कट्टा

कलंदर
सोमवार, 1 एप्रिल 2019

पाकिस्तानशी ट्विटर संवाद? दुटप्पीपणा??
दिल्लीच्या पाकिस्तानी दूतावासात २२ मार्च रोजी त्यांचा ‘नॅशनल डे’ किंवा ‘राष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यात आला होता.
सालाबादप्रमाणे सरकारी प्रतिनिधींसह पत्रकार, माजी राजनैतिक अधिकारी, राजधानीतील लब्ध प्रतिष्ठित मंडळी यांना यानिमित्त होणाऱ्या स्वागतसमारंभास आमंत्रित करण्यात आले होते.
परंतु, यावर्षी या समारंभावर पुलवामा-बालाकोट घटनांची छाया पडणे अपरिहार्य होते.

पाकिस्तानशी ट्विटर संवाद? दुटप्पीपणा??
दिल्लीच्या पाकिस्तानी दूतावासात २२ मार्च रोजी त्यांचा ‘नॅशनल डे’ किंवा ‘राष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यात आला होता.
सालाबादप्रमाणे सरकारी प्रतिनिधींसह पत्रकार, माजी राजनैतिक अधिकारी, राजधानीतील लब्ध प्रतिष्ठित मंडळी यांना यानिमित्त होणाऱ्या स्वागतसमारंभास आमंत्रित करण्यात आले होते.
परंतु, यावर्षी या समारंभावर पुलवामा-बालाकोट घटनांची छाया पडणे अपरिहार्य होते.
भारत सरकारने यावर्षी या समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. अन्यथा दरवर्षी एक केंद्रीय मंत्री भारत सरकारच्या प्रतिनिधीच्या रूपात या समारंभासाठी दूतावासात हजर रहात असतो. यावर्षी मात्र अधिकृत बहिष्कार होता. भारतात लोकशाही आहे आणि सरकारने आपल्या अधिकारात बहिष्कार टाकलेला असला, तरी त्याचा अर्थ इतरांनीही सरकारची री ओढावी असा नसतो.
पण सरकारने या समारंभात प्रतिष्ठितांनी हजर राहू नये यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि एकप्रकारे स्वतःचे हसे करून घेतले. याला ‘मुत्सद्देगिरी’ म्हणत नाहीत रडकेपणा म्हणतात.
भारत सरकारने दूतावासाच्या प्रवेशद्वारासमोर पोलिस व निमलष्करी दलाचा मोठा बंदोबस्त ठेवलेला होता. यामध्ये पुरुष व महिला पोलिसांचा समावेश होता.
समारंभासाठी येणाऱ्या प्रत्येकाची कसोशीने छाननी केली जात होती. नावगाव, ओळखपत्र या सर्वांची पोलिसांकडून कडक तपासणी केली जात होती. अनेक पत्रकारांना समारंभापासून परावृत्त करण्यासाठी सरकारने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असल्याची माहिती आहे ना असे सूचकपणे सांगण्यात आले.
याचवेळी माजी परराष्ट्र सचिव मुचकुंद दुबे हेही कार्यक्रमासाठी आले.
त्यांनाही अडविण्यात आले. त्यांनाही एका अधिकाऱ्याने सरकारतर्फे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यावर वयोवृद्ध दुबे प्रचंड भडकले. ‘तुम्ही मला डिप्लोमसी शिकवता का?’ असा संतप्त प्रश्‍न त्यांनी त्या पोलिस अधिकाऱ्याला केला. ‘मी या देशाचा माजी परराष्ट्र सचिव आहे हे तुम्हाला माहिती आहे काय’ अशी विचारणा करून त्यांनी चिडून ‘तुम्हाला काय कारवाई करायची ती करा’ असे सांगून दूतावासात प्रवेश केला. कार्यक्रम संपवून बाहेर पडणाऱ्या काही पत्रकारांना सरकारची तळी उचलून धरणाऱ्या काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी घेरून ‘बहिष्कार असताना पत्रकारांनी या कार्यक्रमाला जाणे सयुक्तिक आहे काय’ असे विचारायला सुरुवात करताच एक वरिष्ठ पत्रकार भडकले. त्यांनी त्या वृत्तवाहिनीच्या वार्ताहरालाच झापून काढले. ‘जेथे बातमी असते तेथे पत्रकाराने सर्वप्रथम जायचे असते. तुम्ही आत कार्यक्रमात न येता बाहेर सरकारची चमचेगिरी करून आम्हाला प्रश्‍न करीत आहात? तुम्ही पत्रकार नसून सरकारी भाट आहात’असे सुनावले. एवढे होईपर्यंत भारत सरकारचे प्रमुख आणि पंतप्रधानांनी पाकिस्तानी पंतप्रधानांना ट्‌वीट करून राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा दिल्याचे वृत्त थडकले. मग तर सरकारी चापलुसी करणाऱ्या या वृत्तवाहिन्यांची चांगलीच अडचण झाली.
आता असे कानावर येते, की सरकारमधल्याच कुणा मंत्र्याने सरकारची म्हणजेच ब्रह्मांडनायकांना अडचणीत आणण्यासाठी पोलिसांना हे प्रकार करण्याच्या सूचना दिल्या असाव्यात. यामुळे महानायकांचीही अडचण व्हावी असाही उद्देश असावा असे मानले जाते.
खरे खोटे ते मंत्रीच जाणोत. 
पण स्वतः पाकिस्तानला ट्‌वीट करायचे, शुभेच्छा द्यायच्या आणि इतरांना मात्र अडवाअडवी करायची आणि पाकिस्तानची कुणी बाजू घेतली, तर देशद्रोही म्हणून शिक्का मारायचा! 
हा दुटप्पीपणा आणखी किती काळ???? 


