भीमाशंकर डोंगरयात्रा

डॉ. अमर अडके
सोमवार, 14 डिसेंबर 2020

किल्ले भ्रमंती

बरेच दिवस कर्जत ते भीमाशंकर मोहीम खुणावत होती. पण बेत काही जुळून येत नव्हते. कित्येक वेळा या मोहिमेची तयारी केली आणि दुसऱ्याच मोहिमा करून आलो. पण ही मोहीम तशीच राहून गेली. 

पावसाळ्यात एकदा मनानं उचल खाल्ली. पण बेत पुढं ढकलावा लागला. कारण शिडीच्या घाटवाटेनंच वर चढायचं हा निर्णय पक्का होता. ऐन पावसाळ्यातला धो धो पाऊस, शेवाळलेले दगड आणि शिड्यांची अवस्था म्हणून पावसाळा जाऊ द्यावा आणि सारं काही वाळलं की मगच शिडीच्या वाटेनं चढी करायची असा बेत आखला.

कड्याच्या पश्‍चिमेकडच्या अंगानं वर चढताना शिड्यांचा आधार असला, तरी दोन शिड्यांच्या मधल्या भागातला कातळ कडा चढणं हे पावसाळ्यात फारच धोक्याचं, कारण दगड शेवाळलेले आणि पश्‍चिमेकडं तुटलेले सरळसोट कडे. त्यातही दुसऱ्या शिडीकडून तिसऱ्या शिडीकडं जाताना कड्याला वळसा घालूनच शिडीच्या पायथ्याच्या बेचक्यात जावं लागतं आणि या दोन्हीही शिड्यांच्या पोटातून पाणी खळाळत खाली कोसळत असतं. या साऱ्या आव्हानाचा विचार करता निसर्गाला त्या सह्याद्रीच्या रौद्रतेला सलाम करून सह्याद्रीच्या कड्यांनी सौम्य होऊन आवताण धाडलं की जायचं असं ठरलं. पाऊस संपून आसमंत सुकायची वाट पाहता-पाहता नोव्हेंबर महिना निम्मा सरला आणि अखेर भीमाशंकर आणि सह्याद्रीनं निरोप पाठवला, आता या गड्यांनो....

मोहिमेची जुळवाजुळव सुरू झाली. तारखा नक्की झाल्या. माणसं निवडली, मोहिमेची आणखी झाली. हरिभाऊ वाटाड्याला निरोप गेला. पूर्वतयारीच्या बैठका झाल्या आणि शनिवारच्या भल्या पहाटे आम्ही सारे सवंगडी निघालो कर्जत आणि पुढं खांडसच्या दिशेनं.

खांडस म्हणजे भीमाशंकराचा पश्‍चिम पायथा. सह्याद्रीच्या प्रचंड कड्याच्या पायाशी बसलेलं चिमुकलं गावं. इथूनच भीमाशंकराच्या बेलाग पहाडाचं छाती दडपून टाकणारं आव्हानात्मक दर्शन होतं.

इथं आहे आमचा एक वाटाड्या, हरिश्‍चंद्र त्याचं नाव, आपलेपणाने हरिभाऊ असं त्याला म्हणतो. हा नुसता वाटाड्या नाही; तो आमचा जंगल मित्र आहे, सोबती आहे, किंबहुना कुटुंबातलाच एक आहे. पहिला विसावा याच्या घरी. हातपाय धुऊन त्याच्या घरचा चहा पिऊन आम्ही ताजेतवाने झालो. आता मोहिमेला सुरुवात. पाणी-जेवण, आवश्‍यक साहित्य पिशवीत घालून पिशवी पाठीवर लावली. सह्याद्रीच्या त्या उत्तुंग कड्याला मनोमन नमस्कार केला आणि भीमाशंकराच्या दिशेनं चालू लागलो. खरं तर हरिभाऊंचं घर म्हणजे खांडसच भीमाशंकराकडचं शेवटचंच घर. इथं गाव संपतच...

