कट्टा

कलंदर
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. अशाच काही गमती सांगणारे सदर...

खिचडी विसरा खीर खा !!
भारतीय राजकारणावर जाती-धर्माचा पगडा आहे ही गोष्ट जगजाहीर आहे.
जो पक्ष अधिकाधिक सामाजिक समूहांना आपल्याबरोबर घेऊ शकतो तो यशस्वी होतो असे मानले जाते.
जो नेता असे विविध सामाजिक समूह एकत्र आणतो त्या समूहाचे समीकरण तयार होते आणि त्यातून सिद्धांतही तयार केले जातात.
एकेकाळी गुजरातमध्ये माधवसिंग सोळंकी मुख्यमंत्री होते. ते क्षत्रिय होते. त्यांनी गुजरातमध्ये क्षत्रिय(के), हरिजन(एच), आदिवासी(ए) आणि मुस्लिम(एम.) या चार सामाजिक समूहांना एकत्रित केले होते आणि त्यांच्या आद्याक्षरांवरून ‘खाम’ समीकरण तयार झाले होते. ते यशस्वीही ठरले होते. यानंतर काही पटेल नेते व शंकरसिंह वाघेला(क्षत्रिय) यांनी पटेल व क्षत्रिय म्हणून ‘पक्ष’ असेही समीकरण तयार करण्याचा प्रयत्न केला होता. ते अल्पजीवी ठरले होते.
यापूर्वीही अशी समीकरणे करण्यात आलेली होती. चौधरी चरणसिंग हे या कलेत वाकबगार होते. त्यांनी ‘अजगर’ समीकरण तयार केले होते. यामध्ये आहिर, जाट, गुज्जर व राजपूत यांचा समावेश होता. मागाहून यात मुस्लिमांचा समावेश झाल्यावर ‘मजगर’ समीकरण म्हणूनही ते ओळखले जाऊ लागले होते.
गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेश व बिहारमध्ये ‘एम-वाय’ समीकरण प्रचलित आहे व त्यात ‘मुस्लिम व यादव’ यांचा समावेश आहे.
बहुजन समाज पक्षाने एकेकाळी दलितांच्या एकत्रीकरणावर भर देताना ‘तिलक(ब्राह्मण) तराजू(वैश्‍य) और तलवार(क्षत्रिय) जूते मारो इनको चार’ अशी घोषणा दिलेली होती. परंतु कांशीराम यांच्या वारस बहन मायावती यांनी दलित व ब्राह्मण समाजाला एकत्र आणण्याची कामगिरी करून दाखवली होती. त्यावेळी बहुजन समाज पक्षाचे चिन्ह असलेल्या हत्तीवर एक घोषणा तयार करण्यात आली होती - ‘ये हाथी नही गणेश है, ब्रह्मा विष्णू महेश है’! त्यांची ही घोषणा यशस्वी ठरली होती व त्या स्वबळावर उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या.
आता केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा यांनी भाजप आघाडी सोडण्याचे संकेत देताना अशाच एका नव्या समीकरणाचा उल्लेख केला आहे. त्याला त्यांनी ‘खीर’ म्हटलेले आहे. कुशवाहा हे बिहारमधील राष्ट्रीय लोकतांत्रिक समता पक्षाचे प्रमुख आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपबरोबर आघाडी केली होती. ते सध्या केंद्रात मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत. परंतु भाजपकडून मिळणाऱ्या वागणुकीने ते अतिशय नाराज आहेत. त्यांनी भाजपची साथ सोडून बिहारमध्ये सध्या जोरात असलेल्या राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस यांच्या आघाडीत सामील होण्याचे संकेत दिलेले आहेत. तर त्यांनी त्यांचे आदर्श व ज्यांच्या नावाने मंडल शिफारशी ओळखल्या जातात त्या बी.पी. मंडल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हटले, ‘जय यदुवंशीयांचे (यादव) दूध आणि कुशवंशीयांचे(कोयरी किंवा कुशवाहा समाज) तांदूळ एकत्रित झाले तर त्याची खीर होऊ शकते. परंतु खिरीसाठी इतर दबलेल्या व वंचित समाजांचा ‘पंचमेवा’ही आवश्‍यक असतो. त्यात पंडित समुदायाची(ब्राह्मण) साखर मिसळल्यास स्वादिष्ट खीर तयार होऊ शकते.
पूर्वी असे विविध पक्ष एकत्र येण्यास ‘खिचडी’ म्हणत. अटलबिहारी वाजपेयी हे वाक्‌चतुर होते. त्यांनी एकदा टीकाकारांना सुनावले होते, की खिचडी ही पौष्टिक व पाचक असते! आता खिचडीनंतर ही नवी स्वादिष्ट खीर कशी होते ते पहायला लागेल!   

