कट्टा

अनंत बागायतकार
बुधवार, 1 जुलै 2020

राजकारणातही गमती जमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...    –  कलंदर

असत्याचे प्रयोग?
महात्मा गांधी यांना त्यांच्या ‘सत्याचे प्रयोगा’बद्दल जाणले जाते. आता देशात सध्या ‘असत्याचे प्रयोग’ सुरू आहेत. तसे हे प्रयोग गेल्या काही वर्षांपासून सुरूच आहेत. देशात गेल्या पंचेचाळीस वर्षांतील उच्चांकी बेकारी असल्याची माहिती देशाच्या मुख्य सांख्यिकी अधिकाऱ्याने देताच त्याला पदच्युत करण्यात आले. 

योगायोगाने यावेळी लोकसभेच्या निवडणुका होत्या. लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि ३०३ च्या संख्याबळाने फेरसत्ताप्राप्तीनंतर हीच माहिती गुपचूपपणे अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आली. वर निगरगट्टपणे असेही सांगण्यात आले, की त्यावेळी निवडणुका असल्याने ती माहिती जाहीर केली जाणे योग्य नसल्याने त्याचे त्यावेळी खंडन करण्यात आले होते. सध्या तीन राष्ट्रीय असत्यांचे कथन होत आहे. देशात कोरोनाची साथ सुरू होताच देशाच्या महानायकाने लोकांना हिंमत देण्याऐवजी घाबरवून सोडले, ‘जान है, तो जहान है।’ जणू कादर खानचाच फिल्मी डायलॉग! काही दिवसांनी परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसल्यानंतर मात्र कोरोनाची संगत करावी लागणार आणि कोरोनाची भीती बाळगण्याचे कारण नाही, असे हेच महानायक सांगू लागले. 

अर्थव्यवस्था किती खड्ड्यात गेली, हे सांगण्यास कुणा अतिज्ञानी माणसाची आवश्‍यकता नाही. पण महानायक टीव्हीच्या पडद्यावर अवतीर्ण होऊन सांगू लागले. अर्थव्यवस्था बिलकूल चांगली आहे, अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे आणि मी तुम्हाला विश्‍वास देतो की अर्थव्यवस्थेला काहीही झालेले नाही! स्थलांतरित कष्टकरी गावी परतताना मेले, त्यांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक व्यवसाय बंद पडले, बेकारी वाढली. पण महानायकांना हे काही दिसलेच नाही. ते म्हणतात अर्थव्यवस्था सुस्थितीतच आहे! 

तिसरे असत्यकथन! भारताच्या हद्दीत चिनी सेना घुसलीच नाही आणि भारताचे कोणतेही ठाणे चीनच्या कब्जात नाही! अरेच्या? मग ती शारीरिक व हिंसक झटापट झाली कशाला? वीस जवान मेले का? आणि मग घुसखोरी केली कुणी? आमच्याच जवानांनी? 

यावरून गदारोळ सुरू होताच देशाच्या सर्वोच्च पदाला खुलासा करावा लागतो? सारे काही विलक्षण अनाकलनीय! 

असे सांगतात की मानसशास्त्रात अशा काही मानवी श्रेण्या आहेत, की एखादे प्रकरण अंगावर शेकते आहे असे दिसताच ते घडलेलेच नाही असा जोरदार कांगावा सुरू करायचा. बेमालूम खोटे अतिशय ठासून बोलायला सुरुवात करायची आणि कुणी प्रश्‍न विचारायची हिंमत केल्यास त्याचीच चेष्टा करायला सुरुवात करायची! 

शाहजोगपणा, संभावितपणा, साळसूदपणा आणि विधिनिषेधशून्यता यालाच म्हणतात. जय हो!  

 

तुम्ही गप्प कसे? 
सेनाप्रमुखपदावरून निवृत्त झाल्याझाल्या जनरल बिपिन रावत यांची नव्याने निर्मित ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (सीडीएस) या पदावर नियुक्ती झाली. सेनाप्रमुख असताना वादग्रस्त विधाने करण्याचा उच्चांक सेनाप्रमुखांनी केला होता. 

सर्वसाधारणपणे भारतासारख्या लोकशाही देशात सेनाप्रमुखांनी सार्वजनिकरीत्या वक्तव्ये करण्याची परंपरा नाही. परंतु, २०१४ नंतर देशातील सर्वच संस्थांची मोडतोड करून त्यांचे विशिष्ट राजकीय विचारसरणीला अनुकूल असे रूपांतर करण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यात दुर्दैवाने सेना या संस्थेचाही समावेश झाला. काही मंडळींना डावलून बिपिन रावत हे सेनाप्रमुख झाल्यानंतर त्यांनी या विशिष्ट राजकीय विचारसरणीनुसार वागायला, बोलायला सुरुवात केली. 

