कट्टा - कलंदर

अनंत बागायतकार
मंगळवार, 21 जुलै 2020

कट्टा
राजकारणातही गमती जमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...  
कलंदर

सहन होत नाही, सुचतही नाही...!

सहन होत नाहीये! अगदी सुचेनासे झालेय! काय करावे काही कळेनासे झालेय!

ही अवस्था कुणाची?

प्रश्‍न अगदी अपेक्षित आहे आणि त्याचे उत्तर आहे... सरकारी बाबू!

हो, सरकारी बाबूच!

या कोरोनामुळे लॉकडाउनवर लॉकडाउन सुरू आहेत आणि सर्व जनजीवन विस्कळीत होऊन गेले आहे! ऑफिसमध्ये पूर्ण उपस्थिती नाही. सरकारी ऑफिसांमध्येदेखील लोक येईनासे झाले आहेत! त्यामुळे त्यांची कामे करताना बाबूंना मेहनत करावी लागे आणि मग त्या कष्ट व मेहनतीची भरपाईदेखील करावी लागत असे! आता असे काहीच उरले नाही. कुणी फारसे फिरकतही नाही.

ही झाली ऑफिसात बसून काम करणाऱ्या छोट्या बाबूंची कहाणी! आता बड्या बाबूमंडळींची अवस्थाही काही वेगळी नाही. लॉकडाउनमुळे सर्व प्रकारचे प्रवास-दौरे रद्द ना हो! त्यामुळे बाहेरगावी दौऱ्यावर जाणे, टीएडीए म्हणजेच प्रवासभत्ता व महागाईभत्ता, त्या दौऱ्याची अन्य बिले यातून वरिष्ठ बाबूमंडळींना खिशाला खूऽऽऽऽऽऽप खूऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽप दिलासा मिळत असे.

आता सर्व काही बंद... लॉकडाउन! आता तर काय बाहेरगावी जाण्याचे सारे मार्गच बं! त्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, झूम आणि आणखी काय काय मार्गांनी वरिष्ठ बाबूमंडळींना बाहेरगावच्या त्यांच्या बरोबरीच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधावा लागतो. 

म्हणजे काय? ऑफिसातच बसून राहा आणि तेथूनच... फार तर चहा बिस्किटे खात व्हिडिओ कॉन्फरन्स करत बसा! पूर्वीसारखी विविध ठिकाणी दौरे काढण्याची मजाच संपली हो!

ही झाली देशातल्या दौऱ्यांची कथा! परदेश दौऱ्यांचा तर प्रश्‍नच निर्माण होत नाही. कारण अजून आंतरराष्ट्रीय विमाने सुरूच झालेली नाहीत. अगदी उपासमार व्हावी ना तशीच या बाबू लोकांची अवस्था झाली आहे. 

आता तर असे समजते, की बाहेरगावचे किंवा बाहेर देशातले दौरे वगैरे सर्व बंद होणार आहेत. त्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच संपर्क साधणे आणि कामे करण्यावर भर दिला जाणार आहे.

काय हे? किती दुष्टपणा? असे म्हणवते तरी कसे?

पण, किमान सध्या तरी बाबूमंडळींना लॉकडाउन व कोरोनामुळे सक्तीने ‘स्थानकवासी’ व्हावे लागत आहे! अगदी असह्य अशी ही शिक्षा आहे किनई?

 

मला.. मला.. मला.. मला... हवी प्रसिद्धी!

दिल्लीत तूर्तास तरी कोरोनाचा प्रसार काहीसा आटोक्‍यात आल्याची चिन्हे आहेत. अर्थात याबाबत निर्णायक मत व्यक्त करणे अजून तरी धाडसाचे ठरेल. कोरोनाविरुद्धच्या या संघर्षात दिल्लीतील वैद्यकीय सेवेतील सर्वजणांनी जिवाची बाजी लावली यात शंका नाही. त्याबद्दल त्यांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. काहींना आपले प्राणदेखील गमवावे लागले. दिल्ली सरकारने करोनाविरुद्धच्या लढाईत प्राण वेचणाऱ्या डॉक्‍टरांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदतही जाहीर केली आहे. 

गेल्या आठवड्यातच दिल्लीच्या सरकारी रुग्णालयातील एका डॉक्‍टरला कोरोनाच्या रुग्णांची सेवा करता करता या आजाराची बाधा झाली आणि त्याला प्राण गमवावे लागले.

मग काय? राजकारणी मंडळी सुसाट त्या डॉक्‍टरच्या निवासाकडे निघाली ना! पळा पळा, कोण पुढे पळे तो...! शर्यतच!

