कट्टा

कलंदर
सोमवार, 1 जुलै 2019

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर... 
 

आळवू राग नाराज!
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सोनिया गांधी यांची निवड झाली. त्यानंतर लोकसभेत काँग्रेस पक्षाचे नेतेपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. गेल्या लोकसभेत काँग्रेसला कर्नाटकात सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे लोकसभेतील पक्षनेतेपद मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सोपविण्यात आले होते. हा निकष मानला असता तर केरळमधील एखाद्या अनुभवी काँग्रेस सदस्याकडे नेतेपद जाणे अपेक्षित होते.
केरळमध्ये काँग्रेसला पंधरा जागा मिळाल्या आहेत. केरळ खालोखाल काँग्रेसला पंजाबमधून जास्त म्हणजे आठ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे केरळ प्रमाणेच पंजाबचादेखील नेतेपदावर दावा विचारात घेण्यासारखा होता.
प्रत्यक्षात भलतेच झाले! पश्‍चिम बंगालमधून निवडून आलेले काँग्रेसचे एकुलते एक खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या गळ्यात ही माळ पडली. हा एक आश्‍चर्याचा धक्काच होता. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशातून निवडून आलेल्या एकुलत्या एक काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांच्याकडे संसदीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली त्याचप्रमाणे बंगालचे एकुलते एक अधीर रंजन यांच्याकडे लोकसभेची जबाबदारी देण्यात आली असावी. 
राज्यसभेतील काँग्रेसचे नेतृत्वही जम्मू-काश्‍मीरचे एकुलते एक खासदार गुलाम नबी आजाद यांच्याकडेच आहे.
बहुधा ‘एकुलता एक’ हा नवा निकष काँग्रेसमध्ये प्रचलित झालेला असावा. पण या निकषामुळे पक्षात नाराजीचा राग काही जण आलापू लागलेले दिसत आहेत.
केरळमधून शशी थरूर किंवा के. सुरेश यांची नावे नेतृत्वासाठी चर्चेत होती. 
पंजाबमधून मनीष तिवारी यांचे नाव पुढे आले होते. प्रत्यक्षात या सर्वांच्या पदरी निराशा आली. आता अधीर रंजन चौधरी यांच्याकडे नेतेपद गेल्यानंतर शशी थरूर काय किंवा मनीष तिवारी काय यांचा सभागृहातील रस संपल्यासारखा दिसत आहे.
विविध विषयांत पारंगत आणि त्यावर बोलू शकण्याची क्षमता या सदस्यांमध्ये आहे. या दोन्ही सदस्यांचे हिंदी व इंग्रजीवर प्रभुत्व आहे. परंतु, काँग्रेसच्या निर्णयकर्त्यांनी त्यांच्या गुणांपेक्षा स्वतःच्या वैयक्तिक आवडीनिवडींच्या आधारे निर्णय करणे पसंत केले आणि आता हे दोन्ही सदस्य लोकसभेत फारसा रस घेत नसल्याचे दिसून येत आहे.
अजूनही वेळ आहे आणि या दोघांना योग्य ते महत्त्व दिल्यास लोकसभेत काँग्रेसची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी या दोन्ही सदस्यांचा उपयोग होऊ शकतो. अन्यथा ‘राग नाराजी’चे सूर काँग्रेस संसदीय पक्षात कायमस्वरूपी रेंगाळत राहतील!


उत्साह नडला?
नव्या लोकसभेचे अधिवेशन नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीने सुरू झाले.
हा शपथविधी सोहळा दोन दिवस चालतो. या सोहळ्यादरम्यान अनेक मजेदार प्रसंगही घडत असतात. शपथविधीच्या वेळी सदस्य हे विविध भाषांमध्ये शपथ घेत असतात. यामध्ये काहीजण संस्कृतमध्ये घेतात. 
पुण्याचे गिरीश बापट यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. अनेक सदस्य आपापल्या मातृभाषेतूनही शपथ घेतात. दक्षिण भारतातील सदस्य हे इंग्रजी किंवा त्यांच्या मातृभाषेत शपथ घेण्यास पसंती देत असतात.
केरळमधील सदस्यदेखील त्यास अपवाद नसतात. त्यामुळे केरळमधील काँग्रेसचे सदस्य के. सुरेश यांनी जेव्हा हिंदीत शपथ घेतली तेव्हा भाजपच्या बाकांवर एकच जल्लोष झाला. सुरेश यांनाही स्वर्ग दोन बोटे उरला! त्याला कारणही होते! 
वरिष्ठ सदस्य या नात्याने त्यांचा लोकसभा अध्यक्षांच्या तालिकेत समावेश झाला होता. त्यामुळे आपण इंग्रजीप्रमाणेच हिंदीही बोलू शकतो हे दाखविण्यासाठी त्यांनी मातृभाषा मल्याळम किंवा इंग्रजीपेक्षा हिंदीला प्राधान्य देऊन आपली क्षमता दाखविण्याचा प्रयत्न केला. पण झाले भलतेच!
कानोकानी आलेल्या माहितीनुसार काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी या सुरेश यांच्यावर चांगल्याच गरम झाल्याचे कळले. हिंदीतून शपथ घेऊन परतलेल्या सुरेश यांची त्यांनी खरडपट्टी काढल्याचे समजले. 
‘एकतर तुम्ही मल्याळम मधून किंवा इंग्रजीतून शपथ घ्यायला हवी होती. यामुळे मेसेज चुकीचा जातो,’ असे त्यांनी सुरेश यांना सुनावले. 
विशेष म्हणजे केरळमधील वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राहुल गांधी यांनी इंग्रजीत शपथ घेतली होती.
दरम्यान, सुरेश यांना बहुधा लोकसभेतील गटनेतेपद मिळेल, या अपेक्षेने खुशीत आलेल्या केरळमधील अनेक काँग्रेस खासदारांनीदेखील सर्वांना प्रभावित करण्यासाठी हिंदीतून शपथ घेण्याचा सराव केलेला होता. पण जसे त्यांना समजले, की सोनिया गांधी यांनी सुरेश यांना त्यांच्या फाजील उत्साहावरून दोन शब्द सुनावले, सर्वांची एकदमच पाचावर धारण बसली!
काय? शपथविधीसाठी नावे पुकारल्यानंतर केरळमधील खासदार मंडळींनी इंग्रजी किंवा मल्याळममधून शपथ घेऊन काढता पाय घेतला! सदस्यांनी शपथ कोणत्या भाषेत घ्यावी याचे स्वातंत्र्य त्यांना असले पाहिजे. 
पण.....! 


