कट्टा

कलंदर
सोमवार, 29 एप्रिल 2019

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...

शाप दिला, आता महिषासुराच्या मागे?
बाँबस्फोटाशी निगडित प्रकरणात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा यांना भाजपने भोपाळहून उमेदवारी दिल्यानंतर वाद होणार हे अपेक्षितच होते.
झालेही तसेच!
पहिल्याच पत्रकार परिषदेत साध्वींनी त्यांच्या पोलिसकोठडीतील कथित छळाची कहाणी सांगितली. या खटल्यात आपल्याला कसे खोटेपणाने गोवण्यात आल्याचा दावाही केला. या कहाण्या सांगितल्यानंतर त्यांनी या प्रकाराबद्दल त्यावेळचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांना आपण शाप दिल्याचा गौप्यस्फोट केला.
त्यांच्या शापाचा प्रताप हा, की काही दिवसांनंतरच हेमंत करकरे यांचा २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. करकरे शहीद झाले. मुंबईवर हल्ला करणाऱ्यांशी लढताना त्यांनी प्राणांचे बलिदान देऊन देशासाठी सर्वोच्च त्याग केला. त्याबद्दल त्यांना अशोकचक्रही मिळाले.
पण छे! कसले ते शहीद? साध्वींचा जाज्वल्य शाप त्यांना नडला!
यावरून झालेल्या गदारोळाने भाजप व त्यांच्या सूत्रधारांच्या तोंडचे पाणी पळाले. एकीकडे सेनादले, पुलवामाचे शहीद यांच्या नावे मतांचा जोगवा मागताना साध्वींनी एका शहीदालाच शाप दिल्याचा गौप्यस्फोट करून टाकला आणि पक्षाची पंचाईत करून टाकली.
अखेर अब्रू वाचवण्यासाठी माफी मागून व विधान मागे घेऊन साध्वींची सुटका करण्यात आली.
पण साध्वी त्या साध्वीच!
त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजयसिंह यांना महिषासुराची उपमा दिली.
दिग्विजयसिंह हे पुराणातील महिषासुर आहेत आणि आपण ‘महिषासुर मर्दिनी’ म्हणून या निवडणुकीत उतरलो असून दिग्विजयसिंह रूपी महिषासुराचा नायनाट करू असे त्यांनी जाहीर करून टाकले.
व्वा! काय ती भाषा? काय तो आवेश?
भाजपचा खरा चेहरा उघड झालाच पण निवडणुकीत मतांसाठी भाजपचे सध्याचे सूत्रधार किती खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतील याची झलक साध्वींच्या रूपाने मिळाली आहे.
भारत महान!  


साठीची मजबुरी....अशी ही बनवाबनवी!
निवडणुकीत मते मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांचे रूपांतर ‘अभिनेत्यात’ होताना अनेकांनी पाहिले असेल.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाटेल त्या थरापर्यंत जाण्याची नेत्यांची तयारी असते. कर्नाटकात एका उमेदवाराने मतदारसंघाच्या दौऱ्यात कुठेतरी चालू असलेल्या लग्नसमारंभात म्हणे ‘नाग-नृत्य’ म्हणजे ‘नाग-डान्स’ केला. हल्ली म्हणे हा नाग-नागीण नाच लग्न व अन्य समारंभांमध्ये फार लोकप्रिय आहे. तर या उमेदवार महाशयांनी हा ‘नाग-नाच’ केला. बहुधा ते मतदारांपुढे सरपटलेसुद्धा असतील!
आता आपल्या देशाच्या युगपुरुषांचेच उदाहरण घ्या!
निवडणूक प्रचारामुळे त्यांच्या वाणीला उधाण आले आहे.
एकीकडे त्यांना त्यांच्या भक्तांनी ‘विष्णू-अवतार’ म्हटल्यावर संतोष होतच असणार ना? पण निवडणुकीत सामान्यांची, गोरगरिबांची मते हवी असतात. मग सूटबुटातले हे ‘साहेब’ लगेच खूप गरीब होतात.
गरीब घरातला आहे, चहावाला आहे वगैरे वगैरे! अलीकडे ते चौकीदाराच्या भूमिकेत आहेत!
गुजरातमध्ये प्रचाराला गेल्यावर ते लगेच स्वतःला ‘गुज्जू’ म्हणू लागतात. ‘इस गुज्जू ने, चायवालेने उनको (सोनिया-राहुल) जमानत के लिए मजबूर किया इसलिए वो गुस्से में है’ असे हलके वक्तव्य ते करतात. पण कधीकधी हा डाव अंगाशीही येतो. छत्तीसगढमध्ये या महोदयांनी ते ज्या तेली समाजाचे आहेत व त्यांचे ‘मोदी’ हे आडनाव छत्तीसगढमधल्या ‘साहू’ या व्यापारी समाजाशी समकक्ष असल्याचे सांगून ‘राहुल गांधी मला चोर म्हणतात म्हणजेच तुम्हा साहू समाजालाही चोर म्हणतात’ असा दुष्प्रचार सुरू केला.
पण बनावटपणा तो बनावटपणाच ना? साहू समाजाच्या नेत्यांनी एक पत्रक काढून ‘असल्या चलाख्या बंद करा, आमचा समाज एक स्वाभिमानी समाज आहे आणि अशा हलक्‍या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत’ असा इशाराच देऊन टाकला.
आणखी काही ठिकाणी हे महाशय स्वतःला मागासवर्गीय असल्याने आपली हेटाळणी केली जात असल्याचे बेमालूम खोटे सांगताना आढळतात. हल्ली तर ते सर्वत्र ‘मोदी ने ये किया’ ‘मोदी ने वो किया’ असेच सांगत हिंडत असतात.
राजस्थानात जाऊन त्यांनी फारच भन्नाट विधान केले. ‘अणुबाँब किंवा अण्वस्त्रे ही काय दिवाळीसाठी आहेत काय?’
याचा अर्थ हे महाशय पाकिस्तानवर अणुबाँब टाकू इच्छितात का? तसे असेल, तर पाकिस्तानात बाँब टाकल्यानंतर पाकिस्तानला लागून असलेला भारतीय भूभाग त्यातून वाचणार आहे का? अण्वस्त्रांची संहारकता किती व्यापक असते याची कल्पना या युगपुरुषाला नाही का? अण्वस्त्रांमुळे होणारा किरणोत्सर्ग व त्याचे दुष्परिणाम दोन-तीन पिढ्यांपर्यंत टिकतात. नागासाकी व हिरोशिमा ही जितीजागती उदाहरणे असताना अणुबाँबची धमकी देणे ही शुद्ध सुमारबुद्धी आहे.
थोडक्‍यात काय? मते मिळविण्यासाठी जीभ सैल सोडण्याचा हा धंदा.  


