कट्टा - कलंदर 

अनंत बागाईतकर, दिल्ली 
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

कट्टा
राजकारणातही गमती जमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...  
कलंदर

वाढदिवसाची भेट? 
अकाली दलाने भाजपबरोबरच्या काडीमोडासाठी निवडलेला दिवसही विशिष्ट होता. पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी भाजपचा निरोप घेतला. 
शेतीक्षेत्रातील सुधारणांच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून मोदी सरकारने तीन वटहुकूम काढले होते. त्यातील शेती उत्पादन व्यापार वृद्धी व सुविधा आणि शेतकरी संरक्षण व सबलीकरण या दोन वटहुकमाशी संबंधित विधेयके लोकसभेत मंजुरीसाठी सादर करण्यात आली. यावर अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी काँग्रेसवर भरपूर टीका केली. 
काँग्रेसने सत्तर वर्षांत काही केले नाही वगैरे वगैरे बोलून त्यांनी काँग्रेसच्या गेल्या लोकसभा निवडणुकीतल्या जाहीरनाम्याचा संदर्भ दिला, ज्यात त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीविषयक कायदा रद्द करून नवा बदली कायदा आणण्याचे आश्‍वासन दिले होते. 
त्यांच्या या भाषणाने भाजपचे सदस्य सुखावले होते. पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांना भाषण आवरते घेण्यास सांगितल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी त्यांना आणखी बोलू द्यावे आणि वेळ वाढवून द्यावा अशी त्यांची वकिलीही केली. 
परंतु ,भाजपला सुखबीर यांच्या मनात काय आहे हे कळलेच नव्हते. भाषणाच्या अखेरीला सुखबीर यांनी बॉम्ब टाकला. 
या वटहुकमांना म्हणजेच या विधेयकांना आमचा विरोध आहे आणि ते मागे घेण्याची सरकारची तयारी नसल्याचे दिसत असल्याने माझी पत्नी हरसिम्रत कौर तिच्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. आम्ही या सरकारमध्ये राहू शकत नाही. 
हे बोलून सुखबीर बादल त्यांच्या पत्नी हरसिम्रत कौर यांच्यासह सभागृहातून बाहेर निघून गेले. भाजपचे सदस्य अक्षरशः सुन्न झालेले दिसत होते. 
यानंतर काही वेळाने सुखबीर एकटेच सभागृहात पुन्हा येऊन बसले आणि त्यांनी त्यांच्या पक्षाच्या सदस्यांना विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याची सूचनाही दिली. विरोधी मतदान करूनच ते पुन्हा बाहेर गेले. 
पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही घटना घडल्याने त्यांच्या वाढदिवसाच्या आनंदाला गालबोट लागले खरे! 
राजकीयदृष्ट्यादेखील हा एक दुःखद प्रसंगच होता. 
अकाली दल आणि शिवसेना हे भाजपचे अगदी जिवाभावाचे सहकारी मित्रपक्ष होते. भाजपने आघाडीचे राजकारण सुरू केल्यापासून म्हणजेच पहिल्यापासून त्यांच्याबरोबर राहिलेले हे दोन पक्ष होते. इतर अनेक पक्षांनी भाजपला कधी साथ दिली तर कधी दगाही दिला. परंतु, हे दोन्ही पक्ष भाजपबरोबर निष्ठेने दीर्घकाळ राहिले. 
परंतु भाजपचे वर्तमान नेतृत्व त्यांना बरोबर ठेवू शकले नाही असे म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडली. आता शेतकऱ्यांच्या मुद्यावर अकाली दलाने भाजपशी काडीमोड घेतला. 
ही भाजपच्या दृष्टीने दुश्चिन्हे म्हणावी लागतील. 
-------------------------------------------------------------------- 

अकाली दलानंतर पाळी कुणाची? 