हरलेले गिते अद्याप मंत्रीच!
‘मोदी-पर्व क्र.२’ची ३० मे रोजी सुरुवात झाली. या दिवशी पंतप्रधानांसह अन्य केंद्रीय मंत्र्यांचा शपथविधी झाला. म्हणजेच आता हे नवे सरकार अस्तित्वात येऊन जवळपास महिना झाला, असे म्हणण्यास हरकत नाही. संसदेचे अधिवेशन १७ जून रोजी सुरू झाले. मंत्रालयांमध्ये मंत्र्यांची ऑफिसेस असतातच. पण अधिवेशनकाळातही मंत्र्यांच्या सोयीसाठी संसदेत त्यांना ऑफिस किंवा कामकाज कक्ष दिले जातात. यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांना प्रामुख्याने ऑफिससाठी स्वतंत्र खोल्या दिलेल्या असतात. त्यानुसार सार्वजनिक आणि अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनाही कॅबिनेट मंत्री या नात्याने स्वतंत्र खोली मिळाली आहे. ही खोली पूर्वीच्या सरकारमधील याच खात्याचे मंत्री अनंत गिते यांना देण्यात आलेली होती आणि आता तेच खाते आणि तीच खोली सावंत यांनाही देण्यात आलेली आहे. दोघेही शिवसेनेचे नेते आहेत, हे आणखी एक साम्य! हा सर्व सारखेपणा असला तरी एक बाब खटकणारी आहे. प्रत्येक मंत्र्याच्या ऑफिस बाहेर त्याच्या नावाची चकचकीत पितळी पाटी व त्याखाली त्याचे मंत्रिपद याचा उल्लेख असतो. सावंत यांच्या ऑफिसबाहेर जी पितळी पाटी आहे त्यावर मंत्रिपदाचा उल्लेख अचूक आहे....पण नावात मात्र गडबड आहे! या पितळी पाटीवर अजूनही ‘अनंत ग. गिते’ यांचेच नाव कायम आहे.
नवीन सरकार सत्तेत येऊन आता जवळपास महिना झाला, पण संसदेत केंद्रीय अवजड व सार्वजनिक उद्योगमंत्री हे अजूनही ‘अनंत ग. गिते’ हेच आहेत. सावंत हे शिवसेनेचे आहेत. भगवान प्रभू रामचंद्र यांच्याबाबत त्यांचा पक्ष विशेष भावनाप्रधान आहे. रामचंद्र जेव्हा वनवासात गेले, तेव्हा त्यांच्या पादुका अयोध्येच्या सिंहासनावर ठेवून त्यांच्या नावाने त्यांचे धाकटे बंधू भरत यांनी राज्यकारभार केला होता असे प्रचलित आहे. बहुधा अरविंद सावंत हे गिते यांची पाटी कायम ठेवून त्यांच्या नावानेच अवजड व सार्वजनिक उद्योग मंत्रालयाचा कारभार चालवीत असावेत! जय हो!


