोप सुरू आहे. 

यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मनात चंद्रशेखर राव यांच्याबद्दल असलेल्या शंकांवर आता जवळपास शिक्कामोर्तब झाल्यासारखे आहे. यामुळे आता राव साहेबांना विरोधी पक्षांच्या गोटात फारसा थारा मिळण्याची चिन्हे नाहीत. 

भाजपला आता मित्रपक्षांची नितांत निकड भासू लागली आहे. त्यामुळेच आता चंद्रशेखर राव, जगमोहन रेड्डी यांच्यासारख्या मंडळींची चाचपणी भाजपने सुरू केली आहे. 

शिवसेनेने खरोखरच वेगळी चूल मांडली तर भाजपकडे तालेवार मित्रपक्षांची चांगलीच चणचण भासणार आहे. बिहारमधील संयुक्त जनता दल व पंजाबमध्ये अकाली दल वगळता मग कोणीच फारसे मजबूत मित्रपक्ष भाजपकडे नाहीत. पण नीतिशकुमार यांच्या संयुक्त जनता दलानेही डोळे वटारण्यास सुरवात केल्याने नवीच समस्या उभी राहिली आहे. 

त्यामुळेच भाजप आता मित्रांच्या शोधात आहे ! 

 

राजकीय निर्जला एकादशी 
सध्या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये धार्मिकता दाखविण्याची जोरदार स्पर्धा सुरू आहे. 
विशेषतः बहुसंख्य हिंदू समाजास न दुखावणे आणि "आम्हीही हिंदूंची कदर करतो' हे दाखविण्याचा विशेष खटाटोप केला जातो. 

भाजप हा मुळातच हिंदुत्ववादी पक्ष असल्याने या पक्षाला फार वेगळे असे काही करावे लागत नाही. 
पण धर्मनिरपेक्षतेची कास धरणाऱ्या कॉंग्रेस पक्षाला मात्र यासाठी अटोकाट प्रयत्न करावे लागत आहेत. इतके, की त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी यांना हल्ली ते जेथे जातील तेथे एखादा मंदिर दर्शनाचा कार्यक्रम हा करावाच लागतो. तसेच त्याचे जाहीर प्रदर्शनही करावे लागते. 

तर अशा स्पर्धात्मक हिंदुत्व दर्शनामध्ये कधीकधी विनोदनिर्मितीही अनवधानाने होत राहते. 
रविवारी म्हणे एकादशी होती आणि ती "निर्जला एकादशी' होती. 

हे निमित्त साधून कॉंग्रेस पक्षातर्फे चक्क त्यांच्या 24 अकबर मार्ग या मुख्य कार्यालयात धार्मिक विधी आयोजित करण्यात आला होता. पण याची उचित जाहिरात व्हावी यासाठी माध्यम प्रतिनिधींनाही बोलाविण्याचे ठरवले. कार्यक्रम सकाळी 10 वाजता होता. निर्जला एकादशी असली तरी माध्यम प्रतिनिधींसाठी सात्त्विक आहाराची सोय करण्यात आली. 

काय मीडिया विभाग त्वरेने कामाला लागला. त्यांनी धडाधड माध्यम प्रतिनिधींना निरोप धाडले. 
परंतु..... ! 

निरोप 10च्या ऐवजी 1 वाजताचा गेला. 
त्यामुळे प्रत्यक्ष पूजापाठाच्या वेळी माध्यम प्रतिनिधी पोचलेच नाहीत. ते आले 1 वाजता. 

तोवर सगळे आटोपले होते. 
चला, एकादशी पावली नाही असंच म्हणावं लागेल ! 

 

रा.स्व.संघ... मी कात टाकली ......... ! 
मंदिराचा जीर्णोद्धार, इमारतीची रंगरंगोटी, एखाद्या व्यक्तीने ढब्बूगिरी टाकून सडसडीत होणे..... याला मराठीत "कात टाकणे' असा शब्दप्रयोग वापरला जातो. 
तो काय केवळ साप-नागापुरता मर्यादित नाही ! 

तर येथे रा.स्व.संघाने किंवा अगदी अचूकपणे सांगायचे असेल तर दिल्लीस्थित संघ कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या माहितीचा हा किस्सा ! 
करोल बाग ते नवी दिल्ली स्टेशनादरम्यान झंडेवालां(किंवा दिल्लीच्या भाषेत झंडेवालान) नावाचा भाग आहे. तेथे "केशव-कुंज' नावाचा इमारतींचा एक समूह आहे तेच ते दिल्लीतले "संघालय' ! येथे सुरुची प्रकाशनाचे दुकान आहे. ऑर्गनायझर-पांचजन्य साप्ताहिकाचे कार्यालयही आहे. आत अतिथिगृह, भोजनगृह, पाकगृह, मोठे पटांगण व आवार असे संघाला आवश्‍यक अशा सर्व सोयींनी युक्त असे हे संकुल किंवा "कुंज' आहे. 

