कट्टा

कलंदर
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सैतानाच्या वकिलाचे पुस्तक प्रकाशन
टीव्हीवर ‘डेव्हिल्स ॲडव्होकेट’ या शीर्षकाने पत्रकार करण थापर हे बड्याबड्या नेत्यांच्या मुलाखतींची मालिक चालवत असत. त्यांच्या पत्रकारितेमधील आठवणी व प्रसंगांवर आधारित त्यांचे पुस्तक या मालिकेच्या शीर्षकानेच नुकतेच प्रकाशित झाले. एका पंचतारांकित हॉटेलात व अतिविशिष्ट व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांच्या पुस्तकाचा हा प्रकाशन सोहळा झाला.

सैतानाच्या वकिलाचे पुस्तक प्रकाशन
टीव्हीवर ‘डेव्हिल्स ॲडव्होकेट’ या शीर्षकाने पत्रकार करण थापर हे बड्याबड्या नेत्यांच्या मुलाखतींची मालिक चालवत असत. त्यांच्या पत्रकारितेमधील आठवणी व प्रसंगांवर आधारित त्यांचे पुस्तक या मालिकेच्या शीर्षकानेच नुकतेच प्रकाशित झाले. एका पंचतारांकित हॉटेलात व अतिविशिष्ट व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांच्या पुस्तकाचा हा प्रकाशन सोहळा झाला.
थापर यांची निर्भीड पत्रकार व मुलाखतकार म्हणून प्रसिद्धी आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना थापर यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यामध्ये त्यांनी मोदी यांना गुजरात दंग्यांवरुन छेडले होते. मोदींनी उत्तरे देण्याचे नाकारले होते. परंतु थापरही त्यांच्या प्रश्‍नांवर आडून राहिले, तेव्हा मोदींनी एक ग्लास पाणी मागितले. ते पिऊन ते कॅमेऱ्यासमोरुन मुलाखत सोडून निघून गेले होते.तो प्रसंग भाजप नेत्यांच्या मनावर कोरला गेला असल्यास त्यात नवल नाही. त्यामुळे लालकृष्ण अडवानी व त्यांची मुलगी प्रतिभा सोडून भाजपचा एकही नेता या कार्यक्रमाला फिरकला नाही. विरोधी पक्षांचे मात्र सर्व नेते या कार्यक्रमाला गर्दी करून होते.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, मार्क्‍सवादी नेते सीताराम येचुरी यांच्यासह शशी थरुर आणि इतरही अनेक विरोधी नेते या समारंभाला उपस्थित होते. या निमित्ताने अनेक गमतीजमतीही झाल्या.
येचुरी लिफ्टसाठी वाट पहात असतानाच मागून राहुल गांधी आले. त्यांच्याबरोबर अतिविशिष्ट सुरक्षा असते. त्यांनी येचुरी यांच्या अंगरक्षकाला बाजूला जायला सांगितले पण येचुरी यांना मात्र ते सांगू शकले नाहीत कारण खुद्द राहुलच त्यांना बरोबर घेऊन लिफ्टने गेले आणि कार्यक्रमाच्या स्थानी दोघे बरोबर पोचले. येचुरी म्हणाले की मी जे टाळत होतो तेच घडले. राहुल गांधींचा मी सल्लागार आहे, त्यांचा मी अतिशय निकटवर्ती आहे असे सर्वत्र बोलले जाते आणि त्यामुळेच मी राहुल यांच्याबरोबर जाण्याचे टाळत होतो पण नेमके तसेच घडले व माझा निरुपाय झाला. कार्यक्रमावर भाजपचे खासदार व नेते यांचा जणू काही अघोषित बहिष्कारच होता. पण भाजपचे मार्गदर्शक नेते लालकृष्ण अडवानी उपस्थित राहिले. असे सांगतात, की कार्यक्रमाच्या मध्येच त्यांच्या कन्या प्रतिभा यांनी त्यांना ‘निघायचे का?’ म्हणून विचारले पण अडवानी यांनी त्यांना थांबण्यास सांगितले. 
राहुल गांधी यांनीही अडवानी यांच्या जागेपाशी जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यांनी भाषणात ‘परस्परांचा तिरस्कार सोडा’ हेच सांगितले. ‘अडवानी यांच्याशी माझे वैचारिक मतभेद आहेत आणि मी त्यांच्याशी वैचारिक संघर्ष करीन परंतु त्यांचा तिरस्कार करणार नाही!’ असे राहुल गांधींनी सांगितले.

