कट्टा

कलंदर
सोमवार, 8 जुलै 2019

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...  

नवे अध्यक्ष नव्या पद्धती
लोकसभेच्या अध्यक्षपदी कोटाचे (राजस्थान) लोकप्रतिनिधी ओम बिडला यांची सर्वसंमतीने निवड झाली. ओम बिडला हे हिंदी भाषेबाबत विशेष आग्रही असल्याचे आढळून येते. सभागृहाचे कामकाज ते शुद्ध हिंदीतून चालवतात. प्रश्‍नोत्तराच्या तासात प्रश्‍नकर्त्यांना पुकारताना ते ‘माननीय सदस्य’ म्हणून संबोधतात. राजस्थानचे असल्याने ते ‘स’चा उच्चार ‘श’ असा करतात मत्र्यांनाही ‘माननीय मंत्री महोदय’ असेच पुकारतात.
गेल्या आठवड्यात काही विधेयके संमत करण्यात आली होती. त्यांची मंजुरीची प्रक्रियाही त्यांनी हिंदीतूनच कटाक्षाने पूर्ण केली. उदाहरणच द्यायचे झाल्यास विधेयकाला दिलेल्या विविध दुरुस्त्या किंवा विधेयकाचे एखादे कलम संमत झाल्यानंतर प्रथम आवाजी मत घेण्यात येते. त्यावेळी बहुतेक लोकसभा अध्यक्ष हे इंग्रजीचा आधार घेत असत. कारण ते अधिक सुटसुटीत असते. म्हणजे बाजूने मतदान करणाऱ्या ‘आइज’ आणि विरुद्ध मतदान करणाऱ्या ‘नोज’ म्हटले जाते. ‘आइज’च्या बाजूने निर्णय देताना अध्यक्ष ‘आइज हॅव इट’ असे तीनवेळा म्हणतात. पण ओम बिडला मात्र ही प्रक्रिया हिंदीतूनच करतात आणि ‘निर्णय हां के पक्षमें हुआ’ असे तीनवेळेस म्हणून त्यावर शिक्कामोर्तब करतात. परंतु, ओम बिडला यांनी एक नवा दंडक घातला आहे आणि त्यानुसार कुणाही सदस्याला त्यांनी त्यांच्या आसनापर्यंत येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे एखाद्या सदस्याला काही बोलायचे असल्यास तो सदस्य आसनाच्या खालूनच मार्शलकरवी निरोप देऊन संवाद साधू शकतो. हे जरा ‘अति’ झाल्यासारखे मानले जातेय!
पूर्वीच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन व त्यांच्यात एक साम्य मात्र जरूर आढळते.
विरोधी पक्षांतर्फे देण्यात येणाऱ्या स्थगन प्रस्तावाची एकही सूचना मंजूर न करण्याचा खाक्‍या त्यांनी महाजनांप्रमाणेच पाळण्याची प्रथा चालू ठेवली आहे. हीदेखील फारशी योग्य व उचित पद्धत मानली जात नाही!
असो, एकेकाच्या कामाची तऱ्हा!


