कट्टा

कलंदर
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. अशाच काही गमती सांगणारे सदर...

अवतारी व अलौकिक पुरुष अस्वस्थ आहेत?
विष्णू-अवतार, सर्वज्ञ, युगपुरुष, महानायक ही विशेषणे लागू पडतील असे एकच व्यक्तिमत्त्व सध्या भारतीय भूमीत आहे. एवढ्या सर्व विशेषणापेक्षा खरंतर त्यांना ‘ब्रह्मांडनायक’ म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. त्यांच्या बरोबरच आणखी एक अलौकिक व्यक्तिमत्त्व आहे. सध्या म्हणे दोन्ही अवतारी व अलौकिक व्यक्तिमत्त्वे अस्वस्थ आहेत. अस्वस्थ होण्याचे कारण काय ?
अवतारी पुरुष त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात वाराणसीला गेले होते. तेथे त्यांच्या सभेतून लोक उठून गेले. अवतारी पुरुषांना त्यांना बसविण्यासाठी मिनतवाऱ्या कराव्या लागल्या आणि सर्वांत दुर्दैवी भाग म्हणजे टीव्ही कॅमेऱ्यांनी ते सर्व चित्रण केले होते. 
अर्थात अवतारी पुरुषमहोदयांची दहशत, धाक इतका, की कुणाही माध्यमांची ते दाखविण्याची हिंमत झाली नव्हती. एकाच भाषिक वाहिनीने व वृत्तपत्राने ते धाडस व हिंमत दाखवली. हा सिलसिला येथेच थांबला नाही. यानंतर महानायक भोपाळला गेले. 
‘कार्यकर्त्यांचा कुंभ’ होता. तेथे तर कार्यकर्ते होते, पण महानायकांच्या भाषणाच्या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. हे काहीसे अवचितच व धक्कादायकच होते. सामान्य जनता उठून जाणे एकवेळ ठीक आहे, पण कार्यकर्त्यांनीच पाठ फिरवावी म्हणजे काय ?
राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील महानायकांच्या सभेला पूर्वीसारखा उत्साह, जोष, जल्लोष आणि मुख्य म्हणजे गर्दी आढळून येत नाही. त्यामुळेच महानायक व सहनायक चिंताक्रांत आहेत. ही माहिती एका भाजप समर्थकांचीच आहे. 
हे घडत नाही तोपर्यंत महा व सहनायकांकडे आणखी एक माहिती येऊन थडकल्याचे कळते व त्यामुळे त्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली असे आता संबंधित सांगत आहेत.
राजस्थानात मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविरुद्ध असंतोष एवढा वाढलेला आहे, की त्याची किंमत पक्षाला मोजावी लागेल
अशी चिन्हे आहेत. आता त्या पाठोपाठ मध्य प्रदेशातून येणाऱ्या माहितीमुळे महानायक व सहनायकांच्या अस्वस्थेत भर पडली 
आहे.
मध्य प्रदेशातील भाजपमध्ये गटबाजीचा कळस झालेला आहे 
आणि मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हाताबाहेर परिस्थिती गेल्याचा ‘रिपोर्ट’ खुद्द पितृसंघटना रा.स्व.संघाकडून आल्याची माहिती कळते.
रा.स्व.संघाने आपण सांस्कृतिक संघटना असल्याचा मुखवटा लावून रूप बदलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मूळ राजकीय चेहरा किती आणि कसा लपवणार ? तर संघाच्या मंडळींनी मध्य प्रदेशात त्यांच्या स्वयंसेवकांमार्फत ठिकठिकाणी सर्व्हे व पाहण्या केल्या. जनमत चाचण्या केल्या आणि त्या सर्वांचे रिपोर्ट फारसे अनुकूल नसल्याचे त्यांना आढळून आले. 
एका रिपोर्टमध्ये तर भाजपला मध्य प्रदेशातील २३० जागांपैकी कशाबशा १०० जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
यामुळे संघाची मंडळी खडबडून जागी झालेली आहेत.
त्यांनी भाजपला विद्यमान आमदारांपैकी किमान ७० ते १००आमदारांची तिकिटे कापा व नवे चेहरे द्या असा आदेश दिला आहे. आता संघ परिवाराने आणखी पाहण्या व सर्व्हेची फेरी सुरू केली आहे. त्याची माहिती व निष्कर्ष अद्याप हाती यायचे आहेत.
संघाला सत्तेचे सुख आता इतके अंगवळणी पडत चालले आहे, की ते हातून निसटू नये यासाठी धडपड सुरू केली आहे. 
त्यामुळेच केंद्रातील सत्ता टिकविण्यासाठी व महानायकांना सांप्रदायिक ध्रुवीकरणाने मदत करण्यासाठी सरसंघचालकांनी राम मंदिराचा मुद्दा उकरलेला आहे. 
सत्तासुखलोलुपता ! सत्तेसाठी काहीही ! सत्तातुराणाम्‌...!


