कट्टा

कलंदर
सोमवार, 27 मे 2019

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...    

व्यक्तिस्तोमाचा कालखंड
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा २२ ऑक्‍टोबर १९६४ रोजी जन्म झाला.
म्हणजेच सध्या ते ५५ वर्षांचे आहेत.
उच्चपदाला पोचलेल्या व्यक्तींच्या बाबत वय वगैरे गोष्टी फारशा महत्त्वाच्या नसतात. 
त्यांचे कर्तृत्व मोठे असते. अमितभाई पण कमी कर्तृत्ववान नाहीत.
त्यामुळेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने त्यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामगिरीची सार्वत्रिक चर्चा होताना आढळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहनायक, त्यांची पडछाया म्हणून ते गेली पाच वर्षे वावरले.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे नक्की रसायन लोकांना जाणता यावे, यासाठी त्यांचे चरित्र लिहिण्यात आले आहे. ‘अमित शहा अँड द मार्च ऑफ बीजेपी’ या शीर्षकाने ब्लूम्सबरी या प्रकाशनसंस्थेतर्फे अनिर्बन गांगुली व शिवानंद द्विवेदी या लेखकद्वयांनी लिहिलेले हे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्याच्या प्रतीदेखील सर्वत्र पाठविण्यात आल्या आहेत. या २९४ पानी पुस्तकात अमित शहा यांच्या राजकीय प्रवासाचा आलेख आहे.
अभाविप, भाजप युवामोर्चा, बूथवर्कर पासून अमित शहा यांचा राजकीय प्रवास सुरू होऊन आता ते राष्ट्रीय अध्यक्षपदी आरूढ झाले आहेत.
जगातला सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपचा विस्तार करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्याचबरोबर पक्षाला गेल्या पाच वर्षांत जे चमकदार यश मिळाले, त्यामागील रणनीतीकार म्हणूनही त्यांना वाखाणले गेले. त्यांना आधुनिक राजकारणाचे ‘चाणक्‍य’ अशी उपाधीही देण्यात आली आहे.
अशा या व्यक्तीचे चरित्र लोकसभा निवडणूक संपतासंपता लोकांच्या हातात पडणार आहे.
याचा अर्थ काय?
याचा अर्थ एवढाच आहे, की केवळ भाजपचे नेतृत्व करण्यापर्यंत शहांची झेप नाही!
त्यापलीकडेही त्यांच्या नेतृत्वाला आणखी ‘मोठ्या’ जबाबदारीची ओढ लागलेली दिसते! ही ‘मोठी’ जबाबदारी कोणती? समझनेवाले को इशारा काफी है........!


‘जर-तर’चा खेळ!
निवडणुकीच्या फेऱ्या संपल्यानंतर निकालाची प्रतीक्षा सुरू होते. प्रतीक्षा करताना निरनिराळ्या अटकळबाजींना उधाण येणेही स्वाभाविक असते. अनेक उत्साही नेते वेगवेगळे अंदाज देऊ लागतात.
बिहारमधील तरुण सळसळते नेते व वडील लालूप्रसाद यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रीय जनता दलाचा गाडा हाकणारे तेजस्वी यादव यांनी एका निवेदनाद्वारे २३ मे नंतर म्हणजेच निकाल जाहीर झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार हे ‘रंग बदलतील’ असे भाकीत केले आहे. म्हणजे काय?
तेजस्वी यांच्या म्हणण्यानुसार विरोधी पक्षांच्या आघाडीचे सरकार केंद्रात स्थापन झाले, तर नीतिशकुमार भाजपची साथ सोडतील.
पण जर भाजपला स्वतःचे बहुमत न मिळता त्यांना इतर पक्षांच्या मदतीने सरकारस्थापनेची पाळी आल्यास?
तेजस्वी यांच्या मते, अशी स्थिती निर्माण झाल्यास नीतिशकुमार हे त्यांचे काही पत्ते उघड करतील!
म्हणजे? म्हणजे, नीतिशबाबू पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना विरोध करतील! मोदी-अमित शहा सोडून अन्य कुणालाही पंतप्रधान केले तरच त्यांचा पक्ष पाठिंबा देईल, असे ते जाहीर करतील अशी भविष्यवाणी तेजस्वी यांनी केली आहे.
महाराष्ट्रातही अशीच काहीशी भविष्यवाणी करण्यात आली आहे.
जर भाजपचे संख्याबळ कमी होऊन त्यांना आघाडीतील घटकपक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करावे लागल्यास मोदी-शहा जोडगोळीस विरोध करण्यात शिवसेना आघाडीवर राहील, असेही भाकीत केले जात आहे.
घोडामैदान फार लांब नाही!
लवकरच या भविष्यवाण्यांचा निर्णय लागेल!
तोपर्यंत करमणूक मनोरंजन करून घ्या!


