कट्टा

कलंदर
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

कट्टा
राजकारणातही गमती जमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर... 

गोयल... पाहू रे किती वाट?
आशा अमर असते. 
पियुष गोयल यांची काहीशी अशीच अवस्था असावी. 
पंतप्रधान, पक्षाध्यक्ष यांच्या मर्जीतले असूनही त्यांना हवेहवेसे वाटणारे खाते अद्याप मिळू शकलेले नाही. 
गोयल यांना अर्थखात्याची सुरुवातीपासूनच आस लागलेली होती. 
पक्षाचे ते खजिनदारच राहिले ना? मग देशाचे ‘वजीर ए खजाना’ (अर्थमंत्री) होण्याची इच्छा त्यांना झाली नाही तरच नवल! 
‘मोदी-१’ काळात अर्थमंत्री ते होऊ शकले नाहीत. 
कारण अरुण जेटली यांच्यासारख्या मातब्बरापुढे त्यांचे काय चालणार? परंतु, दैवाच्या मनात काहीतरी असावे. ‘मोदी-१’ संपता संपता जेटलींची प्रकृती बिघडली. 
शेवटचा हंगामी अर्थसंकल्प सादर करण्याइतकी त्यांची प्रकृती नीट राहिली नव्हती. हंगामी म्हणून का होईना गोयल हे अर्थमंत्री झाले आणि त्यांनी ‘मोदी-१’ राजवटीचा शेवटचा हंगामी अर्थसंकल्प सादर करून मनाचे समाधान करून घेतले. 
‘मोदी-२’ राजवट सुरू झाली. जेटली यांच्या प्रकृतीला आराम पडण्याऐवजी गुंतागुंत वाढली. त्यांनी स्वतःहूनच मंत्रिमंडळाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला. 
आता गोयल यांच्या अगदी आवाक्‍यात अर्थमंत्रिपद आल्यासारखी स्थिती होती. कारण माध्यमांनीदेखील त्यावेळी अर्थखाते गोयल यांच्याकडेच जाऊ शकते, असे भाकीत केले होते. 
प्रत्यक्षात घडले भलतेच! अर्थखाते निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आले. यामागे जेटली यांचाच हात होता असे त्यावेळी बोलले गेले. 
पियुष गोयल यांच्या आशांवर पुन्हा पाणी पडले. 
रेल्वेखाते त्यांच्याकडेच राहिले आणि वर वाणिज्य खात्याची जबाबदारीही मिळाली. 
परंतु, मनापासून ते खूश झाले नाहीत. 
आता जेटली या जगात नाहीत. 
निर्मला सीतारामन या अर्थखात्याचा कारभार हाकत आहेत, पण त्यांची या विषयावर कितपत पकड आहे याबद्दल शंका आहेत. कारण अलीकडे त्यांनी जेवढ्या पत्रकार परिषदा घेतल्या त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्याची जबाबदारी त्यांनी अर्थसचिव व अन्य अधिकाऱ्यांवर सोपवून स्वतः गप्प राहणे पसंत केले होते. 
गोयल हे चार्टर्ड अकाउंटंट असल्याने आर्थिक बारकाव्यांची त्यांना माहिती आहे. 
थोडक्‍यात काय जेटली यांच्या ‘एक्‍झिट’नंतर गोयल यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. 
मंत्रिमंडळाच्या पुढे कधीतरी होणाऱ्या फेरबदलात आपण अर्थमंत्री होऊ व आपले ते स्वप्न पूर्ण होईल या स्वप्नात ते दंग असावेत. 
त्यामुळेच रिझर्व्ह बॅंकेने त्यांच्याकडील आणखी राखीव निधी सरकारला दिला पाहिजे यासारखी विधानेही ते करू लागले आहेत. 
आता मोदी-शहा फळले, तर त्यांना त्यांचे फळ मिळेल. ‘पाहू रे किती वाट’ हा खेळ बंद होण्याचीच ते प्रार्थना करीत असावेत! 
आशा अमर असते! 