घराचं काय ??
लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, शांताकुमार, कलराज मिश्र यांच्यासारख्या वयोवृद्धांना लोकसभा निवडणुकीतून बाहेर करण्यात आले.
शांताकुमार आणि कलराज मिश्र हे आपापल्या गृहराज्यात निघूनही गेले. परंतु अडवानी व जोशी यांचे काय?
आता राजकीय वर्तुळात या नेत्यांना तिकीट नाकारल्याने ते पुढे राहाणार कुठे अशा प्रश्‍नांची चर्चा सुरू झालेली आहे.
अडवानी हे उपपंतप्रधान होते आणि अनेक वर्षे संसदसदस्य असल्याने त्या नात्यानेही त्यांना सरकारी बंगला मिळू शकतो. ३० पृथ्वीराज मार्गावर ते राहतात. त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना सुरक्षित अशा निवासाची आवश्‍यकता भासणार आहे.
आता नव्याने सुरू झालेल्या चर्चेनुसार अडवानी यांना कदाचित अमित शहांच्या जागेवर राज्यसभेत आणले जाऊ शकते.
अमित शहा सध्या राज्यसभा सदस्य आहेत आणि त्यांना राज्यसभेत प्रवेश करून सव्वा वर्ष झाले आहे. त्यामुळे ते लोकसभेत प्रविष्ट झाल्यानंतर त्यांच्या जागी अडवानी यांची निवड होऊ शकते. 
जोशींचे काय?
जोशी हे त्यांच्या फटकळ स्वभावाबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचे काहीसे कठीणच दिसते. उत्तर प्रदेशात भाजपला निर्विवाद बहुमत आहे आणि त्यांना तेथून राज्यसभेवर येण्यात कोणतीही अडचणही नसेल. परंतु पक्षाचे नवे नेतृत्व या दोन्ही नेत्यांबद्दल तेवढे दयाळू राहील काय, हा खरा प्रश्‍न आहे.   


मल्लाह नाराज का?
‘मल्लाह’ हा शब्द कानावरून गेल्यासारखा वाटतोय ना?
बरोबर! फूलनदेवी याच समाजाची! उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल आणि काही प्रमाणात ओडिशा व ईशान्य भारतातही हा समाज पसरलेला आहे. परंपरेने नावाडी व मच्छीमारी करणारा हा समाज आहे. आता ते शेतीही करू लागले आहेत. निषाद खेवट या नावानेही त्यांना ओळखले जाते. मूलतः ‘ओबीसी’ म्हणून त्यांना दर्जा आहे. परंतु, मागासलेपणाच्या आधारे आपल्याला अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट केले जावे, अशी त्यांची जुनी मागणी आहे व त्यासाठी ते वेळोवेळी आंदोलनेही करीत असतात. निवडणुकांच्या वेळीही मागणी विशेष जोर धरते.
मध्यंतरी वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी या उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर असताना त्यांना या समाजाचे एक शिष्टमंडळ भेटले व आपली काही गाऱ्हाणी त्यांनी त्यांच्या कानावर घातली. त्यावेळी एका स्थानिक कार्यकर्त्याने काही उलटेसुलटे प्रश्‍न विचारल्याने बैठक तणावात संपली होती व त्यातून फारशी फलनिष्पत्तीही होऊ शकली नाही.
यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा याच भागात दौरा झाला. त्यांनाही मल्लाह समाजाचे शिष्टमंडळ भेटले. प्रियंका गांधी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, परंतु सध्या काँग्रेस पक्ष केंद्रात किंवा राज्यातही सत्तेत नसल्याने आपण तूर्तास काही करू शकत नसल्याचे त्यांनी या शिष्टमंडळास सांगितले. मात्र काँग्रेस पक्ष व आपण स्वतः या समाजाबरोबर राहू, आंदोलन केलेत, तर त्यातही बरोबर राहू, असे आश्‍वासन त्यांनी दिले. बोलताना त्यांनी वर उल्लेखित फटकळ कार्यकर्त्याच्या पाठीवर थोपटले. त्याचे फोटो व टीव्हीवरील दृष्येही प्रसारित झाली. त्याच रात्री त्याच्या नावाची होळी करण्यात आली आणि अन्य दोन नावांची नासधूस करण्यात आली. याला योगायोग म्हणावे की काय? यामुळे हा समाज नाराज व संतप्त आहे. काहीसा भयभीतपण आहे. कारण जर विरोधी पक्षांशी हातमिळवणी करण्याचा संशय आल्यानंतर ही शिक्षा मिळत असेल, तर परिस्थिती अवघड आहे!
मात्र, निवडणूक जवळ आल्याने या समाजाने काही भूमिका घेण्याचा निर्णय केला आहे आणि त्याचा फटका सत्तापक्षाला बसल्याखेरीज राहणार नाही असे सांगण्यात येते! 


