कट्टा

कलंदर
गुरुवार, 10 जानेवारी 2019

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. अशाच काही गमती सांगणारे सदर... 

लग्नातही राजकारण.......भांडाभांड
अद्याप लग्नांचा हंगाम संपलेला नाही.
राजधानीत राजकीय नेत्यांच्या मुलामुलींची लग्ने व त्यासाठी होणारे भव्य स्वागतसमारंभ, जेवणावळी हा राजकीय वर्तुळातला चवीने चर्चिला जाणारा विषय असतो. बहुतेक राजकारणी मंडळी ही त्यांच्या मूळ ठिकाणी परंपरागत व कौटुंबिक पद्धतीने विवाहसमारंभ आटोपल्यानंतर राजधानीतील सत्तावर्तुळातील आपले वजन सिद्ध करण्यासाठी आवर्जून दिल्लीत एक स्वागतसमारभ करीत असतातच !
अशाच एका तेलगू नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त राजधानीत त्याने जोरदार स्वागतसमारंभ आयोजित केला होता. या स्वागतसमारंभाला सर्वपक्षीय खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असल्याने खासदार मंडळींबरोबरच इतरही अनेक राजकीय पुढारी व नेते दिल्लीतच मुक्कामाला असल्याने अशा समारंभामध्ये विशेष गर्दी व वर्दळ दिसून येत असते. तृणमूलचे खासदारही या समारंभाला हजेरी लावण्यासाठी गेले होते. तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी हे एक अत्यंत आक्रमक आणि काहीसा ‘गरम मिजाज’ असलेले खासदार आहेत. सभागृहात देखील ते एवढ्यातेवढ्यावरुन वाद निर्माण करीत असतात. त्यामुळे त्यांच्या वाटेला सहजासहजी कुणी जातही नाही.
तर, या समारंभात कल्याणबाबू स्वागतसमारंभाचा आनंद घेत होते.तेवढ्यात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची त्या समारंभात ‘एंट्री’ झाली. निर्मला सीतारामन या विनोदासाठी प्रसिद्ध नाहीत व उलट सतत रागीट चेहऱ्यानेच सगळीकडे वावरणाऱ्या नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. एकीकडे निर्मला सीतारामन व दुसरीकडे कल्याण बॅनर्जी..... दृष्यही मजेदारच होते. कधीनाही ते निर्मलाताईंना विनोदाची हुक्की आली. कल्याण बॅनर्जी यांना मजेने डिवचताना त्या म्हणाल्या, ‘कल्याण, वुई आर टेकिंग ओव्हर बंगाल !’ म्हणजे ‘आम्ही पश्‍चिम बंगाल जिंकणार आहोत !’ झालं ! कल्याणदादा जे उसळले ! त्यांच्या बंगाली मिश्रित हिंदीत त्यांनी निर्मला सीतारामन यांना प्रत्युत्तर करण्यास सुरुवात केली. भाजप कसे दंगे घडवीत आहे वगैरे वगैरे ! बरं, त्यांचा आवाज इतका मोठा आहे, की साधं बोलताना देखील ते भांडल्यासारखे वाटतात. पण निर्मला सीतारामन यांनी त्यांना विनाकारण जाताजाता उचकावले आणि कल्याणदादानी मग त्यांचे आवाज काढला.
पण ते इतके चिडले होते, की मागाहून असे कानावर आले, त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडेही निर्मला सीतारामन यांची खासगी तक्रार केली, की लग्नासारख्या समारंभात देखील ही मंत्री मंडळी कसे राजकारण आणतात म्हणून !
जय हो !!