अकाली दलाने शेतकऱ्यांच्या मुद्यावर भाजपचा निरोप घेतला. आता पाळी कुणाची अशी चर्चा सुरू झाली आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात असाच काहीसा प्रकार घडला होता. भाजपच्या अनेक मित्रपक्षांनी भाजपच्या पराभवापूर्वी त्यांच्या आघाडीतून काढता पाय घेतला होता. त्यावेळी रामविलास पास्वान, ममता बॅनर्जी, द्रमुक या पक्षांनी भाजपची साथ सोडून काँग्रेसचा हात धरला होता. 
अकाली दलाने शेतकऱ्यांच्या मुद्यावर काढता पाय घेतल्यानंतर पंजाब शेजारच्याच हरयाणा राज्यातील भाजप आणि दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्ष यांच्यात तणाव वाढला आहे. 
दुष्यंत चौटाला हे देवीलाल यांचे पणतू आहेत, ज्यांनी शेतकऱ्यांच्या आधारे राजकारण केलेले होते. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा दुष्यंत चौटाला यांच्यावर आहेत. 
त्यात हरयाणातील सरकार चौटाला यांच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्याने भाजपची ती एक कसोटीच ठरणार आहे. 
दुसरीकडे बिहारमध्येदेखील भाजपला त्यांच्या दोन मित्रपक्षांमधल्या भांडाभांडीला तोंड द्यावे लागत आहे. रामविलास पास्वान यांचा लोकजनशक्ती पक्ष आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा संयुक्त जनता दल पक्ष! नीतीश कुमार आणि पास्वान यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. त्यामुळे पास्वान व त्यांचे चिरंजीव चिराग (जे सध्या पक्षाची सूत्रे सांभाळत आहेत) यांनी ते संयुक्त जनता दलाबरोबर कोणताही संबंध ठेवू इच्छित नसल्याचे भाजपला स्पष्ट केले आहे. जागावाटपाबाबतदेखील ते संयुक्त जनता दलाशी कोणतीही बोलणी करणार नसल्याचे सांगितले आहे. 
भाजपने मात्र नीतीश कुमार हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचे व त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केलेले आहे. त्यामुळेही पास्वान पितापुत्र अस्वस्थ आहेत. आता त्यांनी भाजपने संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा लढवाव्यात असे सुचविले आहे. 
संयुक्त जनता दलानेही एकंदर ३४३ जागांपैकी ११५ जागांवर दावा सांगून १२८ जागा भाजपला सोडण्याची तयारी दाखवली आहे. भाजपने त्यांच्या कोट्यातून पास्वान यांना जागा द्याव्यात असेही त्यांनी सुचवले आहे. 
या प्रकारामुळे भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढलेली आहे. त्यात भाजपचे निवडणूक चाणक्‍य अमित शहा यांची प्रकृती म्हणावी तशी चांगली नसल्यानेही पक्षापुढे जरा अडचणी वाढलेल्या आहेत. 
तिकडे तमीळनाडूमध्येदेखील अण्णा द्रमुक पक्ष नाराजच झालेला आहे. विशेषतः जीएसटी आणि नवे शैक्षणिक धोरण या दोन मुद्यांवर त्यांच्या भावना तीव्र आहेत. 
सारांश काय? 
भाजपच्या जहाजावरूनही बहिर्गमनाची सुरू झालेली मालिका पुढे किती लांबणार? 
थांबा आणि वाट पाहा! 
---------------------------------------------------------- 

