कट्टा

कलंदर
मंगळवार, 17 जुलै 2018

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर... 

आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग 
कोणत्याही राजकीय पक्षात नवे-जुने वाद कायम असतात. 
जेवढा पक्ष मोठा तेवढे हे वाद तीव्र ! 
भाजप सध्याचा आकारमानाने सर्वांत मोठा पक्ष ! मग हा पक्षही या वादाला अपवाद कसा राहील ? 
या पक्षाचे महानायक आणि त्यांचे सहनायक यांची ताजी विधाने, जाहीर सभा, विरोधी पक्षांवरची टीका व त्याचबरोबर नवनवीन सरकारी घोषणा यांचा सपाटा पाहता लोकसभा निवडणुका आता कधीही किंवा नजीकच्याच भविष्यकाळात जाहीर होणार काय असे वाटू लागले आहे. 
लोकसभा निवडणुका होणार कधी ? 
राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड विधानसभांबरोबर, की ठरलेल्या वेळी पुढच्या वर्षीच्या एप्रिल-मे महिन्यात ? 
वेळेबाबत मतमतांतरे आहेत. 
काहींचा अंदाज असा आहे, की विनाकारण नियोजित वेळापत्रकापूर्वी लोकसभा निवडणुका घेण्याचे कारणच काय ? 
किंवा युगपुरुष हे त्यांच्या एकट्याच्या बाहुबलावर विजयश्री खेचून आणण्याची ताकद राखून आहेत. 
शंकेखोर लोकांच्या म्हणण्यानुसार राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यात लोकसभेच्या आधी निवडणुका होणार आहेत. त्यात निकाल भाजपच्या विरोधात गेले, तर लगेचच होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर ते परिणाम करू शकतात. पण, आत्मविश्‍वास असलेल्या मंडळींनी महानायकाच्या विजयश्री खेचून आणण्याच्या क्षमतेचा हवाला देऊन ही शक्‍यता धुडकावून लावली आहे. 
ते काही असो, निवडणुका कधीही होवोत, रणशिंग फुंकले गेले आहे. 
आता या जगातल्या सर्वांत मोठ्या पक्षाची(अध्यक्षांचा तसा दावा आहे) उमेदवारी कुणाला मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. असे सांगतात की 2014 मध्ये निवडून आलेल्यांपैकी किमान 150जणांना बाहेरची वाट दाखवली जाणार आहे. 
या चर्चेमुळे भाजप संसदीय पक्षात चांगलीच अस्वस्थता आणि चलबिचल आहे. 
विशेषतः पंच्याहत्तरीच्या आसपास असलेल्यांमध्ये तर उमेदवारी जाणार याची बालंबाल खात्रीच आहे. 
खरी उत्सुकता आहे ती पक्षाच्या पाचजणांच्या मार्गदर्शक मंडळातील लालकृष्ण अडवानी (वय 90) आणि मुरली मनोहर जोशी (वय84) यांना उमेदवारी मिळणार काय याची ! 
2014 च्या निवडणुकीतच जोशी यांच्यावर गदा आलेली होती. कारण महानायकांनी जोशींच्या वाराणसी मतदारसंघातूनच निवडणूक लढविण्याची एकतर्फी घोषणा करून टाकली. त्या मतदारसंघावर एकप्रकारे कब्जाच केला. जोशी यांना कानपूरला हलविण्यात आले. अडवानी सुदैवी ठरले. त्यांचे गांधीनगर कायम राहिले. आता 2019 मध्ये या दोन मार्गदर्शकांचे भविष्य काय असा प्रश्‍न चर्चेत आहे. 
या दोन्ही नेत्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार हे नेते काही पक्षाकडे उमेदवारी मागायला जाणार नाहीत. 
पण हे निकटवर्तीय असेही सांगतात की भाजप व सरकारचे सूत्रधार असलेले दोघेही नेते उमेदवारीबाबत निश्‍चित विचारणा करतील. 
भाजप मार्गदर्शक मंडळाचे पाच सदस्य आहेत. 
अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी आणि राजनाथसिंह ! 
वाजपेयी हे रुग्णशय्येवर आहेत आणि निवडणूक लढवू शकत नाहीत. मोदी व राजनाथसिंह हे सक्रिय आहेत (75च्या आत आहेत) त्यामुळे ते निवडणूक लढविणार हे स्पष्ट आहे. राहता राहिले हे दोन नेते ! 
त्यांना उमेदवारी देण्याचीही चर्चा होणार आणि नाकारली तर आणखी तीव्रतेने चर्चा होणार ! 
यातला कोणता मार्ग सूत्रधार-द्वय निवडणार याकडे लक्ष लागणे स्वाभाविक आहे ! 