डाव उलटा पडला
माननीय पंतप्रधानांची विशेष मुलाखत १ जानेवारीला देशभर प्रसारित झाली. एएनआय या वृत्तसंस्थेच्या संपादिका स्मिता प्रकाश यांनी ती घेतली होती. मुलाखतीत काही प्रश्‍न स्पष्ट होते, परंतु त्यात पुरवणी प्रश्‍न किंवा पंतप्रधानांना मध्येच अडवून प्रश्‍न विचारले गेले नव्हते. अनेक महत्त्वाचे विषय व मुद्दे त्यात समाविष्ट नव्हते किंवा वगळले गेले होते. राहुल गांधी यांनी ही मुलाखत ‘स्टेज्ड’ म्हणजेच एखाद्या नाटकाप्रमाणे पूर्वतयारी करून आल्यासारखी होती आणि प्रश्‍न विचारणारी महिला पत्रकार ‘प्लायेबल’ (म्हणजेच समोरच्या व्यक्तीपुढे सहजपणे झुकणारा, वळणारा, वाकणारा) असल्याची टिप्पणी केली होती. त्याबरोबर दिल्लीतल्या ‘नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट’(एनयूजे) या संघटनेने राहुल गांधी यांचा निषेध केला. असे समजते सत्तापक्षाच्या वर्तुळातून याबाबत सूचित केले गेले होते. म्हणजेच असा निषेध करण्याबाबत. एनयूजेच्या पत्रकानंतर माध्यमांशी जवळीक असलेल्या सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याने कुजबूज सुरू केली, की वृत्तपत्र स्वातंत्र्याबाबत फार आव आणणाऱ्या पत्रकार संघटना गप्प का? 
हे वरिष्ठ मंत्री माध्यमांच्या इतके जवळ आहेत, की त्यांना ‘न्यूज ब्युरो चीफ’ असेच म्हटले जाते. तसेच त्यांच्या अतिनिकट स्तंभलेखकांनाही ते ‘अँगल्स’ देऊन लेख लिहायला सांगतात. याची माहिती इतकी झाली आहे, की एकदा एका पत्रकाराने त्यांना एका लेखाबद्दल अभिनंदन केले. तो लेख आपण लिहिलेला नाही असे त्यांनी सांगताच त्या खोडकर पत्रकाराने नाव दुसऱ्याचे असले तरी मजकूर तुमचाच आहे ना ? अशी टिप्पणी करताच ते खजील झाले. तर या मंत्री महोदयांच्या चिथावणीनंतर एडिटर्स गिल्ड या संघटनेतर्फे तत्काळ राहुल गांधी यांचा निषेध करणारे पत्रक काढण्यात आले. यानंतर सरकारी बांडगुळी पत्रकार मंडळींनी प्रेस क्‍लब, आयडब्ल्युपीसी(महिला प्रेस क्‍लब - इंडियन वुमेन प्रेस कॉर्प्स) व प्रेस असोसिएशन या स्वतंत्र भूमिका राखणाऱ्या आणि अनेक मुद्यांवर सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या माध्यमसंस्थांकडे मोर्चा वळविला. उघड व निगरगट्टपणे सरकारची बाजू घेणाऱ्या आणि अर्थमंत्र्यांच्या निकटवर्ती अशा एका महिला पत्रकाराने (अग्रगण्य वृत्तवाहिनीच्या) आयडब्ल्यूपीसीच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारण्यास सुरुवात केली. वरील तीन संस्थांतर्फे एक निवेदन जारी करण्यात आले. त्यामध्ये राहुल गांधी यांच्या प्रमाणेच केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंग यांनी पत्रकारांचा ‘प्रेस्टिट्यूट’ म्हणून केलेल्या उल्लेखाचीही समावेश करण्यात आला होता आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय नेत्यांनी संयम पाळावा असे आवाहन केले. यानंतर एडिटर्स गिल्डमध्ये एकच हंगामा सुरू झाला. असे समतोल पत्रक का काढण्यात आले नाही असा जाब अध्यक्षांना विचारण्यात आला आणि त्यांना खुलासा करताना नाकीनऊ झाले. सारांश......... हे सरकार इतक्‍या छोट्या मनाचे आहे, की साध्यासाध्या गोष्टींसाठी भांडाभांड करणारे संकुचित बुद्धीचे नेते यामध्ये आहेत ! परंतु यानंतर अनेक स्तंभलेखकांनी एडिटर्स गिल्ड आणि संबंधित मंत्रीमहोदयांचे चांगले वाभाडे करणारे लेख लिहिले !


