कट्टा

कलंदर
सोमवार, 13 मे 2019

कट्टा
 

आता भीती वाटू लागली ?
एकेकाळचे रा. स्व. संघाचे प्रवक्ते आणि आता संघातून भाजपमध्ये बदली होऊन सरचिटणीस झालेल्या राम माधव यांचे एक विधान सध्या येथील राजकीय वर्तुळात चर्चित झाले आहे.
त्यांनी एका मुलाखतीत बोलताना ‘भाजप अन्य सहकारी पक्षांबरोबर सरकार स्थापनेस तयार राहील!’ असे विधान केले होते.
आता या विधानाचे विविध अर्थ राजकीयदृष्ट्या लावले जाऊ शकतात.
सर्वांत पहिला अर्थ हा, की भाजपला स्वबळाचे बहुमत मिळण्याची शक्‍यता वाटेनाशी झाली आहे. 
म्हणजेच २०१९ च्या या निवडणुकीत भाजपला बहुमत हुलकावणी देताना दिसू लागले आहे, असा तर याचा अर्थ नव्हे?
एक गोष्ट निश्‍चित आहे, की भाजपच्या वर्तुळातूनही २०१४ च्या तुलनेत पक्षाला कमी जागा मिळतील, असे मानले जात आहे.
किती कमी मिळतील याबाबत वेगवेगळे अंदाज व तर्क दिले जात आहेत. परंतु, १८० ते २२० च्या दरम्यान भाजपला जागा मिळतील, असे भाकीत वर्तविले जात आहे. म्हणजेच २७ ३ची जादुई म्हणजेच सध्या बहुमताची संख्या गाठण्यासाठी भाजपला अकाली दल व शिवसेनेची मदत तर लागेलच, परंतु अन्य प्रादेशिक पक्षांचीही मदत लागणार आहे. त्यासाठीच आता भाजपने इतर पक्षांना जाळ्यात ओढण्यासाठी ‘फील्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच राम माधवरावांचे विधानही सूचक आणि महत्त्वपूर्ण आहे. यासाठी तूर्तास भाजपतर्फे कुणीच पुढाकार घेताना आढळत नाही. कारण भाजपने असा पुढाकार घेण्याच्या हालचाली सुरू केल्यास आतापासूनच ‘देवाणघेवाण’ आणि ‘त्यासाठीची किंमत’ याची ‘घासाघीस’(बार्गेनिंग) सुरू होईल व त्याचप्रमाणे उरलेल्या मतदानाच्या फेऱ्यांवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकेल.
हे करायचे कसे?
दिल्लीच्या राजकीय वर्तुळानुसार तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगण राष्ट्रसमितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी ‘फेडरल फ्रंट’ची कल्पना पुन्हा नव्या उमेदीने मांडण्यास सुरुवात केली आहे. त्या हालचालीमागे भाजपचाच हात आहे. किंबहुना चंद्रशेखर राव यांची ही ‘राजकीय चाल’ ‘भाजप पुरस्कृत’ असल्याची चर्चा आहे. 
त्यामुळेच काँग्रेसबरोबर आघाडी असलेल्या द्रमुक पक्षाचे प्रमुख एम. के. स्तालिन यांना भेटण्याचा केलेला त्यांचा प्रयत्न सफल होऊ शकला नाही. केरळचे मुख्यमंत्री व मार्क्‍सवादी नेते पिन्नराई विजयन यांना भेटून त्यांना परतावे लागले. 
थोडक्‍यात, बहुमत हुकण्याच्या भीतीने ग्रस्त भाजपने इतर समर्थकांकडून ‘फील्डिंग’ लावायला सुरुवात केली आहे!


सांघिक हस्तक्षेप?
सध्याच्या निवडणुकीत भाजपला स्वबळाचे बहुमत मिळेल काय?
नाही मिळाले तर काय?
आणि मिळाले तर काय?
अशा विविध प्रश्‍नांवर चर्चा सुरू आहेतच!
संघाच्या वर्तुळातून एक रंजक माहिती कानावर आली.
या माहितीनुसार भाजपला स्वबळाचे बहुमत मिळाले, तर काही प्रश्‍नच निर्माण होणार नाही.
त्यांचे सरकार आपोआपच स्थापन होईल.
पण मिळाले नाही तर?
तर मात्र बऱ्याच शक्‍यता निर्माण होतील!
संघ वर्तुळातही याबाबत चर्चा सुरू आहेतच.
याबाबत कानावर आलेल्या माहितीनुसार, भाजपला स्वबळाचे बहुमत मिळाल्यास त्यांच्या सरकारस्थापनेत कोणताही हस्तक्षेप न करण्याची भूमिका घ्यायची, असे संघ नेतृत्वाने ठरविले आहे.
पण बहुमत न मिळाल्यास?
होय, आणि संघ वर्तुळात ती शक्‍यता अधिक असल्याचे मानले जाते!
तर, बहुमत न मिळाल्यास मात्र संभाव्य आघाडी सरकारचे नेतृत्व कुणाकडे असावे याबाबत संघाचा हस्तक्षेप राहील, असे भाजप नेतृत्वाला सूचित करण्यात आल्याचे समजते.
परंतु, भाजपच्या उच्च वर्तुळातून मात्र संघाला हस्तक्षेप करू न देण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
खुद्द युगपुरुषांनी, ‘मी नाहीतर कुणी नाही’ अशी भूमिका घेतल्याचे समजते.
आणि त्यांनी संधी न मिळाल्यास ‘काहीही’ करण्याची तयारी केल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते!
मंडळी काय होणार?
चला वाट पाहू!