बदलती हवा?
मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचे समर्थन व पाठिंब्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी आणि इतरही काहींच्या चित्रफिती जारी करण्यात आल्या.
अजूनपर्यंत यातील कुणीही त्याचा इन्कार केलेला नसल्याने त्यांच्या खरेपणाची खात्री बाळगायला हरकत नाही. परंतु, निवडणुकीच्या ज्ञात इतिहासात प्रथमच एखाद्या शीर्ष उद्योगपतीने एखाद्या उमेदवाराला जाहीरपणे पाठिंबा देण्याचा हा बहुधा पहिलाच प्रकार असावा. आता त्याचे विविध अर्थ लावण्यास सुरुवात झाली आहे. मिलिंद देवरा हे काँग्रेसचे. त्यातही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे अगदी ‘खास’! राहुल गांधी यांनी मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या विरोधात घेतलेली जाहीर भूमिका आणि अनिल अंबानी यांनी त्यांच्याविरुद्ध कोर्टात जाण्यापर्यंत गाठलेली मजल! अनिल अंबानी हे भाऊ असले, तरी आता ते विभक्त झाले आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत देशात प्रथम क्रमांकावर आणि जगातही अव्वल क्रमांकात समाविष्ट अशा मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा देण्याची बाब चर्चित झाली आहे. अंबानी यांनी पश्‍चिम बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या उद्योगपतींच्या परिषदेत नुसती हजेरीच लावली नाही, तर एक तास भाषण करून ममतादीदींची स्तुती केली व पश्‍चिम बंगालला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासनही दिले होते. अंबानी यांच्या या ‘ॲक्‍शन’ डोळेझाक करण्यासारख्या नाहीत. त्यामागे काही हेतू निश्‍चितच आहेत! विशेषतः त्यांच्यापासून विभक्त झालेले धाकटे बंधू अनिल अंबानी यांना वर्तमान राजवटीकडून ज्या पद्धतीने साह्य केले जात आहे त्या पार्श्‍वभूमीवर मुकेशभाईंकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना अनुकूलता दाखविणे हे काहीसे सूचक मानावे लागेल! ही झाली उद्योगजगताची गोष्ट!
राजधानीतल्या गप्पिष्ट वर्तुळाचा कानोसा घेता आणखीही काही चविष्ट गोष्टी कानावर येत आहेत. नोकरशाहीतही वर्तमान राजवटीविरुद्धचा रोष व असंतोष वाढताना दिसतोय!
अलीकडेच ओडीशामध्ये एका प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याने पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली म्हणून त्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले. याची कडवट प्रतिक्रिया नोकरशाहीत व प्रशासनात उमटलेली आहे. काय नोकरशाहीदेखील या सरकारवर नाराज झाली आहे काय? होय, असे अनुमान कुणी काढल्यास ते वावगे ठरणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला अधिकारांबाबत समज देणे व त्यानंतर आयोगाने ‘नमो बायोपिक’, ‘नमो टीव्ही’वर बंदी घालणे, आदित्यनाथ आणि अन्य बेताल वक्‍त्यांना लगाम लावण्याची कृती यामुळे सरकार व सरकारचे सूत्रधार अस्वस्थ झालेले आहेत. ही सर्व बदलत्या हवेची तर लक्षणे नाहीत?