गाव ओलांडल्यावर मोठा ओढा लागला. त्या वरच्या पुलावरून पलीकडं गेलं की डाव्या आणि उजव्या बाजूला अशा दोन वाटा फुटतात. उजवीकडची वाट म्हणजे गणेशघाटाची वाट. तुलनात्मक दृष्ट्या सोपी, राबता असलेली. डावीकडची वाट म्हणजे थेट कड्याला भिडणारी, जंगलातली, उभ्या चढावाची, अवघड अशी शिडीची वाट. या शिडीच्या वाटेनंच जायचं हा निश्‍चय म्हणूनच पावसाळा जाऊ दिला होता. कारण शिडीच्या वाटेनं तीन ठिकाणी उभा कडा शिडीच्या आधारानंच चढावा लागतो. दोन शिड्यांमधील उभा कातळ चढावा लागतो. त्यातही दुसऱ्या आणि तिसऱ्या शिडीमधला कातळ अंगावर येणारा. डावीकडं वळसा घेऊन वर चढावा लागणारा. पावसाळ्यात कातळ शेवाळतात, निसरडे होतात वरून जलप्रपात कोसळत असतात तेव्हा शिडीच्या वाटेनं चढाई जिकिरीची असते. म्हणून पावसाळा जाऊ दिला. आता आसमंत वाळला होता. शेवाळं सुकलं होतं. कातळ पायाला थारा देत होते म्हणून शिडीच्या वाटेनंच जायचं ठरलं. 

ओढा ओलांडून डावीकडं वळलो. शिडीच्या वाटेकडं रुळलेला रस्ता संपला. उजवीकडं भातखाचरांत शिरलो, कापणी झालेली भातखाचरं घट्ट झाली होती. हळूहळू कड्याकडं सरकू लागलो. गाव मागं पडलं. भातखाचरं संपली. जंगल सुरू झालं. गर्द झाडांच्या सावलीतून जंगलामधली चढावाची पायवाट सुरू झाली. नागमोडी वळणं घेत ही वाट चढत चढत कड्याच्या दिशेनं जाऊ लागलो. फुप्फुसांचे भाते फुलू लागले. घाम निथळू लागला. दमछाक करणारा चढ शिडीकडं घेऊन जाऊ लागला. सहकारी मागं पुढं होऊ लागले. तसे थंडीचे दिवस, गर्द झाडी; पण कोकणातला उष्मा, खडी चढी, त्यामुळं नाकी दम येऊ लागला. थांबू नका, बसू नका असे हाकारे देत, उत्साह टिकवून ठेवत टप्प्या- टप्प्यानं वर चढू लागलो आणि अखेरीस कड्याला बिलगलेल्या पहिल्या शिडीचं दर्शन झालं. आता तर पहिला टप्पा पार केला.

आता या तीन शिड्या चढून त्याच्या मधल्या कातळांवरून कसोशीनं वर चढून, कड्याच्या खांद्यावरच्या जंगलात शिरायचं. शिड्या कमकुवत, वरच्या दोन शिड्यांना कसलाच आधार नाही. उजव्या हाताला प्रचंड कातळ भिंत आणि डाव्या हाताला खोल दरी, उभी चढाई. सावकाश आस्तेकदम प्रयत्नपूर्वक सारे वर चढलो. खाली दरीकडं पाहिलं, कुठून कसं चढत आलो ते.

समोर मावळतीकडं पदरगड किल्ला उभा होता. खरं तर खांडसपासूनच महादेवाच्या पिंडीच्या आकाराच्या या पदरगडाचं विहंगम दर्शन होतं. गड तसा दुर्गम. पहिले दोन टप्पे कष्टपूर्वक चढता येतात, पण तिसरा अति अवघड. पदरगड चढाई ही एक स्वतंत्र मोहीमच होऊ शकते. परंतु आज त्याचं प्रयोजन नव्हतं, म्हणून नुसत्या दर्शनावरच समाधान मानलं. खांडसहून पदरगड आकाशात उंच घुसलेला दिसत होता. हळूहळू त्याच्या उंचीशी स्पर्धा करणारा कडा चढू लागलो, तसातसा तो नजरेत मावू लागला. आता तर जवळ-जवळ त्याच्या उंचीएवढ्या उंचीवर पोचलो. सातत्यानं होणारं त्याचं दर्शन फारच विलोभनीय होतं.