कारण मग टीव्ही कॅमेरेवाले, फोटोग्राफर याचा लवाजमा बरोबर घेऊन त्या सांत्वनाचाही मोठा ‘इव्हेंट’ नको का करायला? हल्ली जवानांचा मृत्यू असो किंवा या कोरोनाविषयक घटना असोत, प्रत्येक दुःखद प्रसंगाचादेखील ‘इव्हेंट’ करण्याचे प्रकार सर्रास होऊ लागले आहेत आणि त्यातून त्या प्रसंगाचे गांभीर्य, धीरोदात्तपणा पार नष्ट होतो. जवानांच्या शवपेट्यांचे राजकारण आणि त्याचे ‘इव्हेंट’ करणे याची राष्ट्रीय मोहीमच जणू सुरू आहे आणि त्याला स्वार्थी राजकारणासाठी खतपाणी घालण्यात येत आहे.

तर, या निधन पावलेल्या डॉक्‍टरच्या घरी दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अतिउत्साही अध्यक्ष पोचले. त्यांनी घाई अशासाठी केली होती, की दुपारनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या घरी जाणार होते. तर हे अध्यक्ष महोदय पोचले, कुटुंबाचे सांत्वन केले वगैरे वगैरे...!

बाहेर स्थानिक बातमीदार उभेच होते. लगेचच त्यांनी एक निवेदन केले आणि या डॉक्‍टरांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत दिल्ली सरकारने केली पाहिजे अशी काँग्रेसची मागणी आहे असे म्हटले. तिकडे केजरीवालच नव्हे, तर डॉक्‍टरांचे कुटुंबीयही चक्रावून गेले. कारण दिल्ली सरकारने आधीच एक कोटी रुपयांची मदत जाहीर केलेली असताना प्रदेश काँग्रेस अध्यक्षांना ही मागणी करण्याचे कारण काय आणि त्याचे असे सवंग प्रदर्शन करण्याचे कारण काय?

पण प्रसिद्धी आणि श्रेयासाठीची ही तगमग आणि घालमेल हो! बाकी काही नाही! श्रेयासाठी वाटेल त्या थराला जाण्याची चढाओढ सुरू आहे आणि मृत्यूसारख्या प्रसंगाचे गांभीर्यही नष्ट केले जात आहे.

सुमारबुद्धी व उथळ-सवंग राजकारणाचा बोलबाला असल्यावर असेच घडणार!

 

‘मोदी-०२’मधील ‘सुषमा स्वराज’?

सुषमा स्वराज यांची आठवण आजही येते. अकाली त्या सर्वांना सोडून गेल्या. एक कर्तबगार राजकीय नेत्या असून आणि परराष्ट्र खात्यासारखे मंत्रिपद मिळूनही त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांच्या कर्तृत्वाला पुरेसा वाव दिला गेला नाही, ही भावना त्यांना ओळखणारे अनेकजण व्यक्त करीत असतात. त्याला कारणही होते. 

‘मोदी-०१’ कारकिर्दीत एक-व्यक्तिकेंद्रित परराष्ट्र संबंधांना सुरुवात झाली. या नव्या संकल्पनेत परराष्ट्र संबंधांची सूत्रे पंतप्रधानांनी स्वतःच्या हाता घेतली आणि परराष्ट्रमंत्र्यांना दुय्यम किंवा गौण स्थान देण्यात येऊ लागले. पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जाताना व परतल्यावर त्यांचे स्वागत करणे किंवा परदेशात कुठेतरी अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणे एवढी मर्यादित भूमिका परराष्ट्रमंत्र्यांसाठी मुक्रर केली गेली. क्वचितच त्यांना पंतप्रधानांच्या समवेत परदेश दौऱ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली असावी. 

याला काय म्हणायचे? दुर्दैवी!
तीच अवस्था आता राजनाथ सिंग यांच्या वाट्याला येऊ लागली आहे. ते नावाचे संरक्षणमंत्री आहेत. परंतु, सारी सूत्रे पंतप्रधान, त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याकडे! राजनाथ सिंग यांचे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनतर्फे बांधल्या जाणाऱ्या रस्त्यांची व्हिडिओ उद्‌घाटने किंवा विविध संरक्षणविषयक कार्यक्रमांची उद्‌घाटने वगैरे.

गलवान खोऱ्यातील चिनी सैन्याबरोबरच्या झटापटीनंतर राजनाथ सिंग हे लेहला भेट देणार होते. त्यांचा दौरा जाहीरही करण्यात आला होता. अचानक कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक? स्वतः पंतप्रधानांनीच लेहला जाण्याचे ठरवले आणि तेथे पोचून त्यांनी जे काही त्यांनी करणे अपेक्षित होते ते सर्व केले. बिच्चारे राजनाथ सिंग दिल्लीतच बसून राहिले आणि टीव्हीवरची दृष्ये पाहून त्यांना स्वतःचे समाधान करून घ्यावे लागले.