उंदीरमामा की जय!
सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे खरेतर उंदीरमामा किंवा मूषक महाशयांबद्दल काही लिहिणे जरा धोकादायकच नाही का? 
पण उंदीरमामा कुठे कधी धुमाकूळ घालतील हे सांगता येत नाही, कारण त्यांची उपद्रव क्षमता निर्विवाद मानली जाते. 
एकदा दिल्ली-हावडा मार्गावरील राजधानीत प्रवास करताना एका महासंचालक पदावरील पोलिस अधिकाऱ्याच्या चक्क पॅंटमध्ये एक उंदीरमामा घुसले होते. 
एकदा काही पत्रकार याच गाडीने चालले असताना वातानुकूलित डब्यांच्या बंद काचेच्या खिडक्‍यांमध्ये म्हणजे दोन काचांच्या मधे उंदीरमामांची पिल्ले विलक्षण आनंदात बागडत होती. 
आता आणखी एक ताजा प्रसंग! 
राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभा सदस्य मनोज झा हे पाटण्याहून दिल्लीला येत होते. ते व त्यांचे कुटुंबीय होते. त्यांनी वातानुकूलित प्रथम दर्जाचे आरक्षण केले होते. हा चार प्रवाशांसाठीचा कुपे असतो. 
गाडीत प्रवेश करून मंडळी स्थानापन्न झाली. 
गाडी सुरू झाली. गाडीने वेग धारण केला आणि सुखद प्रवासाची इच्छा मनाशी बाळगत प्रवास सुरू झाला. 
थोड्याच वेळात त्या कुपेमध्ये उंदीरमामांनी प्रवेश केला. भारतात हे घडू शकते म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने मामांना हाकलून लावण्यात आले. 
परंतु, मामा काय किंवा त्यांचे भाईबंद काही ऐकायलाच तयार नव्हते. त्यांनी चक्क त्या कुपेमध्ये आक्रमणच केले. मामांच्या भाईबंदांची फौज इतकी वाढली, की खासदार महोदय व त्यांच्या कुटुंबीयांना झोपणे दूरच पण बसणेही अशक्‍य झाले. 
रेल्वे कर्मचारीही अक्षरशः हवालदिल झाले. 
अखेर खासदार महोदयांनी रेल्वेमंत्र्यांच्या नावाने ट्‌वीट करून उंदरांच्या धुमाकुळाची माहिती दिली. 
रेल्वेमंत्र्यांनी त्याची त्वरित दखल घेऊन त्यांची पर्यायी व्यवस्था करतानाच खेदही व्यक्त केला.  
चला किमान एवढी दखल घेतली हे काही कमी नाही. 


गरवी गुजरात भवन 
गुजरातचा गौरव असे नामाभिधान धारण करणाऱ्या नव्या गुजरात भवनाचे उद्‌घाटन नुकतेच पंतप्रधानांच्या हस्ते झाले. खरे तर एखाद्या राज्याच्या सरकारी अतिथिगृहाच्या उद्‌घाटनाची बाब हा फारशा चर्चेचा विषय नसतो. पण यास विविध पैलू असल्यानेच त्याची दखल घेतली जात आहे. हे नवे आलिशान गुजरात भवन दिल्लीच्या ‘ल्युट्येन्स झोन’मध्ये आहे. विज्ञान भवन आणि उपराष्ट्रपती निवासाच्या अत्यंत जवळ आहे. अकबर मार्गावर हे भवन उभारण्यात आले आहे. 
या भवनाच्या समोरच काँग्रेसचे मुख्य कार्यालय आहे. या भवनाच्या शेजारी देशाच्या हवाईदल प्रमुखांचे निवासस्थान आहे. गुजरात राज्याचे हे दुसरे अतिथिगृह आहे. पहिले किंवा मूळचे अतिथिगृह चाणक्‍यपुरीत आहे. ते आलिशान आहे. परंतु, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या अतिथिगृहाची आवश्‍यकता भासू लागली. चाणक्‍यपुरीतील अतिथिगृह तसेही काहीसे जुने झाले होते. तसेच महाराष्ट्राने जे आलिशान नवे महाराष्ट्र सदन इंडिया गेटच्या बाजूला कस्तुरबा गांधी मार्गावर उभारले आहे, तो स्थापत्यकलेचा एक नमुना म्हणून मानले जाते आणि हे सदन पाहण्यास दिल्लीकर येत असतात. महाराष्ट्र आणि गुजरातची नेहमीच अनेक क्षेत्रात स्पर्धा सुरूच असते. विशेषतः आर्थिक आघाडीवर दोन्ही राज्यांची नेहमीच शर्यत लागलेली असते. बहुधा त्यामुळेच अकबर मार्गावरील गुजरात भवनाची कल्पना डोक्‍यात आली असावी. 
केंद्रात सरकार येताच लगोलग कोणताही वेळ न दवडता केंद्र सरकारने हा जमिनीचा तुकडा गुजरात सरकारला दिला. त्यावर तातडीने कामही सुरू झाले आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार ठरलेल्या वेळापत्रकापूर्वी तीन महिने कामकाज पूर्ण करून त्याचे उद्‌घाटनही करण्यात आले. गुजराती संस्कृती, इतिहास व स्थापत्यकला आणि आधुनिक पर्यावरण अनुकूल अशी जुन्या व नव्याची सांगड घालणारी ही वास्तू आहे. या वास्तूत १९ स्वीट्‌स (कुटुंबाला राहता येणाऱ्या खोल्या) आणि ५९ साधारण खोल्यांचा समावेश आहे. एकंदर सात हजार चौरस मीटरमध्ये या वास्तूचा विस्तार आहे. १३१ कोटी रुपयांचा खर्च त्यास आला आहे. 
नेहमीप्रमाणे पंतप्रधानसाहेबांनी टोलेठोसे या प्रसंगीही लगावले. केंद्रात व गुजरातमध्ये दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार सत्तेत असल्याने गुजरातच्या विकासातील अडथळे दूर झाले, असे वक्तव्य त्यांनी झाडले. गुजरात हे कधीच गरीब राज्य नव्हते आणि एक प्रगतिशील व उद्यमी राज्य म्हणून ते ओळखले  जाते. या राज्याला कधीच केंद्राच्या मदतीवर जगण्याची गरज भासली नव्हती, कारण या राज्याचे नेतृत्व अनेक दिग्गजांनी केले होते. हा इतिहास झाला. 
पण लोकांना आता इंडिया गेटच्या दोन्ही बाजूंना दोन आलिशान नेत्रांचे पारणे फेडतील अशा दोन वास्तू पाहण्यास मिळणार आहेत. जय हो! 