थोडं पाणी-अल्पस्वल्प विसावा घेऊन, शिडीच्या वरच्या अंगाच्या जंगलात शिरलो, परंतु जंगल येण्यापूर्वी कड्याच्या कडेकडेनं जाणारी वाट तापणाऱ्या उन्हातूनच जाणारी होती. भर उन्हातला तो चढ संपवून एकदाचं कड्याच्या खांद्यावरच्या जंगलात शिरलो. गर्द झाडीतल्या चढावाच्या नागमोडी वाटेनं चालत चालत जंगलातल्याच एका झोपड्यापाशी थांबलो. पदरवाडीचा एक गडी इथं ताक विकण्यासाठी घेऊन आला होता. दमलेल्या पर्वतारोहीला ते ताक म्हणजे जणू अमृतच. त्या ताकाची चव वर्णन करणं शक्य नाही. याच्या किंचित पुढं गणेश घाटाकडून येणारी वाट आणि शिडीची वाट एकत्र येतात. इथून पुढचा बहुतेक मार्ग जंगलातून टप्प्याटप्प्यानं पण तीव्र चढाचा, काहीसा रुंद, असा चढत चढत भीमाशंकराच्या माथ्याकडं घेऊन जातो. हा मोहिमेतला तिसरा टप्पा. दमलेले सहकारी पुन्हा नव्या जोमानं चढाईला सिद्ध झाले. जंगल मागंमागं सरकू लागलं. आता झाडीतून मधूनच उजव्या हाताला भीमाशंकराचा नागफणी सुळका, डाव्या हाताला पूर्वेकडचा लांबच लांब कडा, मधली दरी दिसू लागली आणि दूरवरच्या भीमाशंकराच्या घंटेचा घनगंभीर आवाजही येऊ लागला. आपसूकच पावलांची गती वाढली. जंगलाची सावली विरळ झाली. कारवीच्या गच्च रानातून पाऊल वाटेला लागलो. आता डाव्या हाताला भीमाशंकराचं बस-स्थानक तिथून खालच्या दरीकडं पाहणारे पर्यटक दिसू लागले. उजव्या हाताला उंचावर नागफणी सुळक्याकडं जाणारं पठार दिसू लागलं. सहकाऱ्यांच्या मानात आनंद मावेना. घामेजलेल्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं आणि कलतीकडं निघालेल्या सूर्याच्या साक्षीनं आम्ही सारेजण भीमाशंकराच्या पठारावर पोचलो. जवळजवळ साडेचार-पाच तास अखंड चढाई करून...

डाव्या बाजूला वाजणारी भीमाशंकराची आसमंत निनादून टाकणारी घंटा, नागफणीच्या पठारावरचं कलतीकडचं ऊन, अंगाला झोंबणारा वारा हा सारा अनुभवच मोठा विलक्षण होता. या वातावरणानंच एवढ्या चढाईचा थकवा कुठल्याकुठं पळाला.

आता घाई होती नागफणीच्या सुळक्यावर जाण्याची. तिथल्या सूर्यास्ताचे साक्षीदार होण्याची. इथून नागफणी तसा काही अगदीच जवळ नव्हता. नाही म्हटलं तरी अर्ध्या-पाऊण तासाची पायपीट आणि चढण होतीच. पण नागफणीवरून दिसणारा सूर्यास्त, तिथून खालच्या कोकणाचं विहंगम दृश्य अत्यंत विलोभनीय असतं. त्याचं वर्णन करणंच अवघड आहे. झपाट्यानं नागफणीकडं निघालो. झाडी संपली, परत पठार, मग हनुमान तळं, मग पुन्हा दार झाडीतली चढण, परत पठाराची चढण आणि मग दोन बाजूला दोन उत्तुंग सुळके. उजवीकडचा नागफणी पण त्याचं खरं रौद्र दर्शन होतं डावीकडच्या सुळक्यावरून. वेड्यासारखं या सुळक्यावरून त्या सुळक्यावर असं भटकलो. सुळक्याच्या खाली कड्याची प्रचंड भिंत, दरी, त्याही पलीकडचं कोकण, अविस्मरणीय दृश्य डोळ्यात मावेना. सूर्याचा गोळा हळूहळू लाल होऊ लागला. मोठा दिसू लागला. आकाशीचे रंग बदलू लागले. समोरचं निळं आकाश तांबड्या प्रकाशानं सजलं. डोंगर गर्द होऊन लागले. दऱ्या काळोखात मिटू लागल्या. अनिमिष नेत्रांनी हा संध्याकाळचा समारंभ पाहू लागलो. सूर्य क्षितिजाआड गेला. आकाश काळं झालं. आजूबाजूचे डोंगर, दऱ्या या काळोखात हरवून गेल्या. खालच्या वाड्या-वस्त्यांमधील दिवे लुकलुकू लागले. मग भानावर आलो. पण तिथून उठवेचना. भटकंतीच्या अनुभव कथनाच्या आनंदात रंगून गेलो.

