कट्टा

कलंदर
गुरुवार, 17 जानेवारी 2019

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर... 

सत्तेचा कैफ??
सत्तेचा कैफ हा न्याराच असतो. सत्तेची नशा, धुंदीही वेगळीच असते !
या कैफात काय काय घडत असते हे कदाचित सत्तेवर आरूढ व्यक्तीला म्हणजेच सत्ताधीशाला कळतही नसावे !
परंतु दुरून पाहणाऱ्यांना ते कळत असते.
११ व १२ जानेवारीला राजधानीत भाजपच्या राष्ट्रीय परिषदेची दोन दिवसांची बैठक पार पडली.
राष्ट्रीय परिषद ही पक्षसंघटनेची आमसभा मानली जाते त्यामुळे देशभरातून जवळपास दहा ते बारा हजार प्रतिनिधी आले होते.
एवढ्या प्रतिनिधींची सोय करणे हे सोपे काम नव्हते.
त्यात तीन राज्यांमधील सरकारे गेल्याने तेथील सरकारी विश्रामगृहामध्येही पूर्वीसारखे भाजपला मुक्तद्वार राहिलेले नव्हते.
ज्या राज्यात भाजपची सरकारे आहेत त्या राज्यांच्या सरकारी विश्रामगृहांकडे भाजपनेत्यांची नजर पडणे अटळ होते.
राजधानीत महाराष्ट्राची दोन विश्रामगृहे आहेत.
एक नवे आणि एक जुने. मग काय ? भाजपच्या प्रमुख नेत्यांसाठी नव्या महाराष्ट्र सदनाचे दरवाजे उघडण्यात आले. तर त्यापेक्षा कनिष्ठ प्रतिनिधींसाठी जुन्या महाराष्ट्र सदनात सोय करण्यात आली.
नवे महाराष्ट्र सदन आलिशान व सप्ततारांकित सुखसोयींनी युक्त असे आहे. त्यामुळे देशभरातील प्रमुख नेत्यांची तेथे राहण्यासाठी संधी मिळावी यासाठी चढाओढ असल्याचे कानावर आले.
या नेत्यांनी सुखसोई मिळण्यासाठी तेथील कर्मचारी वर्गाला धारेवरही धरल्याचे समजले.
यानंतर कर्मचारी वर्गाकडून आणखीही गमतीजमती कळू लागल्या.
नवीन महाराष्ट्र सदनाचे भाजप नेतृत्वाला विलक्षण आकर्षण असल्याचे त्यांनी सांगितले. खुद्द भाजप अध्यक्ष अमितभाई शहा यांना महाराष्ट्र सदन आवडते आणि ते त्यांच्या अनेक बैठका आणि बहुतांशी गोपनीय बैठका या सदनातच घेतात असेही कळले.
थोडक्‍यात येथील महाराष्ट्र सदनाचे रूपांतर भाजपच्या दुसऱ्या कार्यालयात झाल्यासारखेच आहे.
राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने सरकारी विश्रामगृह हे भगव्या झेंड्यांनी पार भरून टाकण्यात आले होते. भाजपच्या परराज्यातील नेते व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सदनाचा कब्जा केलेला होता अशी माहिती कानावर आलेली आहे.
विशेष म्हणजे भाजपचे जे विविध उत्सव चालतात आणि त्यासाठी परराज्यातील कार्यकर्त्यांना देखील महाराष्ट्र सदन उपलब्ध करून द्यायचे तर त्याचा खर्च कोण करते असा प्रश्‍नही निर्माण होतो.
कानावर आलेल्या माहितीनुसार भाजप नेते व कार्यकर्ते यांच्या खर्चाबाबत मोठे प्रश्‍नचिन्ह असल्याचे समजते.
ही बाब गंभीर आहे. मराठी जनतेच्या पैशावर परराज्यातील भाजप कार्यकर्त्यांना पोसण्याचा हा प्रकार होत असेल तर तो त्वरित बंद झाला पाहिजे.
अद्याप भाजपचा २०१४ मधील सत्ताप्राप्तीचा कैफ उतरला नसल्याची चिन्हे आहेत व बहुधा त्यातूनच हे घडत असावे !


पत्नी बाहेर गेली... शपथ मीच घेतो!
महिलांना राजकारणात बरोबरीचे स्थान देण्याचे असंख्य उपाय सुरू असले, तरी जित्याची खोड कायम राहतेच ना ?
पुरुषी वर्चस्व कायम ठेवण्याचे अनेक बनाव व उपाय काही ‘नग’ करीत असतातच! पंजाबमध्ये अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. काँग्रेसने सर्वत्र विजय मिळविला.
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद येथे निवडून आल्यानंतरही तेथे सदस्यत्वाची शपथ ही घ्यावीच लागते. गिद्दरबाह (मुक्तसर जिल्हा) येथील जिल्हा परिषदेवर राजबिंदर कौर या निवडून आल्या. शपथविधीच्या वेळी त्यांचे पतिदेव परमपालसिंग औलख हे शपथ घेण्यास उभे राहिल्यावर सगळेच उपस्थित काहीसे अचंबित झाले. परमपालसिंग यांनी तातडीने खुलासा केला की  पत्नी राजबिंदर कौर कुठेतरी बाहेर गेली आहे म्हणून खोळंबा होऊ नये यासाठी तिच्याजागी मी शपथ घेतोय ! आपण काही वेगळे व विचित्र करीत नसल्याचे आणखी सिद्ध करण्यासाठी त्याने काका लाखेवाली ऊर्फ सरबजितसिंग या त्याच्या मित्राचाही दाखला दिला आणि त्यानेही अशीच पत्नीच्या जागी शपथ घेतल्याचे सांगितले.
परंतु काका लाखेवालीने त्याची कहाणी सांगताना, त्याने शपथ घेण्याचा प्रयत्न केला, पण गावकऱ्यांनी त्याला चोप देऊन पळवून लावल्याचे कण्हतकुथत सांगितले आणि तो अजून रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले.
तिसरा आणखी एक असाच जो गणंग ज्याचे नाव नरिंदर कावनी आहे त्यानेही असाच प्रकार केल्याचे सांगतात पण तो बेपत्ता आहे.
असेच प्रकार पूर्वीही झाल्याचे गावकरी सांगतात.
अर्थात या ताज्या प्रसंगाची गंभीर दखल घेण्यात आलेली असून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशात यापुढची मजल आहे.
तेथे ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद सदस्य किंवा पदाधिकारी असलेल्या महिलांचे पती चक्क लेटरहेड छापून त्यावर बिनधास्तपणे ‘पती - सरपंच’, ‘पती - ग्रामपंचायत सदस्य’ असे लिहून जे धंदे करायचे ते करीत असतात.
थोडक्‍यात काय ????
‘मेरा भारत महान’ !!    

संबंधित बातम्या