कट्टा
कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. अशाच काही गमती सांगणारे सदर...
नाराज शिवराज!
मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचे नाव आता बहुधा बदलून ‘शिवराज’ ऐवजी ‘नाराज’ ठेवावे लागण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात त्यांच्या हातातोंडाशी आलेली सत्ता निसटली.
विशेष म्हणजे आता जनमानसात त्यांच्याबद्दल मोठी सहानुभूती निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे.
शिवराजसिंग चौहान यांचा पराभव व्हायला नको होता असे आता लोकं बोलू लागली असे समजते.
शिवराजसिंग खूपच नाराज आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांमुळे हरल्याची त्यांची भावना ठाम झाल्याचे कानावर येते.
आताची ताजी कानावर आलेली माहिती!
भाजपची हार झालेली असली, तरी मतदारांना धन्यवाद देण्याचे निमित्त करून ‘आभार यात्रा’ काढण्याची योजना शिवराजसिंग यांनी आखली. यानिमित्ताने त्यांना पराभवाच्या कारणांचे आकलन व त्याची मीमांसा करणे सोपे गेले असते. थेट लोकांशी संपर्क करता आला असता. परंतु जशी ही माहिती राष्ट्रीय नेत्यांपर्यंत (हो, तेच ते दोघे) पोचली त्यांनी त्यांचा नकाराधिकार वापरला.
आभार यात्रा वगैरे काढण्याची काही आवश्यकता नाही असे त्यांनी शिवराजसिंगांना कळवून त्यांच्या यात्रेच्या बेतावर पाणी ओतले.
शिवराजसिंग बिचारे नाराजी गिळून गप्प बसले. त्यांचे हरलेले शेजारी रमणसिंग यांचीही अवस्था काही वेगळी नाही. पराभवाची जबाबदारी या दोघांनीही वैयक्तिकरीत्या स्वीकारली. परंतु ज्यांनी या राज्यांमध्ये प्रचाराचा धडाका लावला त्यांनी पराभवाची जबाबदारी घेणे सोडा, त्याबद्दल चकार शब्दही काढलेला नाही.
असे सांगतात की पंतप्रधान, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराज या तिघांनी ज्या पद्धतीने या राज्यांमध्ये प्रचार केला त्याची अत्यंत प्रतिकूल प्रतिक्रिया झाली व लोकांनी भाजपला धडा शिकविला.
छत्तीसगढमधल्या एका वरिष्ठ भाजपनेत्याच्या म्हणण्यानुसार या तिन्ही नेत्यांच्या ज्या मतदारसंघांमध्ये सभा झाल्या तेथे तेथे भाजपचा पराभव झाला. छत्तीसगड मध्ये तर हे विशेषत्त्वाने घडले.
योगी महाराजांनी छत्तीसगडमध्ये सर्वाधिक प्रचारसभा केल्या आणि सर्वांत वाईट पद्धतीने भाजपचा तेथे पराभव झाला. यामुळे रमणसिंगही विलक्षण नाराज झालेले असल्याचे सांगण्यात येते.
या दोघाही नेत्यांची अवस्था वाईट आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार किंवा वेदना सहन कराव्या लागत आहेत!
अप्रासंगिक विनोद
विनोद करणे ही एक प्रवृत्ती असते आणि त्याला अनुकूल अशी प्रकृतीही आवश्यक असते. त्याचप्रमाणे विनोदात हजरजबाबीपणा जसा महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे त्याची प्रासंगिकता किंवा त्यामुळे कुणी दुखावले जाणार नाही याचे भानही आवश्यक असते.
विनोद हा ‘निर्विष’ असणे हे सर्वाधिक महत्त्वाचे असते! निखळ विनोद निर्भेळ आनंदनिर्मिती करू शकतो!
लोकसभेतला हा प्रसंग आहे. जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीबाबतच्या ठरावावर चर्चा सुरू होती.
काँग्रेसतर्फे शशी थरुर यांनी भाषण केले. भाषणात त्यांनी ‘भाजप व पीडीपी या दोन पक्षांची युती अनैसर्गिक होती’ असा मुद्दा मांडताना इंग्रजीत ‘अन-नॅचरल मॅरेज’ असा शब्दप्रयोग केला होता.
राजनाथसिंह यांनी चर्चेवरील उत्तरात त्या शब्दप्रयोगाचा प्रतिवाद केला. राजनाथसिंह म्हणाले की ‘ये मॅरेज अन-नॅचरल था या नही ये पता नहीं, मगर कभी कभी नॅचरल मॅरेज भी टूट जाता है; बल्कि टूटना नही चाहिए’!
शशी थरुर यांचा दुसरा विवाह, त्यांच्या द्वितीय पत्नीचा(सुनंदा पुष्कर) यांचा संशयास्पद मृत्यू या गोष्टी सर्वांच्याच स्मरणात आहेत. त्यातही सार्वजनिक जीवनातील व्यक्तीच्या अशा प्रकारच्या वादग्रस्त खासगी गोष्टी चविष्टपणे चघळण्याची सवय असते.
