कट्टा

कलंदर
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

कट्टा
राजकारणातही गमती जमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...    

ही टिक टिक थांबली का? 
घड्याळ, घड्याळाचे काटे, घड्याळाचा टिक टिक असा आवाज यांना लोकांच्या मनात एक वेगळेच स्थान आहे. बॉलिवूडने तर या प्रतीकाचा शृंगारासाठी विलक्षण प्रभावी असा वापर केल्याची अनेक उदाहरणे आहेत. ‘मेरी दिल की घडी, करे टिक टिक बजे रात के बारा’ हे गाणे असो, की ‘बारा बजे की सुईयों जैसे हम दोनो मिल जाए,’ यासारखे गाणे असो; घड्याळ नावाच्या वस्तूने किंवा समयदर्शक उपकरणाने मानवी जीवनात अविभाज्य असे स्थान प्राप्त केलेले आढळते. पाश्‍चात्त्य सिनेमांमध्येदेखील लंडन मधील ‘बिग बेन’ या घड्याळ-स्तंभाचा वापर अनेकवेळेस प्रभावीपणे केला गेला. लंडनची किंवा ब्रिटनची ओळख म्हणजे बिग बेन असे समीकरणच तयार झाले. 
मुंबईतील राजाबाई मनोऱ्याने असेच स्थान मिळवले होते. पण हा विषय निघाला कसा? ते सांगायचेच राहून गेले! स्वातंत्र्यानंतर भारतीय लोकांच्या जीवनात आकाशवाणीने असेच अभिन्न असे स्थान प्राप्त केले होते. दुर्गम भागातही आकाशवाणीच्या माध्यमातून लोक जगाच्या संपर्कात रहात असत. तर या आकाशवाणीने लोकांनी उत्तमोत्तम कार्यक्रम देण्याबरोबरच अचूक भारतीय प्रमाणवेळेचीही सवय लावली. 
लोक आकाशवाणीच्या वेळेनुसार आपापल्या घड्याळांच्या वेळा लावत असत. राजधानी दिल्लीत आकाशवाणीचे मुख्यालय संसद भवनाच्या परिसरात आहे. या पारंपरिक पद्धतीचे बांधकाम असलेल्या इमारतीच्या मध्यभागी दुसऱ्या मजल्यावर घड्याळ लावण्यात आले आहे. 
कित्येक वर्षे ते घड्याळ अचूक वेळ दाखवीत आपले कर्तव्य पार पाडत होते. बदलत्या काळानुसार हे घड्याळ बदलले जाणार काय असे वाटू लागले होते. परंतु, हे घड्याळ आहे त्याच स्थानी विराजमान राहिले व देशाला समयदर्शन करीत राहिले. परंतु, एवढ्या वर्षांनंतर बहुधा या समयदर्शकाचे आरोग्यही काहीसे बिघडले असावे. जवळपास महिना झाला, हे घड्याळ बंद पडलेल्या अवस्थेत आहे. ही बाब आकाशवाणीच्या उच्चपदस्थांच्या नजरेस आणून देण्यात आली. परंतु, त्यांनाही यात फारसा रस नसावा. हे घड्याळ बंद पडले असले, तरी आकाशवाणीतर्फे समयसूचनांचे काम अव्याहत सुरू आहे, त्यात खंड नाही. परंतु, शेवटी जीवनात प्रतीकांनाही महत्त्व असतेच ना! आकाशवाणीच्या वरील मजल्यावर लोकांच्या नजरेत येईल अशा रीतीने स्थानापन्न झालेला हा समय प्रहरी किंवा समयदर्शक अद्याप नादुरुस्त अवस्थेत पडून आहे. 
त्याला दुरुस्त करून नवी चालना देण्याची आवश्‍यकता आहे. 
तोपर्यंत वाट पाहूया! 


