कट्टा

कलंदर
सोमवार, 22 एप्रिल 2019

कट्टा
 

निःपक्षता राखणार कोण??
आकाशवाणी आणि दूरदर्शन व त्यांच्या विविध वाहिन्या किंवा शाखा-उपशाखा यांना सरकारी प्रसारमाध्यमे म्हटले जाते.
परंतु, गेल्या काही वर्षांपासून ‘प्रसारभारती’ नावाच्या मंडळामार्फत ही माध्यमे चालवली जातात. प्रसारभारती व ही माध्यमे आता स्वायत्त मानली जातात. परंतु, योगायोगाचा भाग असा, की प्रसारभारतीचे वर्तमान अध्यक्ष हे विविध वृत्तपत्रात लेखन करून सत्तापक्ष आणि त्यांच्या सूत्रधारांची प्रशंसा करताना आढळतात. त्यामुळेच आकाशवाणी आणि दूरदर्शन ही प्रसारमाध्यमे खरोखर स्वायत्त आहेत काय, असा प्रश्‍नही पडतो. सध्या लोकसभा निवडणुकांचा काळ आहे. त्यामुळे तर या माध्यमांवर निःपक्षता पाळण्याचे मोठे आव्हान आले आहे.
त्यांच्या परीने ही माध्यमे निःपक्षता पाळण्याची धडपड करीत असतात आणि त्याचे श्रेय तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच द्यावे लागेल. कारण त्यांच्यावरही प्रसारण, प्रसारणाचा रोख, दिशा याबाबत दबाव येतच असतात. तरीही जास्तीत जास्त तटस्थ आणि निःपक्ष वार्तांकन करण्याचे आटोकाट प्रयत्न ही माध्यमे करीत असतात.
काँग्रेसने ही माध्यमे पक्षपात करीत असल्याचा आरोप केला. यानंतर या माध्यमांच्या एकंदर वार्तांकनाचा आढावा घेण्यात आल्यावर निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच्या काळात काँग्रेसपेक्षा दुप्पट वेळ सत्तापक्ष म्हणजेच भाजपला वेळ देण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती मिळते. यामुळे या दोन्ही माध्यमांमध्ये काहीशी अस्वस्थता पसरणे अपेक्षित होते. न्यायालये व निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांना सर्व राजकीय पक्षांना समान संधी देण्याची सूचना केलेलीच होती. त्यामुळेही यात सुधारणा करण्याची लगबग सुरू झाली. असे समजते, की या माध्यमांच्या अंतर्गत बैठकांमध्ये काही वरिष्ठ व अनुभवी अधिकाऱ्यांनी सत्तापक्ष आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना जी अवाजवी प्रसिद्धी दिली जात आहे त्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. काही अनुभवी अधिकाऱ्यांनी तर या माध्यमांकडून निवडणूक आचारसंहितेचा भंग करण्याचे प्रकार घडत असल्याकडे लक्ष वेधले. त्यानुसार एका नेत्याला एक दिवस स्थान दिल्यानंतर पुढील किमान दोन दिवस अन्य पक्षांच्या नेत्यांना प्रसारणात स्थान देणे अपेक्षित असते. परंतु, या आचारसंहितेचे पालन होत नसल्याकडे या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधल्यानंतर त्यात सुधारणा करण्याच्या सूचना करण्यात आल्या. आता तर प्रमुख विरोधी पक्षाचे नेते म्हणून मानल्या जाणाऱ्या राहुल गांधी यांची मुलाखत मागणारे पत्र त्यांना पाठविण्यात आल्याचेही समजते. परंतु, आकाशवाणी व दूरदर्शनचे सोडून द्या. इतर खासगी वाहिन्यादेखील पक्षपाती वार्तांकन करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी लावला आहे.
काँग्रेसनेते कपिल सिब्बल यांनी नोटबंदीच्या संदर्भात भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या विरोधातील स्टिंग ऑपरेशन व त्याच्या चित्रफिती पत्रकार परिषदेत दाखविल्या. यावेळी पत्रकारांना संबोधित करताना ते म्हणाले, ‘ही बातमी, ही माहिती तुम्ही दाखवणार नाही किंवा प्रसिद्ध करणार नाही, कारण लगेचच तुम्हाला ‘फोन’ येतील आणि या पत्रकार परिषदेचे प्रसारण करू नका असे सांगण्यात येईल व तुम्हीही भयापोटी तत्काळ तो आदेश पाळणार!’ विशेष म्हणजे खरोखरच सिब्बल यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची पत्रकार परिषद अनेक खासगी वाहिन्यांनी मध्येच बंद करून त्याबाबतची बातमी पुन्हा प्रसारित होणार नाही याची खबरदारी घेतली. विरोधी पक्षांना वृत्तवाहिन्यांवर स्थान मिळू नये, त्यांना प्रसिद्धी मिळू नये यासाठी विशेष ‘खबरदारी’ घेतली जात असल्याचे समजते. केवळ एक-पक्ष आणि एक-नेता यांनाच स्थान मिळावे यासाठी विशेष परिश्रम केले जात असल्याचे आढळून येते!
जय हो! 