पाकिस्तान, काश्‍मीर यासंदर्भात त्यांनी काही राजकीय स्वरूपाची विधाने करून वादळ निर्माण केले होते. परंतु, मागाहून त्यांनी ते जाणीवपूर्वक केल्याचे सांगितले जाऊ लागले. म्हणजेच त्यांना ‘वरून’ आशीर्वाद असल्याचे त्यातून ध्वनित करण्यात आले होते. या सेनाप्रमुखांबरोबर लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या काही सह-प्रशिक्षणार्थींच्या आठवणीनुसार ते विद्यार्थिदशेतही अशीच वादग्रस्त विधाने करीत असत. त्यांना त्याबद्दल कानपिचक्‍याही मिळत असत असे या मंडळींनी सांगितले. परंतु एकदा सेनाप्रमुख झाल्यानंतर ते कुणाला जुमानणार? निवृत्त होण्याच्या आधीच त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध विधान करून गोंधळ माजवला, कारण सेनाप्रमुखांनी अशा कोणत्या विषयावर वक्तव्य देणे कुणालाच अपेक्षित नव्हते. अशी अनेक विधाने त्यांनी केली आहेत. काश्‍मीरमधील दगडफेक करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत बोलताना त्यांनी सेनेचा धाक व भीती त्यांना असलीच पाहिजे असे म्हटले होते. तर सेनादलांमध्ये महिलांना लढाऊ भूमिका देण्याच्या संदर्भात त्यांनी या महिलांना कपडे बदलताना कुणी पाहिले, तर त्यावरून गदारोळ होऊ शकतो असे म्हटले होते. तर आता तिन्ही सेनादलांचे प्रमुख या नात्याने ते गप्प का असा प्रश्‍न विचारला जात आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही एकदमच गपचूप आहेत. त्याबद्दलही गूढ आहे. 

या दोघांचा उल्लेख अशासाठी, की हे दोघेही थेट पंतप्रधानसाहेबांना ‘रिपोर्ट’ करतात. पंतप्रधानसाहेबांनी चिनी सैनिक भारतीय हद्दीत नाहीत असे जे काही अनपेक्षित विधान केले आणि नंतर त्यावर खुलासे केले गेले ते कुणाच्या सल्ल्यावरून, असा प्रश्‍न सध्या चर्चेत आहे. 

त्याचबरोबर गलवान खोऱ्याच्या परिसरात भारतीय सैनिकांची जमवाजमव करणे, अधिक कुमक पाठविणे हे निर्णय कुणी केले याबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. 

तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख म्हणून जनरल रावत गप्प का? की त्यांना गप्प राहण्यास सांगण्यात आले आहे? भारत-चीन दरम्यानच्या ताज्या संघर्षातील अनेक अनुत्तरित प्रश्‍नांपैकी हा एक!  

 

मंत्री एका खात्याचे, कारभार दुसऱ्यांचा?
वर्तमान सरकारची अजब तऱ्हा आहे. मंत्री एका खात्याचे, पण ते बोलतात दुसऱ्या मंत्रालयांबाबत! 

भारत-चीन संघर्षाबाबत संरक्षण मंत्रालयाने आणि खुद्द संरक्षण मंत्र्यांनी औपचारिक प्रतिक्रियेखेरीज बाकी काहीही बोलण्याचे टाळले. पण जे काही खुलासे आणि स्पष्टीकरणे, निवेदने होती ती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते आणि खुद्द परराष्ट्र मंत्र्यांनी केली. पण जे इतर कुणी मंत्री बोलले नाहीत ते रस्ते, परिवहन आणि एमएसएमआय खात्याचे मंत्री व्ही. के. सिंग मात्र बोलून गेले. व्ही. के. सिंग ऊर्फ विजयकुमार सिंग यांनी दोन विधाने केली. एका निवेदनात त्यांनी भारतानेही चीनचे चाळीसहून अधिक सैनिक मारल्याचे म्हटले. तर अन्य एका विधानात त्यांनी चीनने जसे काही भारतीय सैनिक कैद केले व त्यांना मागाहून सोडले, तसेच भारतानेही काही चिनी सैनिक पकडले होते आणि त्यांनाही नंतर सोडून दिले. 

विजयकुमार सिंग हे माजी सेनाप्रमुख होते आणि विवादास्पद राहिले होते. परंतु, मंत्रिपदावर असताना दुसऱ्या खात्याशी संबंधित विषयांवर त्यांनी टिप्पण्या करणे, हे अनुचित किंवा औचित्याचा भंग करणारे मानले जाते. 

अर्थात या सरकारमध्ये हे प्रकार सातत्याने घडतात. मध्यंतरी रेल्वेमंत्री पियुष गोयल हे अर्थखात्याच्या विषयांवर बोलत असत. तर मागे अर्थमंत्री संरक्षण खात्यावर बोलत असत, असे विनोद घडलेले होते. पण विजयकुमार सिंग यांना सर्व गुन्हे माफ असावेत. त्यांनी सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांना उद्देशून ‘प्रेस्टिट्यूट’ असे म्हटले होते आणि त्यांच्या त्या वक्तव्याबद्दल भाजपमध्ये त्यांची वाहवाच झाली होती. त्यामुळे संरक्षणमंत्री असून राजनाथ सिंग हे चूप आहेत. पण व्ही. के. सिंग यांना मात्र खुली छूट आहे. 
अजब तुझे हे सरकार...! 