संसद आणि कोरोना 
 
कोरोनाच्या छायेतच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. कोरोनाच्या विषाणूला संसदेत प्रवेश मिळू नये यासाठी कमालीच्या उपाययोजना करण्यात आल्या. 
संसद सदस्यांपासून ते कर्मचारिवर्ग आणि वार्तांकनासाठी विशेष परवानगी मिळालेल्या पत्रकारांपर्यंत सर्वांना विशेष उपाययोजनांचे बंधन घालण्यात आले होते. त्यानुसार अधिवेशन सुरू होण्यापूर्वी दोन दिवस या सर्वांना विविध चाचण्या करून घेण्यास सांगण्यात आले. त्यासाठी संसदेत विशेष सोयही करण्यात आली. त्या चाचण्यांचे मिळालेले प्रमाणपत्र दाखवूनच प्रवेश देण्याचे ठरविण्यात आले. 
हे सर्व तर व्यवस्थित पार पडले. 
परंतु पहिल्या दिवशीचे कामकाज पार पडल्यानंतर सहज आढावा घेतल्यावर लोकसभेचे १७, राज्यसभेचे ८ असे २५ संसदसदस्य कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. ५०हून अधिक कर्मचारीही कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. 
काय? 
आणखी एक हुकूम जारी झाला. 
आता रोजच्या रोज संसदेत प्रवेश करण्यापूर्वी बाहेरच पत्रकार आणि प्रवेशाची परवानगी असलेल्या प्रत्येकाला कोरोनाच्या ‘रॅपिड टेस्ट’ करण्याचे बंधन लागू करण्यात आले. 
कोरोनामुळे संसदेतली सर्व कॅंटीन बंद करण्यात आली आहेत. केवळ चहा आणि कॉफी व बिस्किटे मिळू शकतात. याखेरीज कुणाला जेवायचे असल्यास एक दिवस आधी पूर्वसूचना दिल्यानंतर तेवढेच अन्न दिले जाईल असे सांगण्यात आले आहे. तेही बाहेरून आणण्यात येणार आहे. म्हणजेच ‘आउटसोर्सिंग’ करण्यात आले आहे. यामुळे खाण्यावरही एकप्रकारे बंधनच आले आहे. 
थोडक्‍यात काय कोरोनाच्या नावाखाली संसदेत पूर्वापार चालत आलेले रेल्वेचे कॅंटीन बंद करून कदाचित एखाद्या खासगी कंपनीकडे दिले जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. हे सरकार तसेही खासगीकरणासाठी सतत आसुसलेले असते आणि कोरोनामुळे एक आयती संधी त्यांना मिळाली आहे. 
असे असले तरी संसदसदस्य हे परस्परांशी बिनधास्तपणे भेटताना आढळतात. एकमेकांच्या बाकाजवळ जाऊन बोलताना दिसतात. संसदेच्या आवारातही शारीरिक विलगता किंवा दूरीकरणाचा निकष कुणी कटाक्षाने पाळताना क्वचितच दिसतात. 
यामुळे कोरोनाची भीती हळूहळू कमी होत चालली असावी असे वाटायला लागले आहे, जे चांगले चिन्ह मानावे लागेल! 
परंतु बहुधा सरकारला मात्र ही मनातली भीती दूर होण्याची बाब पटलेली नसावी. आता अठरा दिवसांचे हे अधिवेशन आणखी कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 
हे अधिवेशन बिना सुटीचे आहे म्हणजेच रविवारीदेखील कामकाज राहणार आहे. परंतु, आता या नव्या परिस्थितीत सरकार काय करणार याकडे नजरा लागलेल्या आहेत. प्रश्‍नोत्तराचा तास रद्द करून सरकारने विरोधकांना आरडाओरडा करण्याची संधी दिली होती. आता अधिवेशनाच्या कालावधीत कपात केल्यास आणखी गदारोळ अपेक्षित आहे. 
---------------------------------------------------- 

तुमचे मोदी... माझे मोदी! 