स्वप्नात पाहिले जे, ते राहूदेत स्वप्नी.....
हे  मराठी नाट्यगीत आठवले का?
नाटकात होते. रामदास कामत यांनी गायलेले! सध्या निवडणुकीत कृष्णभक्तीचे असेच काहीसे दर्शन व्हायला लागले आहे! मतदारसंघातून भाजपने पुन्हा अभिनेत्री, नृत्यांगना आणि स्वप्नसुंदरी हेमामालिनी यांना उमेदवारी दिली आहे. खरं तर स्थानिक भाजप नेते व कार्यकर्त्यांचा त्यांना विरोध होता. कारण पाच वर्षांत ही सुंदरी मथुरावासीयांच्या नुसत्या स्वप्नातच आली होती. मतदारसंघात त्यांनी क्वचितच प्रत्यक्ष-दर्शन दिले किंवा त्या प्रत्यक्ष प्रकटल्या होत्या. त्यामुळे भाजप नेतृत्वाने त्यांना मथुरेऐवजी अन्य कोणत्यातरी मतदारसंघात हलविण्याचेही ठरविले होते. भाजपच्या मीडिया विभागाचे माजी प्रमुख व सध्या उत्तर प्रदेशात वीजमंत्री असलेले श्रीकांत शर्मा हे मथुरा मतदारसंघावर नजर लावून बसलेले होते. राष्ट्रीय राजकारणाची त्यांना आस असल्याने ते येथून उत्सुक होते. परंतु ......! कृष्ण त्यांना पावला नाही! परंतु, हेमामालिनी यांनी भाजप नेतृत्वाला गळ घातली, की मथुरेचे प्रतिनिधित्व करता करता त्या ‘कृष्णमय’ झाल्या आहेत. त्यामुळे मथुरा सोडून अन्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची कल्पनाही त्यांना सहन होणार नाही. आता त्या निवडून आल्या, की मथुरा-वृंदावन परिसरात राहूनच कृष्णभक्तीत लीन होऊ इच्छितात! त्यांनी म्हणे मथुरेत एक घरही घेतले आहे. त्यांच्या भक्तिमय विनवणीला भाजप नेतृत्व पाघळले आणि त्यांनी पराभवाची स्पष्ट चिन्हे दिसत असतानाही हेमामालिनी यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय केला. हेमामालिनी यांनीही आता त्यांच्या कसदार अभिनयाचा परिचय देत कधी ट्रॅक्‍टर चालव, कधी शेतात जाऊन हातात खुरपे घेऊन काम कर वगैरे वगैरे ग्रामकन्येची भूमिका अदा करण्यास सुरुवात केली आहे.
आता नाइलाजाने भाजपची नेतेमंडळीही त्यांना पुन्हा तिकीट देण्याचे समर्थन करू लागली आहेत. एका नेत्याने आव आणत म्हटले, ‘हेमामालिनी स्वतः तमीळ ब्राह्मण आहेत, त्यांची मोठी प्रतिमा आहे आणि त्यांचे पती धर्मेंद्र हे जाट आहेत. तेही लोकप्रिय आहेत. त्यामुळे हेमामालिनी यांना निवडून येणे हे सहजसोपे आहे. या मतदारसंघात जाट मते निर्णायक मानली जातात. त्यामुळेच पूर्वी धर्मेंद्र यांना प्रचाराला न बोलाविणाऱ्या हेमामालिनी यांनी यावेळी त्यांना प्रचाराला बोलावले हे आश्‍चर्यच होते. त्यापूर्वी एकदा धर्मेंद्र बिकानेरमधून उभे होते, तेव्हा त्यांनी हेमामालिनी यांना बोलावूनही त्या प्रचाराला गेल्या नव्हत्या. आता बहुधा त्यांना मथुरावासीयांची नाराजी कळली असल्याने त्यांनी सर्वप्रकारे त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न चालविला असावा! तरीही त्यांना यावेळची निवडणूक अवघड असल्याचे मानले जाते. बहुधा मथुरानिवासी मराठी नाट्यगीत गात असावेत..... स्वप्नात पाहिले ते राहूदेत स्वप्नी............................! 


