कट्टा

कलंदर
मंगळवार, 11 जून 2019

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर... 

भांडी आणि पडीक चेहरे!
तोंडावर ताबा नसणाऱ्यांना व ‘आतली’ माहिती बाहेर फोडणाऱ्यांना मराठीत छान संज्ञा आहे..... ‘फुटकं भांडं’! राजकीय पक्षांमध्ये अशी असंख्य फुटकी भांडी असतात.
पत्रकारांचे ते खबरे असतात. ही मंडळी पत्रकारांना ‘आतली’ माहिती पुरवत असतात. अनेक वेळेस पक्षाच्या एखाद्या महत्त्वाच्या बैठकीची माहिती बाहेर पत्रकारांपर्यंत पोचते, तेव्हा पक्षनेतृत्वाला कपाळावर हात मारून घेण्याखेरीज पर्याय राहात नाही. ही माहिती कुणी फोडली, याची कल्पनाही त्यांना असते पण त्यासाठी शिस्तभंग कारवाई वगैरे काही केली जात नाही. फार तर संबंधित ‘फुटक्‍या भांड्या’ला तंबी देऊन सोडण्यात येते.
पराभवाच्या विश्‍लेषणासाठी काँग्रेस कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. बैठकीत जोरदार चर्चा झाली. राहुल गांधी यांनी त्यांची नाराजीही प्रकट केली. चर्चेच्या अखेरीला सोनिया गांधी यांनी ‘या चर्चेचा तपशील आता बाहेर फोडू नका’ असे सांगूनही फुटके भांडेगिरी कोणकोण करते याची मला माहिती आहे, असे सांगताच उपस्थितांमधील काहींनी चेहरे लांब केले तर काहींनी नजर चुकविण्यास सुरुवात केली, असे त्यांच्या प्रतिस्पर्धी फुटक्‍या भांड्यांनी तत्काळ पत्रकारांना सांगितले. या बैठकीत आणखी एक मजा झाली.
राजस्थानात शून्य व मध्य प्रदेशात केवळ एक जागा जिंकल्याने येथील नेते बैठकीत हल्ल्याचे लक्ष्य राहणार हे उघड होते. एका जुन्याजाणत्या नेत्याने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा पूर्ण पचकाच करून टाकला. त्यांनी बैठकीत राजस्थानात काँग्रेसचे उमेदवार किती मताधिक्‍याने हरले याची आकडेवारीच मागवली आणि बैठकीत ती सादर केली. गेहलोत यांना तर त्यामुळे धरणी पोटात घेईल असे झाले.
पण त्यांची तेवढी पंचाईत करणे तर क्रमप्राप्तच होते. अन्य शिक्षा नाही पण किमान एवढी शिक्षा तर द्यायला हवीच होती! एवढे झाल्यानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ केला पण गेहलोत आणि कमलनाथ हे असे काही राजकारणी आहेत, की त्यांनी साधी राजीनाम्याची तयारीदेखील दाखवली नाही! पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी तर निवडणुकीत काँग्रेसला चांगल्या जागा न मिळाल्यास आपण मुख्यमंत्रिपद सोडू, असे जाहीर केले होते आणि देशात ज्या दोन राज्यात काँग्रेसची अब्रू वाटली त्यात पंजाब एक राज्य ठरले. सांगण्याचा मुद्दा एवढाच, की सोनिया गांधी व त्यांना पुस्ती जोडत प्रियंका यांनीदेखील पक्षातल्या फुटक्‍या भांड्यांना इशारा देऊनही कार्यकारिणीतली माहिती बाहेर फुटायची ती फुटलीच! धन्य ती फुटकी भांडी!


घराणेशाही की एकव्यक्तिशाही?
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक चर्चा जोरजोराने सुरू झाली आहे. या निवडणुकीने घराणेशाहीला हादरा दिला! भक्तसंप्रदायातल्या अनेक लेखणीबहाद्दरांनी तर त्यांच्या लिखाणात हा प्रमुख मुद्दा केलेला आढळतो. नरेंद्र मोदी यांचा विजय म्हणजे गांधी-नेहरू घराणेशाहीचा पाडाव, असे सोपे समीकरण ते मांडत आहेत.
पण अंधभक्तीत तल्लीन मंडळींना काही गोष्टी दिसेनाशा झाल्या आहेत. पहिले उदाहरण - आंध्र प्रदेशात महाप्रचंड मतांनी कोण निवडून आले? जगमोहन रेड्डी! हे जगमोहन रेड्डी कोण आहेत? कुणी सामान्य नव्हे!
आंध्र प्रदेशचे माजी-दिवंगत मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचे ते चिरंजीव आहेत. आता ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. ओडिशात नवीनबाबू पटनाईक पाचव्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत.
ते कोण आहेत? ओडिशाचे उत्तुंग नेते बिजू पटनाईक यांचे चिरंजीव! बाकी लहानसहान अनेक उदाहरणे देता येतील. सांगायचा मुद्दा म्हणजे ही निवडणूक म्हणजे घराणेशाहीचा अंत हा जो सोईस्कर अर्थ लावण्याचा आटापिटा भक्तसंप्रदाय करीत आहे, तो कसा चुकीचा आहे त्यासाठी ही उदाहरणे! पण याच निवडणुकीने एकव्यक्तिकेंद्रित राजकारणाला आणखी बळकटी आणली आहे व ती अधिक धोकादायक बाब असून याकडे भक्तसंप्रदाय दुर्लक्ष करीत आहे. एकव्यक्तिकेंद्रित राजकारण देशाला एकाधिकारशाहीकडे नेते. गेल्या शतकात त्याचा अनुभव देशाने घेतला आहे.
त्याची पुनरावृत्ती टाळण्याची आवश्‍यकता अधिक आहे, कारण एकाधिकारशाही अधिक धोकादायक व देशाचे नुकसान करणारी असते.


