कट्टा

कलंदर
सोमवार, 15 एप्रिल 2019

कट्टा

राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...  

 

हेचि फळ काय मम तपाला??
अखेर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना स्वतःहूनच निवृत्ती जाहीर करावी लागली.
किंबहुना आपल्याला आणखी एकदा उमेदवारी मिळेल या अपेक्षा व प्रतीक्षेत त्या होत्या ही बाब नाकारून चालणार नाही.
त्याचबरोबर त्यांना उमेदवारी द्यायची नाही, हे पक्के केलेल्या भाजप सूत्रधार द्वयांनी त्याबाबत मौन पाळून अखेर सुमित्राताईंनाच बोलते करविले!
त्यांनी स्वतःहूनच माघार घेऊन सूत्रधारांना मुक्त केले.
हे करताना सुमित्राताईंच्या मनात किती किती विचार आले असतील? ‘हेचि फळ मम काय तपाला?’
भाजप आणि सरकारसाठी त्यांनी काय काय नाही केले?
आधार कार्ड विषयक विधेयकाबाबत सरकार विशेष आग्रही होते. राज्यसभेत सरकारला बहुमत नसल्याने ते संमत करण्यात अडचण होती. कायदेपंडित नेते व अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हे विधेयक वित्तविधेयक असल्याचे सांगितले. लोकसभा अध्यक्षांनी (सुमित्रा महाजन) ते वित्तविधेयक असल्याचा निर्णयही दिला. वित्तविधेयकाबाबत राज्यसभेला अधिकार नसतात आणि राज्यसभेच्या मंजुरीचीही आवश्‍यकता नसते. तसेच एकदा लोकसभा अध्यक्षांनी संबंधित विधेयक हे वित्तविधेयक असल्याचा निर्णय दिल्यानंतर त्याला कुणालाच आव्हान देता येत नाही. त्यामुळे या निर्णयामुळे सरकारचा फार मोठा फायदा झाला. आधार विषयक विधेयक सरकारला संमत करता आले. 
हा त्यांचा निर्णय वादग्रस्त ठरला.
काही मंडळी न्यायालयात गेली.
पाच वर्षांच्या काळातले असे अनेक प्रसंग सांगता येतील. ज्यामध्ये सरकार उपकृत झाले.
या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आणि सर्वसाधारणपणे लोकसभा अध्यक्षांना उमेदवारी देण्याबाबतचे जे लोकशाही संकेत व शिष्टाचार पाळले जातात ते लक्षात घेता सुमित्राताईंची उमेदवारी पहिल्या यादीतच जाहीर व्हायला हवी होती.
ते तर झाले नाहीच आणि उलट त्यात दिरंगाई होऊ लागली.
परंतु, दिरंगाईबाबत ताईंना कुणी विश्‍वासातच घेईना आणि त्यामुळे गूढ वाढले.
अखेर या दिरंगाईचा अर्थ लक्षात घेऊन ताईंनी काय ओळखायचे ते ओळखले. त्यांनी सूत्रधारांना काय अपेक्षित आहे ते ओळखले आणि स्वतःहूनच इंदोरच्या निवडणूक रिंगणातून माघारीचा निर्णय जाहीर केला. 
सूत्रधारांच्या मनाचा चोरटेपणा उघड झाला. निर्णय स्वच्छ व निष्कपटपणाने केलेला असेल, तर तो सांगण्याचे नैतिक धाडस आपोआपच येते. ते येत नसेल, तर त्याचा अर्थ निर्णयात खोटी आहे!
त्यामुळेच ताईंच्या मनात ‘हेचि फळ मम काय तपाला’ या ओळी आल्या, तर त्यात आश्‍चर्यकारक काहीच नाही!


