कट्टा

कलंदर
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

कट्टा

राजकारणातही गमतीजमती घडत असतात. अशाच काही गमती सांगणारे सदर...   
 

...आणि साबुदाणा वडा
पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ज्यांना राजकीय व पत्रकार वर्तुळात ‘दीदी’ म्हणून संबोधले जाते त्यांची बाह्य प्रतिमा आक्रमक नेत्याची असली, तरी त्यांच्या आवडीनिवडी अगदी साध्या आहेत. 
गेल्याच आठवड्यात त्या दिल्लीत विरोधी पक्षांच्या बैठकांसाठी आलेल्या होत्या. दिल्लीत आल्या की त्यांच्या भेटीगाठींचा एक क्रम असतो. त्या क्रमात ‘प्रेस क्‍लब ऑफ इंडिया’लाही कधीकधी स्थान मिळून जाते. 
तर या त्यांच्या ताज्या दिल्लीभेटीत त्यांनी प्रेस क्‍लबला निरोप पाठवला की ‘मी प्रेस क्‍लबला भेट देणार आहे.’ 
त्या पत्रकारांच्याही तशा लाडक्‍या आहेत. कारण पत्रकारांशी मुक्तपणे गप्पा मारायला त्यांची कधी ना नसते. 
त्या प्रेस क्‍लबला आल्या. सुरुवातीला त्यांचे क्‍लबच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. चहापाणी विचारण्यात आले. त्या म्हणाल्या, ‘चहा चालेल.’ त्यांना कडक टोस्ट आवडतात. पण त्यादिवशी त्या म्हणाल्या, ‘आधीच भरपूर खाणे झाले आहे आता नको.’ कुणीतरी सांगितले की क्‍लबमध्ये साबुदाणा वडा नव्याने सुरू करण्यात आला आहे. दीदींचे डोळे लकाकले.. ‘साबुदाणा वडा? मला तर फार आवडतो..’ आणि मग त्या क्‍लबच्या अध्यक्षांना (मराठी व्यक्ती) म्हणाल्या, ‘कलकत्त्यात महाराष्ट्र भवन आहे आणि तेथे साबुदाणा वडा होतो आणि मला लहर आली की मी त्यांच्याकडून मागवते. तेही स्वादिष्ट वडे पाठवतात. गणपती उत्सवात तर चंगळ असते!’ 
तोपर्यंत दीदींच्या पुढ्यात गरम गरम साबुदाणा वडे आले 
होते. त्यांनी त्यातील एक खाल्ला. मग म्हणाल्या, ‘आता पोट भरले आहे म्हणून एक इथे खाते. बाकीचे मला बांधून द्या, जाता जाता खाते..’ 
मग काय सगळीकडे एकच हशा पिकला. त्यांना गरमागरम वडे पॅक करून देण्यात आले. 
जाताजाता त्यांनी पदाधिकाऱ्यांना ‘मुझे भी मेंबर बना दो।’ म्हणून सांगितले. लगेचच फॉर्मवर त्यांची सही घेण्यात आली व त्यांना मानद सदस्यत्व करण्याची प्रक्रिया करण्यात आली. 
दीदी खूष! त्यांनी त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकाच्या हिंदी व इंग्रजी अनुवादाचे प्रकाशनही प्रेस क्‍लबमध्येच करण्याचा निर्णय घोषित केला आणि पुढच्या वेळी पुन्हा क्‍लबला भेट देण्याचे निश्‍चित केले.


