कट्टा

कलंदर
सोमवार, 11 मार्च 2019

डॉक्‍टरसाब सक्रिय??
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना त्यांच्या परिचितांच्या वर्तुळात ‘डॉक्‍टरसाब’ म्हणून संबोधले जाते!
‘अपघाती पंतप्रधान’ असा त्यांचा उपहास करण्यात आला आणि त्याच शीर्षकाने लिहिलेल्या पुस्तकावर सिनेमा काढून त्यांना बदनाम करण्याचा भाजपचा आणि पुस्तक लिहिणाऱ्या भाजपच्या बगलबच्च्यांचा डाव लोकांनीच हाणून पाडला.
सिनेमा सपशेल पडला! लेखकाने ‘माझा विश्‍वासघात केला’ अशा शब्दात मनमोहनसिंग यांनी नाराजी व्यक्त केली होती.

डॉक्‍टरसाब सक्रिय??
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना त्यांच्या परिचितांच्या वर्तुळात ‘डॉक्‍टरसाब’ म्हणून संबोधले जाते!
‘अपघाती पंतप्रधान’ असा त्यांचा उपहास करण्यात आला आणि त्याच शीर्षकाने लिहिलेल्या पुस्तकावर सिनेमा काढून त्यांना बदनाम करण्याचा भाजपचा आणि पुस्तक लिहिणाऱ्या भाजपच्या बगलबच्च्यांचा डाव लोकांनीच हाणून पाडला.
सिनेमा सपशेल पडला! लेखकाने ‘माझा विश्‍वासघात केला’ अशा शब्दात मनमोहनसिंग यांनी नाराजी व्यक्त केली होती.
पण डॉक्‍टरसाहेब पुन्हा राजकीयदृष्ट्या सक्रिय होताना आढळत आहेत.
त्यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत येत्या जून महिन्यात संपत आहे. ते आसाममधून राज्यसभेवर निवडून आले होते. आता आसाम विधानसभेत राज्यसभेवर एक सदस्य पाठविण्याइतकेही संख्याबळ काँग्रेसकडे नसल्याने त्यांना संसदेत कायम ठेवायचे कसे हा यक्षप्रश्‍न काँग्रेसनेतृत्वाला सतावत आहे. त्यांचे व्यक्तिमत्व, अनुभव, अभ्यास याचा दबदबा मानला जात असल्याने त्यांचे संसदेत असणे काँग्रेसला अत्यावश्‍यक वाटते, पण राज्यसभेवर त्यांना आणायचे कुठून हा गुंता कायम आहे.
जूनपूर्वी लोकसभेची निवडणूक अपेक्षित आहे.
त्यामुळे डॉक्‍टरसाहेबांना लोकसभेसाठीच उभे करण्याची कल्पना काँग्रेसच्या मनात घोळायला लागली आहे.
त्यांनी १९९६ मध्ये दक्षिण दिल्लीतून लोकसभेची निवडणूक लढविली होती, पण भाजपच्या सुषमा स्वराज यांच्याकडून ते पराभूत झाले होते. त्यानंतर ते लोकसभेच्या वाटेला गेले नाहीत.
आता पुन्हा काँग्रेसची मंडळी त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उभे करू पाहत आहेत.
अर्थात यावेळी त्यांना दिल्लीतून नव्हे, तर पंजाबमधून व तेही अमृतसरमधून निवडणूक लढवण्याबाबत सुचवीत आहेत.
अमृतसर मतदारसंघ हा तसा काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. सध्याचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी मोदी-लाटेतही अरुण जेटली यांना पराभूत केले होते.
त्यामुळे मनमोहनसिंग यांना अमृतसरहून निवडणूक लढविण्यासाठी सुचविले जात असल्याचे समजते. अमरिंदरसिंग यांचे व त्यांचे संबंधही उत्तम आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील आणि त्यामुळे त्यांना निवडणूक अजिबातच जड जाणार नाही असे मानले जाते.
त्यात काँग्रेसचा आणखीही एक स्वार्थ आहे. खरोखरच भाजपला सरकार स्थापनेची संधी मिळू शकली नाही, तर त्या परिस्थितीत विरोधी पक्षांचे कडबोळे एकत्र करून तयार होणाऱ्या सरकारचे नेतृत्व मनमोहनसिंग यांनाच पुन्हा करायला सांगायचे व त्यांना कुणाचा विरोध राहणार नाही अशी काँग्रेसची समजूत आहे. म्हणजे पंतप्रधानपद व सरकारवर आपला वरचष्मा राखण्याचे काँग्रेसचे मनसुबे आहेत.
डॉक्‍टरसाहेबही सध्या विविध विषयांवर सतत मतप्रदर्शन करताना आढळतात. त्यांनी मौन सोडल्याचे दिसून येते. त्याचबरोबर अलीकडच्या काळात अनेक राजकीय मंडळींनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनातही त्यांची हजेरी, त्यांची व्याख्याने ही ठळकपणे डोळ्यात भरत असतातच पण, त्यांची दखलही सर्व वर्तुळांमध्ये घेतली जात आहे.
जय हो!!! डॉक्‍टरसाब आगे बढो!!!!