सत्तेसाठी आटापिटा !
आगामी लोकसभा निवडणुकीत यश हुलकावणी देते, की काय यामुळे धास्तावलेल्या भाजपने असा काही आटापिटा व धडपड चालवली आहे ती ज्याचे नाव ते!
देशाचे युगपुरुष हल्ली प्रत्येक भाषणात विष्णुसहस्रनामाप्रमाणे, दलित, वंचित, गरीब, शेतकरी, महिला, पीडित अशी नामावली घेऊन त्यांची आळवणी करताना आढळतात. आळवणी करण्याचा त्यांचा स्वभाव नाही; पण आगामी निवडणुकीतही यश मिळालेच पाहिजे आणि देशाचे नेतृत्व करण्याची आणखी एक संधी मिळालीच पाहिजे या भावनेने ते पुरते पछाडलेले आहेत. यामुळे प्रत्येक भाषण, प्रत्येक कृती ही त्या हेतूनेच केली जात आहे. अलीकडेच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी भाजपच्या महिलांचा एक मेळावा घेतला. या महिला दुसऱ्यातिसऱ्या कुणी नसून भाजपचे नेते, खासदार यांच्या पत्नी होत्या. 
भाजप अध्यक्षांनी त्यांना सरकारने केलेल्या कामगिरीचा अहवाल सांगितला आणि त्यांनी देखील घरोघर जाऊन त्यांच्या परीने पक्षाला आगामी निवडणुकीतीलविजयासाठी प्रयत्न करावेत, मदत करावी असे आवाहन केले.
राखी पौर्णिमेच्या काही दिवस आधी झालेल्या या खासदार व नेत्यांच्या गृहिणींच्या मेळाव्यामुळे हा भाजपच्या महिला मोर्च्याचा कार्यक्रम असावा अशी काहींची समजूत झाली होती. युगपुरुषांना दुसऱ्यांदा या देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी यासाठी नेते व खासदारांच्या गृहिणींना देखील या मोहिमेत सामील करून घेण्यात आले. यापूर्वी देखील काही उत्साही खासदारांनी आपल्या सहकारी खासदारांच्या गृहस्वामिनींचे मेळावे आयोजित केलेले होते. परंतु त्याचे स्वरूप सांस्कृतिक अधिक होते. आता खुद्द पक्षाच्या पातळीवरच या गृहिणींना पक्ष प्रचाराची कामगिरी सोपविण्यात आल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. 
महिलाशक्तीचा विजय असो!   

ऐकावे ते नवलच ???
वर्तमान राजवटीत काही विचित्र गोष्टीच कानोकानी ऐकू येऊ लागल्या आहेत एवढं खरं!
आपल्याला विरोध करणाऱ्यांना जरब व धाक घालण्यासाठी राज्यकर्ते या थरापर्यंत जाऊ शकतात यावर अजून विश्‍वास बसत नाही! भाजपशी संबंधित परंतु वर्तमान सरकारच्या तीव्रपणे विरोधात भूमिका घेणाऱ्या एका नेत्याच्या भावाबद्दलची ही कहाणी कानावर आली. या नेत्याचा हा भाऊ राजकारणात नाही आणि उद्योग-व्यवसाय करणारा आहे. भाजपचा सहानुभूतीदार आहे कारण घर व कुटुंब भाजपवादीच आहे. अचानक या भावाला कधी प्राप्तिकर, कधी एन्फोर्समेंट डायरेक्‍टोरेटच अधिकारी घरी येऊन विविध प्रश्‍न विचारू लागले. त्यांच्या उद्योग-व्यवसायाबद्दल खोदून खोदून माहिती घेऊ लागले आणि जेथे काही शंका येत असतील त्याबाबत अधिकच खोलात जाऊ लागले. यानंतर गुप्तचर विभागाच्या काही मंडळींनी देखील त्यांच्या घराला भेट दिली. या नेत्याच्या भावाला हा प्रकार काय चालला आहे हे काहीच लक्षात येईना!
अखेर न राहवून त्याने नेता असलेल्या भावास फोन केला आणि या प्रकाराची माहिती दिली. त्या बंडखोर नेत्याने चौकशी सुरू केली. त्याला मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या बंडखोरीचा फटका त्यांच्या भावाला बसला होता. या मंडळींनी जरा तपशिलात जाऊन या प्रकाराची आणखी माहिती घेतली असता निरनिराळ्या बहाण्यांनी घरी चौकशीसाठी येणाऱ्या एका अधिकाऱ्याकडूनच म्हणे अशी माहिती मिळाली, की भाजपचे सहानुभूतीदार असलेले परंतु वर्तमान नेतृत्वाबद्दल नाराज आणि असंतुष्ट असलेल्या लोकांची माहिती मिळविण्याची एक मोहीम सुरू करण्यात आली आहे. भाजपच्या बाजूने असूनही नेतृत्वाच्या विरोधात ही मंडळी का याची माहिती काढण्यासाठी हा आटापिटा सुरू असल्याचे समजते. जी मंडळी भाजपच्या बाजूने आहेत. परंतु वर्तमान राज्यकारभार आणि नेतृत्व यांच्यावर नाराज व असंतुष्ट आहेत अशा लोकांसाठी एक संज्ञाही प्रचलित करण्यात आली आहे आणि कानावर आलेल्या माहितीनुसार अशा लोकांची गणना ‘पोलिटिकली एक्‍सपोज्ड पर्सन्स’(पीईपी) अशा श्रेणीत करण्यात येत आहे. आता या लोकांविरुद्ध प्रत्यक्षात कोणती व कशा प्रकारची कारवाई करणार हे स्पष्ट झालेले नाही. परंतु सामान्य माणसे नुसत्या चौकशीनेही जरबेखाली येतात आणि तो धाक निर्माण करण्यासाठी आणि त्यांनी फारशी गडबड करू नये यासाठी हे नवे तंत्र व सत्र अवलंबिले जात असावे असा कयास आहे.
एखाद्या देशात नको असलेल्या व्यक्तीला प्रवेश नाकारला जात असतो. अशा व्यक्तीला ‘पर्सोना नॉन ग्रॅटा’(पीएनजी) म्हणून गणले जाते. ज्या व्यक्तीला असे अवांछित म्हणून घोषित केले जाते त्याला त्या देशात प्रवेश मिळत नाही. आता भारतातच नवी ‘पीईपी’ श्रेणी तयार झाल्याचे कानावर येत आहे. ऐकावे ते नवलच!  