राष्ट्रीय पातळीवर फक्त इंग्रजीच?
नव्या सतराव्या लोकसभेत प्रथमच निवडून येणाऱ्या ताज्या चेहऱ्यांची संख्या २६७ आहे.
हे ज्याप्रमाणे ताजेतवाने चेहरे आहेत तसेच स्मृती इराणी, रविशंकर प्रसाद, कनिमोळी यांच्यासारखे राज्यसभेत असलेले पण लोकसभेत प्रथमच येणारे चेहरेही आहेत.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे सदोदित राज्यसभेत राहिले आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अखेरीला म्हणजे २००४ व २००९ मध्ये ते लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर ते राष्ट्रपती झाले.
या लोकसभेत नव्याने आलेली मंडळी विविध क्षेत्रामधली आहेत. तरुण आहेत, उत्साही आहेत आणि त्यांना नव्या जगाचे भरपूर ज्ञानही आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून चांगल्या योगदानाची अपेक्षा केली जात आहे.
या नव्या खासदारांमध्ये डॉक्‍टरही आहेत. महाराष्ट्रातूनच सुजय विखे, प्रीतम मुंडे, श्रीकांत शिंदे, हीना गावित अशांची नावे घेता येतील.
आता असे कानावर आले आहे, की या डॉक्‍टर सदस्यांनी आपला वेगळा असा एक गट स्थापन केला आहे.
या माध्यमातून बहुधा ते वैद्यकीय क्षेत्र, आरोग्य क्षेत्र यातील विषय व मुद्यांवर लक्ष केंद्रित करू इच्छितात.
यातील एका तरुण सदस्य महोदयांना अन्य पक्षाच्या एका खासदार महोदयांनी विचारले, की तुम्ही इंग्रजीत का बोलता?
तुम्ही शपथही इंग्रजीत घेतलीत?
त्यावर या तरुण सदस्य महोदयांनी काहीसे चकित करणारे उत्तर दिले. ते म्हणाले, ‘आता संसदेत खासदार म्हणून निवडून येणे म्हणजे राष्ट्रीय पातळीवर तुम्ही येता. राष्ट्रीय पातळीवर आल्यावर इंग्रजीतूनच बोलणे आवश्‍यक आहे आणि मी तर इंग्रजीतच बोलणार आहे!’
प्रश्‍न विचारणाऱ्या खासदारांची बोलतीच बंद झाली. ‘व्वा व्वा’ करत त्यांनी काढता पाय घेतला.
हे तरुण खासदार महोदय भाजपचे आहेत आणि पंतप्रधानांपासून सर्वच भाजप नेत्यांचा हिंदीतून बोलण्यावर कटाक्ष असतो. अर्थात याचा अर्थ इंग्रजीवर बंदी असा नव्हे, परंतु भाजपमध्ये मुख्यतः हिंदीकडे अधिक प्रभावी कल असतो.
हे सर्व अद्याप नव्यानेच भाजपमध्ये आलेल्या या तरुण उत्साही खासदार महोदयांना कळले नसावे.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याचाच हा प्रकार!
हळू हळू येतील जागेवर!
आणखी एका खासदारांचा किस्सा असाच आहे!
त्यांना राज्यसभेत येऊन वर्षाहून अधिक काळ झाला. अद्याप ते एकदाही तोंड उघडू शकलेले नाहीत!
ते काँग्रेसमध्ये आहेत.
त्यांनी सुरुवातीपासून एक पण केलाय, की राज्यसभेत बोलायला सुरुवात करायची ती अशा एखाद्या जोरदार विषयावर की त्या भाषणाने खळबळ माजायला हवी!
हे सर्व ठीक आहे. पण अशी ते किती काळ वाट पहात बसणार?
या त्यांच्या प्रतिज्ञेमुळे अद्याप ते ‘मौनी खासदार’च राहिले आहेत.
एकेकाच्या वेगळ्या तऱ्हा! 


बदलता काळ, नया भारत?
पंतप्रधान हल्ली नेहमीच ‘नया भारत’, ‘न्यू इंडिया’ची चर्चा करताना आढळत असतात.
त्यांच्या नेतृत्वाखालील भारतात कोणते नवे बदल झालेत याचे संदर्भ देऊन ते या ‘नव्या भारता’चे वर्णन करीत असतात. परंतु, संसदेतही एक ‘नया भारत’ अवतीर्ण होताना आढळत आहे. सतराव्या लोकसभेत नव्या चेहऱ्यांचा एक जबरदस्त पगडा आढळून येतो. ही नवी मंडळी साधीसुधी नाहीत. विविध क्षेत्रातील अग्रगण्य मंडळींचाही त्यांच्यात समावेश आहे. कुणी वैद्यकीय क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेले आहे. तर कुणी उद्योग किंवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली अग्रगण्य व्यक्ती आहे. या नव्या मंडळींचा आर्थिक स्तरही चांगलाच उच्च आहे.
संसदेत खासदारांच्या वाहनांवर नजर टाकली असता त्यांचा उच्च आर्थिक वर्ग ध्यानात येऊ शकतो. बदलत्या भारतातून पूर्वीच्या अनाकर्षक अशा फियाट किंवा प्रिमिअर आणि अँबेसिडर मोटारी आता हद्दपार झाल्या आहेत. त्यांची जागा आता अत्यंत महागड्या अशा आलिशान मोटारी किंवा नव्या परिभाषेत ‘एसयूव्ही’नी घेतलेली आढळते. राजीव गांधी यांना जॉर्डनचे राजे हुसेन यांनी आलिशान मर्सिडिझ मोटार भेट दिली होती. ती त्यांनी सरकारजमा केली पण ते स्वतः ती चालवत संसदेत येत असत. त्यानंतरच्या पंतप्रधानांनी पुन्हा अँबेसिडर मोटारी वापरणेच पसंत केले, परंतु दहशतवादी धोक्‍याचे प्रमाण वाढत जाऊ लागले. त्यानुसार पंतप्रधानांसाठी सर्व सुरक्षा उपायांनी सिद्ध अशी बीएमडब्ल्यू मोटार वापरण्यात येऊ लागली. संसदेच्या वाहनतळावर एक नजर टाकल्यास बीएमडब्ल्यू, जीप, लॅंडरोव्हर, रेंज रोव्हर, मर्सिडिझ, टोयोटा, जग्वार अशा परदेशातील भारी व महागड्या गाड्या आढळून येतात. एक केंद्रीय राज्यमंत्री मात्र अजूनही सायकलवर येतात. त्यांचे नाव आहे मनसुखभाई मंडाविया. त्यांच्या सायकलवर त्यांच्या नावाची पाटी लिहिलेली आहे. संसदेच्या वाहनतळावर मोटार असल्याप्रमाणे ते सायकल लावतात. हाच नवा भारत!