निवडणुकीची चाहूल लागतेय!!
निवडणुकीची चाहूल लागली आहे.
भारतात सर्वप्रथम नोकरशाही आणि बाबू मंडळी त्या चाहुलीने सावध झालेले नेहमीच आढळतात.
आता वर्तमान लोकसभा हळूहळू मावळती होऊ लागल्याने आणि सरकारही आता अखेरच्या टप्प्यात असल्याने बाबू मंडळींनी आपली नेहमीची उदासीनता दाखवायला सुरुवात केली आहे.
जी खासदार मंडळी किंवा अगदी मंत्री महोदयदेखील कामे सांगतात ती सरळ सरळ न करण्याचा बेफिकीरपणा आता बाबू दाखवू लागले आहेत. बाबूमंडळीच नव्हे तर सरकारी उद्योगातली मंडळीदेखील आता चक्क सरकारी आदेश धाब्यावर बसवू लागली आहेत.
एका खासदाराने एका सरकारी उद्योगातील त्याच्या सग्यासोयऱ्याच्या बदलीबाबतचे काम संबंधित मंत्र्याला सांगितले होते.
मंत्र्याने त्या उद्योगाच्या प्रमुखांना लक्ष घालण्यास सांगितले. परंतु, त्याने चक्क उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे त्या खासदाराने सांगितले.
त्या खासदाराचे ते बदलीचे काम होऊ शकले नाही.
निवडणूक जवळ आली, की त्यापूर्वी आपली बदल्या, बढत्या, नेमणुकांची कामे लवकरात लवकर करून घेण्याची लगबग मंत्री व खासदार करीत असतात.
पण बाबूलोक आणि नोकरशहा हे सर्व ओळखून असतात.
ते खासदारच नव्हे तर मंत्र्यांनाही जुमानेनासे होतात. एखादा मंत्री त्रासदायक असेल, तर त्याच्या कारकिर्दीचे पूर्ण उट्टे या शेवटच्या दोन-तीन महिन्यात काढले जाते.
सध्या सरकारी कचेऱ्यांमध्ये मजा मारण्याचा काळ आला आहे. सुट्या घेतल्या जात आहेत. हो, निवडणुकीपूर्वी हे सर्व करायला लागेल कारण निवडणूक काळात मात्र या बाबू मंडळींना ड्यूटीवर असणे अत्यावश्‍यक राहील!
जय हो!!
भारत महान!!!!


लोकसभा अध्यक्षांचा ‘लंच ब्रेक’!
लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन या उत्तम यजमान आहेत!
पूर्वी त्या मंत्री-खासदार असताना दरवर्षी दिल्लीतला हिवाळा संपतासंपता पत्रकारांना दुपारचे भोजन देत असत. भोजनानंतर गप्पा मारत असत आणि एखादे चांगले पुस्तक पत्रकारांना मुद्दाम भेट देत असत.
लोकसभा अध्यक्ष झाल्यानंतर यात खंड पडला.
पण आता वर्तमान लोकसभेचे शेवटचे अधिवेशन पार पडतापडता त्यांनी पत्रकारांसाठी दुपारचे भोजन आयोजित केले होते. अधिवेशनाच्या शेवटच्याच दिवशी!
आधी वाटले होते, की कामकाज नेहमीप्रमाण बारा किंवा फार तर एक वाजता संपेल!
प्रत्यक्षात सरकारने एका मागून एक विधेयके संमत करण्याचा सपाटा लावला होता.
सुमित्राताईंची त्यामुळे काहीशी गडबड उडाली. दुपारी एक वाजता पत्रकारांना भोजनाला बोलावून ठेवलेले आणि कामकाज आटोपण्याची चिन्हे नाहीत! अखेर उपाध्यक्षांकडे कामकाज सोपवून त्या घरी रवाना झाल्या.
खास मध्य प्रदेशातल्या माळवा विभागाच्या ‘दाल बाफले’ यांचा बेत होता.
याखेरीज खास ‘मालवी’ पद्धतीने केलेल्या भाज्या, लाडू, ताक, नारळाचे पाणी, दहीवडे, फळे आणि निघताना मुखशुद्धीसाठी उत्कृष्ट पान!
पत्रकार तृप्त झाले.
सुमित्राताईंनी काही काळ पत्रकारांबरोबर व्यतीत करून मग त्या पुन्हा संसदेकडे रवाना झाल्या.
दरवर्षी नव्हे पण लोकसभा अध्यक्ष झाल्यानंतर कारकिर्दीची सांगता सुमित्राताईंनी त्यांचा खास माळवी स्टाईल भोजनाने करून आपली प्रथा कायम राखली!!!!
पण यावेळी त्यांनी पुस्तक मात्र दिले नाही!!!!!!!