राजा की रंक??
लोकसभा निवडणुकीला लोकशाहीतले महापर्व, जनमताचा महोत्सव वगैरे विशेषणे वापरली जातात. याच काळात सर्वसामान्य माणूस म्हणजे मतदाराला अतिमहत्त्व प्राप्त झालेले असते.
हा ‘राजा’ असतो असे मानले जाते. नेते मंडळी या मतदार राजाचा जेवढा अनुनय करता येईल तेवढा करीत असतात. अगदी पाय धुण्यापर्यंतदेखील मजल गेलेली असते!
पण काही नेते मात्र याला अपवाद मानावे लागतील. अलीकडेच केंद्रीय मंत्री व भाजपनेत्या मनेका गांधी यांनी त्यांच्या मतदारसंघातील मुस्लीम मतदारांना जी गर्भित धमकी दिली त्याचे प्रसारण सर्वांनीच केले होते. गांधी यांनी त्यांच्या भाषणात सरळसरळ म्हटले होते की, तुम्ही मते दिली नाहीत तर मतमोजणीत ते लक्षात येईल. मग त्यानंतर तुम्ही तुमची कामे घेऊन आलात तर मग काय करायचे त्याचा विचार करावा लागेल! आता अशी धमकी दिल्यावर मतदार बिचारे काय करणार? पण भाजपमध्ये आणखीही असे काही आहेत, की ते मतदारांना धमकीऐवजी शाप देताना आढळतात.
उत्तर प्रदेशातल्या उन्नावमधून भाजपतर्फे अतिवादग्रस्त धार्मिक नेते साक्षी महाराज उभे आहेत.
या सर्वगुणसंपन्न साक्षी महाराजांनी पक्षालाच धमकावून या मतदारसंघातून तिकीट मिळवले आहे.
साक्षी महाराज यांनी त्यांच्या अत्यंत प्रक्षोभक विधानांमुळे पक्षाला व सरकारला भरपूर अडचणीत आणलेले आहे. त्यामुळेच ही डोकेदुखी दूर करण्याच्या दृष्टीने त्यांना तिकीट नाकारायचे किंवा फारच झाले तर त्यांचा मतदारसंघ बदलून त्यांना पराभूत करण्याची तजवीज करायची, अशी योजना भाजप नेतृत्वाने आखली होती. पण साक्षी महाराज पडले घाग! त्यांनी धमकी दिली, की त्यांना उन्नावमधून उमेदवारी न देणे पक्षाला महागात जाईल! म्हणजे? ते बंडखोरी करतील व पक्षाविरुद्ध प्रचारही करतील! काय? पक्षनेतृत्वाने मुकाट्याने त्यांना उन्नावमधून उमेदवारी देऊन टाकली.
पण, उमेदवारी मिळूनही गप्प बसतील ते साक्षी महाराज कसले? त्यांना अंदाज आला, की यावेळी त्यांचे जिंकणे सहजसोपे राहिलेले नाही. त्यांनी एका सभेत मतदारांना चक्क शाप दिला, की जर तुम्ही मला मते दिली नाहीत आणि माझा पराभव झाला तर मी तुम्हाला शाप देईन आणि मग त्याची फळे तुम्हाला भोगावी लागतील! बाप रे! पुराणातल्या कहाण्यांची आठवण झाली. अमुक ऋषीने अमुक शाप दिला! पण आता आपण २१ व्या शतकात आहोत! एका ट्विटरवर साक्षी महाराजांना सुनावण्यात आले, की गरीब बिचाऱ्या मतदारांना शापाचे भय दाखविण्याऐवजी प्रतिस्पर्धी उमेदवारालाच शाप देऊन टाका म्हणजे तुमचा पराभवच होणार नाही! आता अशा धमक्‍या काय मतदार राजाला? 
राजा कसला तो?