काँग्रेस-गुरुपौर्णिमा-गुरुदक्षिणा!
गुरुपौर्णिमा हा एक पवित्र दिवस असला तरी त्याचदिवशी सुटी देण्याची प्रथा नाही.
यावर्षी गुरुपौर्णिमा शुक्रवारी(२७ जुलै) होती. आठवड्यातील कामकाजाचा शेवटचा दिवस!
संसदेत शुक्रवार हा कमी कामकाजाचा दिवस मानला जातो. खासगी विधेयकांचा दिवस असल्याने ज्या खासदारांची विधेयके असतात तेच प्रामुख्याने थांबतात आणि बाकीची मंडळी मतदारसंघात जाणे पसंत करतात.
भाजप व संघपरिवारात गुरुपौर्णिमेचे महत्त्व वेगळ्या प्रकारे आहे. या दिवशी ‘गुरुदक्षिणा’ देण्याचा कार्यक्रमही केला जात असतो. तेव्हा त्यांना या दिवसाचे महत्त्व वाटणे स्वाभाविक आहे. परंतु या दिवशी संसदेला सुटी घेण्याइतका त्याचे महत्त्व वाढलेले नव्हते. पण यावर्षी भाजपच्या खासदारांनी गुरुपौर्णिमेला सुटी मिळावी म्हणून आदल्या दिवशी गुरुवारी सकाळपासून आग्रह करायला सुरवात केली होती. गुरुवारी सकाळी संसदीय कामकाजमंत्र्यांनी आणि सरकारमधील इतर मंत्र्यांनीदेखील सुटीची कल्पना नाकारलेली होती.
गुरुवारी दुपार होता होता पुन्हा खासदारांनी उचल खाल्ली आणि भाजपच्या खासदारांनी विरोधी पक्षांच्या व मुख्यतः काँग्रेसच्या खासदारांना देखील सुटीसाठी पटविण्यास सुरवात केली. मुळातच जोडून सुटीसाठी(शनिवार-रविवार) आसुसलेल्या इतर पक्षांच्या खासदारांनीही पाठिंबा देण्यास सुरवात केली. पुन्हा हे प्रकरण संसदीय कामकाज मंत्र्यांकडे आले. हा प्रकार टाळता कसा येईल ? दोन वर्षांपूर्वी मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकी पेशातील खासदारांना निवडून त्यांचा सत्कार केला होता. तसे काहीतरी करा असे सुचवल्यानंतर संसदीय कामकाज मंत्र्यांना ‘आयडिया’ पटली. परंतु ’सुटीखोर’ खासदारांचा जोर अधिक होता व ते काही या कल्पनेला बधले नाहीत. अखेर काँग्रेसचे नेतेही या दबावाला बळी पडले व त्यांनी सुटीसाठी होकार दिला. पण काही पत्रकारांनी काँग्रेसच्या नेत्यांना गुरुपौर्णिमा आणि गुरुदक्षिणा व संघपरिवार यांचा संबंध समजावून काँग्रेस पक्ष कसा याला बळी पडला आणि एकप्रकारे काँग्रेसने गुरुदक्षिणेला पाठिंबाच दिला आहे असे म्हणताच काँग्रेसचे एकदोन नेते खरोखर अचंबित झाले व ते लगबगीने पक्षाच्या मुख्य संसदीय नेत्यांकडे गेले. पण मुख्य नेत्यांनी पत्रकारांच्या खोड्यांकडे लक्ष देऊ नका सांगून त्यांना वाटेला लावले. पण हे नेते मात्र अस्वस्थ झाले होते आणि ती अस्वस्थता ते चेहऱ्यांवरून लपवू शकले नाहीत! 