झंडा उंचा रहे हमारा....
अलीकडच्या काळात देशभक्ती, राष्ट्रवाद या दोन शब्दांनी लोकांना विलक्षण स्फुरण चढायला लागले आहे. जणूकाही जे लोक त्यांची देशभक्ती व राष्ट्रवादाचे प्रदर्शन किंवा देखावा करीत नाहीत ते देशद्रोहीच! 
पण या स्पर्धेत अनेक नवनव्या गोष्टी होताना दिसत आहेत. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधान तिरंगा फडकवितात. मग देशाला उद्देशून भाषण करतात. 
अन्यत्रही अनेक संस्था किंवा संघटना आपापल्या पातळीवर स्वातंत्र्यदिन साजरा करतात. 
पण यंदा एक नवीनच प्रथा किंवा पायंडा सुरू झाल्याचे आढळून आले. लाल किल्ल्याच्या बरोबरीने संसदगृहातही ध्वजारोहण आणि झेंडावंदनाचा स्वतंत्र कार्यक्रम करण्यात आला. 
लोकसभा अध्यक्ष ओम बिडला यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. आता हळूहळू असे समांतर ध्वाजारोहणाचे कार्यक्रम वाढताना दिसू लागले आहेत. 


तिकीट द्या तिकीट...!
भाजपचे एक नेते विमानाने कुठेतरी निघाले होते. 
विमानतळावर पोचल्यावर सामान, बोर्डिंग पास घेणे वगैरे सोपस्कार पूर्ण करून ते सुरक्षा तपासणीच्या रांगेत उभे राहिले. 
ते तपासणीसाठी पुढे जाऊ लागताच तेथे उभ्या असलेल्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याने ‘साब टिकट देना,’ असे म्हटले. 
या नेत्याला वाटले तो बोर्डिंग पास मागत असावा. 
त्याने बोर्डिंग पास त्याला दाखविल्यावर तो गणवेशधारी सुरक्षा कर्मचारी त्यांना म्हणाला, ‘साब ये टिकट नही, इलेक्‍शन लडने के लिए टिकट चाहिए!’ 
आता थक्क होण्याची पाळी या नेत्यावर आली. तो कर्मचारी विलक्षण धैर्याने म्हणाला, ‘साब इलेक्‍शन लडना है और भाजपा का टिकट चाहिए!’ प्रसंग बाका होता. 
या नेत्याने वेळ मारून नेताना त्याला सांगितले, की असे विमानतळावर काहीच होणार नाही. तसेच तिकिटाबाबत त्यांच्या हातात काहीच अधिकार नाहीत. संबंधित राज्याच्या सरचिटणिसाकडे अर्ज करावा लागेल वगैरे वगैरे! 
ही कामकाज प्रक्रिया सांगितल्यावर पिच्छा सुटला, असा सुटकेचा निःश्‍वास टाकून नेता महोदय मार्गस्थ झाले. 
दिल्लीला परतल्यानंतर काही दिवसांतच तो सुरक्षा कर्मचारी दत्त म्हणून भाजपच्या मुख्य कार्यालयात त्यांच्यासमोर हजर झाला. 
त्याची चिकाटी वाखाणण्यासारखी होती. त्याने त्याची सर्व माहिती, त्याने केलेली सार्वजनिक कामे वगैरेचे तपशील असलेला दस्तावेज या नेता महोदयांपुढे टाकला. त्यांनी त्याला संबंधित सरचिटणिसांकडे पाठविले आणि खरोखर सुटका करून घेतली! 
धन्य! धन्य! धन्य! हा किस्सा सांगताना नेता महोदय भाजपची लोकप्रियता किती तळागाळापर्यंत पोचली आहे, हे सांगायला विसरले नाहीत! 

संबंधित बातम्या