कट्टा

कलंदर
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...  

हम ‘आप’ के है कौन?
दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टी ऊर्फ ‘आप’च्या सदस्यांनी १९८४ च्या शीखविरोधी दंगे व हत्याकांडाचा निषेध करणारा ठराव नुकताच संमत केला.
त्यामध्ये कुणीतरी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलेला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मागे घेण्यात यावा अशी ओळ जोडली. गोंधळात ठराव संमत झाला. या प्रकाराची बातमी खळबळजनक होणे स्वाभाविकच होते. तसेच झालेही. आता ‘आप’तर्फे त्यावर सारवासारव सुरू आहे. खुद्द विधानसभा अध्यक्षांनी ठरावात असे वाक्‍य नसल्याची ग्वाही देऊन कुणीतरी खोडसाळपणे ती बातमी पसरविल्याचा खुलासा केला. हा सर्वच प्रकार एक बनाव असल्याची भावना झालेली आहे.  दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसबरोबर समझोता करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उत्सुक आहेत पण त्यांच्या पक्षातल्या काहींना ते मान्य नाही व त्यातूनच हा ‘घातपात’ झाल्याची शंका व्यक्त होत आहे.
काँग्रेसमध्ये अहमद पटेल, शीला दीक्षित हे नेते समझोत्याला अनुकूल आहेत, पण दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकेन त्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे ‘आप’कडून हा प्रकार घडल्याने माकेन व त्यांच्या समर्थकांना आनंद झाला.
पण तोपर्यंत ‘आप’चा खुलासा झाला व असे काही झाले नसल्याचे सांगण्यात आल्याने पेच अधिक वाढला 
आता दिल्लीत काँग्रेस व आपची आघाडी होणार काय याबाबत पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. आता जी सारवासारव सुरू आहे त्यात असे सांगितले जाते, की दिल्लीतल्या शिखांची मते पदरात पाडण्यासाठी हा डाव खेळण्यात आला. त्याचबरोबर काँग्रेसमधून आपमध्ये आलेल्या अलका लांबा यांना राजीनाम्याच्या धमकीचे नाटक करायला लावून त्यावर पांघरूण घालायचे. पण या सगळ्या कोलांटी उड्या मारण्यात ‘आप’चीच चांगली फटफजिती झाली. यामुळे अजय माकेन यांनी ‘आप’शी समझोता न करण्याची जी भूमिका घेतली त्याला बळकटी मिळाली. 
माकन म्हणाले, की गेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्याशी संघर्ष करणारा नेता म्हणून अरविंद केजरीवाल व त्यांच्या पक्षाला मुस्लिम व दलितांनी मते दिली. पण आता तीन राज्यांमधील विजयानंतर परिस्थिती बदलली आहे. मुस्लिम पुन्हा काँग्रेसकडे वळत आहेत. तर मायावती यांच्या धरसोडीच्या भूमिकेने दलितही काँग्रेसला अनुकूल होऊ लागले आहेत. त्यामुळे दिल्लीत काँग्रेसला यशाची चांगली अपेक्षा आहे. माकेन यांना यानिमित्ताने चांगलेच बळ मिळाले आहे. आता ते इतर गटांवर कुरघोडी करतील काय हे पहावे लागेल !  पण ‘हम आप के है कौन’ हा प्रश्‍न दिल्ली काँग्रेसचे नेते विचारत आहेत !