‘कथनी व करनी’तला फरक..... निःशंक!  
देशाचे नवे मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून रमेशचंद्र पोखरियाल ऊर्फ निःशंक यांची निवड करण्यात आली. काहीशी चकित करणारी अशीच ही निवड म्हणावी लागेल. कारण एकीकडे या देशाचे पंतप्रधान ‘डिजिटल इंडिया’, चांद्रयान, मंगळयान, विज्ञानाची प्रगती, संगणकीय क्रांती अशा बड्या व लंब्याचौड्या गोष्टी करताना आढळतात. पण आता झालेले मनुष्यबळ विकास मंत्री किंवा शिक्षणमंत्री निःशंक यांच्या कारकिर्दीवर नजर टाकता पंतप्रधानांना प्रगती हवी, की पुच्छगती हवी असा प्रश्‍न पडतो. निःशंक यांनी गेल्या लोकसभेत एका भाषणात भारताकडे वेदकाळापासून अणुविज्ञान असल्याचा दावा केला होता. कणाद ऋषींनी त्याचा शोध लावला होता व प्राचीन भारतात अणुस्फोट, अण्विक हत्यारे होती असा दावा केला होता. ज्योतिष हे विज्ञान आहे असेही त्यांनी सांगितले होते. त्यावेळी अर्थमंत्री असलेले अरुण जेटली सभागृहात उपस्थित होते व निःशंक यांच्या वाणीने ते अस्वस्थ झाले. त्यांनी निःशंक यांना असे काही पुराव्याखेरीज बोलत जाऊ नका, असे समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर अत्यंत गंभीरपणे निःशंक यांनी त्यांना सांगितले, की जेटलीसाहेब माझ्याकडे काही पुराण ग्रंथ व पोथ्या आहेत व त्यात ही माहिती देण्यात आली आहे. जेटली अवाक! त्यांनी पुन्हा एकदा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, की किमान संसदेच्या पटलावर अशा प्रकारे बोलणे योग्य नसते वगैरे वगैरे! पण निःशंक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले व पुन्हा पुन्हा त्यांना सांगत राहिले, की ते त्या पोथ्या व ग्रंथ त्यांना दाखवतील. अखेर हताश जेटलींनी त्यांना समजावण्याचा नाद सोडला!
हात जोडले, नमस्कार म्हणाले आणि निरोप घेतला! आता निःशंक यांच्याकडे देशाचे शिक्षण खाते आहे. भारत महान!


इंग्रजीसुद्धा!
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलण्यासाठी भाजपतर्फे ‘ओपनिंग बॅट्‌समन’ म्हणून राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यांना संधी देण्यात आली. ‘ओडिशाचे मोदी’ म्हणून त्यांना भाजपमध्ये ओळखले जाते म्हणे! त्यांची अतिसाधी राहणी व जीवन यावरून त्यांना ही उपाधी देण्यात आल्याचे भाजपमध्ये म्हणतात! हा पण एक विनोदच आहे! कारण देशाच्या पंतप्रधानांची साधी राहणी आहे, हे कोणत्या निकषावरून मान्य करायचे? त्यांचे नाव कोरलेल्या अतिमौल्यवान कोटावरून, रोज नवनवी जाकिटे आणि शाली यावरून? पण या देशाला व्यक्तिस्तोम व उदोउदोचा शाप आहे! तर अशा या अतिसाध्या सारंगी यांची पहिले वक्ते म्हणून निवड कशी झाली?
सारंगी यांना पाच भाषा येतात. हिंदी, इंग्रजी, उडिया, बंगाली व संस्कृत. या भाषा ते सफाईने बोलू शकतात. त्यामुळे बिनाइस्त्रीचे साधे सुती पांढरे कपडे परिधान करणाऱ्या या साध्या माणसालाही अस्खलित हिंदी-इंग्रजी बोलता येऊ शकते, हे दाखविण्यासाठी त्यांना प्रथम वक्‍त्याचा मान देण्यात आला. ओडिशाचे असलेले पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यामार्फत ही खात्री करून घेण्यात आल्याचे समजते. कानोकानी आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी प्रधान यांना सारंगी हे इंग्रजीतून भाषण करू शकतील काय म्हणून विचारणा करण्यास सांगितले. प्रधान यांनी सारंगी यांना फोन केला व तशी विचारणा केल्यावर सारंगी यांनी म्हणे त्यांना पाच मिनिटे अस्खलित इंग्रजीत बोलून दाखविल्यावर त्यांना हिरवा कंदील देण्यात आला. त्यानुसार सारंगी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात प्रथम अस्खलित इंग्रजीत केली. त्यानंतर हिंदीत ते बोलले. त्यांच्या भाषणात ठिकठिकाणी संस्कृत श्‍लोक व सुभाषितांचा मुबलक वापर करण्यात आला. थोडक्‍यात त्यांच्या भाषा येण्याचे एक प्रदर्शन संसदेत मांडण्यात आले. उथळ पाण्याला खळखळाट असतोच. सुमारबुद्धीच्या लोकांबाबत असे घडते. संसदेने अनेक बहुभाषिक नेते व संसदपटू पाहिलेले आहेत. जॉर्ज फर्नांडिस यांना बहुतेक सर्व दाक्षिणात्य भाषा येत होत्या. याखेरीज कोकणी, मराठी, हिंदी व इंग्रजीही ते अस्खलित बोलत. इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व विलक्षण होते. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हेदेखील बहुभाषिक होते. त्यांना किमान आठ ते नऊ भाषा येत होत्या.
पण.... या नेत्यांनी त्याचे कधी प्रदर्शन किंवा बाजार मांडला नाही!

संबंधित बातम्या