केजरीवाल - पुद्दुचेरी कनेक्‍शन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे थेट पुद्दुचेरी (पाँडिचेरी) येथे पोचले आणि तेथील मुख्यमंत्री नारायणस्वामी यांच्या समर्थनासाठी त्यांनी चक्क सभाही घेतली. 
नारायणस्वामी हे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. मग केजरीवाल कसे काय त्यांना पाठिंबा द्यायला गेले बुवा? 
नारायणस्वामी हेही पुद्दुचेरीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि तेथील लोकनियुक्त सरकारला अधिकार मिळावेत यासाठी आंदोलन करीत आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले निर्णय भाजपच्या केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी मंजूर न केल्याच्या निषेधार्थ नारायणस्वामी राजनिवासाबाहेर दिवसरात्र काळा शर्ट घालून ठिय्या आंदोलन करीत आहेत. त्यांनी ते १३ फेब्रुवारीला सुरू केले. 
केजरीवाल हे पण दिल्लीला पूर्ण राज्याचे अधिकार मिळावेत म्हणून सातत्याने मागणी करीतच आहेत त्यामुळे त्यांना पुद्दुचेरी आणि दिल्लीचे दुखणे एक असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी काँग्रेसचे असूनही नारायणस्वामी यांना तेथे जाऊन पाठिंबा जाहीर केला.
दिल्लीत मात्र केजरीवाल आणि काँग्रेसच्या तारा अद्याप जुळताना आढळत नाहीत. शरद पवार यांच्या घरी विरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीत केजरीवाल व काँग्रेसच्या नेत्यांना (राहुल गांधी उपस्थित होते) भाजपला दिल्लीत हरविण्यासाठी एकत्र येण्याची सूचना करण्यात आली होती. केजरीवाल यांची तयारी असली तरी काँग्रेसमध्ये त्यावर दोन तट आहेत. त्यामुळे केजरीवाल बहुधा पुद्दुचेरी-मार्गे काँग्रेसच्या दिल्लीश्‍वरांना अनुकूल करू पाहात असावेत. 
केजरीवाल पुद्दुचेरीला पोचल्यावर नारायणस्वामी यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. दोघांचे एकमेकाला कडाडून भेटण्याचे फोटोही प्रसिद्ध झाले. यापुढे केवळ दिल्लीसाठी नव्हे तर दिल्लीबरोबर पुद्दुचेरीसाठीही पूर्ण राज्याचा दर्जा मिळविण्यासाठी आपण एकत्रितपणे मागणी करू असे केजरीवाल यांनी जाहीर केले. विरोधी पक्षांची एकजूट इंचाइंचाने पुढे सरकत आहे. केजरीवालही ‘व्हाया पुद्दुचेरी’ दिल्लीचे राजकारण खेळत आहेत. पण दिल्लीत काँग्रेसला लहान भावाची भूमिका घेण्यात अडचण आहे आणि त्यामुळेच त्या मुद्यावर गाडे अडले आहे. 
केजरीवाल आघाडी करू इच्छितात, पण त्यांना काँग्रेसची वर्चस्ववादी भूमिका अमान्य आहे. त्यांच्या बाजूने ममतादीदी, चंद्राबाबू उभे आहेत. त्यामुळे कोणता मधला मार्ग निघतो त्याची वाट पाहिली जात आहे.


निवडणुका - पक्षांतर व घरोबा! 
निवडणुका जवळ आल्या, की राजकारणातली वर्दळ वाढू लागते. विशेषतः राजकीय पक्षांमधील ‘जा’ आणि ‘ये’ वाढू लागते. यालाच ‘आयाराम’ ‘गयाराम’ असेही म्हटले जाते. काँग्रेसचे दिवंगत नेते अर्जुनसिंग यांनी अशा मंडळींना उद्देशून ‘मायग्रेटरी बर्ड्‌्स’ म्हणजे ‘हवा व ऋतुमानबदलाप्रमाणे स्थलांतर करणारे पक्षी’ असे म्हटले होते. 
नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री असलेले उत्तर प्रदेशातील एक दलित नेते रामलाल राही यांनी भाजपमध्ये काही काळ आश्रय घेतला होता. पण आता प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारण प्रवेशानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपचे बंडखोर खासदार कीर्ती आझाद यांनी अखेर पक्षाला रामराम केला आणि काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला.
त्यांचे वडील भगवत झा आझाद काँग्रेसमधील एक मोठे नेते होते व बिहारचे मुख्यमंत्रीही होते, केंद्रात मंत्रीही होते.
ईशान्य भारतातले काही नेतेही आता भाजपचा काही काळ अनुभव घेऊन पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर आले आहेत.
हे झाले राजकीय... पक्षीय घरोबे! 
कौटुंबिक पातळीवरही आघाड्या होऊ लागलेल्या दिसतात. पूर्वी मुलायमसिंग यांचे नातू व लालूप्रसाद यांची एक मुलगी यांचा विवाह होऊन दोन्ही कुटुंबे परस्परांची नातेवाईक झाली. सध्याच्या राजकीय मोसमात संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते व वरिष्ठ नेते के. सी. त्यागी (नेहमी टीव्हीवर असतात) यांचा पुतण्या आणि भाजपचे खासदार, माजी मंत्री व सध्या प्रवक्ते व सरचिटणीस असलेले राजीव प्रताप रुडी यांची कन्या विवाहबंधनात अडकत आहेत. 
बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपच्या युतीचे सरकार सत्तेत आहे. दिल्लीतही दोन्ही पक्षातील नेत्यांनी कुटुंबाच्या पातळीवरही युती - आघाडी करण्याचे ठरविलेले असावे. 