तेलही गेले तूपही गेले...
के. राजशेखरन हे मिझोरामचे राज्यपाल होते. केरळमधील भाजपचे ते नेते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनेते शशी थरुर यांच्या विरुद्ध भाजपला ताकदवान उमेदवार हवा होता.
त्यांनी राजशेखरन यांना राज्यपालपदाचा राजीनामा द्यायला लावला व तिरुअनंतपुरम येथून त्यांना उमेदवारी दिली. पण थरुर यांच्याकडून ते हरले. आता पुढे काय? त्यांना पुन्हा राज्यपालपदी नेमणार? अजून तरी त्याबाबत काही हालचाल नाही. बहुधा नवे सरकार केंद्रात आले, की त्यांचे पुनर्वसन केले जाईल अशी आशा आहे.
नाहीतर, ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे’ अशी अवस्था व्हायला नको! जाताजाता....... निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादी 
काँग्रेसशी दगाबाजी करणाऱ्यांना आता बक्षिसे मिळणार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांना राज्यात वजनदार मंत्रिपद दिले जाणार आहे, तर विजयसिंह मोहिते पाटील यांना एखाद्या राज्याचे राज्यपालपद देण्यात येणार असल्याची वार्ता कानोकानी मिळाली आहे!
जय हो! 


घाई घाई? घ्या दमानं!
सध्याचे युग ‘त्वरित टिप्पण्यां’चे आहे. हातात मोबाईल, ट्विटर खाते, फेसबुक, व्हॉट्‌सॲप आणि आणखी काही! मग काय? काही तरी घडताच प्रतिक्रिया व टिप्पण्यांचा भडिमार सुरू! ‘इतरांपेक्षा आधी’च्या घाईत घोटाळे होत राहतात.
निवडणुकीच्या निकालानंतर आणि मोठे यश मिळाल्याने भक्तमंडळींच्या आनंदाचे रूपांतर उन्मादात न झाले तरच नवल? गुडगाव....अरे अरे माफ करा... आता त्याला गुरुग्राम म्हणतात बरं का!
तर या गुरुग्रामात भक्तमंडळींनी एका मुस्लिम तरुणाला पकडून ‘जय श्रीराम’ची घोषणा देण्यास भाग पाडले. त्याला चांगले बदडलेदेखील! आता यापुढच्या काळात काय काय वाढून ठेवले आहे, याची ही नांदी किंवा ट्रेलर आहे असेच म्हणावे लागेल! दिल्लीत कामानिमित्त आलेले पुण्याचे एक डॉक्‍टर त्यांच्या हॉटेलातून मॉर्निंग वॉकला बाहेर पडताच त्यांनाही पाच-सहा तरुणांनी घेरून जय श्रीराम म्हणण्याची धक्कादायक घटनादेखील याच दिवशी घडली.
पूर्व दिल्लीचे भाजप खासदार व माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी गुरुग्रामच्या घटनेवर अतिशय संतप्त व तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि हा देश ‘सेक्‍युलर’ आहे व अशा असहिष्णुतेला जागा नसली पाहिजे असे म्हटले. अरे बापरे! ‘सेक्‍युलर’ तत्त्वाचे समर्थन आणि तेही भाजपच्या खासदाराकडून? पक्षाच्या विचारसरणीशी एवढी घोर प्रतारणा? ज्या पक्षाच्या पंतप्रधानाने विजयानंतरच्या पहिल्याच सभेत ‘सेक्‍युलर’ संकल्पनेचा बुरखा या निवडणुकीने कसा टराटरा फाडला गेला हे मोठ्या फुशारकीने सांगितले, ज्या पंतप्रधानाला आपण राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वाच्या विरोधात बोलत असल्याचे भान नव्हते, त्यांच्याच पक्षाचा एक नवखा, काल आलेला खासदार ‘सेक्‍युलॅरिझम’चे समर्थन करतो? केवढी ही धर्मभ्रष्टता? गौतम गंभीर हे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आले, त्यांना तिकीट मिळाले व ते प्रचंड मताधिक्‍याने निवडूनही आले.
तर अशा या नवख्या माणसाने शहाणपणा शिकवावा म्हटल्यावर भाजपमधील तमाम भक्तसंप्रदाय व भक्तांनी गंभीर यांच्या विरुद्धच ट्‌विटचा भडिमार सुरू केला. स्वतःच्याच खासदाराविरुद्ध हे करताना कुणालाही किंचितशीदेखील शरम वाटली नाही.
बिचारे गंभीर, खरेच गंभीर होऊन गेले. पण ते पडले क्रिकेटपटू. ते आपले ‘पिच’ म्हणजेच भूमिका सोडायला तयार नव्हते. त्यांनी सांगून टाकले, की ते पारदर्शकतेवर विश्‍वास ठेवतात आणि त्यांना जे अनुचित वाटते त्या विरुद्ध ते बोलणार. त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. तरीही गंभीर यांना जरा दमाने घेण्याची सूचना करण्यात आली आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये अशीच पण वेगळी तऱ्हा!
निवडणुकीत ज्या प्रकारे एकतर्फी निकाल लागले आणि मताधिक्‍याचे प्रमाण अवाढव्य पाहून गुजरातमधील पाटीदार नेते व काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी ‘भाजपचा बेईमानीवर आधारित विजय’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हार्दिक पटेलांना मतदानयंत्रांवर संशय व्यक्त करायचा होता.
पण काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेतृत्वाला ते रुचले नाही. पीछेहाटीमुळे बचावात गेलेल्या काँग्रेसनेतृत्वाने मतदानयंत्रांतील गडबड घोटाळ्यावर टिप्पणी न करण्याची भूमिका घेतली. अखेर हार्दिक पटेल यांनाही वाद वाढवू नका, सबुरीने घ्या असा सल्ला देऊन गप्प बसण्यास सांगण्यात आले. नवीन मंडळींना राजकारणाचा अनुभव नाही. ते बिचारे सरळपणे वागायला जातात आणि फसतात! 
तर घाई नको आणि फसूही नका! चूप बसा!


