कट्टा

अनंत बागाईतकर, दिल्ली 
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

कट्टा
राजकारणातही गमती जमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...  
कलंदर

कॉंग्रेसमधली वाढती चहलपहल!
जी-23' म्हणजेच पक्षातल्या काही प्रमुख अशा २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना कॉंग्रेसच्या निष्क्रियतेबद्दल पत्र लिहिल्यानंतर पक्षात खरोखरच हालचाली सुरू झाल्या आहेत. 
गेल्या काही दिवसात कॉंग्रेस कार्यकारिणी, पदाधिकाऱ्यांच्यात अनेक फेरबदल करण्यात आले. विविध विभागांच्या प्रमुखांनाही बदलण्यात आले. नव्यांना नेमण्यात आले. पुढच्या टप्प्यात सचिव पातळीवरील फेरबदल करण्यात येणार आहेत.
दरम्यान, पक्षाच्या मीडियाविषयक विभागाच्या प्रमुखपदी कोण येणार याची सध्या जोरदार चर्चा आहे. नव्या काळात कोणत्याही पक्षाच्या मीडिया विभागाला एक नवे महत्त्व प्राप्त झालेले आहे. प्रतिमानिर्मिती आणि प्रसिद्धी ही वर्तमानयुगाची चलनी नाणी आहेत. त्यामुळे पक्ष असो किंवा पक्षनेते असोत, त्यांची प्रतिमानिर्मिती व प्रसिद्धी हा एक विलक्षण चुरशीचा व बेफाम स्पर्धेचा खेळ झालेला आहे. पक्षापक्षांमध्ये यावरून जी चढाओढ आणि रस्सीखेच सुरू असते, ती अभूतपूर्व म्हणावी लागेल.
त्यामुळेच या नव्या प्रसिध्दीच्या शह-मात खेळासाठी खेळाडूही तेवढेच तरबेज असणे आवश्‍यक असते. प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाला लोळविण्याची व युक्तिवादात चीत करण्याची क्षमता असलेला मीडिया प्रभारी असणे ही राजकीय पक्षांची नितांत गरज झालेली आहे. कॉंग्रेसचे सध्याचे मीडिया विभाग प्रमुख रणदीप सुरजेवाला यांना सरचिटणीसपद देण्यात येऊन कर्नाटकसारखी महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी कुणाला नेमायचे याचा शोध सुरू झालेला आहे. जी नावे चर्चेत आहेत त्यात आनंद शर्मा, अभिषेक मनु सिंघवी आणि मनीष तिवारी यांचा समावेश आहे. यामध्ये आनंद शर्मा आणि मनीष तिवारी यांचे पारडे फारसे जड नाही. कारण दोघेही ‘जी-23'चे सदस्य असून त्या पत्रावर त्यांचीही सही होती. अर्थात त्यांच्यावर पूर्ण फुली मारता येणार नाही, कारण नव्या फेररचनेत अनेक असंतुष्ट नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. पण आनंद शर्मा हे राज्यसभेत उपनेते आहेत आणि गृह मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षही आहेत. ही मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे ते मीडिया विभागाला कितपत न्याय देऊ शकतील ही शंका आहे.
अभिषेक सिंघवी हे अत्यंत मागणी असलेले प्रथितयश वकील आहेत आणि त्या पेशामुळे तेही यासाठी किती वेळ देऊ शकतील हा प्रश्‍न आहे. तिवारी यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. ते प्रवक्तेही आहेत आणि सौम्य स्वभावाचे व अभ्यासूही आहेत. पत्रकारांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. पण असे असले तरी कुणीतरी ‘गडद रंगाचा घोडा'(डार्क हॉर्स)देखील असतोच! राजस्थानातील बंडखोर नेते सचिन पायलट यांचेही नाव यासाठी चर्चेत आहे. सचिन पायलट यांचेही दिल्लीतल्या पत्रकारांशी चांगले संबंध आहेत. त्यांचे वडील राजेश पायलट याच्याप्रमाणेच ते दिल्लीच्या पत्रकार वर्तुळात चांगले वजन राखून आहेत. त्यामुळे त्यांना राजस्थानातल्या राजकारणातून काढून ‘राहुल दिल्ली टीम'मध्ये समाविष्ट करता येऊ शकते काय अशीही चर्चा कानावर येत आहे.
 मीडिया विभागासाठी जी नावे चर्चेत आहेत त्यांच्यासाठी एक निकष अत्यावश्‍यक आहे आणि तो म्हणजे ती व्यक्ती इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये कुशल असणे अपेक्षित आहे. या दोन्ही भाषा सफाईदारपणे बोलू शकणाऱ्या नेत्यांचाच या पदासाठी विचार केला जाणार आहे. वरील सर्व नावे विचारात घेता यातील प्रत्येकजण दोन्ही भाषा सफाईदारपणे बोलणारा आहे. आणखी असेच एक नाव चर्चेत आहे आणि ते जयराम रमेश यांचे आहे. तेही पत्रकारांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. अभ्यासू, हिंदी व इंग्रजीवर समान प्रभुत्व ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. विषयांची त्यांची उत्तम जाण आहे. परंतु तेही सध्या बौध्दिक कामात म्हणजेच संशोधनपर पुस्तके लिहिण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे त्यांचा विचारही करण्यात अनेक पण-परंतु आहेत.
येत्या काही दिवसातच हे नाव समोर येईल!   

