कट्टा

–  कलंदर
मंगळवार, 29 जानेवारी 2019

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. अशाच काही गमती सांगणारे सदर...

रुग्णाईत भाजप?
योगायोगाचीही कमालच आहे. भाजपमध्ये आजारपणाचा खोखो सुरू आहे. एक नेता बरा होत नाही तोपर्यंत दुसऱ्या एखाद्या नेत्याची प्रकृती बिघडते असा प्रकार सुरू आहे. पूर्वीची उदाहरणे जाऊ द्यात अगदी ताजे उदाहरण, अर्थमंत्री अरुण जेटली हे अचानक न्यूयॉर्कला गेल्याचे वृत्त आले. त्यानंतर अटकळबाजीला सुरुवात झाली. आपल्या रूटीन चेक-अप साठी ते गेले आहेत इथपासून ते त्यांना बहुधा कॅन्सर झाल्याच्या संशय आल्याने तत्काळ तपासण्या करण्यासाठी ते न्यूयॉर्कला गेल्याची चर्चा सुरू झाली. अद्याप त्यांच्या न्यूयॉर्क भेटीबाबतचे तपशील जाहीर करण्यात आलेले नाहीत. पण आरोग्य आणि प्रकृतीच्या कारणास्तव ते तेथे गेले आहेत एवढे मात्र खरे.
जेटली यांनी ते व्यवस्थित असल्याचे दाखविण्यासाठी न्यूयॉर्कला जाताना, न्यूयॉर्कला पोचल्यावर राहूल गांधी व काँग्रेसला झोडून काढणारे ब्लॉगही लिहिले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका परिषदेलाही संबोधीत केले. पण, जेटली यांच्या प्रकृतीबाबतची बातमी मागे पडेपर्यंत आणखी एक बातमी आली. साक्षात ‘चाणक्‍य’ आजारी पडल्याची बातमी आली. चाणक्‍य? अहो असे काय करता? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा हो ! तेच आजारी पडले! त्यांना स्वाईन फ्लूचे निदान झाले. असे कानावर आले, की अंगात ताप आल्याने आणि इतरही काही लक्षणे दिसू लागल्याने शहा हे तातडीने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल झाले. त्यांच्याबरोबर त्यांचे विश्‍वासू सहकारी भूपेंद्र यादव होते. शहा यांच्या तपासण्या चालू असताना यादव हे तेथेच शहा यांच्याजवळच सतत होते. पण, डॉक्‍टरांनी जसे स्वाईन फ्लूचे निदान केले तसे यादव शहा यांच्यापासून तत्काळ काही अंतर राखून वावरू लागल्याचे यावेळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले. हा संसर्गजन्य आजार आहे आणि वेळीच खबरदारी न घेतल्यास जीवघेणाही ठरु शकतो.  अमित शहा यांच्या पाठोपाठ पक्षाचे एक वरिष्ठ नेते आणि पक्षाचे संघटन सरचिटणीस रामलाल यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेही तापाने फणफणलेले असल्याने त्यांना तत्काळ कैलाश हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कैलाश हॉस्पिटल केंद्रीय पर्यटन व संस्कृती मंत्री डॉ.महेश शर्मा यांच्या मालकीचे आहे. हे सर्व चालू असतानाच कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनाही ‘एम्स’(ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) मध्ये दाखल करण्यात आले. त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तीन-चार दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आले परंतु एक दिवस त्यांना प्राणवायूही पुरवावा लागला होता असे समजले. एका पाठोपाठ भाजपचे वरिष्ठ नेते आजारी पडत गेल्यामुळे राजकीय वर्तुळात तो एक चर्चेचा विषय झाला. भाजपनेत्यांच्या आरोग्याबाबत एक विचित्र योगायोग आढळतो. पर्रीकर गंभीर आजारी आहेत. सुषमा स्वराज यांना तसेच अरुण जेटली यांना मूत्रपिंड रोपणाच्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. सुषमा स्वराज यांनी तर लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचेही जाहीर केले. नितीन गडकरी यांनाही भर सभेत चक्कर येऊन ते कोसळले होते. भाजपवर आरोग्यदेवता कोपली आहे, की काय ते कळत नाही?


