कट्टा

अनंत बागाईतकर, दिल्ली 
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

कट्टा
राजकारणातही गमती जमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...  
कलंदर

भाजप विरुद्ध भाजप? 

देश, समाज यांच्यासाठी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या इतिहास प्रसिद्ध व्यक्तींवरून वाद निर्माण होऊ नये अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. विशेषतः अलीकडच्या काळात इतिहासावरून हलकल्लोळ करण्याचे प्रकार सर्रास घडू लागल्याचे आढळून येते. इतिहासपुरुषांना प्रदेशाच्या मर्यादा घालण्याचे प्रकारही होऊ लागले आहेत. एकंदरीतच उबग आणणाऱ्या या घटना आहेत व त्यामुळे निर्माण झालेले वातावरणही अस्वस्थ करणारे आहे. 
बेळगाव जिल्ह्यातील मनगुट्टी नावाच्या लहानशा गावात तेथील रहिवाशांनी शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा मध्यवर्ती चौकात उभारला. तत्काळ कन्नड अस्मिता बाळगणाऱ्या संघटना व गटांनी त्याला हरकत घेतली आणि असा पुतळा बसविण्यासाठी पूर्वपरवानगी घेतलेली नव्हती, असे कारण देऊन जिल्हा प्रशासनाने तो रातोरात हलविलादेखील. 
झाले! त्यावरून स्थानिक पातळीवर वादावादीला तोंड फुटले आणि इकडे महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली. 
आता बेंगळुरू आणि मंगलोर येथील दोन उड्डाण पुलांच्या नावावरूनही असा वाद निर्माण झाला आहे. बेंगळुरूमध्ये ज्या रस्त्यावर नेहमी वाहतुकीची कोंडी होत असे, तेथे हा उड्डाण पूल बांधून सुरळीत वाहतुकीची सुविधा निर्माण करण्यात आली. 
आता पूल म्हटले की त्याला कुणाचे तरी नाव देण्याचा मुद्दा आलाच! या पुलास स्वा. सावरकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने संमत केला. 
पुन्हा त्यावरून गदारोळ! 
कर्नाटकी अस्मिता बाळगणाऱ्या सर्व संघटनांनी त्यास कडाडून विरोध केला. कर्नाटकात नाव देण्यायोग्य कुणी व्यक्ती नव्हत्या का, कर्नाटकात असंख्य महान व थोर व्यक्ती होऊन गेलेल्या असताना सावरकरांचे नाव का असा सवाल करण्यात आला. 
हा वाद इतका विकोपाला गेला, की या पुलाचे उद्‌घाटनच लांबणीवर पडत गेले. पूल विना उद्‌घाटनच सुरू करण्यात आला. 
अखेर नुकतेच या पुलाचे नामकरण जाहीर करण्यात आले. त्याला सावरकरांचे नाव देण्यात आले. आता पुन्हा त्यावरून वाद पेटला आहे. पार सावरकरांनी ब्रिटिशांची माफी कशी मागितली होती हा इतिहासही उकरून काढला जात आहे. 
मुख्यमंत्री येडियुरप्पा हे भाजप व रा.स्व.संघाच्या आपल्या ‘बॉस’ना खूश करण्यासाठी हे प्रकार करीत आहेत अशी त्यांच्यावर टीका करण्यात आली. कर्नाटकातही अनेक देशभक्त होऊन गेले आहेत वगैरे वगैरे! 
ही सर्व कन्नड अस्मिता प्रेमी मंडळी भाजपचीच आहेत, परंतु सध्या त्यांचे कर्नाटकप्रेम अधिक प्रबळ झाले आहे. 
त्यामुळे ते आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ले करू लागले आहेत. 
दुसरीकडे भाजपचेच एक नेते सुब्रह्मण्यन स्वामी यांनी भाजपच्या ‘आयटी’ सेलचे प्रमुख अमित मालवीय हे त्यांची(स्वामी) बदनामी करीत असल्याची तक्रार त्यांनी पक्षाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्याकडे केली आहे आणि मालवीय यांना काढून न टाकल्यास आपण हे प्रकरण धसास लावू असा इशाराही दिला आहे. 
अन्य प्रकरणात ‘जी’ म्हणजेच ‘जॉइंट एन्ट्रन्स एक्‍झॅम’मध्ये अत्यंत कमी उपस्थिती होती व विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होऊ शकले नसल्याचा दावा त्यांनी केला आणि कोरोनाच्या या साथीत परीक्षा घेणे अयोग्य असल्याचे म्हटले. 
त्यांना शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी उत्तर देताना वस्तुस्थिती वेगळी असल्याचे सांगून किती विद्यार्थी परीक्षेला हजर होते त्याचा आकडा त्यांनी दिला आणि स्वामी यांची माहिती बरोबर नसल्याचे म्हटले. 
मग काय स्वामी पुन्हा भडकले. त्यांनी सांगितले की ते परीक्षा मंडळाकडील आकडेवारी कोर्टात सादर करतील! 
थोडक्‍यात काय? भाजपमध्ये सध्या अंतर्गतच वादावादी सुरू झालेली दिसते. भाजप विरुद्ध भाजप असा खेळ सुरू आहे! 

