कट्टा

कलंदर
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

कट्टा
राजकारणातही गमती जमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...

आझमगढी भुजिया, राफेल, रशिया...! 
महाष्ट्रातील सरकारस्थापनेचा घोळ संपता संपेना! 
शिवसेना नेतृत्वाला खोटे ठरविण्याच्या नादात भाजपने शिवसेनेसारखा मित्रपक्ष गमावला. 
विशेष म्हणजे शिवसेनेची समजूत घालण्यासाठी भाजपच्या ‘शीर्ष नेतृत्वा’कडून अजिबात प्रयत्न करण्यात आले नाहीत. भाजपमध्ये 
सध्या सर्व सूत्रे केवळ दोनच नेत्यांच्या हाती आहेत. कोणत्याही निवडणुकीचा प्रचार केवळ या दोन नेत्यांकडून केला जातो आणि बाकीच्या नेत्यांना फारसे स्थान दिले जात नाही, ही आता जगजाहीर झालेली बाब आहे. त्यामुळेच एखाद्या राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाल्यास त्याच्या सोडवणुकीची जबाबदारीही या नेतृत्व-जोडीवरच येणे साहजिक आहे. 
कानोकानी आलेल्या माहितीनुसार असे समजले, की या 
पेचाने प्रथमच अडचणीत आलेल्या भाजपच्या या ‘हायकमांड’ला काहीशी उपरती झाली आणि त्यांनी परिवहनमंत्री नितीन गडकरी व संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांना यात लक्ष घालण्याची विनंती केली म्हणे. 
गडकरी लगबगीने दुसऱ्या दिवशी सकाळीच राजनाथसिंग यांच्या निवासस्थानी पोचले. राजनाथसिंग यांनी त्यांचे स्वागत केले. बोलणे सुरू झाले. 
गडकरी - राजनाथजी महाराष्ट्रात... 
राजनाथ - अरे सुनो, वो आझमगढी भुजिया लाये हो? ले आव, ले आव! गडकरीजी भुजिया खाईये, आझमगढसे लाये है, बहुत बढिया है, टेस्ट कर के देखिये! 
गडकरी, भुजिया म्हणजे शेव खाऊन... ‘राजनाथजी महाराष्ट्र के....’ 
राजनाथ - मैं फ्रान्स गया था, राफेल पर वो निंबू चढाया, क्‍या मीडिया ने हल्ला बोला.... कमाल है! 
गडकरी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पेचप्रसंगाचा विषय काढू इच्छितात.... ‘वो महाराष्ट्र..’ 
राजनाथ - अरे क्‍या बताऊं, रशिया में अभी गया था, उन्होने उनके कुछ प्लांट्‌स दिखाये.. एकदम गजब...! 
गडकरी - नमस्कार, ठीक है, मैं निकलता हूँ! 
राजनाथ - अरे महाराष्ट्र का ना? हो जाएगा, हल निकल जाएगा, कोई बात नही! 
गडकरी समजून गेले, की राजनाथ बाबूंचा मूड काही औरच आहे त्यांनी तेथून काढता पाय घेतला. 
सत्ता दोन व्यक्तींमध्येच एकवटली गेल्यास इतरांना काम काय? 
असे काही घडले की गोष्टी विस्कटू लागतात! 
महाराष्ट्रात असेच काहीसे घडले आहे!  