‘सुपा’तले आणि बाहेरचे?
‘जात्यामधले दाणे रडती, सुपातले हसती...!’ असं एक जुनं गाणं होतं ! मराठी म्हण-वाक्‌प्रचारावर ते आधारित होतं !
अलीकडेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला विजय मिळाला. तेथे त्यांची सरकारे स्थापन झाली. काँग्रेसचे अध्यक्षपद घेतल्यानंतर एकदम तीन राज्यांचे मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी प्रथमच तरुण राहुल गांधी यांच्यावर पडली होती.
विचारविनिमय व सल्लामसलतीसाठी त्यांनी जवळपास तीन दिवस घेतले आणि त्यानंतर त्यांनी तिन्ही राज्यांच्या नेत्यांची निवड केली. विचारविनिमयाची प्रक्रिया दोन ठिकाणी चालू होती. ‘१२ तुघलक लेन’ म्हणजेच राहुल गांधी यांचे निवासस्थान आणि ‘१० जनपथ’ म्हणजे सोनिया गांधी यांचे निवासस्थान !
मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही ठिकाणची नेतानिवडीची प्रक्रिया सोपी नव्हती. त्यामध्ये सरळसरळ नवे तरुण नेतृत्व आणि जुने अनुभवी नेतृत्व अशी स्पर्धा होती. ‘ओल्ड गार्ड विरुद्ध जनरेशन नेक्‍स्ट’ !
सर्व प्रथम मध्य प्रदेशाचा निर्णय झाला. ‘ओल्ड-गार्ड’ कमलनाथ यांना कौल देण्यात आला. या सर्व प्रक्रियेत राहुल गांधी हे अनेकवेळेस त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी फेऱ्या मारत असत.
ज्या दिवशी अंतिम निर्णय झाला त्यादिवशी सकाळी व दुपारी राहुल गांधी सोनियांच्या घरी गेले होते. सायंकाळच्या निर्णायक वेळी मात्र सोनिया गांधी राहुल यांच्या निवासस्थानी पोचल्या.
त्याआधी ज्येष्ठ नेते ए.के.अँटनी तसेच अन्य काही विश्‍वासू सहकारी राहुल यांच्या निवासस्थानी आधीच पोचले होते. चर्चा होता होता भोजनाची वेळ आली. राहुल यांच्या निवासस्थानाजवळच असलेल्या क्‍लॅरिजेस हॉटेलातून सूप व अगदी हलक्‍या अशा आहाराचे पदार्थ मागविण्यात आले. ज्या हॉलमध्ये बैठक चालू होती तेथे मुख्य टेबलावर सोनिया, राहुल व प्रियांका बसलेले होते. त्याच्या मागे असलेल्या खुर्च्यांवर अँटनी व अन्य नेतेमंडळी बसून आपसांत बोलत होती.
सूप आले आणि ते फक्त तिघांनाच देण्यात आले असे ‘आतून’ मिळालेल्या माहीतगारांकडून समजले.
राहुल, सोनिया आणि प्रियांका या तिघांनाच सूप देण्यात आले. बाकीच्या उपस्थित नेत्यांमध्ये आजूबाजूला जणू काही घडत नसल्यासारखी चर्चा चालू राहिली. कडाक्‍याच्या थंडीत तिघेजण गरमागरम वाफाळत्या सुपाचा आस्वाद घेत आहेत व बाकीचे नेते, मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक प्रमुख नेते मात्र नुसत्या गप्पा मारत तोंडाची वाफ दवडत असल्याचे ते दृष्य अवर्णनीयच मानावे लागेल !
पण राजकारणात सर्व काही क्षम्य असते ना!


पराभवालाही जबाबदार अंधश्रद्धा!
मध्य प्रदेशात भाजपला सत्ता मिळतामिळता राहून गेली.
खरं तर मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना कसंही करून का होईना पुन्हा ते सत्तेत येतील अशी आशा होती.
पण ते भाग्य त्यांना लाभले नाही. काँग्रेसने त्यांच्या तोंडापर्यंत पोचलेला घास हिसकावून घेतला. आता याचे खापर कुणावर फोडायचे ? किंवा या यशाचे उचित श्रेय काँग्रेसला द्यायचे काय ? नाही ! त्रिवार नाही !
चौहान समर्थक याचे खापर ‘सिंहस्थ’पर्वावर फोडताना आढळतात.
मुख्यमंत्री असताना शिवराजसिंग यांनी अत्यंत उत्साहात उज्जैनला सिंहस्थ मेळाव्याचे आयोजन केले त्याचे यजमानपदही भूषविले. पण आता तेच त्यांच्या पराभवाला कारणीभूत झाल्याचे त्यांचे समर्थक सांगू लागले आहेत. नाशिकला पण सिंहस्थ मेळावा असतो. दर बारा वर्षांनी ही पर्वणी येत असते. हरिद्वार, उज्जैन, प्रयाग(अलाहाबाद) आणि नाशिक अशी चार स्थळी ते होत असतात. तर २०१६ मध्ये उज्जैन सिंहस्थ-पर्वाचे आयोजन शिवराजसिंग यांच्या आतिथ्य व यजमानपदाखाली झाले होते. असे सांगतात, की ज्या मुख्यमंत्र्यांवर या मेळ्याचे यजमानपद भूषविण्याची जबाबदारी पडते त्याला मुख्यमंत्रिपदाला मुकावे लागते. आता नियम, परंपरा म्हटले, की उदाहरणे देखील तयार असतात. राज्याचे पहिले मुख्यमंत्री रविशंकर शुक्‍ल यांच्या कारकिर्दीत या मेळाव्याचे आयोजन झाले आणि काही महिन्यातच त्यांचे निधन झाले. त्यानंतर गोविंद नारायणसिंग हे मुख्यमंत्री असताना त्यांनाही या पर्वणीचा प्रताप भोगावा लागला. वर्ष होते १९६८ ! भाजपचेच मुख्यमंत्री असलेल्या सुंदरलाल पटवा यांना १९८० मध्ये व नंतर १९९२ मध्ये याच कारणास्तव मुख्यमंत्रिपदाला मुकावे लागले होते. साध्वी व संन्यासी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भाजप नेत्या उमा भारती २००३ मध्ये मुख्यमंत्री झाल्या आणि २००४च्या सिंहस्थानंतर त्यांना वादग्रस्त पद्धतीने मुख्यमंत्रिपदावरून जावे लागले. २०१६चा संदर्भ वर आलाच आहे. पण कमलनाथ चांगलेच नशीबवान मानावे लागतील.  कारण आता पुढील उज्जैन सिंहस्थ २०२८ मध्ये असेल. तोपर्यंत बरेच पाणी वाहून गेले असेल ! काळाच्या किंवा सिंहस्थाच्या उदरात काय दडले आहे कुणास ठाऊक ? उत्तर प्रदेशाचा जो मुख्यमंत्री दिल्लीजवळच्या गाझियाबाद किंवा नोएडा येथे भेट देतो त्याच्या खुर्चीवर गदा येत असल्याचा एक समजही खूप प्रचलित आहे. कल्याणसिंग, मायावती, राजनाथसिंह यांच्यासारख्यांनी त्याचा फटका खाल्ल्याचे मानले जाते. योगी आदित्यनाथ यांनी हा भ्रम तोडण्यासाठी येथे भेट दिलेली आहे. 
पाहू त्यांचे मुख्यमंत्रिपद किती काळ टिकते ?? 