स्वच्छ भारत ?
इन्फ्रास्ट्रक्‍चर लीजींग अँड फायनान्स सर्व्हिसेस (आयएल अँड एफएस) ही सरकारी कंपनी आहे.
ती दिवाळ्यात निघण्याची पाळी आली आहे. तिची दिवाळखोरी वाचविण्याची शर्थ केंद्र सरकारकडून सुरू आहे. देशातल्या अनेक पायाभूत क्षेत्रातील प्रकल्पांना या कंपनीकडूनच वित्त पुरवठा करण्यात आलेला आहे. कंपनीच्या नावावरून लक्षात येईलच !
परंतु, सध्या ही कंपनी आर्थिक संकटात सापडलेली आहे आणि ती दिवाळ्यात निघू नये यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. पंतप्रधान व पंतप्रधान कार्यालय स्वतः या प्रकरणात लक्ष घालत आहेत.
अलीकडेच या कंपनीच्या संदर्भातील काही फायली पंतप्रधान कार्यालयाने मागवल्या. कॉर्पोरेट मंत्रालयाकडे या फायली होत्या. या मंत्रालयाचे कार्यालय संसदभवनाजवळच्या शास्त्रीभवन या इमारतीत आहे. या फायली काढण्यासाठी बाबूमंडळी गेल्यावर त्यांना ४४० व्होल्टचा झटका बसला! या एवढ्या महत्त्वाच्या फायलींचा भुगा झाल्याचे त्यांना आढळून आले. कारण? त्यांना वाळवी लागली होती आणि वाळवीने त्या फायली पूर्ण खाऊन टाकल्या होत्या. सुदैवाने या फायलींच्या अधिकृत नकला किंवा डुप्लिकेट प्रती दुसऱ्या कपाटात जतन केलेल्या होत्या. त्या शोधण्यात आल्या आणि पंतप्रधान कार्यालयाकडे त्या सुपूर्त करण्यात आल्या. कशीबशी अब्रू वाचली. पण मोदींच्या डिजिटल युगात असा प्रकार घडावा हे आश्‍चर्यच नव्हे काय? 


बाबा-बुवांना राजमान्यता !!
वर्तमान राजवटीत बाबा-बुवा-महाराज यांची चांगलीच चलती आहे.
नुकतीच तुम्ही बातमी वाचली असेलच, की तेलंगणातील एक असेच मोठे महाराज किंवा बाबा किंवा स्वामी परिपूर्णानंद हे भाजपमध्ये सामील झाले! चक्क राजकारणात प्रवेश? हो, त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पण त्याआधी त्यांनी भाजपसाठी काय काय कामे केली ती पाहिल्यावर भगव्या कपड्यातल्या या राजकारणी पुढाऱ्यांचे आश्‍चर्य वाटल्याखेरीज रहात नाही! बहुधा भाजपला आपली राजकीय किंमत व वजन काय आहे हे दाखविण्यासाठी त्यांनी हा प्रकार केला असावा, की काय अशी शंका आल्याखेरीज रहात नाही. बुवाबाजी किंवा महाराजगिरीचा वापर करून इतर पक्षातल्या नेत्यांना फोडणे आणि त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायला लावणे असे प्रकार काही बाबा-महाराजांनी सुरू केले होते. 
वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एक भगवे बाबा रामदेव आणि दुसरे डबलश्री रविशंकर महाराज यांनी भाजप व संघ परिवाराला मदत केली होती. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मोठे करण्यासाठी आपल्याकडची साधनसंपत्ती लावली होती. त्याचा फायदा भाजपला झाला. असाच एक प्रकार हैदराबादला घडला. त्यातील प्रमुख ‘हिरो’ हे वर उल्लेखित परिपूर्णानंद महाराज होते अशी चर्चा आहे. पण त्या चर्चेवर परिपूर्णानंद यांच्या भाजप प्रवेशामुळे शिक्कामोर्तब झाले.
अविभाजित आंध्र प्रदेशातील काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्रीपदासारख्या उच्च पदावर राहिलेले नेते डी. आर. नरसिंहा यांची पत्नी पद्मिनी रेड्डी यांनी अचानकपणे भाजपमध्ये सामील होत असल्याची घोषणा केली. एवढा मोठा मासा गळाला लागतो म्हटल्यावर भाजपनेदेखील त्याची मोठी जाहिरात केली. तेलंगणा प्रदेश भाजपचे अध्यक्ष के. लक्ष्मणन आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मुरलीधर राव यांच्या उपस्थितीत व मोठ्या गाजावाज्यात पद्मिनी रेड्डींच्या भाजप प्रवेशाचा सोहळा पार पडला.काँग्रेसची स्थिती अत्यंत विचित्र व अवघडल्यासारखी झाली होती. नरसिंहा हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्याच्या समितीचे अध्यक्ष व त्यांच्याच पत्नीने भाजप प्रवेश करावा? काँग्रेसची विलक्षण अडचण झाली. पण काही तासातच त्यांच्या घराभोवती काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव केला. अनेक कार्यकर्त्यांनी ओक्‍साबोक्‍शी रडून भाजपमध्ये प्रवेश करू नका, आता माघारी पुन्हा काँग्रेसमध्ये या असा आग्रह धरून ठिय्या आंदोलनच सुरू केले. अखेर त्यांच्या हृदयाला पाझर फुटला.त्यांनी भाजप प्रवेश रद्द करून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याची घोषणा केली.
राज्यातल्या काँग्रेसजनांमध्ये हायसे झाले. त्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. कार्यकर्त्यांचे आपल्यावरील प्रेम पाहून आपण पाघळलो अशी कबुली पद्मिनीताईंनी दिली.पण काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्यास त्या प्रवृत्त कशा झाल्या? पद्मिनीताई या परिपूर्णानंद स्वामी महाराजांच्या शिष्या होत्या असे कळते. हे स्वामी महाराज प्रवचने देतानाच वर्तमान राजवटीचे गुणगान गात असतात. त्यात महानायक......अरे माफ करा! आता महानायकांना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी बढती देऊन ‘विष्णू-अवतार’पद दिले आहे. तर हे स्वामी महाराज सध्याचे देशातील जे अवतारी व अलौकिक असे नेते आहेत त्यांची देखील स्तुतिस्तवने गात असत. त्यातूनच ते सत्तापक्षाच्या समर्थकांमध्ये भर टाकण्याचे कामही करीत. असे सांगतात, की पद्मिनीताईंनी भाजपमध्ये नाट्यमय प्रवेश करण्याच्या आधी स्वामी महाराजांची देशातले दुसरे अवतारी नेते ऊर्फ भाजप अध्यक्ष यांना भेटले होते. आपले अनेक भक्तगण भाजपमध्ये प्रवेश करू इच्छित असल्याचे त्यांनी त्यांच्या कानावर घातले. त्यानंतर पद्मिनीताईंचा वाजतगाजत भाजप प्रवेश झाला.
पण हा आनंद व सुख अल्पायुषी ठरले आणि पद्मिनीताई पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्या. भारत महान! 