 

काँग्रेसमधला खो खो सुरूच! 

खो-खोचा खेळ म्हणा किंवा संगीतखुर्चीचा खेळ म्हणा! 
काँग्रेसमधलाच नव्हे तर तमाम राजकीय पक्ष आणि राजकारणातला हा सर्वात आवडता खेळ मानावा लागेल. एखादा राजकीय नेता पक्षांतर करतो. तत्काळ त्याला दुसऱ्या पक्षात आधीच्या पक्षासारखेच पद आणि स्थान दिले जाते. लेबल बदलले जाते, माल तोच राहतो! 
पक्षांच्या आत म्हणजेच पक्षांतर्गतदेखील असा खेळ सुरू असतोच! 
काँग्रेसचेच उदाहरण घ्या! सोनिया गांधी परदेशात उपचारासाठी किंवा त्यांच्या नियमित तपासण्यांसाठी गेल्या आहेत. जाताना त्यांनी पक्षाध्यक्षपदाची तात्पुरती जबाबदारी राहुल गांधी यांच्याकडे सोपवली आहे. पूर्वीदेखील एकदा असेच झाले होते. 
हा खेळ बंद व्हावा म्हणूनच ज्या तेवीस वरिष्ठ काँग्रेसजनांनी पत्र लिहिले होते त्यात नेमकी हीच मागणी करण्यात आलेली होती. काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असावा अशी मागणी त्यांनी केली होती. त्या पत्रात त्यांनी कुठेही ‘काँग्रेसच्या राजघराण्या’चा उल्लेख केलेला नव्हता. तरीदेखील त्यांचे पत्र गांधी कुटुंबाविरुद्ध असल्याचा आरोप करण्यात येऊन या तेवीस जणांवर वाटेल ते आरोप करण्यात आले. 
वस्तुतः त्यांच्या या पत्रामुळे ‘युवराज’ यांचा ‘राज्याभिषेक’ होण्यास मदतच झाली. कारण या पत्रामुळे त्यांना पुन्हा पक्षाध्यक्षपदाच्या घोड्यावर बसविण्याचे प्रयत्न सुरू झाले. आता पक्षातली व त्यांच्या निकटची मंडळी सांगू लागली आहेत, की आता राहुल गांधी अध्यक्षपदी पुन्हा आरूढ होण्यास तयार झाले आहेत. 
बहुधा त्याचा सराव किंवा रंगीत तालीम म्हणूनच आता सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीत त्यांना जी तात्पुरती जबाबदारी मिळाली आहे, तीच बहुधा पुढे कायम राहील अशी शक्‍यता नाकारता येत नाही. 
जानेवारी महिन्यांपर्यंत ते पुन्हा पूर्णवेळ अध्यक्ष होतील असे सांगितले जात आहे. तोपर्यंत हंगामी म्हणून काम करून ते पुन्हा आपली पकड प्रस्थापित करतील. 
गांधी कुटुंब आणि काँग्रेस पक्ष हे विभक्त न होणारे रसायन आहे. 
त्यामुळे या पक्षाला त्यांच्याशिवाय पर्याय नाही. कुटुंबालाही पक्ष हीच अंतिम बाब वाटत असल्याने ते पक्षावरील पकड किंचितही ढिली होऊ देत नाहीत, असे पक्षातले जुने अनुभवी नेते सांगतात. 
सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्याकडे तात्पुरता ‘चार्ज’ दिल्याचे कळल्यानंतर पक्षात आता सक्रिय नसलेल्या नेत्यांना काहीशी खोचक टिप्पणी करीत म्हटले, की किमान अध्यक्षपदाचा तात्पुरता चार्ज तरी कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीकडे द्यायला काय हरकत होती? मुळात सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष आणि आता त्यांनी या हंगामी पदाचाही ‘तात्पुरता चार्ज’ राहुल गांधी यांच्याकडे दिला आहे, किती हास्यास्पद? 
या नेत्याचे म्हणणे तसे खरेच आहे! पण काँग्रेसला याचीच सवय आहे. 
एक गांधी जाऊन दुसरा गांधी! संगीतखुर्चीचा खेळ सुरूच! 
 