चढता सूरज धीरे धीरे...
सध्या रविशंकर प्रसाद यांचा ‘चढता सूरज’ दिसतोय!
रविशंकर प्रसाद कायदामंत्री आहेत. ते राज्यसभेत आहेत पण आता लोकसभेसाठी उभे आहेत.
पटणासाहेब (बिहार-पाटणा) येथून त्यांना उमेदवारी मिळाली आहे आणि त्यांचा सामना भाजपमधून बंडखोरी करून बाहेर गेलेल्या ‘खामोष’.... ‘बिहारी बाबू’ ऊर्फ शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी आहे. 
भाजपचा हा ‘शत्रु’ आता काँग्रेसचा उमेदवार आहे!
त्यामुळे रविशंकर यांची ही लढत देशातली एक लक्षवेधी लढत राहील हे निःसंशय! पटणासाहेब हा भाजपचा अत्यंत सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. भाजपचा बालेकिल्ला, गढ मानला जात असल्याने रविशंकर तसे निर्धास्त आहेत. खरं तर राज्यसभेत असताना त्यांना लोकसभेची निवडणूक लढविण्याची गरज काय होती?
पण, तुम्हाला आठवत असेल अरुण जेटली हेही राज्यसभेत होते पण त्यांनी अमृतसरहून लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि मोदी लाटेतदेखील ते पराभूत झाले होते. त्यांच्या कारकिर्दीवरील तो एक बट्टाच मानावा लागेल. आता रविशंकर नशीब आजमावत आहेत.
रविशंकर यांच्या या निवडणूक लढण्यालाही काही अंतःस्थ पैलू आहेत. ही भाजपची सुरक्षित जागा मानली जाते. रविशंकर निवडून आल्यास त्यांचा टक्का नुसता वाढणार नाही, तर पक्षात आणि संभाव्य सरकारमध्ये त्यांना निश्‍चितपणे मोठे स्थान मिळणे अपेक्षित आहे.
त्याहीपेक्षा ते ज्यांना मनोमन प्रतिस्पर्धी मानतात त्या जेटली यांच्यावर मात करण्याचे मानसिक समाधानही त्यांना लाभणार आहे. अर्थात हे फक्त मनातल्या मनातच हं! याचा उच्चार ते कधीच करणार नाहीत. परंतु, काही खास पत्रकार मित्रांबरोबरच्या मैफलीत या गोष्टीला हळूचकन वाचा फुटत राहते.
अशाच एका मैफलीत त्यांना पत्रकारांनी संभाव्य सरकारमध्ये तुम्ही कोणते मंत्रिपद पसंत कराल? अर्थ मंत्रिपद की परराष्ट्र मंत्रिपद? जेटली व सुषमा स्वराज हे दोघे सध्या ही पदे भूषवीत आहेत. आणि एकंदर कानोसा घेता मोदींच्या संभाव्य मंत्रिमंडळात हे दोघेही नसतील असा अंदाज वर्तविला जात आहे. एवढेच नव्हे, तर भाजपला स्वबळाचे बहुमत खरोखरच मिळाले, तर राजनाथसिंह यांचे गृहमंत्रिपददेखील इतिहासजमा होईल आणि त्यांच्या जागी अमित शहांची नेमणूक होऊ शकते असे मानले जाते. अजून कशाच्या कशाला पत्ता नाही. पण चर्चा मात्र गरमागरम खमंग आहेत!!


अपप्रचारक...सवयीचे गुलाम!
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी वाराणसीमध्ये काशीविश्‍वनाथच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. हिंदुत्ववाद्यांना ते सहन झाले नाही. परिवारातल्या मंडळींनी मंदिरातच वादावादी सुरू केली. हिंदुत्व समर्थकांनी प्रियंका या ख्रिश्‍चन आहेत आणि हिंदू नाहीत, त्या मांसाहारी आहेत, अगदी गोमांस खात असल्यापर्यंतचा आरोप करण्यापर्यंत धर्मरक्षकांची मजल गेली आणि त्यांना मंदिरात प्रवेश देऊ नये यासाठी त्यांचा आटापिटा सुरू झाला. या धर्ममार्तंडांना मंदिरात येणाऱ्या सामान्य लोकांनीच जेव्हा जाब विचारायला सुरुवात केली, तेव्हा त्यांची पळताभुई थोडी झाली. आणखी काही अनास्था प्रसंग येण्यापूर्वीच त्यांनी तेथून काढता पाय घेतला.
या धर्ममार्तंडांना उपस्थित लोकांनी पहिला प्रश्‍न केला, की या मंदिरात हिंदू वगळता इतर धर्मीयांना प्रवेशबंदी आहे काय? मुळात प्रियंका गांधी या ख्रिश्‍चन नाहीत आणि समजा असल्या, तरी या मंदिरात इतर धर्मीयांना प्रवेश करण्यास बंदी आहे काय? असे विचारल्यावर धर्मरक्षक गप्प बसले. त्यांचा बचावाचा पवित्रा पाहून मग सामान्य मंडळींनी आणखी काही गोष्टी त्यांना सुनावण्यास सुरुवात केली, की या मंदिरात दर्शनास येणारी प्रत्येक व्यक्ती शाकाहारी आहे याची ‘गॅरंटी’ देणार का? त्यावर आणखी एकाने सांगितले, की या मंदिरात असंख्य राजकीय नेते येत असतात आणि त्यांच्यापैकी किती मांसाहारी आहेत हे आपण नावानिशी सांगू शकतो! जमावाची आक्रमकता लक्षात घेऊन धर्मरक्षकांनी काढता पाय घेतला. परंतु, परिवारातील काही कार्यकर्त्यांच्या लहान लहान गटांना विशिष्टरीत्या पढवून लोकांमध्ये सोडण्याचा एक नवा प्रकार सुरू झाला आहे. हे लहान लहान गट रेल्वे, बस यातून प्रवास करताना मुद्दाम वर्तमान सरकार, त्या सरकारचे महानायक त्यांचे कौतुक व प्रशंसा करणे, सरकारने पाकिस्तानला कसा धडा शिकवला आहे याचे गुणगान करणे, गांधी कुटुंब, घराणेशाही याविरुद्ध बोलणे अशा चर्चा छेडल्या जाऊन प्रचाराचा एक नवा प्रकार सुरू करण्यात आला आहे. कुणी एखादा विरोधी बोलणारा आढळला, तर त्याची कोंडी करण्याचे प्रकारही केले जातात. हा ‘नवा भारत’ असावा. तिकडे पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘नया पाकिस्तान’ची घोषणा देऊन निवडणूक जिंकली होती, त्याचीच आठवण येऊ लागली आहे!! 