बिहारमधील धुमसते राजकारण ! 
बिहार ही धगधगत्या राजकारणाची भूमी आहे. येथला साधा रिक्षावाला असो, हमाल असो किंवा गरीबातला गरीब माणूस असो, तो राजकारणावर अधिकारानेच बोलताना आढळेल. चंद्रगुप्त मौर्य व चाणक्‍याची ही भूमी आहे. मगध साम्राज्याची भूमी ! 
मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी आजारी लालूप्रसाद यांची विचारपूस करणारा फोन केला काय आणि बिहारच्या राजकारणाने एकदमच उसळी घेतली काय ! सर्वच न्यारे ! 
एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी व गेल्यावेळच्या नीतिशकुमार यांच्या दगाबाजीनंतर अत्यंत कडवट राजकीय संबंध होऊनही लालूप्रसाद व नीतिश हे वैयक्तिक संबंधांवर त्याचा परिणाम होऊ देत नाहीत हे अनेक प्रसंगात सिद्ध झाले आहे. लालूप्रसादांच्या मुलाच्या लग्नाला अलीकडेच नीतिशकुमार जातीने हजर राहिले होते. 
भाजप नेते सुशील मोदी यांनी लालू व नीतिश यांच्यात काड्या करून सरकार पाडले होते पण, त्यांच्या मुलाच्या लग्नालाही हजर राहण्याचा मोठेपणा लालूंनी दाखवला होता. 
पण सध्या लोकसभा निवडणुकीची चाहूल लागलेली आहे. विरोधी पक्ष हे एकजुटीला लागले आहेत. नीतिशकुमार यांच्याबद्दल मवाळ भूमिका घेणारे कॉंग्रेससारखे पक्ष आहेत. त्यामुळे नीतीशबाबूंनी लालूंची चौकशी करताच अनेक नीतीशप्रेमी विरोधी पक्षांच्या आशेला पालवी फुटायला लागली. कॉंग्रेसने नीतिशकुमार यांना आमंत्रण देऊनही टाकले. 
मात्र राष्ट्रीय जनता दलाचे "उभरते' तरुण नेते तेजस्वी यादव यांनी क्षणार्धात ही शक्‍यता फेटाळून लावली. दगाबाजांना "महागठबंधन'मध्ये जागा नाही असे त्यांनी जाहीर करून टाकले. 
परंतु लालूप्रसाद यांच्यात एक फार चांगला गुण आहे. ते उदार मनाचे आहेत आणि राग विसरणारे आहेत. नीतिशकुमार यांच्यासंदर्भात त्यांच्याही मनात चलबिचल सुरू झाली. त्यांनी शरद यादव यांना फोन केला पण, शरद यादव हेही नीतिशकुमार यांच्याकडून दुखावलेले असल्याने त्यांनी नीतिशकुमार यांच्या गोड बोलण्याला आता तरी भुलू नये असे लालूंना स्पष्ट सांगितले. 
असे समजते, की निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे पुन्हा नीतिशकुमार यांच्याबरोबर काम करू लागले आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरूनच नीतिशकुमार यांनी लालूंची विचारपूस करणारा फोन केला. पण त्यांच्या फोनमुळे सुरू झालेल्या राजकारणामुळे ते इतके भडकले, की आपण पुन्हा लालूंना फोन करणार नाही असे जाहीर केले. आपण चार वेळा फोन केले व तो एक शिष्टाचाराचा भाग होता त्यात राजकारण आणण्याचे कुणाला कारण नाही असे त्यांनी चिडून जाहीर केले. 
पण एक मात्र खरे.... काहीतरी गडबड आहे आणि पाणी मुरतंय खरं !! 


