कट्टा

कलंदर
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

कट्टा
राजकारणातही गमती जमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...

अजि मी ब्रह्म पाहिले?
एके दिवशी ब्रह्मांडनायक ऊर्फ युगपुरुष महोदयांना आपल्या पक्षाच्या महिला लोकप्रतिनिधींना भेटण्याची इच्छा झाली. 
सर्व महिला सदस्य विलक्षण आनंदित झाल्या, की त्यांना साक्षात ब्रह्मांडनायकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळणार आहे. 
काय? आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे 
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे....  
अगदी ठेवणीतले कपडे घालून जाणे हेही क्रमप्राप्त होणारच ना? तो दिवस उजाडला! 
सर्व महिला लोकप्रतिनिधी जमल्या. त्यांची संख्या भरपूर होती. 
ब्रह्मांडनायकांना प्रत्यक्ष भेटण्याचा तो सुयोग असल्याने बहुतेक लोकप्रतिनिधींनी फुले, गुच्छ आणि इतरही काही लहानमोठ्या प्रतीकात्मक भेटवस्तू आणल्या होत्या. 
ब्रह्मांडनायकांजवळ जाऊन प्रत्येकाने नाव व ओळख सांगण्याचा कार्यक्रम सुरू झाला. कुणी गुलाबाचे फूल दिले. कुणी आणखी काही! 
ओळख करून दिल्यानंतर ब्रह्मांडनायकांच्या प्रशस्तीपर काही शब्द बोलण्याचा उपक्रमही झाला. 
कानोकानी आलेल्या माहितीनुसार, एका लोकप्रतिनिधींना तर, ‘सर आप मेरे मेहबूब है’, असे म्हटले. 
कुणीतरी आपल्यासारखे नेतृत्वच गेल्या कित्येक वर्षांत झालेले नाही आणि पुढे होणार नाही असे म्हटले. 
एकदा सुरुवात झाल्यानंतर मग स्तुतिसुमनांची उधळणच सुरू झाली. 
ब्रह्मांडनायक मंदमंद हसत या सर्वाचा आस्वाद घेत होते. 
मंडळी स्थानापन्न झाली. 
ब्रह्मांडनायकांनी त्यांना त्यांच्या सार्वजनिक कामाबद्दल विचारणा केली. 
जवळपास ९९ टक्के मंडळाने कामापेक्षा ब्रह्मांडनायकांच्या स्तुतिपाठाचे वाचन केले. 
यातील एक-दोन लोकप्रतिनिधींनी मात्र गंभीरपणे आपल्या सार्वजनिक कामाची रूपरेषा सांगितली. त्याचप्रमाणे आपण चालवीत असलेल्या काही स्वयंसेवी कामांचाही उल्लेख केला. 
ज्या बोटावर मोजता येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने कामाची माहिती दिली त्यांना आशा वाटत होती, की या देखावेबाजांपेक्षा ब्रह्मांडनायक आपली अधिक दखल घेतील. 
पण पूर्ण अपेक्षाभंग! ब्रह्मांडनायक त्या देखावेबाजांच्या स्तुतीने एवढे भारावून गेले होते, की त्यांच्यातच मिसळून रमून गेले. आपल्याला फॅशन आणि इतरही आधुनिक गोष्टींची किती माहिती आहे हे दाखवताना त्यांनी विनोद करून या देखावेबाज मंडळाला खुदुखुदु हसवलेदेखील! ‘कित्ती त्यांनाही माहिती आहे नाही?’ अशा लटक्‍या गोष्टीही झाल्या. 
जी मंडळी गंभीर कामांची माहिती घेऊन गेली होती, ती मात्र खट्टू झाली. पण करणार काय? ब्रह्मांडनायकांनाही अशा गोष्टी आवडतात ना? 