प्रचार आणि निद्रा!
निद्रा?
म्हणजे झोप हो!
तर मंडळी, सध्या निवडणुका सुरू आहेत. निवडणुकांसाठी राजकीय नेते रात्रीचा दिवस करून, जीव तोडून प्रचार करीत आहेत.
नेते मंडळी आणि खुद्द उमेदवार हे तहान-भूक आणि झोप विसरून प्रचार करीत आहेत. या सगळ्या गडबडीत मनुष्याला झोपेची आवश्‍यकता तर भासणारच ना?
ही मंडळी कधी झोपत असतील?
त्यांना झोप लागत असेल काय? असे विविध प्रश्‍न मनात आल्याखेरीज रहात नाहीत!
दिल्लीच्या चांदणी चौक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि व्यवसायाने डॉक्‍टर असलेल्या हर्षवर्धन यांच्याकडे याचे उत्तर आहे.
त्यांनी त्यांच्या अनुभवाने सांगितले, की त्यांना एवढ्या धावपळीतदेखील तीन ते चार तासांची झोप पुरेशी होते आणि ते तेवढी झोप घेतात.
परंतु, डॉक्‍टर असल्याने त्यांना या विषयात आणखी सखोल ज्ञान असणे स्वाभाविक आहे.
त्यांनी असे सांगितले, की तसं पहायला गेलं तर मनुष्याला अगदी चांगली गाढ अशी पंचेचाळीस मिनिटांची झोपदेखील दिवसभरासाठी म्हणजे चोवीस तासांसाठी पुरेशी होऊ शकते.
हे कसे काय शक्‍य आहे बुवा?
हर्षवर्धन यांनी याबाबत पत्रकारांबरोबरच्याच वार्तालापात बोलताना खुलासा केला, की जर जागृत व अर्ध-जागृत मन यातील फरक-अंतर मिटवून एकाग्रचित्त अवस्था केल्यास त्या व्यक्तीला पाऊण तास झोपही पुरेशी ठरू शकते. थोडक्‍यात ध्यानधारणेच्या माध्यमातून पंचेचाळीस मिनिटांची निद्रा पुरेशी होऊ शकते व माणूस ताजातवाना होऊ शकतो, असा त्यांचा शोध त्यांनी पत्रकारांसमोर सादर केला.
पण ते स्वतः मात्र तीन-चार तास झोपतात, हे सांगायला ते विसरले नाहीत. हे जरा जास्तच झालं नाही का? पण डॉक्‍टर हर्षवर्धनसाहेब यांनी पूर्वीदेखील असाच काहीसा एक शोध लावून लोकांना चक्रावून टाकले होते.
हर्षवर्धन हे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे मंत्री आहेत. स्टीफन हॉकिंग या अवकाश व खगोल शास्त्रज्ञाचा, खरं तर त्यांना ब्रह्मांड वैज्ञानिक म्हटले जाते. त्यांचा हवाला देताना त्यांनी असा दावा केला होता, की आइन्स्टाईन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा उल्लेख वेदांमध्ये सापडू शकतो, असे हॉकिंग म्हणाले होते.
त्यावेळी त्यावर वाद झाला होता.
आता हर्षवर्धन यांनी निद्रेबाबत नवा शोध लावलेला आहे!