शांत शांत आणि निवांत! निर्मनुष्य....निःशब्द!!
या  राजधानीत अत्यंत एकाकी, निर्मनुष्य आणि नीरव अशी कोणती जागा असेल बरं???
करा, करा, विचार करा! डोकं खाजवा!!
सापडलं???
नाही ना? हरलात ना??
या प्रश्‍नाचं उत्तर वरुण गांधी देतील!
वरुण गांधी?? होय हो, तेच ते संजय आणि मनेका गांधी यांचे पुत्र, राहुल व प्रियंकाचे चुलतभाऊ आणि भाजपचे खासदार! पण आता ते असंतुष्ट खासदार मानले जातात! इतके, की आता प्रियंका यांच्या प्रवेशानंतर वरुणही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार इथपर्यंत चर्चा पोहोचली आहे. वरुण हे प्रियंकांचे लाडके लहान भाऊ आहेत.
असो हे विषयांतर झालं!
तर वरुण गांधी नुकतेच संसदेच्या ग्रंथालयात गेले.
संसदेचे ग्रंथालय प्रचंड मोठे आहे. तेथे असंख्य पुस्तके 
आहेत. संदर्भग्रंथ आहेत. एकप्रकारे माहिती व ज्ञानाचा तो 
एक अफाट खजिनाच आहे. अनेक अभ्यासक, संशोधक अध्ययनासाठी या ग्रंथालयाचा विशेष परवानगी घेऊन उपयोग करीत असतात.
परंतु, अलीकडच्या संगणक युगात पुस्तके व ग्रंथ आणि पर्यायाने ग्रंथालयांचे अस्तित्व व महत्त्व झपाट्याने कमी होताना आढळू लागले आहे. एका क्‍लिकने लोकांना माहितीचा खजिना इंटरनेटवर उपलब्ध होत असतो.
पण, तरीही वरुण गांधी यांनी जेव्हा या ग्रंथालयाला भेट दिली तेव्हा तेथील ग्रंथपालांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले.
वरुण आत गेले. तेथे संसदसदस्यांना अध्ययनासाठी विशेष व्यवस्था केलेली आहे. पण अलीकडच्या काळात कुणीही संसदसदस्याने त्या सुविधेचा लाभ घेतला नसल्याची माहिती मिळाल्याने वरुण चकित झाले.
पूर्वी मधु लिमये, ज्योतिर्मय बसू, विठ्ठलराव गाडगीळ यांच्यासारखे सदस्य या ग्रंथालयाचा भरपूर उपयोग करीत असत.
आता मात्र ते ओस पडले आहे.
त्यामुळेच येथून निघताना वरुण गांधी यांनी म्हटले, सर्वात निर्मनुष्य, निवांत, नीरव स्थळ कोणते असेल तर ते हे आहे..... संसदेचे ग्रंथालय!!!!!
संसदेच्या नव्या सदस्यांच्या बौद्धिकतेबद्दल अलीकडच्या काळात टीकाटिप्पण्या होत असतात. त्यातील एक प्रमुख आक्षेप संसदसदस्य पुरेसे अध्ययन करीत नसल्याचा असतो. दुर्दैवाने लोकप्रतिनिधींनी अध्ययनाचा त्याग केलेला आहे आणि केवळ गोंधळास प्राधान्य देऊन संसदेचा स्तर खालावला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही!!! 

संबंधित बातम्या