नववर्ष आणि अशी भोजने येती...
डिसेंबरची अखेर आणि जानेवारी महिन्याची सुरुवात हा दिल्लीतला बहारदार काळ असतो.
गच्च थंडी असते आणि त्या थंडीत सुखद उन्हे अंगावर घेत एखाद्या बंगल्याच्या हिरवळीवर दुपारच्या भोजनावर गप्पांची मैफल रंगणे यासारखे दुसरे सुख नसते.
राजकीय नेत्यांना तर यासारखी पर्वणी दुसरी नसते. 
त्यामुळे या काळात पत्रकार व राजकारणी मंडळी या ना त्या राजकीय नेत्याच्या या अशा प्रकारच्या भोजनसमारंभात व्यस्त रहात असतात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व नेते प्रफुल्ल पटेल हे 
दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अशा प्रकारचे भोजन आयोजित करीत असतात. गेली अनेक वर्षे हा पायंडा चालत आलेला आहे.
पटेल यांचे सर्व पक्षांमध्ये उत्तम संबंध असल्याने त्यांच्या या भोजनात सर्वपक्षीय नेते मंडळी आवर्जून येत असतात.
यावर्षीही त्यांनी दुपारचे भोजन आयोजित केले. त्याला सर्व पक्षीय नेते मंडळी हजर होती. परंतु, यावेळी सर्व विरोधी पक्षांची नेते मंडळी जमा झाली होती आणि एकप्रकारे एक अनौपचारिक असा विरोधी पक्षांचा संयुक्त मेळावा किंवा संमलेनच यानिमित्ताने तेथे झाले असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
सर्व विरोधी नेतेमंडळी व पत्रकार पटेल यांच्या निवासस्थानाच्या हिरवळीवर मनसोक्तपणे स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि चविष्ट गप्पा मारत बसले. बघता बघता दोन-तीन तास कसे निघून गेले ते कळलेच नाही.
या भोजनाच्यावेळी काही चवदार प्रसंगही घडले.
या भोजनाला भाजपच्या विरोधातल्या बहुतेक सर्व 
पक्षांची नेतेमंडळी हजर होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष 
शरद पवार, सुप्रिया सुळे, विजयसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडिक, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, द्रमुकच्या नेत्या व करुणानिधी यांच्या कन्या कनिमोळी, लालूप्रसाद यांच्या कन्या मिसा भारती, समाजवादी पक्षनेते रामगोपाल यादव, बहुजन समाज पक्ष नेते सतीश मिश्रा, तृणमूल नेते डेरेक ओब्रायन व दिनेश त्रिवेदी आणि काँग्रेसतर्फे अहमद पटेल, मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम ही मंडळी उपस्थित होती. अहमद पटेल आले व त्यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांना प्रथम ‘विश’ केले.
गप्पा सुरू करताना अहमदभाईंनी, ‘पवार साब हमारे नेता है, पार्टी मे नही मगर वह सबसे सीनियर है और हम उनको नेता मानते है’ अशी टिप्पणी केली.
पवार यांनीही मग मिष्कलपणे अहमदभाईंना त्यांनी काँग्रेसचे काम कधी सुरू केले असे विचारले. अहमदभाईंनी १९७८ सांगितल्यावर पवार हसत म्हणाले, ‘मैने १९५८ मे काँग्रेस का काम शुरू किया था !’ त्यावर एकच हंशा झाला.
पत्रकारांसाठी तर ही पर्वणीच होती. एवढे सर्व विरोधी नेते एकाच ठिकाणी सापडल्यावर मग गप्पा व माहिती विचारण्याचा सपाटाच पत्रकारांनी लावला.
तेवढ्यात कुणीतरी फोटोची टूम काढली.
सर्व नेते आळीपाळीने फोटोसाठी उभे राहिले आणि मग पत्रकारांनी मोबाईलवरून त्यांचे फोटोही काढले.
अशी भोजने येती........... !!


जित्याची खोड... !
मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्यात काँग्रेसला यश मिळाले असले तरी सत्तेची वाटचाल काट्याकुट्यांनी आणि खाचखळग्यांनी भरलेली आढळते.
काँग्रेसला काठावरचे बहुमत आहे. साधनसंपत्तीच्या आधारे सरकारे पाडण्याच्या कलेत वर्तमान भाजपनेतृत्वाने मोठे कौशल्य मिळविले आहे. त्याचा वापर त्यांनी सुरू केल्याच्या बातम्या कानावर येऊ लागल्या आहेत.
एका भाजपच्या नेत्याच्या म्हणण्यानुसार भाजपची सरकारे असलेल्या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन होण्याची बाब ‘नेता-द्वयां’च्या विलक्षण जिव्हारी लागली आहे. यातले एक नेते ‘ब्रह्मांड नायक’ व ‘विष्णू-अवतार’ आहेत तर दुसरे नेते चाणक्‍य मानले जातात.
त्यामुळेच काँग्रेसची ही सरकारे त्यांना हृदयात सलत आहेत.
असे सांगतात, की लोकसभा निवडणुकीपूर्वीच मध्य प्रदेशातील काँग्रेसचे तकलादू सरकार पाडण्याच्या कारवाया भाजपच्या कौटिल्यांनी सुरू केल्या आहेत. लोकसभेपूर्वीच तेथे भाजपचे सरकार कसे स्थापन होईल याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
साध्या बहुमतासाठी भाजपला सहा ते सात आमदारांची गरज आहे. समाजवादी पक्ष(१), बहुजन समाज पक्ष (२) आणि अपक्ष व अन्य काही स्वतंत्र आमदार मिळून ही संख्या पूर्ण होते.
तेव्हा या आमदारांवर ‘काम चालू आहे’ असे सांगितले जात आहे.
कर्नाटकात हे प्रकार चालूच आहेत. परंतु तेथे अद्याप डाळ शिजलेली नाही.
वातावरण बदलत चालले असल्याने नेतेमंडळींना जरा गोष्टी अवघड होत चालल्या आहेत.
विशेष म्हणजे जुने मित्रपक्ष साथसंगत सोडत चालले असताना या बदलत्या हवेत नव्याने कुणी साथ देईल अशी शक्‍यता दिसून येत नसल्याने अस्वस्थता आणखी वाढत चालली आहे !!!

संबंधित बातम्या