पळा.... पळा.... कोण पुढे पळे तो.....!
सध्या दिल्लीत बसून भाजपची आणि त्यातही युगपुरुषांची बाजू मांडण्याची मुख्य जबाबदारी देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली सांभाळत आहेत.
त्यांच्या बाजूने दणादण एका पाठोपाठ ब्लॉग लिहून ते त्यांची निष्ठा व्यक्त करीत आहेत.
यांना पर्याय नाही, मोदींचे नेतृत्वच भारताला तारू शकते आणि मोदींचे नेतृत्व ही भारताची गरज आहे या तीन मुद्यांभोवती त्यांचे ब्लॉग तयार करण्यात येतात आणि लोकांसमोर सादर केले जातात. हे करताना विरोधी पक्षांमध्ये नेतृत्वाचा अभाव कसा आहे, राहुल गांधी यांना कुणीच गांभीर्याने घेत नाही असा उपहास, चेष्टा व हेटाळणी करण्यासही ते चुकत नाहीत.
आता त्यांनाही पक्षात स्पर्धक तयार झालेला आहे.
या स्पर्धकावर साक्षात पक्षाध्यक्षांचा वरदहस्त आहे.
तर हे स्पर्धक दुसरे तिसरे कुणी नसून रेल्वेमंत्री पियुष गोयल आहेत. 
अरुण जेटली आजारी असताना त्यांच्या बदली अर्थमंत्री म्हणून गोयल यांनाच तात्पुरती जबाबदारी दिलेली होती.
आता दिवसेंदिवस जेटली यांची प्रकृती फारशी नीट राहताना दिसत नसल्याने खरोखर भाजपचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यास त्यामध्ये अर्थखात्याची जबाबदारी पियुष गोयल यांच्याकडेच जाऊ शकते, असे खात्रीलायकपणे मानले जाते.
जेटली यांच्याप्रमाणेच गोयल हेही मोदी यांच्या नेतृत्वाचे गुणगान करीत असतात. 
हे ‘अभेद्य’ आहेत आणि त्यामुळेच यावेळी २०१४ पेक्षा अधिक संख्येने भाजपला जागा मिळतील, असे भाकीतही ते वर्तवितात.
परंतु, पत्रकारांनी त्यांच्या उत्साहाला काहीसा चाप लावताना २०१४ सारखी लाट नसल्याकडे लक्ष वेधले असता त्यांनीही शाब्दिक कसरती व चलाखी केली. 
ते म्हणाले, २०१४ मध्ये मोदींच्या बाजूने उघड लाट होती. परंतु, आता २०१९ मध्ये मोदींच्या बाजूने जबरदस्त अंतःप्रवाह म्हणजे अंडरकरंट आहे. त्यामुळे यावेळी अधिक जागा मिळणार आहेत.
एका पत्रकाराने आपला काहीसा फटकळपणा दाखवीत म्हटले, की अंडरकरंट हा नेहमी प्रस्थापित सरकारच्या विरोधात असतो. पण गोयल त्यांच्या सिद्धांतावर ठाम राहिले.
बहुधा त्यांना निवडणुकीनंतरचे सरकार आणि अर्थमंत्रिपदाची खुर्ची आणि मुकुट दिसत असावा.
परंतु, गुजराती बोलणारे गोयल अमित शहांचे खास आहेत, हे निश्‍चित आणि त्या मार्गानेच ते अर्थमंत्रिपदापर्यंत पोचू शकतील.


असली निवेदने करीत नाही!
गृहमंत्री राजनाथसिंह हे लखनौहून उभे आहेत.
मतदान केल्यानंतर कपाळाला चंदनाचा टिळा लावलेल्या राजनाथसिंह यांची बोटावरची शाई दाखवतानाची छबीही सर्वत्र प्रसिद्ध झाली.
ंतर, बाहेर येताच पत्रकारांनी राजनाथसिंहांनी गाठले.
प्रश्‍नोत्तराची एक फेरी या निमित्त झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा ‘भ्रष्टाचारी क्र.१’ असा उल्लेख केला, त्याकडे लक्ष वेधून पत्रकारांनी त्यांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ताडकन उत्तर दिले, ‘मैं ऐसे बयान नही देता!’
राजनाथसिंह यांचे हे निवेदन फारसे चर्चित झाले नाही, कारण युगपुरुषांच्या प्रसिद्धीतंत्र व झगझगाटात भाजपच्या इतर नेत्यांचे अस्तित्वत लुप्त झालेले आढळते.
किंबहुना त्यामुळेच राजनाथ यांच्या या वक्तव्याला फारशी प्रसिद्धी मिळू शकली नसावी.
परंतु राजनाथ तर बोलून गेले आणि चक्क युगपुरुषांच्या विरोधात?
हळूहळू का होईना लोकं बोलू लागलीत!
एकदा संसदेत गंगा नदीवर वाहतुकीच्या दृष्टीने बंदरे बांधण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली व त्यात विरोधी पक्षांनी काही सूचना केल्या.
त्या सूचना पटल्याने परिवहन, नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी त्यास मान्यता दिली. त्यावर एका विरोधी सदस्याने काहीसे खवचटपणे विचारले, ‘मोदी याला परवानगी देतील काय?’ त्यावर गडकरींनी राजनाथ यांच्याप्रमाणेच ताडकन उत्तर देत, ‘मला परवानगीची गरज नाही,’ असे म्हणून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला होता.
ही कशाची लक्षणे आहेत?
युगपुरुषाची भीती व दरारा कमी झाला काय?
याचाही शोध घ्यायला हवा!

संबंधित बातम्या