कट्टा

कलंदर
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...    –  कलंदर

 

उत्साह अंगाशी आला
नुकताच भारतीय हवाईदल दिन साजरा करण्यात आला.
सध्या जी मंडळी सत्तेत आहेत त्यांच्यात राष्ट्रवाद, देशभक्ती ही विशेषत्वाने ठासून भरलेली आहे.
आम्हीच खरे देशभक्त व इतरांची देशभक्ती ही कमी, हलकी आणि हिणकस असल्याचा भाव या वर्तमान सत्ताधीशांमध्ये असतो. त्यामुळेच त्यांचे हे फाजील सोंग कुणी उघडे पाडण्याचा प्रयत्न करताच ते चवताळून अंगावर येतातच पण लगेच त्या व्यक्तीला देशद्रोही, पाकिस्तानचा एजंट अशा उपाध्या लावायला लागतात. त्यांच्या माहिती तंत्रज्ञानाच्या टोळ्यांना मोकाट सोडले जाते. परंतु नाटकीपणा आणि सोंग व ढोंग ते ढोंगच ना ? निव्वळ प्रदर्शन व देखाव्याची हौस असलेली ही मंडळी आहेत. सवंगपणाने भरलेली ! हवाईदल दिन असल्याने यांच्याही अंगात हवा शिरणे अपेक्षितच होते. अगदी उच्चपदस्थ आणि मंत्र्यांनी हवाईदलावर शुभेच्छांचा वर्षाव केला. हल्ली माहिती तंत्रज्ञानाचा सुकाळ असल्याने शुभेच्छा संदेशाबरोबर विमानाच्या चित्राचा समावेश करणे अपेक्षितच होते. परंतु या सर्व सवंग व दिखाऊ मंडळींनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात जी विमाने हवाईदलात नाहीत आणि जी कधी हवाईदलाने वापरलीही नाहीत अशा विमानांचे फोटो समाविष्ट करून आपल्या ज्ञानाचा परिचय दिला. कुणी ‘एफ-१५’ विमान, कुणी ‘एफ-१६’ या विमानांचे फोटो टाकले. ही विमाने भारताने कधीच वापरलेली नाहीत.
अखेर कुणीतरी उपराष्ट्रपती आणि अन्य मंत्र्यांच्या नजरेला ही बाब आणून दिल्यावर पटापट सुधारणा झाल्या. काहींनी तर विमानांचे चित्रच काढून टाकले. थोडक्‍यात मुद्दा काय ? तर फाजील उत्साह असा नेहमीच अंगाशी येतो ! 

बेभरवशाचे राजकारण की चैतन्यशीलता?

राजकारण हे सतत प्रवाही व गतिमान असते. त्याची चैतन्यशीलता अद्‌भुत असते.
त्यामुळेच सर्वसामान्यांच्या दृष्टीने ते बेभरवशाचेही असते आणि त्यांच्या साधारण आकलनाच्या पलीकडचे असते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले. यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, की लोकसभेच्या निवडणुका आता त्यांच्या वेळापत्रकानुसार होतील. आता यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने विविध राजकीय पक्षांमध्ये संभाव्य आघाड्या, हातमिळवणी, निवडणूक व जागावाटप समझोते या गोष्टी एकदम स्थगित झाल्या. पण तात्पुरत्या ! आता सर्वांचे लक्ष या पाच राज्यातल्या निवडणुकांवर केंद्रित होणे अपरिहार्य आहे. ते घडतेही आहे. 
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यातील सत्ता व सरकारे टिकविणे आणि तेलंगणात मताची टक्केवारी सुधारणे, जागा वाढविणे आणि मिझोरममध्ये सत्ताप्राप्त करून पूर्ण ईशान्य भारतावर कब्जा प्रस्थापित करणे हे भाजपचे उद्दिष्ट आहे.
काँग्रेसला मिझोराम राज्य वाचवायचे आहे. तेलंगणात तेलगू देशम, डावे पक्ष आणि अन्य काही स्थानिक पक्षांबरोबर आघाडी करून काँग्रेसने तेलंगणा राष्ट्र समितीला आव्हान दिले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगढमधून भाजपची सरकारे पराभूत करण्याची कामगिरीही काँग्रेसला करायची आहे. यामुळेच भाजप काय किंवा काँग्रेस काय या प्रमुख राजकीय पक्षांनी तूर्तास विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून लोकसभा निवडणुकीची तयारी काहीशी मागे ठेवली आहे.
असे असले तरी या विधानसभा निवडणुकांचा व त्या पाठोपाठ होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचा काही संबंध नाही असे मानणे योग्य ठरणार नाही.
उलट, या पाच विधानसभा निवडणुकांमधील कामगिरीवरच आपली ‘बार्गोनिंग’ म्हणजेच जागावाटपासाठी घासाघीस करण्याची क्षमता अवलंबून असेल व त्यासाठी या निवडणुकांमध्ये चमकदार यशप्राप्ती करावी लागेल यासाठीच सर्व संबंधित राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे. भाजपवर विशेष दबाव आहे. कारण राजस्थान, मध्य प्रदेश किंवा छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपला एखादे राज्य गमवावे लागल्यास व अन्यत्र पक्षाची स्थिती कमकुवत झाल्यास लोकसभा निवडणुकीसाठी इतर राजकीय पक्षांबरोबर जागावाटप किंवा आघाडी करण्यासाठी जी घासाघीस करावी लागेल त्यात भाजपला कदाचित पडती बाजू घ्यावी लागण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. तसेच प्रतिकूल परिस्थितीतही भाजपने चमकदार कामगिरी केल्यास आघाडी व जागावाटपात भाजपचा वरचष्मा कायम टिकू शकेल. हीच बाब काँग्रेसलाही लागू आहे.
असे कानावर येते, की राजस्थानात भाजपला सत्ता गमवावी लागल्यास भाजपची ही राजकीय सौदेबाजीची क्षमता कमी होऊ शकते. मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्येही पूर्वीपेक्षा संख्याबळ कमी झाल्यास सौदेबाजीतली दुर्बलता वाढणारच आहे. परंतु भाजपला सर्व राज्यांमध्ये त्यांच्या मनासारखे यश मिळाल्यास भाजपचे नेतृत्व ‘राजकीय सर्जिकल स्ट्राईक’ करण्याच्या विचारात आहे. असे सांगितले जाते, की बिहारमधील जागावाटपाच्या कटकटी वाढत चालल्या आहेत. यावर एक वेगळाच उपाय भाजपच्या नेतृत्वाने काढायचे ठरवले आहे. लोकसभेच्या ऐन तोंडावर नीतिशकुमार यांचा पाठिंबा काढून त्यांचे सरकार पाडायचे. 
यामुळे नीतिशकुमार एकटे पडतील आणि जवळपास त्यांचा राजकीय अंतही होऊ शकतो. या परिस्थितीत नीतिशकुमार यांची अवस्था अधांतरी होईल. विरोधी पक्ष त्यांना जवळ करणार नाहीत हेही सत्य आहे. मग त्यामुळे निर्माण होणारी पोकळी भाजपने भरून काढायची आणि बिहारमध्ये ‘भाजप विरुद्ध बाकी सारे’ अशी देशातल्या सारखी परिस्थिती तयार करायची. त्यामुळे या पाच राज्यात कसेही करून आपले राजकीय वर्चस्व कायम राखण्याच्या पिपासेने भाजपने कामाला सुरुवात केली आहे.
एकंदर काय राजकारणातील वळणे कशी व कुठे असतील याचा अंदाज भल्याभल्यांना लागणे कठीण असते!  
 

संबंधित बातम्या