पंतप्रधानांची तंबी
एकीकडे काँग्रेसने त्यांच्यातल्या फुटक्‍या भांड्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे सत्तारूढ भाजपमधल्या नव्या खासदारांनाही पंतप्रधानांनी अशाच काही कानपिचक्‍या, पण जरा सौम्यपणे व हसत हसत दिल्या.
‘आमच्यातल्या काहीजणांना टीव्हीवाल्यांचे 
ते दांडके (माईक) दिसल्याबरोबर कंठ फुटत असतो. काहींना सकाळपासूनच राष्ट्राला उद्देशून भाषण 
देण्याची सवय लागलेली आहे,’ असे सांगून ते 
म्हणाले, ‘या सवयींवर नियंत्रण ठेवा. टीव्हीवाले, 
रिपोर्टर्स हे तुमची वाट पहात असतात. तुम्ही दिसल्याबरोबर, काय कसं काय वाटतंय, अशा निरुपद्रवी प्रश्‍नाने संवाद सुरू करतात आणि बोलताबोलताच अशा प्रश्‍नांमध्ये गुंगवून टाकतात 
आणि शब्दात पकडून बातमी तयार करतात. या प्रकारांपासून सावध राहा. कुणाही पत्रकाराशी बोलायला जाऊ नका.’
पंतप्रधानांनी एक प्रकारे ते जी गोष्ट करतात तीच त्यांच्या खासदारांनाही करायला सांगितली....... पत्रकारांना टाळा!
काहीजणांना ‘छपास’ आणि ‘दिखास’ या रोगांची लागण झालेली असते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
‘छपास’ म्हणजे नाव छापून येण्याचा रोग!
‘दिखास’ म्हणजे टीव्हीवर चेहरा झळकण्याचा रोग!
या रोगापासून स्वतःला वाचवा असेही त्यांनी खासदारांना सांगितले.
नव्या खासदारांना दिल्लीतल्या चालाख्या सांगायलाही ते विसरले नाहीत.
दिल्लीत आल्यानंतर तुम्ही कधीही न पाहिलेले लोक तुम्हाला थेट स्टेशनवर किंवा विमानतळावरही आणायला आलेले आढळतील. कुणीतरी ही व्यवस्था केलेली आहे, असे तुम्हाला वाटेल. पण त्याला फसू नका, कारण हे लोक पुढे तुम्हाला असे घेरून टाकतात, की त्यांच्या अनुचित हेतूची कल्पना येऊनही तुम्ही त्यांना दूर करू शकत नाही आणि त्याचा तोटा तुम्हाला होतो असे सांगून पंतप्रधानांनी ‘असे हे लोक ही दिल्लीची खासियत आहे,’ अशी टिप्पणी केली व एकप्रकारे दिल्लीकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
सारांश काय?
काँग्रेस असो किंवा भाजप, त्यांच्या 
खासदारांना पत्रकारांशी बोलायला मनाई व प्रतिबंध केले जातात!    
 

संबंधित बातम्या