राजनाथसिंह यांनी कदाचित ही सहज टिप्पणी केली असावी, कारण राजनाथसिंह हे तसे सभ्य नेते म्हणून ओळखले जातात. परंतु भाजप सदस्यांमध्ये मात्र त्यांच्या या टिप्पणीने हास्याची खसखस पिकली.
थरुर यांचा चेहरा काहीसा पडला, पण तरीही ते राजनाथसिंह यांना प्रत्युत्तर देण्यासाठी उठले आणि जम्मू काश्मीरमधील राज्यपालांच्या वादग्रस्त भूमिकेकडे त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
पण... तेवढ्यात चक्क पीठासीन लोकसभा अध्यक्षांकडूनच एक शेरा मारण्यात आला. राजनाथसिंह यांच्याकडे पाहून पीठासीन अध्यक्षांनी, ‘तुम्ही काय त्यांना(थरुर यांना) विवाहाचे तज्ज्ञ समजता काय?’ पीठासीन अध्यक्षांच्या त्या टिप्पणीचा मात्र वेगळाच परिणाम झालेला आढळला. थरुर यांचा चेहराच लहान झाला व ते खाली बसले. त्यांच्या चेहऱ्यावरील अवघडलेले भाव स्पष्ट दिसत होते.
या टिप्पणीवर तर भाजप सदस्य खदाखदा हसू लागले.
फारुक अब्दुल्ला यांना हे सहन झाले नाही. त्यांनी बसलेल्या जागेवरूनच ‘शरम आनी चाहिए आप लोगों को’ अशी टिप्पणी केली.
त्यावर काही अतिउत्साही भाजपचे सदस्य प्रतिवादासाठी उठताना पाहिल्यावर राजनाथसिंह यांनी स्थिती सावरली. अब्दुल्ला हे वरिष्ठ सदस्य आहेत आणि त्यांनी रागाने टिप्पणी केली असली, तरी तिच्यामागील भावना समजून घ्या असे म्हणून विषय पालटला.
परंतु कुणाच्या खासगी आयुष्यातील प्रसंगांवर आपल्या टिप्पण्यांमुळे टीका होईल याचे भान या प्रकरणात पाळले गेले नाही एवढे मात्र खरे!
गुपचूप गुपचूप
तीन हिंदी भाषक राज्यात पराभव झाल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा अचानक अंतर्धान पावले असले, तरी प्रत्यक्षात तसे नाही. सध्या अमितभाई भाजप खासदारांच्या राज्यवार बैठका घेत आहेत.
आतापर्यंत झालेल्या बैठकांमधून बाहेर झिरपलेल्या माहितीनुसार या खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीबाबतचे त्यांचे आकलन विचारण्यात येते. मुद्दे आणि विषय कोणते असू शकतात याची विचारणा केली जाते. विशेष म्हणजे या बैठकांमध्ये प्रत्येक खासदाराला त्याच्या मतदारसंघातील सद्यःस्थिती विचारली जाते.
खासदारांनी काही मुद्दे किंवा प्रश्न उपस्थित केल्यास पक्षाध्यक्ष त्यावर मतप्रदर्शन किंवा मार्गदर्शन करण्याऐवजी संबंधित खासदारांनाच त्यावरील तोडगा काय असू शकतो अशी उलटी विचारणा करतात असे समजले.
पक्षाध्यक्ष स्वतः मौन पाळतात. परंतु खासदारांना एका गोष्टीचे समाधान वाटत असल्याचे आढळून येते.
तीन राज्यातल्या पराभवानंतर ‘आमच्या नेत्यांची देहबोली बदलली’ असे ते दबक्या आवाजात सांगतात. एवढेच नव्हे, तर गेली पावणेपाच वर्षे खासदारांना या ‘दोघांनीही’ एकतर्फी फक्त ‘ऐकविण्याचे’ काम केले. आता त्यांना निवडणूक जवळ येऊ लागताच आणि वातावरण फारसे अनुकूल नसल्याचे दिसू लागताच खासदारांचे म्हणणे ऐकून घेण्याचे सुचले आहे हे चांगले आहे असे ही खासदार मंडळी सांगतात.
दरम्यान, भाजपमधील असंतुष्ट आणि नाराज खासदारांशी विरोधी पक्षांतर्फे संपर्क साधला जाऊ लागला आहे.
भाजपमधील जवळपास दहा ते अकरा खासदार हे आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षत्यागाच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. प्रामुख्याने उत्तर भारतातील खासदार मंडळींचाच यामध्ये भरणा आहे.
काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्याकडे या मंडळींचा कल असल्याचे कळते. महाराष्ट्रातही काही गळाला लागण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते!
जय हो!
बिनधास्त राणीसाहेबा!
शिवराजसिंग चौहान, रमणसिंग हे पराभवाने नाराज, दुःखी आहेत.परंतु राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या मात्र एकदम बिनधास्त आहेत. पराभवानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची भावना नाही.
अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या शपथविधीच्या वेळी वसुंधरा राजे यांनी खिलाडूपणा कायम राखला. या समारंभाला उपस्थित सर्व काँग्रेसनेत्यांशी त्यांनी या भावनेचा परिचय देऊन दिलखुलास गप्पा मारल्या. त्यांचे भाचे ज्योतिरादित्य यांना त्यांनी जवळ घेतले. राहुल गांधी यांनीही तशाच खिलाडूपणाने व त्यांच्या वयाचा मान राखून वसुंधरा राजे यांच्या आसनापाशी जाऊन त्यांच्याशी संवाद साधून विचारपूस केली. त्यानंतर गेल्या आठवड्यात वसुंधरा राजे यांनी थेट दिल्लीवर स्वारी केली.
त्या चक्क संसदेत आल्या. त्या आलेल्या पाहिल्यानंतर राजस्थानचे सर्व भाजप खासदारही त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांनी संसदेत येऊन मध्यकक्षात चक्क दोन ते तीन तास दरबार लावला. केवळ भाजपचेच नव्हे तर काँग्रेस व इतर विरोधी पक्षांचे खासदारही त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसले. कॉफी, टोस्ट यांचा नियमित पुरवठा चालू राहिला आणि मग गप्पांची मैफल न जमली तरच नवल!
जीवनात हार-जीत चालत असते. पराभवसुद्धा खिलाडूपणे कसा स्वीकारायचा याचे उदाहरणच वसुंधरा राजे यांनी दाखवून दिले.
दुर्दैवाने भाजपच्या काही शीर्ष नेत्यांमध्ये खिलाडूपणाचा पूर्ण अभाव आहे आणि त्यांनी राजकारणातला सुसंवाद आणि शिष्टाचार पार नष्ट करून टाकला आहे. आता कदाचित पराभवामुळे ते स्वतःमध्ये वसुंधरा राजे यांच्यासारखा बदल करतील अशी आशा!
या टोपीखाली दडलंय काय?
‘सामना’ या चित्रपटातले हे गाणे एकेकाळी खूप गाजले होते. ‘या टोपीखाली दडलंय काय, या मुकुटा खाली दडलंय काय’ त्याच चालीवर आता ‘नितीन गडकरी यांच्या वक्तव्यांमागे लपलंय काय’ असे विचारण्याची वेळ आली आहे. गडकरी यांनी एक नव्हे, तर लागोपाठ तीन विधाने केली. ती विधाने थेट पक्ष व सरकारी नेतृत्व आणि पक्षीय भूमिकेला छेद देणारी होती. विजयाच्या श्रेयाप्रमाणे पराभवाची जबाबदारीही नेतृत्वाने स्वीकारली पाहिजे, पं. नेहरूंची स्तुती आणि जर आमदार-खासदारांचे आचरण अयोग्य असेल, तर त्याची जबाबदारीही पक्षाध्यक्षांवर येते ही ती तीन विधाने होती. या विधानांमुळे खुद्द भाजपमध्येही खळबळ उडाली.
गडकरी यांनी ही विधाने अशीच सहज म्हणून केली की हेतुपुरस्सर? त्यांनी त्यावर खुलासा केला, पण तो कुणाच्या गळी उतरलेला नाही. गडकरी यांचे बोलविते धनी कोण हा प्रश्न पिंगा घालत आहे.
एका भाजपच्या अतिशय वरिष्ठ खासदाराने याबाबत एक नवाच पैलू सांगितला. त्याच्या म्हणण्यानुसार गडकरी पक्षाध्यक्ष होते. त्यांना अध्यक्ष म्हणून मुदतवाढ मिळालेली होती. परंतु अध्यक्षपदाची सूत्रे घेण्यापूर्वीच त्यांच्याशी संबंधित काही संस्थांवर छापे टाकण्यात आले होते. किंवा तशी आवई उठविण्यात आली होती. त्या वादामुळे गडकरी यांचे अध्यक्षपद हाता-तोंडाशी येऊन हुकले. त्यामागे काही भाजपमधील मंडळींचाच हात होता. गडकरी आता त्याची ‘परतफेड’ करीत आहेत.गडकरी यांचे बोलकेपण सूचक आहे.
परंतु एकीकडे गडकरी तर बोलून गेले, की पराभवाची जबाबदारीही नेतृत्वाने घेतली पाहिजे. प्रत्यक्षात निवडणुकीची सूत्रे सांभाळणारे भाजप अध्यक्ष आणि स्टार प्रचारक असणारे पंतप्रधान यांनी तीन राज्यातील पराभवावर अक्षरशः मौन पाळले. पंतप्रधानांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत फक्त त्यावर संक्षिप्त टिप्पणी केली. पण अध्यक्ष महोदय मात्र गप्पच आहेत.
बहुधा त्यांच्या मौनामुळे गडकरी यांना कंठ फुटला असावा!