बदलती हवा, बदलत्या निष्ठा??
सध्या कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांना ग्रहमान फारच अनुकूल दिसू लागले आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना पटनासाहिब मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. दुसरीकडे पक्ष व सरकारचे मुख्य प्रवक्ते म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आली आहे.
याआधी ही जबाबदारी अरुण जेटली यांच्याकडे प्रामुख्याने होती. परंतु प्रकृतीच्या कारणामुळे जेटली यांच्यावरील जबाबदारी जवळपास कमी करण्यात आली आहे. आता ते घरी बसल्याबसल्या फक्त पक्ष, सरकार व पंतप्रधानांची तरफदारी करणारे ब्लॉग लिहून सेवा बजावत असतात. आर्थिक मुद्दा असेल, तर ते पत्रकारांना सामोरे जातात. परंतु, आता प्रसिद्धीचा प्रकाशझोत आपल्यावरून बाजूला हटत चालला आहे, हे त्यांना कळून चुकले आहे. तरीही टिकून राहण्याची धडपड सुरू आहे.
गेली अनेक वर्षे जेटलींच्या छायेत झाकोळून गेलेल्या रविशंकर यांना आता प्रकाशझोत लाभल्याचा आनंद, उल्हास प्राप्त झाला आहे. ते विलक्षण खुशीत आहेत.
ब्रह्मांडनायक ऊर्फ विष्णू अवतारी युगपुरुष व त्यांचे डावे-उजवे हात असलेले पक्षाध्यक्ष यांनी पक्ष व सरकारची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांना नको असलेल्या मंडळींना अत्यंत सुनियोजित पद्धतीने दूर केलेले आढळते. लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, शांताकुमार यांना वयामुळे बाजूला सारले. जेटली, व्यंकय्या नायडू, सुषमा स्वराज, (कै.) अनंतकुमार, सुरेंद्रसिंग अहलुवालिया हे अडवानी यांच्या जवळचे मानले जात. परंतु युगपुरुषांच्या उदयानंतर या मंडळींनी रंग व निष्ठा बदलल्या.
या मंडळींनी रंग बदलले पण युगपुरुषाच्या मनातील त्यांची प्रतिमा बदलली नव्हती.व्यंकय्यांना राष्ट्रपती व्हायची इच्छा होती, त्यांना उपराष्ट्रपती करून चूप करण्यात आले. आता नुसता कोंडमारा!
सुषमा स्वराज यांना परराष्ट्रमंत्रिपदी नावापुरते ठेवले. त्यांनी स्वतःहूनच लोकसभेतून माघार घेतली!
जेटली यांना सुरुवातीला भाव दिला पण त्यानंतर त्यांचाही कोंडमारा! अधिकारहीन अर्थमंत्री! आता प्रकृतीनेही दगा दिल्यानंतर आपोआपच महत्त्व कमी होत चालले आहे.  
सुरेंद्रसिंग यांना तिकीट नाकारून जागा दाखविण्यात आली. नावापुढे चौकीदार लावणार नाही आणि बालाकोट हल्ला माणसे मारण्यासाठी नव्हता तर पाकिस्तानला ‘मेसेज’ देण्यासाठी होता अशी विधाने त्यांनी केली होती व युगपुरुषांची नाराजी ओढवून घेतली होती.
शहनवाझ हुसेन प्रवक्ते आहेत. त्यांनाही तिकीट नाकारण्यात आले. त्यांनीही नावापुढे चौकीदार लावण्याचे नाकारले होते.
युगपुरुष हिशोब चुकता करायला विसरत नाहीत!
अडवानी यांचे आणखी एक निष्ठावंत रमेश बैस(छत्तीसगड)! आठवेळा रायपूरहून निवडून येणाऱ्या बैस यांचे तिकीट कापण्यात आले. कारण काय, तर विधानसभा निवडणुकीतला भाजपचा पराभव! अजब तर्कशास्त्र! आता रविशंकर यांचा तारा चमकू लागला आहे. त्यांना प्रवक्ते म्हणून प्राधान्य दिले जाते. कधीकधी तर रविशंकर यांना त्यांचे मंत्रालय, कॅबिनेट आणि पक्ष अशा तीनतीन ठिकाणी पत्रकारांबरोबर संवाद साधावा लागतो. ते थकून जातात पण त्या थकण्याचाही त्यांना आनंद व समाधान व सौख्य मिळते!
यशासारखी दुसरी नशा नाही!      

संबंधित बातम्या