गणवेशाचे वादळ
संसद किंवा विधिमंडळातील पीठासीन अधिकाऱ्यांच्या दोन्ही बाजूंना दोनजण उभे असतात. त्यांना ‘मार्शल’ म्हणतात. 
मार्शल म्हणजे सेनादलातील पद नव्हे. तर मूलतः ते पीठासीन अधिकाऱ्यांसाठी कान व डोळे म्हणून काम करीत असतात. तसेच, समजा काही बाका प्रसंग आला किंवा एखादा सदस्य बेशिस्त व बेताल वर्तन करू लागल्यास त्याला सभागृहातून व कधी कधी बळजबरीनेदेखील बाहेर काढण्यासाठी (मार्शल आउट) या दोन व्यक्तींची मदत घेतली जाते. 
दोघेही गणवेशधारी असतात. परंतु, संसदेला साजेसा त्यांचा गणवेश असतो. 
लोकसभा आणि राज्यसभेत दोन्हीकडे मार्शल आहेत. 
हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आणि राज्यसभेत सभापती वेंकय्या नायडू यांच्या दोन्ही बाजूला लष्करी गणवेशास समान वाटणाऱ्या गणवेशात मार्शल अवतीर्ण होताच पत्रकार कक्षातील पत्रकार आणि सभागृहातील सदस्य अवाक‌ झाले. 
सभागृहात ‘मार्श लॉ’ लागू झाला काय अशी टिप्पणीही झाली. 
काँग्रेसचे जयराम रमेश यांनी सभापतींना ‘हे काय’ अशी विचारणा केली, पण नायडू यांनी त्यांना दटावून चूप केले. 
लष्करसदृश गणवेशाबद्दल तीव्र प्रतिक्रिया निर्माण होणे अपेक्षितच होते. कारण संसद हे लोकशाहीचे सर्वोच्च स्थान आहे आणि 
तेथे शस्त्र, लष्करी गणवेश यांना सक्त मज्जाव मानला जातो. संसदेवरील हल्ल्यानंतर प्रथमच काही सशस्त्र सुरक्षा तैनात 
करण्यात आली, परंतु पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेसह सर्वांना त्यांची शस्त्रे उघड दाखवता येत नाहीत. ती झाकलेल्या अवस्थेतच ठेवावी लागतात. 
त्यामुळे हा नवा प्रकार सर्वच सदस्यांना बुचकळ्यात पाडून गेला. 
सायंकाळपर्यंत खुद्द भाजपचे एक मंत्री व माजी सेनापती जनरल व्ही. के. सिंग, व्ही. पी. मलिक तसेच काही हवाईदलाच्या उच्चाधिकाऱ्यांनी या गणवेशाबद्दल तीव्र मतप्रदर्शन केले. 
अखेर मंगळवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी राज्यसभेचे कामकाज सुरू होतानाच नायडू यांनी या गणवेशाबाबत फेरविचार करण्यात येत असल्याची माहिती सभागृहाला दिली व त्याबाबतची चर्चा थांबली. 
परंतु, असला प्रकार करण्यापूर्वी लोकशाही व संसदीय संकेत काय आहेत याची जाणीव ठेवली गेली असती, तर हा अनास्था प्रसंग व विनाकारणचा वाद उत्पन्न झाला नसता. 
पण करणार काय? 
ही जाणीव असती, तर वर्तमान राज्यकर्त्यांना अनेक वाद टाळता आले असते. जित्याची खोड, दुसरे काय?   


वाद आणि नाराजी 
महाराष्ट्रातील सरकारस्थापनेचा घोळ अनेकांना अनाकलनीय होऊ लागला आहे. 
परंतु, ज्या पत्रकारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारस्थापनेच्या ‘महा-घोळा’चे वार्तांकन केले आहे, त्यांना या नव्या घोळाबद्दल फारसे काही वाटत नसल्याचे आढळून येते. 
मिनिटामिनिटाला ‘ब्रेकिंग न्यूज’ किंवा ‘बातम्या फोडू’ वृत्तवाहिन्यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. सारख्या सारख्या किती बातम्या फोडायच्या? असा प्रश्‍न त्यांना पडू लागला आहे. 
परंतु, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागावाटप व सरकारस्थापना यांचा अनुभव असलेल्या पत्रकारांना यात कोणतेही नावीन्य वाटत नाही. हा नुसता घोळ नसतो, तर यात कुरघोडी, गनिमी कावा असे अनेक डावपेच गुंतलेले असतात. या खेळात सगळे पक्ष आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष विलक्षण तरबेज आहेत. त्यामुळेच हा घोळ काही काळ राहणार आहे. 
पण या खेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मिळणाऱ्या महत्त्वामुळे काँग्रेसचे काही नेते अस्वस्थ आहेत. शरद पवारच सर्व काही गोष्टी हाताळत असल्याने या नेत्यांना त्यांचे महत्त्व कमी झाल्यासारखे वाटू लागले आहे. 
त्यामुळे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्या वर्तुळातल्या काही नेत्यांना महाराष्ट्राबद्दल काही विचारल्यास ते तत्काळ, ‘अरे सब तो पवार साब देख रहे हैं, उन्ही से पूछिये।’ असे उत्तर देऊन झटकून टाकतात व आपली नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे काही मंडळी मग सकारात्मक दिशेने सुरू असलेल्या चर्चेत काहीसे विघ्न उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असतात. 
परंतु, आत्तापर्यंत तरी सर्व गाडी सुरळीतपणे सुरू आहे. 
केवळ काँग्रेसमध्येच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येदेखील काही असंतुष्ट आत्मे आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाला या असंतुष्टांना आणि विनाकारण जागा झालेल्या शंकासुरांना प्रथम शांत करून मगच पुढे सरकारस्थापनेची वाटचाल करायला लागत आहे. 
त्याला काही विलंब होणारच!    