सुरक्षित राजकीय अंतर?
विरोधी पक्षांनी अलीकडेच दिल्लीत एकजुटीचे प्रदर्शन केले. पण, आपसातले राजकीय अंतर राखूनच त्यांनी हा प्रकार केला.
बॅनर्जी व चंद्राबाबू नायडू हे दोन नेते या एकजुटीच्या प्रयत्नांचे चेहरे आहेत. त्यांच्या राज्यात भाजपबरोबरच काँग्रेस व डाव्या आघाडीलाही त्यांना तोंड द्यायचे आहे. तर आंध्र प्रदेशात चंद्राबाबू यांना काँग्रेस आणि जगनमोहन रेड्डी (वायएसआर काँग्रेस) यांच्याशी लढायचे आहे. 
त्यामुळे जंतर मंतरवरील एकजूट प्रदर्शनात जेव्हा मार्क्‍सवादी नेते सीताराम येचुरी यांचे भाषण झाले, तेव्हा ममतादीदी व्यासपीठावर नव्हत्या. येचुरी भाषण करून गेल्यानंतर ममतादीदी तेथे पोचल्या. 
काँग्रेसतर्फे आनंद शर्मा आले होते. त्यांच्या शेजारी दीदींना बसायला सांगण्यात आले. पण त्यांनी त्यास नकार देऊन शेवटच्या खुर्चीवर बसणे पसंत केले. शर्माही भाषण करून गेल्यावर दीदी मधल्या खुर्चीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शेजारी येऊन बसल्या. 
दीदींनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. राज्यात जरी त्यांना काँग्रेस-डावे आणि भाजपशी मुकाबला करावा लागणार असला, तरी केंद्रात भाजपचे सरकार न येण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर त्यांचा या पक्षांना पूर्ण पाठिंबा राहील. त्यासाठी त्या सर्व ते प्रयत्न करणार आहेत. 
जय हो दीदी!   


काँग्रेस आक्रमक?
काँग्रेस पक्षाने २८ फेब्रुवारी रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक दिल्लीबाहेर घेण्याचे ठरवले आहे. स्थळ आहे - अहमदाबाद! हो, गुजरातमध्ये! चक्क नरेंद्र मोदी व अमित शहांच्या राज्यात! 
बऱ्याच वर्षांनंतर व तेही राजकीय वातावरण लोकसभा निवडणुकांमुळे तापलेले असताना कार्यकारिणीची बैठक दिल्लीबाहेर घेण्याचा हा निर्णय आश्‍चर्यकारकच मानला जात आहे. 
गेल्यावर्षी महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताने राहुल गांधी यांनी सेवाग्राम येथे कार्यकारिणीची बैठक घेतलेली होती. परंतु, त्यामध्ये प्रतीकात्मकता अधिक होती. आता २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीचे स्वरूप पूर्ण राजकीय असेल. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक बहुधा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित असल्याने या कार्यकारिणी बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 
पक्षाच्या नव्या सरचिटणीस प्रियांका गांधी या सरचिटणीस या नात्याने कार्यकारिणीच्या पदसिद्ध सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे अहमदाबाद बैठकीच्या निमित्ताने त्या प्रथमच कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. यापूर्वी गुजरातमध्ये १९६० मध्ये कार्यकारिणीची बैठक झाल्याचे सांगितले जाते. म्हणजेच जवळपास साठ वर्षांनी काँग्रेस कार्यकारिणी बैठक गुजरातमध्ये होत आहे.
गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळून सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली असली, तरी तो निसटता विजय होता आणि थोड्याशा फरकानेच काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यामुळेच काँग्रेसचे नीतिधैर्य वाढलेले आहे आणि त्याचाच भाग म्हणून लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीची महत्त्वपूर्ण कार्यकारिणी बैठक घेण्यासाठी अहमदाबादची निवड करणे हे सूचक मानले जाते. 
पूर्वी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठका बिगर-काँग्रेसची सरकारे असलेल्या राज्यात नियमितपणे घेण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु विविध कारणांनी व मुख्यतः इच्छाशक्तीच्या अभावामुळे सर्व बैठका दिल्लीतच घेतल्या जात असत. आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काहीसा वेगळा मार्ग काँग्रेस पक्ष चालू लागल्याचे दिसून येते. 
त्याचे स्वागतच करायला हवे.    

संबंधित बातम्या