मध्य प्रदेशातील बेकीची एकी कधी होणार ?? 
कॉंग्रेसनेते गुलाम नबी आझाद कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे प्रमुख केंद्रीय निरीक्षक होते व आघाडीचे का होईना पण कॉंग्रेसचे सरकार त्यांनी सत्तेत बसवले. 
कर्नाटकातही कॉंग्रेस पक्षा अंतर्गत नवे-जुने, निष्ठावान व बाहेरून पक्षात आलेले असे वाद होतेच. खुद्द सिद्धरामय्या यांच्यावरच "बाहेरचे' म्हणून शिक्का होताच ! पण आजाद यांनी पक्षासाठी एक आलिशान व्होल्वो बस मागवली. तिचे रूपांतर "एकता रथ' मध्ये केले आणि त्यातूनच सर्व नेत्यांना एकत्र करून कर्नाटकात एकता यात्रा काढली आणि कॉंग्रेस पक्ष एकजूट असल्याचा संदेश सर्वत्र पोचवला. 
आता ही बस मध्य प्रदेश कॉंग्रेस समितीला देण्यात आली आहे. कारण मध्य प्रदेशातही कॉंग्रेस अंतर्गत सुंदोपसुंदी भरपूर आहे. मध्य प्रदेशात कॉंग्रेसला अनुकूल वातावरण आहे आणि म्हणूनच प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष कमलनाथ, तरुण नेते व कदाचित भावी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे, समन्वय समिती प्रमुख दिग्विजयसिंह, सुरेश पचौरी अशा सर्व मध्य प्रदेशच्या नेत्यांना एकत्र करून व या बसमधून एकता यात्रा काढण्याची सूचना करण्यात आली आहे. 
यात्रेच्या कार्यक्रमावर खल सुरू असल्याचे समजते. 
त्यामुळे तूर्तास व्होल्वो बस मध्य प्रदेश कॉंग्रेस समितीच्या मुख्य कार्यालयात नुसतीच उभी आहे. 
कदाचित राहुल गांधी यांच्या "रोड-शो.'ने एकता यात्रेला आरंभ होईल असे सांगण्यात येते ! 
मुहूर्ताच्या प्रतीक्षेत "एकता यात्रा ' ?? 


कॉंग्रेस आणि वृत्तवाहिन्या 
एक इंग्रजी वृत्तवाहिनी आहे. या वृत्तवाहिनीचे एक "अँकर' होते आणि त्यांनी राहुल गांधी यांची मुलाखत घेताना त्यांची भंबेरी उडवली होती. हे अँकर एव्हाना या मूळ वृत्तवाहिनीतून बाहेरही पडले आहेत व त्यांनी दुसऱ्या वृत्तवाहिनीचे कामही सुरू केले आहे. 
पण, कॉंग्रेसचा या मूळ इंग्रजी नामवंत वृत्तवाहिनीवरील राग काही गेलेला नाही. 
राहुल गांधी यांच्या त्या फटफजितीपूर्ण मुलाखत प्रकरणानंतर कॉंग्रेसने या वृत्तवाहिनीवर बहिष्कार टाकला. 
कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्यांना या वृत्तवाहिनीवर अधिकृतपणे जाण्यास किंवा अवतीर्ण होण्यास मनाई करण्यात आली. कॉंग्रेसच्या असहभागामुळे या वृत्तवाहिनीला विविध चर्चांमध्ये कॉंग्रेसचा दृष्टिकोन काय हे दर्शकांना सांगणे अवघड झाले. 
पण काही कॉंग्रेसनेत्यांनी मात्र असल्या मनाईला न जुमानण्याची भूमिका घेतली. 
मध्य प्रदेशचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. 
ताज्या माहितीनुसार ज्योतिरादित्य शिंदे यांनीही मुलाखत दिल्याचे समजते. 
अर्थात या एकेकट्याच्या मुलाखती आहेत आणि चर्चांमधील सहभाग नाही असा खुलासा करून या प्रकारावर कल्हई करण्यात आली किंवा पांघरूण घालण्याचा प्रयत्न झाला. 
असे कानावर आले, की या वृत्तवाहिनीबद्दल अशी खुन्नस बाळगण्यामागे कॉंग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख रणदीपसिंग सुरजेवाला यांचा मोठा हात आहे. त्यांच्या मनातला या वृत्तवाहिनीबद्दलचा कडवटपणा अजून संपलेला नाही आणि त्यामुळे त्यांनी कॉंग्रेस प्रवक्‍त्यांना या वृत्तवाहिनीवर जाण्यापासून प्रतिबंध केला आहे आणि तो आदेश अद्याप जारी आहे. 
अर्थात निवडणूक जवळ येईल तसे आपले म्हणणेही सर्वत्र सादर करण्याची गरज कॉंग्रेसला भासू लागेल आणि त्यानंतर कदाचित मनःपरिवर्तन होऊन या वृत्तवाहिनीवरील बहिष्कार कॉंग्रेस मागे घेईल अशी अपेक्षा ! 