बालाजी तिरुपती प्रसादम् 
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. 
दुपारी भोजनाच्या सुटीत संसदसदस्य जमले असता, एक तेलगू व तिरुपतीभक्त खासदार सगळीकडे हिंडताना दिसले. 
त्यांच्या मागे एक मोठी पेटी घेऊन दोन माणसे चालत होती. 
दिसेल त्या खासदारांच्या आणि पत्रकारांच्या हातात ते एक प्लॅस्टिकच्या पिशवीचे पाकीट देत होते. त्या पिशवीत काय आहे असे विचारले असता, त्यांनी ‘सर, तिरुपती बालाजी का प्रसाद है,’ असे खास दक्षिणी स्टाइलने सांगितले. त्यांच्या या प्रसाददानातून शरद पवारांसारखे नेतेही सुटले नाहीत. सरसकट त्यांनी प्रसादाचे वाटप केले. 
मग काय अनेक संसदसदस्य, पत्रकार पिशवी उघडून तिरुपतीचा प्रसाद खातानाचे दृश्य संसदेत दिसत होते. श्रीनिवास पाटील (सातारा) यांनी कालच शपथ घेतली होती व भोजनाच्या सुटीत त्यांना विलक्षण भूक लागलेली होती. तत्काळ त्यांना वेटर मिळेना, कारण गर्दी भरपूर होती. 
त्यांनी भर्रकन पिशवी उघडून तिरुपतीचा प्रसाद काढून खाण्यास सुरुवात केली. 
एका पत्रकार मित्राने त्याच्याकडील लाडूही त्यांना खाण्यास दिला. 
तोही त्यांनी खाल्ला. 
तोपर्यंत वेटर आला व त्यांनी भोजनाची ऑर्डर दिली. 
त्यांचे लाडू भक्षण त्यांचे परममित्र शरद पवार यांना बहुधा काहीसे विचित्र वाटले असावे. ‘लाडू काय खाताय,’ अशी टिप्पणी त्यांनी केलीच. 
पण तोपर्यंत पाटलांनी दोन लाडू गट्टम केले होते.   


महाराष्ट्राच्या निकालांचे पडसाद...प्रतिसाद! 
महाराष्ट्रात व हरयाणात भाजपला लगाम बसला. हरयाणात काँग्रेसला अचानक मोठे यश मिळाले. भाजपला बहुमताचा जादूई आकडा गाठता आला नाही आणि अन्य पक्षाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याची पाळी आली. 
महाराष्ट्रात शिवसेनेला खोटे ठरविण्याच्या नादात त्यांना गमावणे नशिबी आले. बहुमतही हुकले. तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे, अशी भाजपची महाराष्ट्रात अवस्था झाली. महाराष्ट्रात ही जादू करणारे किमयागार शरद पवार ठरले. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर या दोन्ही राज्यातले नेते विशेष आकर्षणाचे केंद्र ठरणे स्वाभाविकच होते. 
शिवसेनेने तर पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्यावर साक्षात लोकसभा अध्यक्षांच्या कक्षासमोर निदर्शने केली. 
संजय राऊत हे तर पत्रकार आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आकर्षण होते. अकाली दलाचे नरेश गुजराल तर बराच वेळ संजय राऊत यांच्याशी गुफ्तगू करीत राहिले. नरेश गुजराल यांनी भाजप त्याच्या मित्रपक्षांना नीट वागणूक देत नसल्याची तक्रार करून आघाडीसाठी संयोजक नेमण्याची मागणी केली. 
सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ठरले. 
द्रमुक, अकाली दल, तृणमूल काँग्रेसचे सदस्य त्यांच्याकडे जाऊन त्यांचे अभिनंदन करीतच होते, पण भाजपचे मित्रपक्ष असलेले अकाली दल आणि अगदी अपना दलसारख्या लहान पक्षाच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनीदेखील पवार यांचे महाराष्ट्रातील कामगिरीबद्दल खास अभिनंदन केले. अनेक नेत्यांनी पवार यांना त्यांनी विरोधी पक्षांमध्ये ‘जान’ आणल्याचे सांगून आता राष्ट्रीय राजकारणालादेखील वेगळे वळण लागेल अशी आशा व्यक्त केली. काहीजणांनी तर आता ‘तुम्हीच नेतृत्व करा,’ असेही सांगितले. 
परिस्थिती बदलू लागली आहे हे खरे, पण यात अडथळा येऊ नये हीच अपेक्षा! 

संबंधित बातम्या