अच्छे दिन? आये कब थे?
संसदेचे क्र.४ चे प्रवेशद्वार !
खासदार, मंत्री, वरिष्ठ नोकरशहा आणि पत्रकार या प्रवेशद्वारातून ये-जा करीत असतात. या प्रवेशद्वारासमोरच इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांसाठी एक तंबू उभारण्यात आलेला असतो जेथे मंत्री जाऊन ‘बाईट’ देत असतात.
हे प्रवेशद्वार म्हणजे पत्रकार व नेतेमंडळींचा परस्परांना भेटण्याचा ‘भेट-बिंदू’ झाला आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. सध्या हिवाळी अधिवेशन सुरूच आहे. त्यामुळे नेतेमंडळींची वर्दळ आहेच ! अशाच एका सकाळी कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप मार्गदर्शक मंडळाचे सदस्य मुरली मनोहर जोशी प्रवेशद्वारापाशी गाडीतून उतरले. मार्मिक, तिरकस व बोचऱ्या टिप्पण्या करण्यात पटाईत असलेल्या जोशींना सगळे ‘डॉक्‍टरसाब’ म्हणतात आणि पत्रकार न चुकता त्यांच्याबरोबर संवाद साधतात.
तर, या सकाळी पत्रकारांनी जोशींचे स्वागत करताना थंडा वारे वाहण्याकडे निर्देश करून ‘आज हवा बहुत तेज है’ असे म्हटले. त्यावर दुसऱ्या पत्रकाराने, ‘अच्छे दिन इस हवा मे उड न जाय ?’ अशी पुस्ती जोडताच डॉक्‍टरसाहेबांना राहवले नाही आणि ते उत्तरले, (अच्छे दिन) ‘आये कब थे ?’ त्यांच्या त्या अचूक हजरजबाबीपणाने उपस्थित पत्रकारांमध्ये अक्षरशः एकच हास्यकल्लोळ उठला!


सारे कसे गायब गायब
सध्या संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू आहे. तीन हिंदी भाषक राज्यातील पराभव, अन्य दोन राज्यात तर नावापुरते राजकीय अस्तित्व! राजकीय फुशारक्‍या व बढाया मारायला जागाच उरली नाही! बहुधा यामुळेच संसदेचे अधिवेशन सुरू होऊनही भाजपच्या तंबूत नीरव (मोदी नव्हे) शांतताच आहे! विविध कारणांवरून गोंधळ दोन्ही सभागृहे तहकूब होतात, पण त्यानंतर संसदेच्या मध्यकक्षात पूर्वीप्रमाणे भाजपचे खासदार आढळून येईनासे झाले आहेत. 
खासदारच काय पण नेतेमंडळीही तोंड चुकवत आहेत. गेल्या म्हणजेच पावसाळी अधिवेशनात साक्षात ‘सहनायक’ ऊर्फ ‘भाजप राष्ट्रीय अध्यक्ष’च दस्तुरखुद्द मध्यकक्षात काळ्या कॉफीचा अस्वाद घेण्यात ‘पधारत’ असत. पण तेही यावेळी गायबच! विझिर ए खजाना म्हणजे अर्थमंत्री अरुण जेटली मात्र येतात. प्रकृतीच्या कारणास्तव संसर्ग टाळण्यासाठी त्यांना लोकांमध्ये मिसळण्यास मनाई आहे. पण टेबलामागे दूर बसून ते गप्पा मारतात. रविशंकर प्रसाद येतात काही काळ बसतात आणि काढता पाय घेतात. पहिल्या दिवशी मार्गदर्शक मंडळाचे दोन सदस्य लालकृष्ण अडवानी व शांताकुमार हे दोघेच एका बाकावर काही गप्पा मारत होते व त्यानंतर अन्य कुणाशी न बोलता निघून गेले. मुरलीमनोहर जोशी एखादी चक्कर मारत असतात. परंतु गेल्या पावसाळी अधिवेशनापर्यंत  ब्रह्मांडनायक ऊर्फ विष्णु अवतारी नेते हे अभेद्य असल्याची समजूत करुन पत्रकारांनाही ‘पुढची पंचवीस वर्षे थांबा’ म्हणून फुशारक्‍या मारणारी खासदार मंडळीही गायब आहेत. बहुधा सर्वांनाच भविष्याच्या चिंतेने घेतलेले असावे.  

संबंधित बातम्या