काळ पुढे सरकतो तशा इमारती व सोयीसुविधाही जुनाट होत जातात. मग नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू होते. 

तर 2014 मध्ये भारतात भाजपची प्रथमच स्वबळावरील सत्ता स्थापन झाली त्यानंतर महानायकाने देशाची सूत्रे हाती घेतली. हा महानायक नावीन्याचा हौशी. देशाचेच रंगरूप पालटायला निघाल्यानंतर "केशव-कुंज' मागे कशासाठी ? काय आता "केशव-कुंजा'चे कात टाकणे सुरू झाले आहे. 

सर्व अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असे हे "संघ-संकुल' उभे राहणार आहे. 
यात कॉन्फरन्स हॉल आणि सर्व सोयींनी सुसज्ज असे अत्यंत आधुनिक असे अतिथिगृह, आतिथ्याला आवश्‍यक असलेल्या इतर सर्व सोयी सुविधांची निर्मिती सुरू आहे. 

विशेष म्हणजे शरीरबळ व आरोग्यावर विशेष भर असलेल्या संघ स्वयंसेवकांसाठी या संकुलात एक अत्याधुनिक "जिम' उभारण्यात येत आहे. 

असे म्हणतात की भाजपने आपल्या नव्या पंचतारांकित अशा नव्या मुख्यालयात स्थलांतर करण्याचे ठरवल्यानंतर महानायकांनी संघापुढेही "केशव-कुंज' नूतनीकरणाचा प्रस्ताव ठेवला. 
आता महानायकांचा प्रस्ताव म्हटल्यावर तो नाकारणार कसा ? तो एक प्रकारे हुकूमच ना ? 

काय संघ कार्यालयाचेही नूतनीकरण सुरू झाले. 
एक मराठीत म्हण आहे."राजा बोले दळ चाले' म्हणजेच राजाने हुकूम लिा की सेना त्याबरहुकूम चालायला लागते. तद्वतच सध्या भाजप व संघात स्थिती आहे. 

म्हणेल ती पूर्वदिशा ! बिशाद आहे कुणाची विरोधात जाण्याची ? हो, हो अगदी संघाची देखील ! 

 

देशाचे अर्थमंत्री आहेत किती आणि कोण ? 
अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया झाली. 
ही एक नाजूक शस्त्रक्रिया मानली जाते. तसेच रुग्ण पूर्ण बरा होण्यासाठी मोठा कालावधी लागतो. 
त्यामुळेच जेटली रुग्णालयातून घरी आलेले असले तरी अद्याप सक्रिय झालेले नाहीत. 
अर्थात त्यांच्या जागी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे अर्थखात्याची हंगामी जबाबदारी देण्यात आली आहे. 

बहुधा गोयल यांना प्रधान सेवकांचा वरदहस्त प्राप्त असावा कारण आता त्यांनी जणू काही ते पूर्णवेळ अर्थमंत्री असल्याच्या थाटात वावरण्यास आणि निर्णय करण्यास सुरवात केली आहे. 
यामुळे अरुण जेटली काहीसे अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येते. 

गोयल यांच्या निकटवर्तीयांकडून समजलेल्या माहितीनुसार जेटली यांना प्रत्येक निर्णयाची पूर्वसूचना व माहिती दिली जाते. काही वेळेस जेटली हे त्यांच्या घरून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा, विचारविनिमय देखील करतात. 
असे असले तरी जेटली गप्प बसलेले नाहीत. त्यांनी विविध विषयांवर व विशेषतः कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांना "टार्गेट' करणारे ब्लॉग घरबसल्या लिहिण्याचा सपाटा लावला आहे. आणीबाणीच्या वर्धापनदिनी देखील त्यांनी इंदिरा गांधी यांना हिटलर म्हणून संबोधणारा एक ब्लॉग लिहिला होता. 

जेटली यांनी ब्लॉग लिहिण्याचा लावलेला सपाटा पाहता त्यांना असे दाखवायचे असावे की आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत आणि घरूनही ते अर्थखात्याचे कामकाज पाहू शकतात आणि थोडक्‍यात म्हणजे आता गोयल यांना अर्थखात्यातून सुटी द्यावी ! 
परंतु महानायकांना गोयल यांना आता काढा असे सांगण्याचे धाडस करणार कसे ? तेवढी हिंमत आहे कुणाकडे ? 

चला महानायकांच्या मनात येईपर्यंत ब्लॉग लिहीत बसू ! 
चला ब्लॉग ब्लॉग खेळू ! 
जय हो ! !! 

संबंधित बातम्या