21व्या शतकातील भुताटकी ?? 

बाह्य दिल्लीतील बुराडी नावाच्या वसाहतीत एकाच कुटुंबातील अकराजणांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या बातमीने देशभरात खळबळ उडाली. 
अमानवी-गूढ व अनाकलनीय अशा संकल्पनांच्या प्रभावाखाली हे कुटुंब होते. 
अन्यथा आदल्या रात्री गळफास व्यवस्थितपणे लागून मृत्यू येण्यासाठी बाजारातून नवी प्लॅस्टिकची स्टुले विकत आणण्याचा प्रकार या कुटुंबाने केला नसता. 
आख्ख्या कुटुंबाने स्वतःला मृत्यूच्या आधीन करण्याने.... आणि अगदी पूर्वनियोजित-आखीव पध्दतीने..... 
हे खरोखरच मती गुंग करणारे आहे. 
ही प्रत्यक्ष घटना झाली. परंतु घटनेचे परिणाम कसे होतात हा पुढचा भागही तेवढाच मती गुंग करणारा आहे. 
या कुटुंबाने ते तेरा दिवसांनी पुन्हा अवतीर्ण होणार आहेत आणि तो त्यांचा पुनर्जन्म असेल वगैरे वगैरे लिहून ठेवले आहे. ही माहिती सार्वजनिक झाल्याने या कुटुंबाच्या घराच्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांची पाचावर धारण बसली आहे. 
ताज्या माहितीनुसार शेजाऱ्यापाजाऱ्यांनी तर घर बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 
या प्रकारानंतर आता हे घर, ही गल्ली -मोहल्ला हे भुताळी किंवा भुताटकीचे आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच लोकांनी आता येथून दुसरीकडे जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 
या भागात भीतीचे वातावरण आहे. जे लोक जागा सोडून जाऊ शकलेले नाहीत ते अंधार पडण्यापूर्वीच आपापल्या घरात येऊन चिडीचूप होऊन दारे घट्ट बंद करून बसून राहतात. रात्री गल्ली सुनसान होऊन जाते. 
एवढेच काय पोलिसही तपासाला येताना गटागटाने येतात. 
आता एवढी भीती व दहशत सुरू झाल्यानंतर काही मंडळींनी त्या घरातून गप्पा मारण्याचे आवाज येतात वगैरे गावगप्पा सुरू केल्या आहेत. 
यावर तोडगा म्हणून मृतांच्या एका भाऊबंदाने या घरात येऊन राहण्याची घोषणा केली आहे. तो राजस्थानात राहतो. परंतु लोकांच्या मनातली भीती जावी म्हणून आपण या घरात येऊन काही काळ राहू व सर्व स्थिरस्थावर झाले की परत जाऊ असे त्याने जाहीर केले आहे. 
बघू आता काय होते ते ! 

संबंधित बातम्या