व्हॉट्‌सअॅपची धास्ती?

भीती आणि धास्तीचे नवनवे प्रकार आणि आविष्कार पहायला मिळायला लागले आहेत.
हल्ली पत्रकारांनादेखील माहिती काढण्यासाठी त्यांचे जे ‘सोर्स‘ किंवा ‘खबरे‘ किंवा ‘सूत्र‘ असतात त्यांच्यापर्यंत पोचणे काहीसे जिकिरीचे झाले आहे. एकतर कुणाच्या कार्यालयात जाणे आता निव्वळ दुरापास्त झाले आहे. हॉटेले, उपहारगृहे अद्याप पुरेशा प्रमाणात उघडलेली नाहीत आणि उघडलेली असली तरी तेथे जाण्यास कुणी धजावत नाही अशी स्थिती आहे. कोरोनाच्या अदृष्य भीतीने सगळ्यांना असे जखडून टाकले आहे.
अशा या परिस्थितीत पत्रकार आणि त्यांना माहिती देणाऱ्यांचा मुख्य भर व्हॉट्‌सॲप सारख्या सामाजिक माध्यमावर असणे स्वाभाविक आहे. किंबहुना सरकारदेखील पत्रकारांना माहिती पुरविण्यासाठी इमेल, ट्वीटर किंवा व्हॉट्‌सॲप या माध्यमांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहे. परंतु...!
अलीकडेच काही प्रसिध्द अभिनेते व अभिनेत्र्यांची त्यांच्या जुन्या व्हॉट्‌सॲप मेसेजचे संदर्भ घेऊन त्यांची चौकशी झाली होती. या प्रकाराने पत्रकारांच्या ‘सोर्स'मध्येदेखील धास्तीची भावना आली आहे. आता सरळ सांगितले जाते की मेसेज वगैरे काही केले जाणार नाहीत. जे काही असेल ते प्रत्यक्ष भेटीत आणि भेटही शक्‍य असेल तरच !
कोरोनामुळे जे काही नवनवे प्रश्‍न समस्या व अडचणी उभ्या रहात आहेत त्याची ही एक झलक!   

इच्छुकांची तारांबळ !

बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले. ऑक्‍टोबरच्या १ तारखेपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झालीदेखील. बिहार राज्य हे भारतीय राजकारणाचा अर्क मानले जाते. त्यामुळे तेथे निवडणूक लढविणे आणि त्यासाठी तिकिट मिळवणे हा एक विलक्षण चुरशीचा खेळ असतो. तो दर निवडणुकीला अनुभवाला येतच असतो. परस्पर कुरघोड्या करून एकमेकांची तिकिटे कापण्याचा एक विलक्षण खेळ यानिमित्ताने होत असतो. कोरोनाच्या छायेत हे सर्व काही खतम !
बिहारहून तिकिटासाठी पक्षाच्या हायकमांडला भेटायला येणे, तिकिटासाठी ‘लॉबिंग' करणे, त्यासाठी दिल्लीत समर्थकांची झुंड जमवणे हे सर्व प्रकार यावेळी पूर्ण अदृष्य आहेत. कारण, रेल्वेगाड्या पुरेशा नाहीत. विमानवाहतूकदेखील म्हणावी तेवढ्या प्रमाणात सुरळीत नाही. तसेच विमानाने समर्थकांच्या झुंडी आणणे शक्‍य नाही. त्यामुळे निवडणुकीचे जे उत्सवी स्वरूप असते ते सारे काही लुप्त झाले आहे.
तरीही परिस्थितीपुढे हार न मानणारे ‘महा-इच्छुक' असतातच. त्यातील काहीजणांनी चक्क त्यांच्या स्वतःच्या वाहनाने दिल्ली गाठली. काहींनी चोवीस तास, तर काहींनी छत्तीस तास प्रवास करुन दिल्ली गाठली. पुन्हा कोरोना अडवा आलाच! हायकमांड म्हणजेच केंद्रीय नेते त्यांना सहजासहजी भेटायला तयार झाले नाहीत.‘तुमची माहिती, बायोडेटा देऊन जा, तिकिटवाटपासाठी बैठक झाली की विचार करू' असे सांगून त्यांना परतीच्या वाटेला लावण्यात आले. आता काय करावे? कोरोनाने सगळीच पंचाईत करून टाकली!   

राजकीय यात्रांचा हंगाम!