बदलू लागली हवा?
महानायकांनी उत्तर प्रदेशात निरनिराळ्या व नवनव्या योजना, कार्यक्रम लागू करण्याचा धडाका लावलेला आहे. २०१९ मध्ये सत्तेत परत येण्याच्या दृष्टीने सत्तापक्षासाठी उत्तर प्रदेश हे निर्णायक राज्य असेल. उत्तर प्रदेशातील बदलती हवा व परिस्थिती यामुळे सत्तापक्षाच्या मनात, हृदयात धोक्‍याच्या घंटा वाजू लागल्यात. खुद्द महानायकांनी वाराणसीत दोन दिवस मुक्काम केला होता यावरूनच या चिंतेची कल्पना यावी. वाराणसीमधील लोकांमध्ये सत्तापक्षाबद्दल वेगळीच चर्चा ऐकू येऊ लागली आहे.
वाराणसीमध्ये अलीकडेच एक फ्लायओव्हर पूल कोसळला आणि जवळपास वीस लोकांचा मृत्यू झाला. या पुलाचे बांधकाम व कंत्राट उत्तर प्रदेश सेतू निगम या सरकारी कंपनीकडे होते आणि त्यांनी नेहमीच्या पद्धतीने उपकंत्राटांद्वारे काही प्रमुख कामे खासगी कंपन्यांना दिलेली होती. त्यात एका केंद्रीय मंत्र्यांशी संबंधित कंपनीचा समावेश होता अशी चर्चा ऐकायला येत आहे. मोठ्या हुशारीने या खासगी कंपनीचे नाव एफआयआर मध्ये किंवा तक्रारींमध्ये येऊ देण्यात आले नाही असे कानावर आले. आता तर असेही कानावर पडले, की महानायकांनी वाराणसीमधील अनेक कामे गुजरातमधील कंपन्यांना देऊन स्थानिक लोकांना पूर्णपणे बाहेर ठेवले आहे. वाराणसीमधील स्थानिक मंडळींना बाजूला सारून बाहेरच्या लोकांनाच तेथे प्राधान्य दिले जाऊ लागल्याने स्थानिक लोकांमध्ये असंतोष वाढू लागल्याचे समजते. जेवढी म्हणून कंत्राटे आहेत त्यामध्ये बाहेरच्यांना म्हणजेच मुख्यतः गुजराती कंपन्यांना प्राधान्य दिल्याने लोक चिडले आहेत. रस्ते, पूल, घरे आणि इतरही विविध कामांसाठी स्थानिकांपेक्षा बाहेरच्या कंपन्यांना किंवा केंद्रीय मंत्र्यांच्या सग्यासोयऱ्यांना पसंती दिल्याचे समजते.
यामुळे नाराजी वाढत आहे. वाराणसीच्या सौंदर्यवृध्दीसाठी देखील ज्यांनी विविध कामे वाटून दिली आहेत त्यामध्ये बहुतांश कंपन्या व लोकं बाहेरची आहेत. स्थानिक विरुद्ध बाहेरचे हा वाद पेटण्याची ही चिन्हे आहेत व ते महागात पडू शकते!