अखेर मिळाला न्याय?
‘जायंटकिलर’ किंवा ‘महा-मारक’ म्हणून ज्यांचे वर्णन केले जाते त्या स्मृती इराणी यांना नव्या सरकारमध्ये वजनदार व प्रकाशझोतातले खाते मिळेल अशी अपेक्षा होती. 
पण कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक? 
त्यांच्याकडे पूर्वी वस्त्रोद्योग मंत्रालय होते तेच कायम ठेवण्यात आले. फक्त महिला व बालविकास खात्याची जोड त्याला देण्यात आली. 
एकप्रकारे अन्यायच नाही का? 
एवढे राहुल गांधी यांना त्यांच्या मैदानात जाऊन धूळ चारल्यानंतरही त्यांना चांगले वजनदार खाते मिळू नये? 
हा हंत हंत! खरे तर त्यांना साक्षात युगपुरुषांचा आशीर्वाद प्राप्त असूनही असे का? पण आता क्रमांक दोनचे नेतेही काही कमी पॉवरफुल्ल नाहीत! त्यांचा म्हणे विरोध होता असे कानावर आले. 
पण अखेर मुख्य नायकाच्या हातात काही तरी अधिकार राखलेले असतातच ना! 
लोकसभेतील नव्या सदस्यांना आसन क्रमांक देण्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली. 
असे कळले की पंतप्रधानांनी स्वतः त्यात लक्ष घातले. 
खरे तर हा लोकसभा अध्यक्षांचा अधिकार असतो, पण पंतप्रधान म्हणे एवढे काटेकोर की कुणी कुठे बसायचे याचे तपशीलदेखील त्यांनीच ठरवले. 
तर सत्तापक्षाच्या पहिल्या लायनीत ज्यांना आसने प्राप्त झाली त्यात राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी वगैरे मंडळी तर आहेतच, पण स्मृती इराणी यांनाही पहिल्या रांगेतच आसन देण्यात आले. 
पूर्वी सुषमा स्वराज या भाजपच्या लोकसभेतील पहिल्या रांगेच्या मानकरी होत्या. 
आता बहुधा ती जागा स्मृती इराणी यांना प्रदान करण्यात आली असावी. 
निर्मला सीतारामन या अर्थमंत्री असल्या तरी राज्यसभेच्या सदस्य असल्याने त्यांना लोकसभेत आसन क्रमांक नाही. 
तेव्हा स्मृती इराणी यांना अखेर दिलासा मिळाला! 
‘महा-मारक’ होऊनही वजनदार मंत्रालय न मिळाल्याने त्यांना दुर्लक्षित केल्याचे जे चित्र निर्माण झाले होते, ते यामुळे पुसले गेले असे म्हणायला हरकत नसावी! 
त्यांच्याकडे लक्ष आहे हे यामुळे अधोरेखित झाले! 


अघोषित सेन्सॉरशिप?
खरोखरच काहीतरी वेगळ्याच गोष्टी घडायला लागल्या आहेत. कानोकानी आलेल्या माहितीनुसार असे समजले, की हल्ली सायंकाळी व रात्री निरनिराळ्या वृत्तवाहिन्यांवर जी चर्चांची गुऱ्हाळे सुरू असतात त्याचे विषय काय असले पाहिजेत हे सुचविण्याची जबाबदारी काही व्यक्तींवर सोपविण्यात आली आहे. रोज संध्याकाळी या व्यक्तीचे फोन या वाहिन्यांना जातात आणि त्यानुसार चर्चा सुरू होते. अलीकडेच उत्तर प्रदेशातील एक भाजप आमदार व जो मुख्यमंत्र्यांच्या जवळचा मानला जातो व जो अल्पवयीन दलित मुलीच्या बलात्काराबद्दल तुरुंगात आहे त्याचे एक प्रकरण गाजले. ही मुलगी तिच्या तुरुंगातील काकांना (तेही खोट्या आरोपाखाली तुरुंगात आहेत) भेटायला चालली असता तिच्या मोटारीला एका ट्रकने उडवले. मोटार चालविणारे तिचे वकील व ती स्वतः गंभीर जखमी होऊन मरणासन्न झाले व तिच्या दोन मावश्या मृत्युमुखी पडल्या. हे ‘कांड’ या आमदाराने तुरुंगातूनच घडविले असा आरोप होऊ लागला आणि भाजपवर शिंतोडे उडायला लागले. 
वाहिन्यांना सनसनाटी विषय मिळाला. यात भाजपलाच नव्हे तर होणाऱ्या बदनामीच्या झळा पार दिल्लीतल्या शीर्षस्थ नेत्यांना बसू लागल्या. पण काही ‘स्वामिनिष्ठ’ वाहिन्यांनी मात्र या आमदाराच्या बातम्या न देता काश्‍मीर आणि इतर बातम्यांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली. असे का म्हणून चौकशी केली असता, दबक्‍या आवाजात मिळालेल्या माहितीनुसार रोज सायंकाळी चर्चेला विषय काय घ्यायचा याची ‘सूचना’ येते. एवढेच नव्हे तर त्यासाठीचे वक्तेही सुचविले जातात. हे विषय प्रामुख्याने राष्ट्रवाद, हिंदुत्व, काश्‍मीर, दहशतवाद, सुरक्षा अशा स्वरूपाचे असतात. जेणे करून धार्मिक ध्रुवीकरण व्हावे आणि लोकांमधला मुस्लिमविरोध वाढावा अशा प्रकारचे असतात. बहुसंख्याक अनुनयाचे हे विषय असतात. बहुसंख्याकवादाला गोंजारणारे हे विषय असतात. 
याला काय म्हणायचे? अघोषित सेन्सॉरशिप? भारत महान! 