हंगामी अर्थसंकल्पाचे काय?
फेब्रुवारीला हंगामी अर्थसंकल्प १ सादर केला जाणे अपेक्षित आहे. अर्थात शिष्टाचार व लोकशाही संकेतानुसार हंगामी अर्थसंकल्प म्हणजे केवळ लेखानुदान असते. परंतु सध्याची राजवट व तिचे नेते यांचा राजकीय हव्यास पराकोटीचा असल्याने हंगामी अर्थसंकल्प असूनही त्या निमित्ताने जनतेवर आर्थिक सवलतींचा पाऊस पाडण्याच्या घोषणा करण्याची योजना या राज्यकर्त्यांनी आखली आहे.
प्रश्‍न निर्माण झाला होता, की हा हंगामी अर्थसंकल्प सादर करणार कोण?
   जेटली तर प्रकृतीच्या कारणासाठी न्यूयॉर्कला गेले आहेत. ते हंगामी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी परतू शकतील का?
जेटली यांच्या अनुपस्थितीत मागे पियुष गोयल (हे पक्षाचे अर्थमंत्री म्हणजे खजिनदार आहेत) यांनी अर्थ मंत्रालयाचा हंगामी किंवा तात्पुरता कारभार सांभाळला होता. त्यामुळे हंगामी अर्थसंकल्प सादरीकरण गोयल करणार काय असा प्रश्‍न होता. गेल्या आठवड्यात कॅबिनेटच्या ब्रीफिंगच्या वेळी पत्रकारांनी उत्सुकतेपोटी गोयल यांना अर्थसंकल्प तुम्ही सादर करणारा काय म्हणून खूप छेडले पण ते प्रश्‍न ऐकून न ऐकल्यासारखा करीत राहिले. पत्रकार काही केल्या थांबेनात तेव्हा त्यांनी सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी’ सिनेमा पाहिला का? म्हणून पत्रकारांना त्याची स्टोरी सांगायला सुरुवात केली, आणि सिनेमा खूपच छान आहे म्हणून त्याची जाहिरातही केली. गोयल यांची टाळाटाळ पाहिल्यावर एका पत्रकाराने कदाचित पंतप्रधान स्वतःच हंगामी अर्थसंकल्प सादर करतील अनेक गगनभेदी, आकर्षक घोषणा करुन आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याचा मार्ग सोपा करतील असे म्हटले. एकाने पुस्ती जोडताना म्हटले, 
हे खरंही असेल कारण पंतप्रधानांना नवनवीन गोष्टी करण्याची खूप हौस आहे. नुकतेच ते रणगाड्यात बसून फिरून आले व त्याचे फोटोही त्यांनी काढून घेतले आहेत त्यामुळे ही शक्‍यता नाकारता येत नाही! पण जेटलीही काही कमी नाहीत. त्यांनी ५ अर्थसंकल्प सादर केले आहेत. आता हत्ती गेला आणि शेपूट राहिलेले असताना ते ही हंगामी अर्थसंकल्पाची संधीही इतरांना का मिळू देतील ? त्यांनी अमेरिकेतूनच सांगितले, की ते २८ जानेवारीपर्यंत दिल्लीत पोचतील आणि हंगामी अर्थसंकल्प तेच सादर करतील ! जेटली यांच्याकडे 
फक्त सादरीकरणाचीच जबाबदारी असते. कारण त्यांचे भाषण, अर्थसंकल्प हे पंतप्रधान कार्यालयाकडूनच तयार केले जातात असे कानावर येते. पण तरीही सादरीकरणासाठी का होईना जेटली येणार आहेत. जय हो !