सामूहिकता की गटबाजी? 
काँग्रेस पक्षातील अनागोंदी, गोंधळ थांबण्याची चिन्हे काही दिसत नाहीत! सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपद स्वीकारलेले असले, तरी अद्याप पक्षाची घडी बसण्यासाठी काही काळ लागेल असे दिसते. तोपर्यंत पक्षात अनेक विनोदी प्रसंग घडतील हे गृहीत धरावेच लागेल. नुकताच भारतीय स्वातंत्र्यदिनाचा वर्धापनदिन साजरा झाला. १५ ऑगस्ट रोजी! तो साजरा करण्यासाठी या दिवशी अनेक ठिकाणी ध्वजारोहण, झेंडावंदनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. 
राजकीय पक्षांतर्फे तर विशेष जोरात हे कार्यक्रम केले जातात आणि गल्लोगल्लीच्या नेत्यांना तर स्वप्रसिद्धीची ही एक पर्वणीच असते. तर, दिल्ली प्रदेश काँग्रेसतर्फेही यावर्षी ध्वजारोहण व झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दुर्दैवाने दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांचे नुकतेच निधन झाल्यानंतर अद्याप नवीन अध्यक्षांची नेमणूक झालेली नसल्याने प्रदेश काँग्रेस बिगर-अध्यक्ष आहे. 
ध्वजारोहणाचा मान अध्यक्षांचा असतो, पण अध्यक्षच नसतील तर करायचे काय? दिल्ली प्रदेश काँग्रेसचे तीन कार्याध्यक्ष आहेत. हरून युसूफ, राजेश लिलोथिया आणि देवेंद्र यादव अशी या तीन कार्याध्यक्षांची नावे आहेत. अध्यक्ष नाहीत तर मग या तिघांपैकी कुणी ध्वजारोहण करायचे असा प्रश्‍न निर्माण झाला. प्रत्येकाने ‘मी,’ ‘मी,’ ‘मी’ करायला सुरुवात केली. ध्वजारोहणासाठी आपणच कसे पात्र आहोत हे सांगण्याची अहमहिकाही लागली. अखेर हरून युसूफ यांनी ज्येष्ठतेचा मुद्दा उपस्थित केला. शीला दीक्षित यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. तसेच दीर्घकाळ प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, दिल्ली विधानसभेत आमदार वगैरे वगैरेची यादी त्यांनी वाचली आणि सर्वांत ज्येष्ठ या नात्याने तेच झेंडा फडकवतील असा दावा त्यांनी केला. 
काही वर्षांपूर्वी सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात गेल्या असता त्यांनी काँग्रेस महासमितीमधील सर्वांत ज्येष्ठ सरचिटणीस व खजिनदार मोतीलाल व्होरा यांना ध्वजारोहण करण्यास सांगितले होते. त्याचा दाखलाही देण्यात आला. यावरून प्रदेश काँग्रेसमध्ये घनघोर वादविवाद होऊ लागले आणि गोष्टी हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागताच सर्वांनी मिळून एक नवीच शक्कल शोधून काढली. असे ठरविण्यात आले, की तिघांनी मिळून ध्वजारोहण करायचे! एक झेंडा तीन हात! खरंतर प्रत्येकी दोन म्हणजे सहा हात म्हणायला लागेल! तर १५ ऑगस्टला दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. ध्वजारोहणाच्या वेळी तिन्ही कार्याध्यक्षांनी ध्वजारोहणाची दोरी एकत्रितपणे ओढून ध्वजारोहण केले. ते दृश्य पाहून कार्यकर्त्यांमध्ये काहीशी खसखस पिकली. पण राजकारणी मंडळी कशातून काय काढतील हे सांगता येत नाही. आता आधीच्या भांडणाची गोष्ट राहिली बाजूला. पक्षात सामूहिक नेतृत्व कसे आहे आणि कशा एकजुटीने पक्षाने हा कार्यक्रम केला, अशा फुशारक्‍या मारण्याचे कामही सुरू झाले आहे. 
धन्य धन्य ते राजकीय पुढारी! 


चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण होणार?
पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी ज्या विविध घोषणा केल्या. त्यात त्यांनी तिन्ही सेनादलांसाठी मिळून एका ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ-सीडीएस’चे पद निर्माण करण्याचा निर्णयही जाहीर केला. 
ही संकल्पना आजची नाही. यापूर्वीही त्याबाबतचा प्रस्ताव झालेला होता. अनेक समित्यांनी त्यांच्या अहवालातही त्याचा उल्लेख केलेला आढळतो. यापूर्वीच्या सरकारांनीही ही संकल्पना राबविण्याचे प्रयत्न केले होते. आता सध्याचे पंतप्रधान हे निर्णय करण्यात पटाईत असल्याने आता ‘सीडीएस’पदी कोणाची नेमणूक होणार याबाबत सर्वत्र अटकळबाजी सुरू झाली आहे. 
साहजिकच स्वातंत्र्यदिनाच्या सायंकाळी राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या ‘ॲट होम’ कार्यक्रमात हा चर्चेचा विषय ठरला. सर्वसाधारण चर्चेचा सूर वर्तमान सेनाप्रमुख जनरल बिपिन रावत यांना अनुकूल असल्याचा आढळून आला. 
सध्या तिन्ही सेनाप्रमुखांमध्ये जनरल रावत हे वरिष्ठ किंवा सेवाज्येष्ठ आहेत. त्यामुळे या पदासाठी त्यांचा विचार प्राधान्याने होऊ शकतो असे अनेकांचे मत पडले. या चर्चेमुळे या कार्यक्रमाच्या वेळी जनरल रावत यांच्याबरोबर सेल्फी घेणाऱ्यांची संख्या वाढलेली आढळून आली. राष्ट्रपतींचे माहिती व प्रसिद्धी सचिव अशोक मलिक यांनी यात आणखी एका मुद्याची भर घालून चर्चेला वेगळे वळण दिले. हे पद नव्याने निर्माण होणार असल्याने सरकारी पदांच्या मालिकेत या पदाचे स्थान कोणते राहणार? कॅबिनेट किंवा मंत्रिमंडळ सचिवांच्या बरोबरीचे राहणार, की त्याचा दर्जा राज्यमंत्र्यांचा राहणार याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे मलिक यांचे म्हणणे पडले. थोडक्‍यात याबाबतच्या तांत्रिक बाबींची अद्याप निश्‍चित अशी सोडवणूक झालेली नाही. 
याचा अर्थ एवढाच, की यासाठी काही काळ लागू शकतो. पण या चर्चेमुळे जनरल रावत यांची या कार्यक्रमातली ‘डिमांड’ फारच वाढलेली होती! 