 

आदित्य? नको नको! 

केंद्रीय वीज मंत्रालयातर्फे राज्य वीज मंडळांना त्यांचा तोटा कमी करून अधिक परिणामकारक पद्धतीने कारभार करण्यासाठी एक योजना आखली होती. ‘अटल डिस्ट्रिब्युशन सिस्टिम इंप्रूव्हमेंट योजना’ या योजनेअंतर्गत वीज मंडळांच्या वीज वितरण कंपन्यांसाठीची ती योजना होती. तिचे नामकरण ‘आदित्य’ असे करण्यात आले होते. 
परंतु महाराष्ट्रात झालेल्या राजकीय बदलांचा परिणाम या नामकरणावर झाला. 
शिवसेनेने भाजपला धोबीपछाड देऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता संपादन केली. त्यानंतर ‘आदित्य’ या नावाचा फेरविचार सुरू झाला. ताज्या माहितीनुसार वीज मंत्रालयाने हे नावच रद्द करून टाकले आहे आणि अटल योजना नावानेच ही योजना सुरू ठेवायचे ठरवले आहे. 
‘नावात काय असते?’ असे म्हणतात? पण नावात भरपूर काही असते हे खरे! 
आता आदित्य हे नाव काय केवळ जगात एकाच व्यक्तीचे आहे काय? जगात केवळ एकच ठाकरे आदित्य आहेत काय? 
पण मनाच्या खेळाला काय म्हणावे? 

 

असंतुष्टांनाही दिलासा? 

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या पक्षाच्या काही बैठका घेऊन त्यात संभाव्य संसदीय रणनीतीची चर्चा केली. 
असंतुष्टांचे नेते गुलाम नबी आझाद यांना त्यांनी समविचारी पक्षांबरोबर बैठक करून संयुक्त संसदीय रणनीतीबाबत चर्चा करण्यास सांगितले. या बैठकीत असंतुष्टांपैकी आनंद शर्मा व मनीष तिवारी हेही सहभागी झाले होते. 
तिवारी यांना लोकसभेत कोणतेही पद दिलेले नसले, तरी त्यांना बैठकीला बोलावून सोनिया गांधी यांनी त्यांना पूर्ण दुर्लक्षित केलेले नाही हे सूचित केले. 
थोडक्‍यात असंतुष्टांनाही दिलासा देणे आणि त्यांनाही वाळीत टाकण्यापेक्षा बरोबर घेण्याचा मोठेपणा काँग्रेस नेतृत्वाने दाखवला हे काही नसे थोडके! 

संबंधित बातम्या