काटकसरी काँग्रेस?
काँग्रेस पक्षात उच्च विचारसरणीचे वावडे असले, तरी सध्या ‘साध्या राहणी’वर भर देण्याची पाळी आली आहे. भारतातल्या सर्वांत जुन्या व मोठ्या राजकीय पक्षाला पैशाची चणचण भासू लागली आहे. साहजिकच आहे, कारण पक्षाला कुणी फारसे मोठे देणगीदार मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे काटकसरीवर भर देण्याखेरीज पक्षाला पर्याय राहिलेला नाही.
पक्षात सुरू करण्यात आलेल्या या काटकसर मोहिमेचे सूत्रधार माजी खजिनदार व नव्वदीत पोचलेले, पण अद्याप सक्रिय असलेल्या मोतीलाल व्होरा हे आहेत. व्होरा यांना खजिनदारपदावरुन निवृत्त केले असले, तरी काँग्रेस महासमिती कार्यालयाच्या प्रशासनाची जबाबदारी त्यांच्याकडेच ठेवण्यात आलेली आहे. वर्तमान खजिनदार अहमद पटेल व व्होरा साहेबांनी महासमिती पदाधिकाऱ्यांसाठी एक लांबलचक आचारसंहिताच जारी केली आहे. त्यानुसार महासमितीचे वर्तमान सचिव पातळीवरील जे सुमारे ७० पदाधिकारी आहेत त्यांनी महिन्यातील १५ दिवस त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या राज्यांमध्ये व्यतीत करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी शक्‍यतोवर सरकारी निवास किंवा विश्रामगृहे किंवा कार्यकर्त्यांच्या घरी राहणे अपेक्षित आहे. परंतु या पदाधिकाऱ्यांच्या निवास व भोजन तसेच स्थानिक वाहतुकीची व्यवस्था संबंधित प्रदेश काँग्रेसने केली पाहिजे असेही सर्व राज्यांना कळविण्यात आले आहे. परंतु काही राज्यांच्या प्रदेश काँग्रेस समित्यांनी त्यांच्या आर्थिक हलाखीची गाऱ्हाणी महासमितीकडे मांडल्याचे समजते. व्होरा यांनी मुक्त हवाई प्रवासावरही निर्बंध घातले आहेत. यामुळेही अनेक गगनविहारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या हालचालींना पायबंद बसला आहे. एका महिन्यात केवळ दोनच हवाई प्रवास पक्षाच्या खर्चाने करता येतील असे त्यांना कळविण्यात आले आहे. परंतु जे पदाधिकारी खासदार किंवा आमदार आहेत त्यांना त्यांचे प्रवासखर्च त्यांच्याच पैशाने करण्यास सांगण्यात आले आहे. याचे कारण त्यांना संसद किंवा संबंधित विधिमंडळाकडून प्रवासभत्ता मिळत असतो. विरोधी पक्षात जाण्याची व बसण्याची किंमत काँग्रेस पक्षाला चांगलीच कळू लागली आहे! 

संबंधित बातम्या