देशभक्तीची ही सक्ती, बंधन की आणखी काही?
संसदेत अनेक दालने आहेत जेथे संसदसदस्य, मंत्री, वरिष्ठ पत्रकार बसत असतात, एकमेकाला भेटत असतात. अशाच एका दालनात भाजपचे काही खासदार आणि पत्रकार गप्पा मारत बसले होते. इतर रिकाम्या आसनांवर अन्य काही मंडळीही बसलेली होती. तेथेच असलेल्या टीव्हीवर क्रिकेटच्या मॅचचे प्रसारण सुरू झाले. त्या मॅचच्या आधी राष्ट्रगीत गायले जाऊ लागले. त्याबरोबर एक-दोन मंडळी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभी राहिली. त्या दालनात या प्रसंगावरून काहीसा गोंधळ निर्माण होताना आढळून आला.
टीव्हीवर राष्ट्रगीत सुरू झाले म्हणून या दालनात कुणी उभे रहावे की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. परंतु, भाजपच्या खासदार मंडळींची पाचावर धारण बसली. ते झटक्‍यात उभे राहिले आणि ताठ मान करून राष्ट्रगीत पूर्ण होईपर्यंत उभे राहिले. खाली बसल्यानंतर ते पत्रकारांना म्हणाले, ‘तुमचं ठीक आहे हो, तुम्ही उभे राहिला नाहीत तर कुणी तुम्हाला विचारणार नाही. इकडे तर सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे असतात. उगाच आम्ही राष्ट्रगीताला उभे राहिले नसल्याचे त्यात दिसायचे आणि आमची ऐशीतैशी व्हायची!’ आता पत्रकारांवर अवाक्‌ होण्याची पाळी आली! एवढी सक्ती? भीती? टीव्हीवर राष्ट्रगीत लागल्यावर उभे रहायचे?
एका पत्रकाराने लगेचच या भाजप खासदारांना टोकले, ‘घरी पण असे राष्ट्रगीत लागल्यावर उभे राहता काय?’ ‘जाऊ द्या की राव, आणखी आमची किती खरडाल?’ म्हणून खासदारांनी विषय बदलला! हे चित्र अस्वस्थ करणारे आहे. देशभक्ती हा प्रदर्शनाचा विषय नाही. ती अंतःकरणात असावी लागते. पण सध्याच्या देखावेबाज वातावरणात या नाटकीपणाचीच चलती आहे!
भारत महान!


नशीबवान जयशंकर?
काही माणसे नशीब घेऊन येतात असे म्हणणे भाग पडते.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे त्या माणसातले एक असे म्हणावे लागेल. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी.... फार पूर्वी नाही हो, २०१४ ते २०१९ या काळात देशाचे पंतप्रधान जेव्हा परदेशात जात तेव्हा ते एकटेच जात असत.
सुषमा स्वराज त्या काळात परराष्ट्रमंत्री होत्या.परंतु, त्यांना एकदाही पंतप्रधानांबरोबर परदेशात जाण्याची किंवा परदेशात पंतप्रधानांसमवेत शिष्टमंडळात बसण्याची संधी मिळाली नव्हती.
आता पंतप्रधानांच्या भाषेचाच आधार घ्यायचा झाल्यास, ‘पिछले सत्तर साल में.........’ म्हणजे गेल्या सत्तर वर्षांत असे घडलेच नव्हते!
बिचाऱ्या सुषमा स्वराज यांना फक्त पंतप्रधान परदेशदौऱ्यावर जातील तेव्हा त्यांना विमानतळावर जाऊन निरोप देणे आणि परतल्यानंतर त्यांचे स्वागत करणे आणि त्यांच्या वतीने संसदेत त्या दौऱ्यांवर निवेदन करणे एवढीच कामे होती.
परंतु, आता जयशंकर यांच्यासारखा अंतर्बाह्य मुत्सद्दी परराष्ट्रमंत्री झालेला असल्याने स्थितीत बदल झाला आहे.
जयशंकर भले पंतप्रधानांबरोबर त्यांच्या विमानातून जात नसतील. परंतु, त्या परदेश दौऱ्यातच नव्हे तर शिष्टमंडळातदेखील समाविष्ट असतात. ज्याप्रमाणे ए. के. दोभाल पंतप्रधानांच्या एका हाताला बसतात आता त्याचप्रमाणे दुसऱ्या हाताला जयशंकर यांना जागा मिळू लागली आहे.
जी-२० राष्ट्रसमूहाच्या ओसाका (जपान) येथे झालेल्या शिखरपरिषदेसाठी पंतप्रधान गेले होते. जयशंकर एक दिवस आधीच पूर्वतयारीसाठी तेथे गेले होते आणि पंतप्रधान तेथे पोचल्यानंतर त्यांच्या शिष्टमंडळात सहभागी झाले.
खरोखरच जयशंकर नशीबवानच, नाही का?

संबंधित बातम्या