 
करावं तसं भरावं लागतं की! 
चीनबरोबरच्या संघर्षात कोलांट्या उड्या मारून भाजपने जी फटफजिती करून घेतली. त्यानंतर प्रचारकी टोळ्या आक्रमक होणे अपेक्षितच होते. त्यांनी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस हा कसा चीनधार्जिणा पक्ष आहे याच्या कपोलकल्पित कहाण्या सोशल मीडियावरून पसरवण्याची मोहीम सुरू केली. त्यात काँग्रेसचे नेते चिनी अन्नपदार्थांचा कसा स्वाद घेत आहेत असे फोटोही त्यांनी वापरले. 

परंतु शेवटी दुसऱ्याचे कुसळ पाहताना स्वतःचे मुसळ लपवणार कसे? भाजपच्या विरोधातही प्रतिमोहीम सुरू झाली. भारतातील सत्तापक्ष म्हणून भाजप व चिनी कम्युनिस्ट पक्षाचे पक्षपातळीवरील अधिकृत संबंध आहेत. 

त्यांच्या निमंत्रणावरून गेलेल्या भाजप शिष्टमंडळाचे प्रतिनिधी कसे चीनमध्ये राजेशाही पाहुणचार घेत आहेत याचे फोटो व माहिती बाहेर येऊ लागली. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची एक फीत प्रकाशात आली. त्यात ते भाजप व चिनी कम्युनिस्ट पक्षात किती साम्य आहे आणि दोन्ही पक्ष राजकारणाबरोबरच सामाजिक कार्यही कसे करतात, अशी तारीफही त्यांनी केलेली आहे. मध्य प्रदेशात आपण मोठ्या प्रमाणात चिनी गुंतवणूक आणू इच्छितो असेही त्यांनी म्हटलेले आहे. 

ही प्रतिमोहीम सुरू होताच भाजपची अपप्रचार टोळकी आपोआप थंड पडू लागली आहेत. राजकारणात किमान सभ्यता पाळण्याचे संकेत विसरलेले लोक सत्तेत आल्यावर असे घडते! 

 

जय बिहार रेजिमेंट!
गलवान नदी खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीत बिहार रेजिमेंटचे वीस जवान शहीद झाले. अर्थात नाव ‘बिहार रेजिमेंट’ असले, तरी यामध्ये बिहारचेच सैनिक नसतात. उलट या रेजिमेंटचे नेतृत्व बिगर बिहारी सेनाधिकाऱ्याकडे दिले जाते व हा नियम सर्व रेजिमेंटना लागू असतो. 

त्याचप्रमाणे जेव्हा सैनिक शहीद होतात, तेव्हा त्यांचा उल्लेख भारतीय सेनेचे जवान असा केला जातो. त्यांच्या रेजिमेंटच्या नावाने त्यांचा उल्लेख होत नाही. 

परंतु, जवानांच्या हौतात्म्यांचेदेखील स्वतःच्या राजकीय लाभासाठी व स्वार्थासाठी वापरणारी मंडळी या भारतात आहेत. ही मंडळी राजकीय क्षेत्रातली आहेत. या घटनेनंतर या शहिदांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधानसाहेबांनी विलक्षण संभावितपणे आणि जणू काही ते सहजपणेच बोलत असल्याचा आव आणत म्हटले, बिहारच्या जनतेला या जवानांच्या हौतात्म्याबद्दल अभिमान वाटेल, कारण ते बिहार रेजिमेंटचे जवान होते! 

येथे हे लक्षात घ्यावे लागेल, की बिहारमध्ये पुढच्या चार महिन्यांत विधानसभा निवडणूक आहे. त्याचा प्रचार भाजपने सुरूही केला आहे. भाजपचे महान नेते गृहमंत्री अमितभाई शहा यांनी बिहारी जनतेसाठी पहिली व्हर्च्युअल सभादेखील घेतली असून आता गाव व जिल्हा पातळीवरील सभा सुरू करण्यात आल्या आहेत. 

त्यात भर टाकणारे पंतप्रधानसाहेबांचे हे विधान काय सुचवते? जवानांच्या हौतात्म्याचाही असा सवंग वापर? 

गेल्या काही वर्षांत भारतीय राजकारण अतिशय क्षुद्र पातळीला पोचल्याचा हा पुरावा आहे. बिहार रेजिमेंटला नेमके याच वेळी सीमेवर तैनात करण्याचे कारण काय असा सवाल कुणी केला, तर त्यामुळे कुणाला मिरच्या झोंबायला नको! हलक्‍या राजकारणासाठी असे गंभीर प्रसंग वापरल्यास असे अर्थ लावले जाणारच! 
पण करणार काय? 
भारत महान! 

संबंधित बातम्या