लखनौमध्ये कोण?
काँग्रेसला लखनौमध्ये उमेदवार मिळेनासा झाला आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने रिटा बहुगुणा जोशी यांना भाजपचे ‘हेवीवेट’ उमेदवार राजनाथसिंह यांच्या विरुद्ध मैदानात उतरवले होते. त्या हरल्या होत्या, पण त्यांनी चांगली लढत दिली होती असे मानले जाते. विशेष म्हणजे बहुजन समाज पक्ष तिसऱ्या, तर समाजवादी पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते.
त्यामुळेच मोदी लाटेतही काँग्रेसला २८ टक्के मते पडत असतील, तर यावेळी काँग्रेसने जोर लावल्यास वेगळे चित्र निर्माण होऊ शकते. त्यामुळेच काँग्रेसने नव्या दमाच्या व ताज्या चेहऱ्यांचा शोध सुरू केला. राजनाथसिंह हे तालेवार उमेदवार आहेत. फारसे अधिकार नसले, तरी सध्या गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात तेवढाच तोलामोलाचा उमेदवार देण्याचा काँग्रेसचा विचार होता. सर्वप्रथम वकील कपिल सिब्बल यांचे नाव पुढे आले. पण त्यांना दिल्लीतून चांदणी चौकातून लढण्याचे वेध असल्याने त्यांनी नकार दिला. त्यानंतर काँग्रेसचे पूर्व व दिवंगत नेते जितेंद्रप्रसाद यांचे पुत्र जितिन प्रसाद यांच्या नावाचा विचार सुरू झाला. पण ते काही हे आव्हान स्वीकारायला तयार होईनात. उलट नाराज होऊन ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या त्यावेळी पसरविण्यात आल्या आणि त्यांचेही नाव मागे पडले. अखेर राज्यसभा सदस्य व उत्तर प्रदेशातील एक तालेवार ब्राह्मण नेते प्रमोद तिवारी यांच्या नावाचा विचार सुरू झाला, पण त्यांनीही नकार दिल्याचे समजते. लखनौमध्ये ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या २०१४ च्या उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांना चांगली मते पडली होती. तसेच सध्या उत्तर प्रदेशात ब्राह्मण समाज भाजपवर नाराज आहे व त्याचा लाभ मिळविण्याच्या दृष्टीने काँग्रेसचा उमेदवाराचा शोध सुरू आहे, पण अजून यश मिळताना दिसत नाही. पाहूया वाट!


तडीपार उमेदवार
एखाद्या उमेदवाराला प्रचारासाठी त्याच्या मतदारसंघात प्रवेश करायलाच बंदी केली तर? म्हणजेच त्याला ऐन निवडणूक प्रचारापूर्वीच त्याच्या मतदारसंघातून तडीपार केले तर?? विचित्र वाटतंय ना? पण हे घडलंय खरं! पश्‍चिम बंगालमध्ये बिष्णुपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत सौमित्र का (काही लोकं चुकून खान असा उच्चार करतात).
हे सौमित्रसाहेब तृणमूल काँग्रेसमध्ये होते. खासदारही होते. पण त्यांनी खासदारकी सोडली आणि तृणमूल सोडून भाजपला आपलेसे केल्याने तृणमूलची मंडळी खवळलेली आहेत. सौमित्र का यांच्यावर विद्यार्थ्यांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचे आरोप आहेत. त्यांच्या कारवाया लक्षात घेऊन तृणमूलनेही त्यांना यावेळी तिकीट न देण्याचेच ठरवले होते. परंतु, त्यापूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपला पश्‍चिम बंगालमध्ये उमेदवारांची चणचण असल्याने त्यांनी ‘पदरी पडले पवित्र झाले’ नियम लावून त्यांना बिष्णुपूरचे तिकीटही देऊन टाकले.
तृणमूल काँग्रेसने त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या व न्यायालयाकडे दाद मागितली. कलकत्ता उच्च न्यायालयाने या तक्रारीवर निर्णय देताना सौमित्र का यांना त्यांच्या मतदारसंघात प्रवेशबंदी केली. या मतदारसंघात १२ मे रोजी मतदान आहे. का आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. का यांच्याप्रमाणेच तृणमूल सोडून भाजपमध्ये जाऊन घटल (पश्‍चिम मेदिनीपूर-मिदनापूर) मतदारसंघातून उभ्या राहिलेल्या माजी पोलिस अधिकारी भारती घोष यांनाही याच प्रकारचा आदेश उच्च न्यायालयाकडून मिळाला आहे. त्यांनाही त्यांच्या मतदारसंघात प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे. रद्द झालेल्या नोटांच्या बदली सोन्याच्या व्यवहारात त्यांच्याविरुद्ध १० एफआयआर दाखल आहेत. त्यांनी अटकपूर्व जामीनही मिळवले आहे. पण आता त्यांनाही त्यांच्या मतदारसंघात जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
या कथा कहाण्या अद्‌भुत आहेत!
भारत महान!     

संबंधित बातम्या