रम आणि उपमा
आंध्र प्रदेशात लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही मतदान एकाच दिवशी पार पडले.
एका गावातला हा किस्सा आहे. गावाच्या प्रवेशाजवळच रस्त्याच्या कडेला बरेच लोक बसून उपमा खाताना दिसले. उपम्याचा खमंग वास आसमंतात दरवळलेला होता.
थोडे पुढे गेल्यावर एकजण तो वाटत असल्याचे दिसून आले. लोकांनी केवढ्याला विचारल्यावर उत्तर मिळाले एकदम फ्री! मग काय इतरही लोक त्या खमंग उपम्याचा आस्वाद घेऊ लागले. कळले ते असे, की वायएसआर काँग्रेसने ती सोय केली होती. त्याचा खर्च त्या पक्षाच्या खर्चातच मिळवला जाणार होता. परंतु, हेतू हा की तेथील मतदारांनी वायएसआर काँग्रेसला मतदान करावे. थोड्यावेळाने भरपूर गर्दी जमल्यावर उपमा वाटणाऱ्या माणसाने जाहीर केले, की चला आता मी मतदान करून येतो. तुम्हीपण चला! तो मतदानाला गेला. अपेक्षा ही की फुकटात उपमा खाणारेही आता त्याच्या मागे जाऊन त्याला पाहिजे त्या पक्षाला मतदान करतील. तो मतदान करून परत आला, तरी लोकं आपली उपमा खातच बसली होती. त्याने बारकाईने पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले, की आणखी कुणीतरी त्या लोकांना उपम्याबरोबर रमचा (मद्य) ग्लासही दिला होता.
आता रम आणि उपमा असल्यावर मतदानाला कोण जाईल? जय हो! भारत महान!  


आकड्यांचे खेळ सुरू!
लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या पहिल्या दोन फेऱ्या झाल्या.
आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचे अंदाज लावण्याचे काम सुरू झाले आहे.
अधिकृतपणे तर प्रत्येक पक्षाला तेच सत्तेत येणार असल्याचे बोलणे भागच आहे.
त्यानुसार ते बोलतही आहेत.
तुम्हाला आठवत असेलच, की भाजपने पहिल्यांदा ३५० चा आकडा दिला.
तर घोषणाच दिली, ‘इस बार ४०० पार’!
आता या घोषणा मागे पडल्या आहेत. कारण आता नेतेमंडळी गावागावात प्रत्यक्ष प्रचाराला लागली आहेत आणि आता त्यांना मतदारांच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद यांचे आकलन होऊ लागले आहे. कोण कुणाला अनुकूल आहे याचा अंदाज येऊ लागला आहे.
प्रत्येक पक्षाने आपले अंतर्गत सर्व्हे करण्याचे काम सुरूच ठेवले आहे.
भाजपने याबाबत अतिगुप्तता व मौन पाळले आहे. परंतु दोनशे जागांपर्यंत पक्ष मजल मारेल असे सांगितले जाते.
काँग्रेसच्या गोटातूनही गुप्तता पाळली जात आहेच. पण यावेळी अगदी ४४ सारखी स्थिती नसेल असे छातीठोकपणे सांगितले जात आहे. 
एका पाहणीनुसार पक्ष १५० जागांपर्यंत पोचू शकेल असे समजते.
एका परदेशी कंपनीने केलेल्या पाहणीप्रमाणे काँग्रेसला फारच चांगल्या जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे.
त्या अंदाजाचा संदर्भ देताना संबंधित काँग्रेस नेत्यालाही हसू आवरले नाही, कारण तेवढ्या जागा मिळणे शक्‍य नाही असे त्याचेही मत पडले.
त्यामुळे काहीसे ओशाळून त्याने टिप्पणी केली, की तो अंदाज जाहीर करण्याचे धैर्य किंवा हिंमत होत नाही इतका तो अनुकूल व चांगला आहे.
चला, कुणाला तरी वास्तवाची जाणीव आहे, असे म्हणायला हरकत नाही.    
 

संबंधित बातम्या