चलते रहो, चलते रहो... चरैवेति चरैवेति... ! 
सतराव्या लोकसभेसाठी निवडणूक झाली. सत्तापक्षाला पुन्हा आधीपेक्षा अधिक मोठे बहुमत मिळाले. नवे सरकार पुन्हा प्रस्थापित झाले. पण आधीच्या सरकारमध्ये असलेल्या अनेक मंत्र्यांना यात स्थान मिळू शकले नाही. साहजिकच ती मंडळी खट्टू होणे स्वाभाविक होते. अशी अनेक नावे आहेत. सुरेश प्रभू, राधामोहनसिंग, महेश शर्मा, विजय गोयल, राज्यवर्धन राठोड, अनुप्रिया पटेल, सुरेंद्रसिंग अहलुवालिया वगैरे वगैरे. असे असले तरी काही अपवाद असतातच, की जे नाराज झालेले नाहीत. विजय गोयल आणि महेश शर्मा यांचा त्यात समावेश होतो. 
मंत्रिपद न मिळूनही गोयल यांनी पंतप्रधान निष्ठा सोडलेली नाही. ते त्यांच्या व त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या समर्थनार्थ दिल्लीमध्ये विविध मोहिमा करीत असतात. त्यामुळेच काहीशा संतुष्ट पंतप्रधान साहेबांनी एकदा संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर गोयल यांच्या पाठीवर थाप देऊन इतर खासदारांना ऐकवले, ‘पहा यांना मंत्रिपद मिळाले नसले, तरी नाउमेद न होता ते पक्षाचे काम निष्ठेने करीतच आहेत. त्यांचा कित्ता इतरांनी गिरवावा!’ गोयल यांच्यासाठी याहून आणखी शाबासकी काय असावी? 
नुकतीच लोकसभेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापनाविषयक विधेयक संमत करण्यात आले आणि त्यामध्ये महेश शर्मा - जे स्वतः एक डॉक्‍टर आहेत - यांना समर्थन भाषणासाठी उभे करण्यात आले आणि त्यांनी जोरदार भाषण करून विधेयकाचे समर्थन केले. सुरेश प्रभू हे तर विविध विषयात प्रवीण आहेत. राज्यसभेत ते पहिल्या रांगेतच बसतात. त्यामुळेच अर्थसंकल्पावरील चर्चेची सुरुवात त्यांनी केली. पर्यावरण, वाणिज्य, रेल्वे आणि अर्थातच आर्थिक व वित्तीय विषयांवर बोलण्यासाठी सरकारतर्फे त्यांनाच ‘प्रथम फलंदाजी’साठी उभे करण्यात येते. आता या मंडळींचे हे श्रम वाया जाणार नाहीत अशी अपेक्षा आहे. कारण पंतप्रधानसाहेबांना येत्या काही काळात मंत्रिमंडळाचा विस्तार हा करावाच लागणार आहे. अनेक मंत्र्यांकडे अतिरिक्त खाती आहेत व त्यामुळेच फेरबदल व विस्तार करावाच लागणार आहे. त्यावेळेस आपल्यालाही संधी मिळावी म्हणून बहुधा मंडळी ही ‘राजकीय गुंतवणूक’ करीत असावीत! जय हो! 


वाढता वाढे ... पण शून्यमंडळ भेदणार का? 
सध्या गृहमंत्र्यांचा राजकीय आलेख चढत्या क्रमाने वर जात आहे! काश्‍मीरविषयक विशेष दर्जाचे कलम ३७० रद्द करण्याचा तुरा त्यांच्या जरीपटक्‍यात खोवला गेला आहे. कानोकानी आलेल्या माहितीनुसार आता विविध गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. आता काही मंडळी असेही सांगतात, की त्यांनी स्वतःहूनच गृहमंत्रिपद स्वतःकडे घेतले व त्यामुळेच आयत्यावेळी राजनाथ सिंह यांना संरक्षणमंत्री करावे लागले. आता असेही कळते, की देशांतर्गत सुरक्षेसह अनेक निर्णयांचे शिल्पकार हे गृहमंत्रीच आहेत! 
विशेष म्हणजे गृहमंत्र्यांचेही काही आवडते आणि काही नावडते लोक आहेत. सध्या गृहमंत्र्यांना आवडणाऱ्या लोकांची चांगलीच चलती आहे. 
अलीकडेच रा. स्व. संघ आणि भाजपमधील एक वजनदार व्यक्ती म्हणून गणले जाणारे माजी पत्रकार व सध्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे प्रमुख राम बहादूर राय यांना ‘हिंदी रत्न’ पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हे पारितोषिक मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निःशंक यांच्या हस्ते देण्यात येणार होते. 
पण निःशंक हे त्या कार्यक्रमाला आलेच नाहीत. सुमारे तासभर त्यांची वाट पाहून कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि उपस्थित लोकांतर्फे व त्यातील काही प्रतिष्ठितांतर्फे हे पारितोषिक देण्याचे ठरविण्यात आले. 
परंतु निःशंक आले का नाहीत? 
निःशंक हे गृहमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात व त्यामुळेच वादग्रस्त असूनही त्यांना अत्यंत महत्त्वाचे खाते देण्यात 
आले. त्यामुळेच राम बहादूर राय यांच्यासारख्यांनाही फारसे महत्त्व न देण्याचे धाडस त्यांनी दाखवले अशी कुजबुज कानावर येत आहे!    

संबंधित बातम्या