गळामिठीचे कवित्व सुरूच!
राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना भर लोकसभेत त्यांच्या जागेपाशी जाऊन त्यांना गळामिठी मारली. त्याची टिंगल झाली, चेष्टा झाली आणि प्रशंसादेखील झाली !
राहुल गांधी यांच्या या गळामिठीची सार्वत्रिक दखल घेतली गेली आणि अजूनही त्यावर चर्चा सुरू आहे. यातच त्याचे यश सामावले आहे आणि राहुल गांधी यांना जे साध्य करायचे होते ते त्यांनी केले असे आता मानले जाऊ लागले आहे. महिला पत्रकारांबरोबरच्या एका वार्तालापाच्या कार्यक्रमात काही महिला पत्रकारांनी त्यांना गळामिठीनंतर पंतप्रधान तुम्हाला काय म्हणाले असे विचारले. राहुल यांनी ते सांगण्यास नकार दिला. ती बाब केवळ दोन व्यक्तींमधील आहे. पण पंतप्रधानांनी ते शब्द उच्चारलेले असल्याने त्यांना ते जाहीर करण्याचे स्वातंत्र्य आहे असे त्यांनी सांगितले. राहुल यांच्या उत्तरामुळे हिरमोड झालेला असला तरी पत्रकार ते पत्रकारच ! हा प्रसंग लोकसभेत घडला त्यावेळी पंतप्रधानांच्या आजूबाजूला बसलेल्या काही मंत्र्यांचा शोध करण्यात आला. त्यातील एका महिला मंत्र्यांच्या सांगण्यानुसार गळामिठीनंतर पंतप्रधान काहीसे स्तिमित झालेले होते. राहुल तेथून जाऊ लागले तेव्हा पंतप्रधान काहीसे भानावर आले आणि त्यांनी राहुल गांधींना परत जवळ बोलावले. राहुलही पुन्हा मागे वळून त्यांच्याजवळ गेले. पंतप्रधानांनी त्यांना हस्तांदोलन केले, पाठीवरही थोपटले आणि ‘आजचे भाषण छान झाले’ असे त्यांना सांगितले अशी माहिती या मंत्रिमहोदयांनी दिली. आता खरेखोटे राहुल व पंतप्रधानच जाणोत !

भाजपसाठी धोक्‍याच्या घंटा?
भाजपच्या अध्यक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीत ३५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
पंतप्रधान ऊर्फ महानायकांनी अविश्‍वास ठरावावरील चर्चेला उत्तर देताना ‘२०२४ मध्ये पुन्हा माझ्या सरकारविरुद्ध अविश्‍वास ठराव सादर करा’ असे आव्हान विरोधी पक्षांना दिले आहे. थोडक्‍यात सांगायचे झाल्यास सत्तापक्ष, सत्तापक्षाचे नायक यांना त्यांच्या विजयाची केवळ खात्रीच नव्हे तर दांडगा आत्मविश्‍वास पण आहे. परंतु कुठेतरी गडबड होऊ लागली आहे खरी!
इतके दिवस गप्प असलेल्या रामविलास पासवान(लोक जनशक्ती पक्ष) यांनी राष्ट्रीय हरित लवादाचे प्रमुख म्हणून ज्या न्यायाधीशांची(ए.के.गोयल) नेमणूक सरकारने केली त्यास विरोध केला आहे. ते केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळे खासदार असलेल्या आपल्या चिरंजीवांकरवी (चिराग पासवान) त्यांनी एक पत्र लिहून गोयल यांची नेमणूक तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. गोयल हे सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती असताना त्यांनी दिलेल्या एका निर्णयात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी शिथिल करणारा निर्णय दिलेला होता. हा निर्णय दलितसमाज विरोधी असल्याची टीका त्यावर झालेली होती. आता त्याच न्यायाधीशांना हरित लवादावर प्रमुख म्हणून नेमणे म्हणजे एकप्रकारे त्यांना इनाम किंवा बक्षीस देण्यासारखेच आहे अशी समजूत सार्वत्रिक झालेली आहे. त्यामुळेच पासवान यांच्यासह अनेक दलित समाजाच्या नेत्यांनी या नेमणुकीच्या विरोधात तीव्र भूमिका घेऊन ती रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ९ ऑगस्टला भारत बंदचेही आयोजन करण्यात आले आहे. पासवान यांच्यापेक्षा आपण मागे आहोत हे दिसू नये यासाठी समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील या नेमणुकीला विरोध करून ती रद्द करण्याची मागणी केली आहे. शिवसेना, लोकजनशक्ती पक्ष हे भाजपचे मित्रपक्ष दिवसेंदिवस वाढते नाराज होताना आढळत आहेत. इतरही लहान पक्ष आता आपली नाराजी जाहीर करू लागले आहेत. लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसे भाजपचे मित्रपक्ष आपापल्या मागण्यांच्या तलवारी उपसू लागले आहेत. आता या मित्रपक्षांना भाजप गोंजारणार, चुचकारणार की त्यांचे आव्हान स्वीकारणार हे पहावे लागेल!  

संबंधित बातम्या