गेल्या पाच वर्षांत जे होऊ शकले नाही... 
जम्मू-काश्‍मीरला विशेष सवलती देणाऱ्या राज्यघटनेच्या कलम ३७० मधील तरतुदी व कलम ३५(अ) रद्द करण्यात आले. 
सतराव्या लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात हे काम करण्यात आले. 
ज्या विजेच्या वेगाने हे विधेयक संसदेत सादर करून तातडीने मंजूर करण्यात आले, ती गती व योजना व तिची आखणी हे वाखाणण्यासारखे होते. या सर्व कृतीचे शिल्पकार गृहमंत्री अमित शहा होते यात शंका नाही. या त्यांच्या धडाडीमुळे त्यांच्याबद्दल सर्वत्र आणि विशेषतः भाजपमध्येच त्यांची वेगळी प्रतिमा निर्माण होऊ लागली आहे. निर्णायक आणि धडाडीचा नेता असे त्यांना मानले जाऊ लागले आहे. खऱ्या अर्थाने देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे वारसदार, ‘नवे पोलादी पुरुष’ अशी त्यांची वर्णनेही होऊ लागली आहेत. 
स्वाभाविकपणे त्यांच्या व पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीबाबतही चर्चा सुरू झाल्यास ते आश्‍चर्यकारक मानता येणार नाही. ती सुरूही झाली आहे. काहीजणांनी तर गेल्या पाच वर्षांत मोदी यांच्याकडेही पूर्ण बहुमत असतानाही त्यांनी हे धाडसी पाऊल उचलले नाही, पण दुसऱ्यांदा सत्तेत येताच पहिल्याच अधिवेशनात अमित शहा यांनी हे करून दाखवले अशी चर्चा कानी पडू लागली आहे. 
असे असले तरी अमितभाई हे फार सावध आहेत. 
कुणी त्यांची फार प्रशंसा करू लागताच ते तत्काळ ती थांबवतात. 
खुद्द संसदेतही काही सदस्यांनी हा प्रकार केला होता. तेव्हा अमितभाईंनी तत्काळ त्याला उत्तर देताना, मोदीसाहेबांसारखा नेता व पंतप्रधान असल्यानेच हे शक्‍य होत असल्याचे सांगून सारवासारव केली. स्वप्रशंसा कुणाला आवडत नाही? 
पण अमितभाई सावध आहेत, कारण अजूनही ‘नंबर १’ ला दुखावण्याची कुणाची हिंमत नसावी! 


ही किमती मोटार आली कुठून? 
पक्षांतर केल्यानंतर अचानक त्या लोकप्रतिनिधीने एखादी मूल्यवान मोटार खरेदी केली, तर लोकांच्या भुवया उंचावणारच ना? असाच प्रकार सध्या कर्नाटकात सुरू आहे. 
काँग्रेसच्या सतरा फुटीर आमदारांमधील एक एमटीबी नागराज यांनी नुकतीच ‘रोल्स रॉयस फॅंटम’ ही जगातली एक अत्यंत महागडी म्हणून ओळखली जाणारी मोटार खरेदी केली. या मोटारीची किंमत ११ कोटी रुपये असल्याचे समजते. पक्षातून फुटणे, पक्षांतर करणे, मग भाजपच्या मदतीने मुंबईला जाऊन राहणे या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी ही मोटार खरेदी करणे याचा ‘अर्थ’ काय, हा प्रश्‍न कुणाच्याही मनात येणे शक्‍य आहे. परंतु, वस्तुस्थिती वेगळी असल्याचे कर्नाटकातील राजकीय नेत्यांचे म्हणणे आहे. 
त्यांच्या म्हणण्यानुसार नागराज हे स्वतःच इतके धनवान आहेत, की त्यांना अशी मोटार घेण्यासाठी कुणाकडून लाच घेण्याची गरज नाही. नागराज यांचे मूळ नाव एन. नागराज होते. परंतु, त्यांच्या ‘मंजुनाथ टेबल ब्रिक्स’ या उत्पादनाने त्यांना प्रचंड आर्थिक नफा मिळवून दिला आणि बहुधा देशातील सर्वाधिक श्रीमंत आमदार म्हणून त्यांची गणना झाल्याची माहिती काही संस्थांनी दिली आहे. त्यामुळे नागराज हे काँग्रेसचे फुटीर असले, तरी त्यांची नवी मोटार व त्यांचे पक्षांतर यांचा संबंध नसल्याचे लोक सांगताना आढळतात. म्हणजेच ते नागराज असले, तरी त्यांनी ‘आयत्या बिळावर’ कब्जा केलेला नाही असे सांगितले जाते. 
नागपंचमी नुकतीच झाली आहे. 
आता नागराजांची ही कथा पुढे काय वळण घेते ते पाहू!    
 

संबंधित बातम्या