बिहारमध्ये एक विनोद पूर्वीपासूनच प्रचलित आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नावावर तो खपवला जातो. नीतीश कुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी आणि नरेंद्र मोदी यांनी नीतीश कुमार यांच्याशी राजकीयदृष्ट्या जुळवून घेतलेले असले, तरी दोघांच्या तारा जुळल्या आहेत असे म्हणण्यास वाव नाही. 
त्यामुळेच नीतीश कुमार खासगीत नेहमी विनोद करतात, की ‘त्या’ मोदींची (नरेंद्र) आम्हाला गरज नाही कारण ‘हे’ मोदी (सुशील) आम्ही आधीपासूनच आमच्याबरोबर घेतलेले आहेत. 
बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे स्थानिक वरिष्ठ नेते सुशील मोदी हे नीतीश कुमार यांचे अतिनिकटचे मित्र मानले जातात. भले दोघेही वेगवेगळ्या पक्षात असोत पण त्यांची मैत्री अभंग आहे. 
त्यामुळेच बिहारमधल्या ‘मोदींना’ बरोबर ठेवणे हे त्यांना अधिक सोपे वाटते आणि त्यामुळेच ‘दिल्लीतल्या मोदींची’ त्यांना चिंता करण्याची गरज वाटत नाही असे सांगितले जाते. 
याचा पुरावा नुकताच मिळाला. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बिहारसाठी काही योजना जाहीर केल्या. पशुधन व मत्स्योद्योगाशी निगडित त्या होत्या. 
त्या व्हर्च्युअल कार्यक्रमात बोलताना सुशील मोदी यांनी नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा नीतीश कुमार यांच्यावर जोरदार स्तुतिसुमने उधळली. नीतीश कुमार हे कसे दूरदृष्टीचे नेते आहेत याचे त्यांनी रसभरित वर्णन केले. 
त्यांचा हा परधार्जिणेपणा दिल्लीतल्या भाजपनेतृत्वाच्या पचनी पडणे अवघड गेले. सुशील मोदी यांनी त्यांचे नेते नरेंद्र मोदी यांची स्तुती करणे, बिहारच्या विकासाचे श्रेय त्यांना देणे अपेक्षित असताना त्यांनी नीतीश कुमार यांना सर्व श्रेय देण्याचे धाडस करावे? 
काय? सुशील मोदी यांच्या विरोधात कुजबुज टोळी सक्रिय झाली. 
या टोळीच्या म्हणण्यानुसार ‘सुशील-नीतीश’ जोडगोळीला त्यांचा हा नसता आगाऊपणा भोवल्याखेरीज राहणार नाही! 
पाहू या कधी तो भोवतो ते! सध्या तर भाजप आघाडीला गळती लागलेली आहे. बिहार निवडणुकीच्यावेळी त्यात आणखी वाढ व्हायला नको! 
------------------------------------------------------------- 

भाजपमधली घराणेशाही! 

घराणेशाहीवरून इतर पक्षांना नावे ठेवण्यात भाजपचे नेतृत्व नेहमीच आघाडीवर असते. परंतु दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ शोधताना स्वतःच्या डोळ्यातल्या मुसळाकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार आहे. 
घराणेशाहीचा रोग भारतीय राजकारणाला नवा नाही आणि तो पूर्वीपासूनच जडलेला आहे. या रोगाला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही व त्यामुळेच कोणत्याच राजकीय पक्षाने नाकाने कांदे सोलण्याची गरजही नाही. 
तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बुकनकेरी सिद्दलिंगप्पा येडियुरप्पा म्हणजेच ‘बीएसवाय’ यांनी घराणेशाहीचा आदर्श निर्माण केला आहे. 
त्यांचे चिरंजीव बुकनकेरी येडियुरप्पा राघवेंद्र हे लोकसभेचे सदस्य आहेत. त्यांचे दुसरे चिरंजीव बुकनकेरी येडियुरप्पा विजयेंद्र हे कर्नाटक भाजपचे उपाध्यक्ष आहेत. एकाच घरात तीन तीन राजकीय नेते, व्वा क्‍या बात है! 
परंतु त्यांना असल्या टीकाटिप्पणीचे सोयरसुतकही नाही. 
लिंगायत समाजाचे ते अनभिषिक्त नेते मानले जातात आणि त्यांना अद्याप पर्याय उभा न राहिल्याने तूर्तास तरी ते म्हणतील ती पूर्वदिशा असे कर्नाटकचे राजकारण सुरू आहे. 
एक बिनधास्त राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे आणि प्रसंगी केंद्रीय नेतृत्वालाही फारसे न जुमानण्याची भूमिका घेण्यात ते मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळेच केंद्रीय नेतृत्वदेखील त्यांच्याबाबत सावध असते. 
ते मात्र आपले मुख्यमंत्रिपद आनंदात उपभोगत आहेत! 

संबंधित बातम्या