भारतरत्न पुरस्कार वितरण कधी?
जाता जाता! यावर्षी तीन ज्येष्ठ भारतीयांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले. भूपेंद्र हजारिका, नानाजी देशमुख आणि प्रणव मुखर्जी! प्रणव मुखर्जी यांना भरतरत्न पुरस्कार देण्याचे जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या भृकुटी ताणल्या गेल्या होत्या. परंतु, ज्या पद्म पुरस्कारांबरोबर भारतरत्न पुरस्काराची घोषणा होते ते पद्म पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ केव्हाच पार पडला. भारतरत्न पुरस्कार कधी प्रदान होणार हे अद्याप गुलदस्तातच आहे. या तीन ज्येष्ठांपैकी हजारिका व देशमुख हे हयात नाहीत त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाच त्यांचा पुरस्कार स्वीकारावा लागणार आहे. कानोकानी आलेल्या माहितीनुसार मुखर्जी यांनी पुरस्कार स्वीकृतीसाठी उपलब्धता दर्शविलेली नाही. असे समजते, की प्रणवदा लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. निवडणुकीनंतर येणाऱ्या सरकारच्या काळातच पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी पसंती दर्शविल्याचे समजते. प्रणवदांना कुणाचे सरकार अपेक्षित आहे? हा नुसता प्रश्‍न नव्हे तर लाखमोलाचा आणि यक्षप्रश्‍न आहे! या प्रश्‍नात अनेक उत्तरे दडली आहेत. तर मंडळी चला नव्या सरकारची वाट पहा!


कुणी नाही? मग मी आहेच!
‘गुडघ्याला बाशिंग बांधणं’ ही म्हण किंवा वाक्‍प्रचारातून मनुष्यस्वभावातला उतावळेपणा, लोभ व हव्यास प्रतिबिंबित होतो. काही मंडळी कल्पनेत काही गोष्टी घडताना पाहतात आणि त्या वास्तव असल्याचे समजून तसं वागू लागतात. सध्या निवडणुका सुरू आहेत. सर्वसाधारणपणे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात असे मानले जाते, की यावेळी भाजपला पूर्ण बहुमत मिळणे शक्‍य नाही. किंवा गेल्यावेळेप्रमाणे केवळ भाजपला २८४ जागा मिळणे शक्‍य नाही. बहुधा त्यामुळेच या पक्षाने राज्याराज्यात जाऊन मिळेल त्या लहानसहान पक्षांबरोबर आघाड्या केलेल्या आढळतात. म्हणजेच निवडणुकीनंतर भाजपचे नव्हे, तर भाजप-आघाडीचे सरकार सत्तेत येऊ शकते.
यातून गप्पिष्ट वर्तुळात आणखी एका प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यात आले. जर भाजपला इतर लहानसहान व प्रादेशिक पक्षांच्या आधाराने सरकार स्थापन करावे लागल्यास सध्याचे पंतप्रधान कायम राहतील काय? बरीच मंडळी या प्रश्‍नाला ‘कायम राहणार नाहीत’ असे उत्तर देतात. त्या परिस्थितीत पंतप्रधान कोण होणार या प्रश्‍नाच्या उत्तरात सर्वसाधारणपणे राजनाथसिंह, नितीन गडकरी वगैरेंची नावे पुढी केली जातात. परंतु, ताज्या चर्चेनुसार या पदासाठी देशाचे उपराष्ट्रपतीदेखील अनुकूल असल्याचे समजले आहे. त्यांच्या ऐवजी सर्वसंमत नेता कोण? या प्रश्‍नावर वेंकय्या नायडू यांच्या नावाची चर्चा काही वर्तुळात सुरू आहे. त्रिशंकू राजकीय परिस्थितीत सर्वसंमत नेत्याची शक्‍यता पडताळून पाहण्याचा हा राजकीय खेळ नवा नाही. एकेकाळी उपराष्ट्रपती असलेल्या (सध्या हे नेते हयात नाहीत) आर. वेंकटरमण, शंकर दयाळ शर्मा किंवा के. आर. नारायणन यांच्याबद्दलही अशा चर्चा झालेल्या होत्या. यापैकी वेंकटरमण हे विशेष इच्छुकी होते व त्यांनी तसे प्रयत्नही केले होते. शर्मा व नारायणन यांची नावे काही पक्षांनी पुरस्कृत केली होती. तेव्हा आताही २३ मे नंतर जर त्रिशंकू राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यास उपराष्ट्रपतींचा नंबर लागेल काय? याच गप्पिष्ट वर्तुळात आणखी एका शक्‍यतेची भर पडली. काहींच्या म्हणण्यानुसार अशी परिस्थिती उत्पन्न झाल्यास माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे नाव पुढे येऊ शकते. आता एकदा राष्ट्रपतिपद भूषविल्यानंतर कुणी पंतप्रधान होऊ शकतो काय? असे पूर्वी कधी घडलेले नाही. राज्यघटनेने तशी बंदी केलेली नाही; पण संकेत व शिष्टाचारानुसार असे घडणे अशक्‍य!
 

संबंधित बातम्या