शॉटगनच्या धडाधड फैरी
शॉ टगन ऊर्फ शत्रुघ्न सिन्हा हे भाजपमधील मूठभर बंडखोरांपैकी एक! पक्षाला अडचणीत आणण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी भाजपच्या पूर्ण विरोधात असलेल्या ‘आम आदमी पार्टी’ - ‘आप’च्या व्यासपीठावरही बिनधास्तपणे जाण्यास सुरवात केली आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष व भोजपुरी सुपरस्टार व गायक मनोज तिवारी हे ईशान्य दिल्लीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याच मतदारसंघात दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण व कौशल्यविकासमंत्री मनीष सिसोदिया यांनी कौशल्य विकासाशी संबंधित कार्यक्रम आयोजित केला होता. या समारंभात शत्रुघ्न सिन्हा यांना आमंत्रित करण्यात आले होते. सिन्हा यांनी ‘आप’वर स्तुतिसुमनांचा वर्षाव केलाच पण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे भगवान श्रीकृष्ण असून सिसोदिया त्यांचे अर्जुन आहेत आणि केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी करीत आहेत असे सांगितले. या मतदारसंघातून ‘आप’च्या सतीश पांडे यांना तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा आहे व त्यांना या मतदारसंघाची जबाबदारीही देण्यात आली आहे. सिन्हा यांनी उपस्थितांना पांडे हे चांगले काम करीत असल्याने त्यांना आनंदित ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे(म्हणजेच निवडून देण्याची) व ती पार पाडा असे सांगून आणखी एक शॉट मारला. सर्वांत कळस करताना ते म्हणाले, मला माझ्या मनातले बोलण्याचा(मन की बात) अधिकार नाही. कारण त्याचे पेटंट आधीच कुणीतरी (नरेंद्र मोदी) घेतलेले आहे. पण माझ्या हृदयातल्या गोष्टी(दिल की बात) बोलण्यापासून मला कुणी रोखू शकणार नाही!’
सिन्हा यांनी एक प्रकारे दिल्ली भाजप अध्यक्षांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या विरोधातच प्रचार केला. यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते विलक्षण खवळले आहेत. पण करणार काय? कारवाई केली तर ते आणखी मोठे होतील! तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार!  

अहमद पटेलांची बाजी
काँग्रेस संघटनेत बदल होणे अपेक्षितच होते. जुन्या व वयोवृध्दांची सुट्टी होणार हेही ठरलेलेच होते. परंतु प्रत्यक्षात राहुल गांधी यांनी एकांगीपणा न करता जुन्या मंडळींनाही उचित स्थान देऊन पक्ष नवख्यांच्या ताब्यात देण्याचा आततायीपणा केला नाही.
अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव होते. युपीए १ व युपीए-२ या दोन सरकारांच्या काळात दहा वर्षे अहमद पटेल ‘पॉवरफुल्ल’ होतेच; पण सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात पक्षाची सूत्रे तेच चालवत असत.
राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर पटेल यांचे भवितव्य काय असा प्रश्‍न निर्माण झालेला होता. तसेच पटेल यांच्या हातात पक्षाची सूत्रे असताना जी मंडळी दुखावली गेली होती त्या मंडळींना या नव्या रचनेत पटेल यांना बाजूला काढले जाणार या कल्पनेने आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. प्रत्यक्षात भलतेच घडले. पटेल यांना पक्षाच्या ‘कोअर कमिटी’त स्थान मिळालेच पण पक्षाच्या तिजोरीच्या चाव्याही त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
याचा अर्थ पटेल भले राजकीय सचिवपदावरुन दूर झाले असतील पण त्यांचे महत्त्व, त्यांच्या अनुभवाची गरज पक्ष व राहुल गांधी जाणत असल्याने त्यांनी पटेल यांना योग्य ते स्थान दिले. आता पटेल यांचा काटा दूर होण्यासाठी कंबर कसलेल्यांची पंचाईत झालेली आहे.
पटेल मात्र त्यांच्याकडे दुसऱ्यांदा आलेली खजिनदारपदाची जबाबदारी आनंदात पार पाडू लागले आहेत!

संबंधित बातम्या