कहाँ गये वो?
विरोधी पक्षांचा महामेळावा - महारॅली - कलकत्त्यात १९ जानेवारी रोजी पार पडला. वीस-एकवीस पक्षांचे प्रमुख व नेते तेथे हजर होते.
याच्या सूत्रधार किंवा संयोजक व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्याची किमया करुन दाखवली. त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. या मेळाव्यात अनेक प्रमुख नेते हजर होते. पण एकेकाळी विरोधी पक्षांच्या या जमावड्यात प्रमुख अशा दोन नेत्यांची अनुपस्थिती जाणवणारी होती. मुलायमसिंह आणि लालूप्रसाद. लालूप्रसाद हे आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणात तुरुंगात आहेत आणि त्यांची प्रकृती देखील अजिबात बरी नाही. मुलायमसिंह हे आजारी नाहीत परंतु त्यांची प्रकृतीही साथ देईनाशी झाली आहे. विस्मृतीचे प्रसंग वारंवार त्यांना येताना आढळतात. त्यांचे चिरंजीव अखिलेश यांनी पक्षाध्यक्षपद स्वतःकडे घेऊन मुलायमसिंह यांना पक्षाचे ‘कर्ते पुरुष’ म्हणून त्यांना मार्गदर्शकाची भूमिका दिलेली आहे. त्यामुळे वस्तुतः त्यांच्याकडे कोणतेच अधिकारही नाहीत अशी स्थिती आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच बहुधा त्यांना या महामेळाव्याला निमंत्रित केले नसावे. एकेकाळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील एक स्पर्धक म्हणून मुलायमसिंह यांचा उल्लेख केला जात असे. पण.. कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही!! विशेष म्हणजे या मेळाव्यात त्यांचेच समकालीन म्हणता येतील अशा पिता-पुत्रांच्या तीन जोड्या हजर होत्या; माजी पंतप्रधान देवेगौडा व त्यांचे मुख्यमंत्री-पुत्र एच.डी.कुमारस्वामी, जम्मू-काश्‍मीरचे डॉ. फारुख अब्दुल्ला व त्यांचे चिरंजीव व माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि लोकदलाचे अध्यक्ष अजितसिंग व त्यांचे चिरंजीव जयंत चौधरी.
बिचाऱ्या मुलायमसिंह यांची कुणालाच आठवण झाली नाही. लालूप्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी हजर होते व त्यांचे जोरदार भाषणही झाले. काळाचा महिमा आता पुढची पिढी सूत्रे हाती घेत आहे!


फिल्लमबाजी!
पूर्वी अभिनेते हे नेते होत असत हे सर्वांनी पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे. कालांतराने काही नेत्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपले अभिनय कौशल्य आजमाविण्याचा प्रयत्न केला होता. रामकृष्ण हेगडे किंवा अमरसिंग किंवा लालूप्रसाद ही काही वानगीदाखल उदाहरणे देता येतील. परंतु काही नेत्यांचे आचरण, हालचाली, कृती, हावभाव, भाषणे ही थेट फिल्मी स्टाईलमध्ये असतात. त्यांना या फिल्मी जगाचे असलेले आकर्षण त्यांच्या या वर्तनातून प्रतिबिंबित होत असते. त्यांच्या प्रत्येक हालचालींमध्ये त्यामुळे भरपूर नाटकीपणा भरलेला असतो. परंतु आपल्या राजवटीच्या फायद्यासाठी सिनेमा या माध्यमाचा किंवा रुपेरी पडद्याचा वापर करण्याचा प्रकार नव्यानेच सुरू झालेला आहे.
  एकेकाळी आणीबाणीच्या वेळी गुलजार यांनी एक सुंदर प्रेमकहाणी रुपेरी पडद्यावर ‘आंधी’ या नावाने प्रदर्शित केली. परंतु त्यातली पात्रे ही तत्कालीन सत्ताधाऱ्यांशी साधर्म्य दाखविणारी असल्याचे कारण पुढे करुन या एका नितांतसुंदर सिनेमावर बंदीची कुऱ्हाड कोसळली होती. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘ॲक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या सिनेमाचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या विरोधातील प्रचाराचे प्रमुख हत्यार म्हणून वापर सुरू केला आहे. या सिनेमाची जी परीक्षणे आली त्यात हा चित्रपट सुमार असल्याचे म्हटलेले आहे. परंतु कानोकानी पडलेल्या माहितीनुसार भाजपने अनौपचारिकपणे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना या सिनेमाचा भरपूर काँग्रेसविरोधी वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. दुसरा सिनेमा आहे ‘उरी’. सर्जिकल स्ट्रईकवर आधारित हा सिनेमाही भाजपच्या प्रचाराचे प्रमुख साधन राहणार आहे. सर्व काही फिल्मी स्टाईल मध्ये ! भाजपची ही फिल्लमबाजी किती साह्यभूत होणार कुणास ठाऊक ? पण देशाचे राजकारण किती हलके आणि सवंग होत चालले आहे याचा हा एक नमुना आहे !


