कट्टा

कलंदर
सोमवार, 27 एप्रिल 2020

कट्टा
राजकारणातही गमती जमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...  

यांना लॉकडाऊन लागू का नाही?
ब्रह्मांडनायकांनी देशाच्या दूरचित्रवाणीवर तीन वेळा अवतीर्ण होऊन आणि नंतरही रोज त्या चित्रफितींची असंख्य आवर्तने दाखवून लोकांना ‘घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग आवश्‍यक आहे, घराबाहेरची लक्ष्मणरेषा ओलांडू नका, गर्दी करू नका...!’ वगैर वगैरे असे अनेक उपदेश केले. हे उपदेश नव्हते. लोकांना दिलेले भयसूचक इशारे होते.
कोणताही खरा व प्रामाणिक नेता एखाद्या संकटात त्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची हिंमत वाढवतो पण येथे चित्र उलटेच! लोकांना घाबरविण्यातच जास्त मजा!
तर, लोकांना गर्दी करू नका म्हणून सांगितलेले. देशात ठिकठिकाणी लोक अडकून पडलेले आणि आपल्या आप्तस्वकीय, जवळच्या कुटुंबापासून दूर अडकलेली माणसे! बिचारे फोनवरून कुटुंबाच्या संपर्कात राहून समाधान करीत राहिलेली! तिकडे असंघटित मजूर व कष्टकऱ्यांची अवस्था तर जनावरांपेक्षा वाईट. यमुना नदीच्या किनारी चक्क उघड्यावर त्यांनी राहण्यास, झोपण्यास सुरुवात केली. पण मंडळी हे सर्व तुमच्यासाठी हो!
तुम्ही गुजरातमधले रहिवासी असता तर असे घडले नसते!
हरिद्वारला यात्रेसाठी गेलेले १८०० गुजराती राष्ट्रीय टाळेबंदीने अडकून पडले. करायचे काय? पण या गुजराती मंडळींचे संकटमोचक दिल्लीत सर्वोच्चपदावर असताना त्यांना लॉकडाऊन कसा लागू होईल?
तर साक्षात प्रतिपोलादी पुरुष गृहमंत्री अमितभाई शहा, मनसुख मांडविया हे आणखी एक केंद्रीय मंत्री, तसेच गुजरातचे मुख्यमंत्री यांनी फोनाफोनी करून या गुजराती मंडळींची हरिद्वारहून सुटका करण्याचे ठरविले.
आता देशाच्या गृहमंत्र्यांनीच सांगितल्यावर काय सगळेच सोपे आणि सुरळीत की हो! उत्तराखंड सरकारच्या... अरे हो, तेही भाजपचेच सरकार असलेले राज्य नाही का!... तर त्यांच्या मदतीने २६ आलिशान सर्व सुखसोयींनी युक्त (इंग्रजीत लक्‍झरी बस म्हणतात) बसगाड्यांची सोय करण्यात आली. अगदी लगोलग!
अमितभाईंची परवानगी म्हणजे देशातल्या पोलिसांना तर शिरसावंद्यच ना? कुणाची हिंमत आहे या २६ बस अडविण्याची? बसेस निघाल्या, अहमदाबादला पोचल्यासुद्धा! तर मंडळी या देशात तुम्हाला काही स्पेशल गोष्टी हव्या असतील तर गुजराती असायला हवे!
पंतप्रधानसाहेब, गृहमंत्रीसाहेब हे त्या राज्याचे केंद्रातील पालक असताना गुजराती लोकांना काय ‘प्रॉब्लेम’? इतर राज्यातले असाल तर बसा...!
पण बहुधा या घटनेवरूनच धडा घेऊन उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ‘महाराज’ ऊर्फ योगी आदित्यनाथ यांनीही असलाच एक प्रकार केला.
जसे अमितभाईंना अडवायची कोणाची हिंमत झाली नाही, तसेच ‘महाराज’ योगी आदित्यनाथ यांनाही अडविण्याची कुणाची हिंमत झाली नाही! कोटा (राजस्थान) हे एक देशातले मोठे कोचिंग सेंटर आहे. तेथे देशभरातले विद्यार्थी शिकायला असतात. उत्तर प्रदेशातले सुमारे ७५०० विद्यार्थी या लॉकडाऊनमुळे तेथे अडकून पडले.
काय महाराजच! त्यांना कोण अडविणार? त्यांनी तत्काळ २५० बसगाड्या कोटा येथे रवाना केल्या आणि विद्यार्थ्यांची सुटका केली.
चला म्हणजे एकतर तुम्ही गुजराती असायला पाहिजे किंवा उत्तर प्रदेशातले रहिवासी! मग तुम्हाला सर्व नियम व कायद्यातून सूट!
देशात कोरोना साथ पसरविण्यासाठी तबलिगी जमात या संघटनेला जबाबदार धरले जाते. या संघटनेने त्यांचा पोलिस व प्रशासनाबरोबरचा पत्रव्यवहार सार्वजनिक केला आहे. त्यांनीदेखील बसगाड्या घेऊन त्यांच्या कार्यक्रमाला जमलेल्यांना त्यांच्या त्यांच्या गावी नेण्याची सोय केली होती. परंतु त्यांना मात्र परवानगी दिली गेली नव्हती.
यालाच भेदभाव पक्षपात आणि क्षुद्रबुद्धी म्हणतात.
भारत देश असा कधीच नव्हता! राज्यकर्तेही असे निगरगट्ट कधीच नव्हते... हो, सत्तर वर्षातले!