राजनाथ सिंग यांचा दौरा रद्द करण्यात आला, तरी किमान त्यांना या दौऱ्यात सहभागी करून घेण्यास काहीच हरकत नव्हती. परंतु, तेवढा मनाचा मोठेपणा दाखवला गेला नाही.

अटलबिहारी वाजपेयींच्या कवितेतली एक ओळ आठवते... ‘छोटे दिल से कोई बडा नही होता।’

राजनाथ सिंग यांनी हा प्रसंग गिळला! त्यानंतर त्यांनी दिल्लीत बसूनच सीमा भागात बांधण्यात आलेल्या तीन-चार रस्त्यांची उद्‌घाटने करून मन रमवले! तसेही त्यांना फारसे जबाबदारीचे काम नाही. तिन्ही सेनादलांसाठी आता संयुक्त प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ - सीडीएस) नेमण्यात आल्याने संरक्षणमंत्री व संरक्षणसचिवांना फारसे अधिकार राहिलेले नाहीत. सीडीएस हे थेट पंतप्रधानांना जबाबदार असल्याने संरक्षणमंत्र्यांना तसेही बाजूला सारण्यात आले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तर कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा प्राप्त असल्याने तेही पंतप्रधानांनाच जबाबदार आहेत.

सारांश काय?

नाव मोठे लक्षण...? पद मोठे पण अधिकार...?

असो, राजनाथ सिंगांच्या दुःखावर फुंकर कशी व कोण घालणार?

 

तिसरे सत्तास्थान?

‘अमर अकबर अँथनी’ निर्माते दिग्दर्शक मनमोहन देसाई यांना कुणी प्रश्‍न केला, की बॉलिवूडमधील पहिले दहा अभिनेते कोण? त्यांनी उत्तर दिले ‘अमिताभ बच्चन!’ प्रश्‍नकर्त्याने विचारले पुढे? पुढे दहाव्या क्रमांकापर्यंत मनमोहन देसाईंनी अमिताभचेच नाव घेतले. प्रश्‍नकर्ता चक्रावला. त्याला फार काळ आचंबित न ठेवता मनमोहन देसाई म्हणाले, हिंदी चित्रसृष्टीत एक ते दहा नंबरवर अमिताभच आहे. बाकीचे अकराव्या नंबरापासून सुरू होतात. खरे खोटे हे देसाईच जाणोत, पण त्यांच्या नावावर हा किस्सा सांगितला जातो.

सध्या राजकारणातही काहीशी अशीच अवस्था आहे असे वाटते. २०१९ पर्यंत तरी देशात एकाच नेत्याचा बोलबाला होता... ‘सबकुछ वही’! २०१९ नंतर आणखी एका सहनायकाचा उदय झाला आणि मग या सहनायकालाही काही प्रमाणात का होईना थोडे बरोबरीचे स्थान मिळू लागले. कारणे काहीही असोत!

इतके दिवस असे वाटत होते, की बस्स आता या दोन नेत्यांखेरीज पक्षात, संघटनेत, सरकारमध्ये कुणीच दिसत नाही. पण परिस्थिती पालटताना दिसू लागली आहे. 

गुरू गोरक्षनाथाने एका तिसऱ्या नेत्याला उदयाला घातले आहे असे दिसते. गोरखपूर पीठाचे स्वामी योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्रीही आहेत, त्यांनी राजकीय नेते म्हणून अशी बाजी मारली आहे, की सत्तापक्षात त्यांना आता फारच गांभीर्याने घेतले जाऊ लागले आहे. विशेषतः कुविख्यात गुंड विकास दुबे प्रकरणाचा ज्या प्रकारे फडशा पाडण्यात आला, त्या पार्श्‍वभूमीवर एक विलक्षण धैर्य, साहस, हिंमत असलेले नेते म्हणून त्यांचा लौकिक निर्माण झाला आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना त्यांनी ज्या पोलादीपणे दंडित केले, त्याचीदेखील हिंदुत्ववादी व विशेषतः कट्टरपंथी हिंदुत्ववाद्यांमध्ये त्यांनी मोठी वाहवा मिळवली आहे. मुस्लिमांच्या विरोधात त्यांची वाणी आणि कृती या दोन्हींना विशेष धार चढते आणि त्याचा प्रत्ययच त्यांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातील आंदोलनाच्यावेळी दिला.

आता विकास दुबे प्रकरणाने तर त्यांच्या कारकिर्दीवर कळस चढल्यासारखे झाले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर दिल्लीतल्या दोन प्रमुख नेत्यांच्या बरोबरीने त्यांचे नाव आता चर्चिले जाऊ लागले आहे.

याचा अर्थ काय? सत्तापक्षात तिसऱ्या शक्तीचा उदय? ही शक्ती खपवून घेतली जाणार काय?

येणारा काळच उत्तर देईल!

संबंधित बातम्या