वर्गणी हवी वर्गणी!!
सत्तेत असण्याचा मुख्य फायदा असतो, की सत्तारूढ पक्षाला भरपूर देणग्या मिळत असतात. सत्तापक्षाकडे साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात जमा होते. त्या तुलनेत विरोधी पक्षांना फारसा पैसा मिळत नाही, हे लोकशाहीतले दुर्दैवी वास्तव आहे. आताही भाजपने बड्या उद्योगांकडून मिळालेल्या देणग्यांपैकी ९२ टक्के देणग्या पटकाविल्याची माहिती देण्यात येते. त्या पाठोपाठ काँग्रेसचा नंबर लागत असला तरी रक्कम फारच कमी आहे. त्यामुळेच पक्षाचे नवे खजिनदार अहमद पटेल यांनी ‘कॉर्पोरेट’ देणग्यांऐवजी चक्क सामान्य जनतेकडून वर्गणी गोळा करण्याची कल्पना मांडून कार्यकर्ते, स्थानिक नेते यांना चक्क कामाला लावले आहे. यासाठी ट्‌वीटर, फेसबुक अशा सर्व सोशल मीडियाचा वापर करण्यात येत आहे. याखेरीज अहमदभाईंनी काँग्रेस महासमितीच्या कार्यालयातील अनेक अनावश्‍यक व अवाजवी खर्चांना कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. अगदी चहा आणि अल्पोपहारापासून सर्व खर्चांमध्ये काटछाट करण्यात आलेली आहे.
  सामान्य लोकांकडून वर्गणी गोळा करण्यासाठी पक्षाने लोकांना आकर्षित करता येईल असे एक अपील किंवा आवाहनही तयार केले आहे. त्याचा सारांश असा, की नरेंद्र मोदींना बड्या उद्योगांकडून भरपूर पैसा व देणग्या मिळतात आणि त्यामुळेच ते त्यांचे हितसंबंध जपण्याचे राजकारण करतात, त्यांना लाभकारक असेच निर्णय घेतात. त्यांचे सरकार या बड्या लोकांसाठी काम करते. काँग्रेस त्यामुळेच तुमच्यासारख्या सामान्य माणसांच्या दारात येऊन जेवढी शक्‍य असेल तेवढी मदत मागत आहे. कारण काँग्रेसला सामान्य लोकांकडून देणगी मिळणे याचा अर्थ काँग्रेस या सामान्य लोकांच्या हिताची धोरणे व निर्णय अमलात आणणार आहे. काँग्रेसची नाळ सामान्यांशी जुळलेली आहे. म्हणून काँग्रेसला जास्तीतजास्त मदत करा आणि लोकहिताच्या कामांसाठी काँग्रेसला आधार द्या!
एकेकाळी केरळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असताना ए.के.अँटनी यांनी केरळभर पदयात्रा काढून लोकांकडून फक्त एक रुपया वर्गणी गोळा करुन प्रदेश काँग्रेसला मदत केलेली होती. राष्ट्रीय पातळीवर हा प्रयोग कोण करील? 
राहुल गांधी? 

संबंधित बातम्या