शिंदे महाराजांच्या गोटात अस्वस्थता?
अप्रामाणिकपणाला सजा मिळतेच मिळते असे म्हणतात.
ग्वाल्हेरचे शिंदे घराणे हे मूळचे संघनिष्ठ! सत्ता, अधिकार आणि राजकीय व्यावहारिकता म्हणून या घराण्यातल्या मंडळींनी विविध पक्षांशी घरोबा करून ठेवला होता.
पण आता सर्व शिंदे घराणे एकाच संघ परिवारात विलीन झाले! ज्योतिरादित्य शिंदे हेच एकमेव भाजपच्या बाहेर होते. त्यांनीही 
काँग्रेसला रामराम ठोकून भाजपकडे शरणागती पत्करली. ज्योतिरादित्य भाजपमध्ये सामील झाल्याने संघ-भाजप परिवारात आनंदाची लाटच आली. राजेमहाराजे, संस्थानिक यांच्याबद्दल तसेही संघपरिवारात अंगभूत आकर्षण राहिले आहेच! परंतु, ज्योतिरादित्य यांच्या एन्ट्रीनंतर पुढील राजकीय घडामोडी मात्र भाजप-संघ परिवाराच्या योजनेनुसार होताना दिसत नाहीत. उलट त्यात विघ्नच येताना दिसत आहेत.
ज्योतिरादित्य यांना भाजप प्रवेशाच्या बदल्यात राज्यसभा सदस्यत्व आणि केंद्रीय मंत्रिपद देण्याचा सौदा होता. तसेच राज्यातल्या त्यांच्या समर्थकांना राज्याच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याचा भागही सौद्यात समाविष्ट होता. प्रत्यक्षात कोरोना विषाणूने जो हल्ला केला, त्यामुळे ज्योतिरादित्य यांनाही अद्याप बक्षीस मिळालेले नाही तर त्यांच्या समर्थकांनाही अजून पदरात काही पडलेले नाही. 
नुसती पंचाईत हो! तोंड दाबून बुक्‍क्‍याचा मार! आता तर लोकांचे मतही भाजपबद्दल काहीसे फिरू लागल्याचे दिसून येऊ लागले आहे. त्यामुळे फुटीर आमदारांना पोटनिवडणूक जिंकण्याची धास्ती वाटू लागली असल्याचे समजते. 
मंत्रिपद राहिले दूर! एकंदरीत कोरोना विषाणूने राजकारणातही धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचा पराभव होणार कधी आणि महाराजांना व त्यांच्या अनुयायांना मंत्रिपदे मिळणार कधी? 
कोरोना विषाणूच जाणे!

सबकुछ किशोर कुमार? नाही नाही... शिवराजसिंग चौहान!
एकेकाळी ‘सबकुछ किशोरकुमार’ म्हणून चित्रपट झळकायचे! म्हणजे त्या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन, संगीत, प्रमुख भूमिका, गीत-संगीत सर्व काही किशोर कुमार यांचेच असायचे! तो त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा भाग होता.
सध्या असाच काहीसा खेळ मध्य प्रदेशात सुरू आहे! 
अरे हो! योगायोगाचा भाग म्हणजे किशोर कुमार यांची गांगुली फॅमिली ही खांडव्याची म्हणजे मध्यप्रदेशातलीच होती!
तर सध्या मध्य प्रदेशात मुख्यमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री आणि सर्वच खात्याचे मंत्री एकमेव म्हणजे शिवराजसिंग चौहान हे आहेत!
असे कसे ?
तुम्हाला आठवत नाही का? २४ तारखेला सामाजिक किंवा शारीरिक दुरीकरणाचा पंतप्रधानांचा आदेश धुडकावून शिवराजसिंग यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दुसऱ्या दिवशी विधानसभेत आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले. कमलनाथ यांचे सरकार पाडण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.
पण आता मात्र त्यांना ते दुःस्वप्न वाटू लागले असावे.
लॉकडाऊनला न जुमानता त्यांनी शपथविधी, बहुमत प्राप्ती हे सर्व उरकले.
अर्थात वरचा किस्सा वाचल्यानंतर या देशात भाजपसाठी कायदे व नियम नसतात हे एव्हाना सूज्ञ वाचकांना समजले असेलच!
त्यामुळे शिवराजसिंग चौहान यांनीही कोणतेही नियम न पाळता आपला हव्यास पूर्ण करून घेतला. पण त्यावरून एवढा गदारोळ माजला, की त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यास अवधी मिळाला नाही. आता ते एकटेच राज्यकारभार करीत आहेत.
आता त्यांची तारांबळ उडत असल्याच्या बातम्या येत आहेत.
भोपाळमध्ये असे विनोद सुरू झालेत, की मुख्यमंत्री शिवराजसिंग हे आरोग्यमंत्री शिवराजसिंग यांच्यावर नाराज आहेत कारण आरोग्यमंत्री ढिलाई करीत आहेत. तर दुसऱ्या एका विनोदात आरोग्यमंत्री शिवराजसिंग हे अर्थमंत्री शिवराजसिंग हे पुरेसा निधी पुरवीत नसल्याची तक्रार करीत आहेत!
भाजपला सत्तेची लालसा विलक्षण आहे. महाराष्ट्रातही ते हाच खेळ करू पाहत आहेत. मध्यप्रदेशातले हे बंड त्यांना पचनी पडताना दिसत नाहीये!
आता काँग्रेसचे जे २४ बंडखोर भाजपवासी झाले त्यांच्या जागी पोटनिवडणुका होणे अपरिहार्य आहे आणि लोकांच्या सांगण्यानुसार त्यात भाजपला मतदार धडा शिकवतील.
थोडक्‍यात मध्यप्रदेशातला ‘सबकुछ शिवराजसिंग’ सिनेमा पब्लिकला फारसा पसंत पडलेला नाही!