बदलले मन?
निवडणुकीत आपल्यालाच बहुमत मिळणार याची खात्री प्रत्येक राजकीय पक्षालाच असते.
विरोधी पक्षांना त्यांच्या धर्मनिरपेक्ष राजकीय आघाडीला बहुमत मिळेल, अशी खात्री वाटत आहे. या आघाडीला खरं तर ‘भाजप विरोधी आघाडी’ म्हटले, तर अधिक योग्य ठरेल.
अशा या आघाडीच्या नेतृत्वाबद्दल तर्क-कुतर्क सुरू आहेतच.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव स्वाभाविकपणे आघाडीवर असले, तरी या आघाडीतील प्रादेशिक पक्षांचे संख्याबळ कदाचित काँग्रेसपेक्षा अधिक असू शकते आणि त्या परिस्थितीत नेतृत्वासाठी एखाद्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्याचा विचार होऊ शकतो.
सध्या यासंदर्भात तृणमूल काँग्रेस प्रमुख व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची नावे आघाडीवर आहेत.
आतापर्यंत तृणमूल काँग्रेसचे नेते किंवा खुद्द ममता बॅनर्जी या कल्पनेला अनुकूल होते आणि तशी चर्चाही ते करीत होते. पण आता त्यांचा स्वर बदलला आहे.
आता ही मंडळी म्हणू लागलीत, की ‘दीदी’ अजून सात वर्षे तरी बंगालमधून जाऊ शकणार नाहीत!
आताच्या विधानसभेची दोन वर्षे आणि त्यानंतर पुन्हा निवडून येऊन पुढची पाच वर्षे अशी मिळून आणखी सात वर्षे तरी दीदी बंगालमधून जाऊ शकणार नाहीत.
याचा अर्थ काय?
यांचेच नाव स्पर्धेत शिल्लक राहणार काय?
आणि त्यांचे सहकारी यांनी अंग काढून घेण्याचे ठरवले असले, तरी ते मायावतींना पाठिंबा देतीलच अशी खात्री नाही! ते कुणाला पाठिंबा देतील?
जेव्हा काँग्रेसमध्ये होत्या, तेव्हा त्यांनी नरसिंह राव यांच्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी कुणाला पाठिंबा दिला होता, याकडे काही मंडळी लक्ष वेधू इच्छित आहेत!
उत्तर शोधा..... म्हणजे सापडेल!


संसदेची रंगरंगोटी
नव्या सरकारसाठी केवळ सरकारी यंत्रणाच नव्हे, तर संसदही सजू लागली आहे.
गेल्या जवळपास दीड महिन्यांपासून संसदेतील ऐतिहासिक सेंट्रल हॉल बंद आहे.
याखेरीज मंत्र्यांच्या सर्व खोल्यांचे, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, राज्यसभा सभापती यांच्या दालनांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण सुरू करण्यात आले आहे.
नव्याने सत्तेत येणाऱ्या पक्षाच्या खासदारांची पहिली बैठक म्हणजेच नेतानिवडीची बैठक सेंट्रल हॉलमध्येच होणे अपेक्षित असल्याने त्याचे सुशोभीकरण सुरू आहे.
दोन्ही सभागृहांमधील गालिचे बदलण्याचे कामही सुरू आहे. लोकसभेत सर्वत्र हिरव्या रंगांचे गालिचे असतात. राज्यसभेत लाल रंगाचे साम्राज्य असते. 
सेंट्रल हॉलमध्ये हिरव्या रंगाचाच गालिचा असतो. तसेच आसनांचा रंगही हिरवा असतो. परंतु, समोरच्या लाकडी मेजांना पॉलिश केले जाते. तसेच भिंतींनाही असलेल्या लाकडी अच्छादनांचेही पॉलिश केले जात आहे. सर्वत्र चकाचक केले जात आहे.
निवडणुकीचे सर्व निकाल अधिकृतपणे हाती आल्यानंतर ते राष्ट्रपतींना सादर केले जातील व त्यानंतर राष्ट्रपती लोकसभेची बैठक बोलावतील व नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम केला जाईल. 
नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये संसदगृहात प्रवेश करताना खाली वाकून संसदेला प्रणिपात केला होता.
आता ते काय करतात याची उत्कंठा सर्वत्र असेल! 


बेटे, तूने ये क्‍या किया?
धर्मेंद्रपुत्र सनी देओल पंजाबमधील गुरदासपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत.
त्यांच्या विरुद्ध आहेत काँग्रेसचे सुनील जाखड!
आपल्या पुत्राच्या प्रचारासाठी गुरदासपूरमध्ये दाखल झाल्यानंतर धर्मेंद्र यांना प्रचार करता करता सुनील जाखड यांची माहिती मिळाली. 
आणि काय सांगावे? धर्मेंद्र यांचा सारा प्रचाराचा जोष-जोरच निघून गेला!
सुनील जाखड हे काँग्रेसचे दिवंगत नेते व लोकसभेचे दोनदा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, राज्यपाल राहिलेल्या बलराम जाखड यांचे पुत्र आहेत.
धर्मेंद्र यांना हे कळताच त्यांनी कपाळावर हात मारला आणि त्यांनी जाहीरपणे सांगितले, की सुनील जाखड यांच्या विरुद्ध सनी देओलला तिकीट मिळाल्याचे मला आधी कळले असते, तर त्याला आपण लढूच दिले नसते.
पश्‍चात्ताप व्यक्त करून त्यांनी सुनील जाखड यांचे वडील बलराम जाखड यांचे त्यांच्यावर किती उपकार होते, याचा पाढा त्यांनी वाचला आणि सनी देओलने ही चूक करायला नको होती, असे ते म्हणू लागले.
धर्मेंद्र यांनी भाजपतर्फे बिकानेर (येथून) निवडणूक लढवली होती व ते जिंकलेही होते. परंतु, त्यांना बिकानेरहून लढण्याची सूचना बलराम जाखड यांनी केली होती. काँग्रेसमध्ये असूनही त्यांनी आपले नेहमीच भले चिंतले होते आणि त्यांच्या मुलाविरुद्धच सनी देओलने उभे राहावे, ही कल्पना धर्मेंद्र यांना असह्य झाली होती.
सगळा सीनच पालटला की!
पण आता उपयोग काय?
नाइलाज को क्‍या इलाज?
आता वाट निकालाची!

संबंधित बातम्या