कृषिविषयक विधेयके मंजूर केल्यानंतर त्याला जबरदस्त विरोध होताना आढळत आहे. शेतकऱ्यांचा प्रश्‍न असल्याने ग्रामीण भागाशी त्याचा संबंध असणे नैसर्गिकच आहे. त्यामुळे या नव्या कायद्यांना विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे लक्ष ग्रामीण भागाकडे वळवलेले आहे. पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेशात या आंदोलनाचा विशेष जोर दिसून येतो.
पंजाबमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे आणि तेथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कॉंग्रेसने पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि त्यात सक्रिय सहभाग दिला आहे. कॉंग्रेसचा प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष अकाली दलही आंदोलनात आहे आणि त्यांनीही ग्रामीण भागात त्यांच्या पक्षाच्या मदतीने आंदोलन छेडलेले आहे. पंजाबमध्ये राहुल गांधी यांची ट्रॅक्‍टर रॅली एका दिवसाने पुढे ढकलण्यात आली. कारण राहुल गांधी हे बिहारमधील जागावाटपाच्या कामात काहीसे व्यग्र राहिले. काहीजणांनी यात्रा वेळेवर सुरू करावी आणि राहुल त्यात मागाहून सहभागी होतील असे सुचवले पण मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी एक दिवस थांबून राहुल आल्यानंतरच यात्रा सुरू करण्यास सांगितले. यानंतर कॉंग्रेसतर्फे देशाच्या इतर राज्यांमध्येही या नव्या शेतकरी कायद्यांविरुध्द आंदोलने केलीच जाणार आहेत. पंजाबमधील यात्रेत ट्रॅक्‍टर वापरले जाणार असतील तर इतर राज्यांमध्ये बैलगाड्या तर काही ठिकाणी राहुल गांधी पदयात्राही काढणार आहेत. कॉंग्रेस सक्रिय होत आहे हे काय कमी आहे?   

कुणाचा टीआरपी जास्त?

लोकांना अधिक रस कशात आहे? राजकारणात की खेळांमध्ये? उत्तर सोपे नाही! पण या प्रश्‍नाचे उत्तर कदाचित १० नोव्हेंबरला मिळू शकेल. बिहार विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले. तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे आणि निकाल १० नोव्हेंबरला लागतील. 
बिहारबरोबरच देशातील सुमारे पन्नासहून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकाही घेतल्या जाणार आहेत. यापैकी २७ पोटनिवडणुका एकट्या मध्य प्रदेशातल्या आहेत. आठवतंय ना? महाराज ज्योतिरादित्य शिंदे यांचे बंड? त्यांच्या बंडामुळे मध्य प्रदेशातले कॉंग्रेसचे सरकार पडले होते. त्यांच्याबरोबर जे २७ आमदार राजीनामे देऊन बाहेर पडले त्यांच्या जागांवर या पोटनिवडणुका होत आहेत. म्हणजेच आता नव्याने स्थापन झालेल्या भाजपच्या सरकारचं भवितव्यदेखील या पोटनिवडणुकांच्या निकालांवर अवलंबून असेल. त्यांचा निकालही १० नोव्हेंबरलाच असेल. त्यातही उत्कंठेचा भाग म्हणजे या निवडणुकांमध्ये फारसा दृष्य प्रचार राहणार नाही आणि कोरोना, लॉकडाउननंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्यानेही मतदार त्यात कसा भाग घेणार वगैरे गोष्टींबद्दलही उत्सुकता आहे.
निवडणूक आयोगाने तर कोरोना साथीच्या काळातली ही जगातली सर्वात मोठी निवडणूक असल्याचा दावा केला आहे. तसेच लॉकडाउन आणि इतरही भरपूर मुद्दे या निवडणुकीवर वरचष्मा गाजविण्याची चिन्हे आहेत व त्यातून जनतेचा कौल आणि कल कोणत्या बाजूकडे आहे तेही कळणार आहे. म्हणून १० नोव्हेंबरचा दिवस राजकारणप्रेमींसाठी महत्त्वाचा असेल! पण काय योगायोग पहा! याच दिवशी क्रिकेटच्या इंडियन प्रीमियर लीग ऊर्फ आयपीएलच्या मालिकेचाही समारोपाचा म्हणजेच अंतिम विजेतेपदासाठीचा सामना आहे. आता आली का पंचाईत? क्रीडाप्रेमींनादेखील याच दिवसाची उत्कंठेने प्रतीक्षा आहेच! होणार काय? खुद्द टीव्हीच्या वाहिन्यांचीदेखील चांगलीच पंचाईत होणार आहे, कारण यापैकी कोणत्या बातमीला महत्त्व द्यायचे यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे!
पण सर्वात गंमत येणार आहे ती घराघरांमध्ये! कमी लोकांकडे दोन दोन टीव्ही घरात असतात! त्यामुळे या दिवशी घराघरांमध्ये राजकारणप्रेमी आणि क्रीडाप्रेमी कुटुंबीयांमध्ये टीव्हीवर काय पहायचे यावरुन रस्सीखेच होणार हे नक्की! यावरुन टीव्ही वाहिन्यांनादेखील लोकांचा कल राजकारणाकडे आहे की खेळाकडे आहे हे समजेल आणि त्यानुसार त्यांना त्यांच्या व्यवसायाची भविष्यातली रणनीती ठरवता येऊ शकेल !

संबंधित बातम्या