हिमामंडन व स्वनामधन्यतेचे नगारे! 
स्वस्तुति, स्व-प्रशंसेचे ढोल पिटणे, महिमामंडन, व्यक्तिस्तोम यात भारतीयांचा हात कुणी धरू शकणार नाही.
एकेकाळी काँग्रेसमध्ये या सर्व नाटकांचे प्रयोग झाले होते आणि जनतेने त्या प्रयोगांचे काय केले हा इतिहासही सर्वांना माहिती आहे. 
परंतु जेव्हा सत्तेची धुंदी व नशा स्वार होऊ लागतो तेव्हा विवेकचा लोप होतो.
सध्या सरकारी जाहिरातींमधून पंतप्रधानांचे व्यक्तिमहात्म्य 
अशाच पद्धतीने वाढविण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू आहेत. 
केवळ सरकारी जाहिरातीच नव्हे तर सर्व सोशल प्लॅटफॉर्मवरून हे प्रकार योजनाबद्धरीतीने केले जात आहेत. यासाठी धंदेवाईकांची 
मदत घेऊन विशिष्ट व्यक्तीची प्रतिमा उंचावण्याचा प्रकार केला जात आहे. या प्रचारकी टोळ्यांना अधिकृतपणे राजकीय आश्रय दिला जात आहे.
घराबाहेर चलण्याचा आग्रह करणाऱ्या आईला तिचा लहानसा मुलगा सांगतो, ‘नही, मोदी अंकल ने कहा है...!’
आता चाचा नेहरूंना नष्ट करून त्या जागी ‘मोदी-अंकल’ची प्रतिष्ठापना करण्याची भक्त संप्रदायाची धडपड सुरू झाली आहे. हे करतानाही आपल्या कोत्या आणि क्षुद्रबुद्धीचे प्रदर्शन केले नाही, तर तो भक्तसंप्रदाय कसला?
‘मोदी-अंकल’ आता घरोघरी आणि आधुनिक भारतीय 
समाजात पोचले आहेत. त्यासाठी त्यांना सरकारी चाचा होण्याची आवश्‍यकता भासलेली नाही, अशा अत्यंत फुटकळ आणि सुमारबुद्धीच्या टिप्पण्या करून भक्तसंप्रदाय व्यक्तिमहात्म्य वाढविण्याची खटाटोप करीत आहे.
दुसऱ्याचा मोठेपणा मान्य न करता आपणच मोठे असल्याचा 
अहंकार बाळगणारे आणि सुप्त हुकुमशाही भावना बाळगणाऱ्यांना 
असले महिमामंडन आणि स्वनामधन्यतेचे वेड असते. सध्या ते जोरात आहे!
परंतु या गोष्टी केवळ प्रचारकीच्या माध्यमातून होत नसतात. समाजाने त्या मान्य कराव्या लागतात. मी मोठा आहे, मी साहेब आहे, मी अंकल आहे अशा जाहिराती करून लोकांचे मन काबीज करता येत नाही.
लोकांनी आपण होऊन तशी स्वीकृती देणे याला म्हणतात जनमान्यता व लोकमान्यता!
टिळकांनी स्वतःला लोकमान्य पदवी मिळण्यासाठी चाटुकार अनुयायांकडून प्रचार केलेला नव्हता. लोकांच्या भावनेचा तो आविष्कार होता.
परंतु सुमारबुद्धी व सवंग क्षुद्रबुद्धी असलेल्यांना काय समजावणार?   

संबंधित बातम्या