आता मात्र उठायलाच हवं होतं. काळोखातून पठाराची उतरण, मग जंगलवाट उतरायची होती किमान हनुमान तळ्यापर्यंत. सारेच उठलो. सावकाशीनं उपलब्ध विजेऱ्यांच्या उजेडात परस्परांना सारवत हनुमान तळ्यापर्यंत आलो. जीव भांड्यात पडला. पुढं वाटेनं भीमाशंकराकडं निघालो. वाजणारी घंटा अधिकच गंभीर भासू लागली. उजेड आला, माणसं दिसली. मंदिराच्या पायऱ्या आल्या. भीमाशंकराच्या दर्शनाच्या ओढीनं त्या पायऱ्या उतरू लागलो. मंदिरात पोचलो. घंटा, झांज, शंखाच्या निनादात भीमाशंकराची आरती सुरू होती. त्या मांगल्यात विरघळून गेलो. आरती संपली, शनीचीही आरती संपली. भीमाशंकराच्या पिंडीवर माथा टेकवला. याच्याच आशीर्वादाने तर खडा कडा चढून इथपर्यंत आलो. त्या भारलेल्या अवस्थेतच पावलं मुक्कामाच्या दिशेनं पायऱ्या चढू लागली.

पक्ष्यांच्या किलबिलाटानं आणि गार वाऱ्याच्या झुळुकीनं पहाटे जागा झालो. सहकारीही जागे झाले. प्रातःकर्मे आवरून उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीनं वळणावळणाच्या घाट रस्त्यानं भीमाशंकराच्या पठारावर आलो. प्रसन्न सकाळी पुन्हा एकदा भीमाशंकराचं दर्शन घेऊन आजच्या मोहिमेसाठी मार्गस्थ झालो. भीमाशंकर ते भोरगिरी ही ती मोहीम. खरंतर भीमाशंकराला येण्याचा हाच पूर्वापार मार्ग. घनदाट जंगलातून येणारा, बऱ्याच ठिकाणी दगडी फरसबंदीने बांधून काढलेला. या मार्गावर भीमा नदी प्रथम डावीकडं मग उजवीकडं, कधी दगडांच्या उतरंडीवरून उड्या मारत, कधी खोल घळीमधून राहत, कधी उथळपणे खळखळाट करत, कधी निश्‍चल डोह बनत, डावी-उजवीकडं वळणं घेत थेट भोरगिरीपर्यंत सोबत करते. भीमेचं आणि भीमाशंकराच्या जंगलाचं खऱ्या अर्थानं दर्शन घडवणारा हा अडीच-तीन तासांचा अरण्य प्रवास एक अविस्मरणीय अनुभव होऊन जातो. मग भातखाचरांच्या बांधावरून भीमेच्या प्रवाहाच्या साक्षीनं भोरगिरीच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या टुमदार गावात पोचलो. भोरगिरी हे या गावाचं नाव. गावाच्या शाळेसमोर एक प्राचीन शिवमंदिर आहे. कधी काळी उद्‍ध्वस्त केलेलं, आता काही प्रमाणात जीर्णोद्धारित. आजही प्राचीन कोरीव कामाचे अवशेष मंदिराच्या आसपास इतस्ततः विखुरलेले दिसतात. मंदिर थेट भीमेच्या काठावर. इथं क्षणभर विसावलो. समोर जणू काही सर्व बाजूंनी तासून गोलाई दिल्यासारखा भोरगिरी किल्ला उभा.

दुर्ग दर्शनाच्या ओढीनं टळटळीत दुपार असूनही भोरगिरीच्या चढाला लागलो. प्राचीन लेणी आणि जुना दुर्ग याचं मिश्रण म्हणजे भोरगिरी. उघड्या कातळांवरून घसऱ्याच्या वाटेनं डोंगराची अर्धी चढण चढून लेण्यांपाशी पोचलो. फारसं कोरीव काम नसलेली, ही हिंदू गुहा मंदिरं ओबडधोबड खांब पाण्याच्या टाक्यांनी युक्त आहेत. ही लेणी म्हणजे भोरगिरीच्या प्राचीनत्त्वाचे साक्षीदारच. ही लेणीसुद्धा श्री शंकराचं स्थानच मानली जातात. कालौघात लेण्यांमध्ये अलीकडं काही देवतांची स्थापना केलेली आढळते.

लेण्यांना डावीकडं ठेवून डोंगराला वळसा घालून उद्‍ध्वस्त फरसबंदी आणि पायऱ्यांच्या अवशेषाच्या अनुरोधानं किल्ल्याकडं चालू लागलो. माथ्यावर पोचल्यावर डावी उजवीकडं तटबंदी दिसू लागली. तटबंदी उजव्या हाताला ठेवून अनगड पायऱ्यांवरून उद्‍ध्वस्त दरवाजातूनच गडाच्या मुख्य प्राकारात पोचलो.

गडाच्या प्राकारात कारवीचं गच्च रान माजलेलं, राबता फारसा नाही. किल्ल्याच्या इतिहासाविषयी तशी अनभिज्ञताच. किल्ला कसा पाहायचा, हा प्रश्‍न. खालच्या वस्तीतील दोन चिमुरड्या मुली उत्साहानं मध्यावरच्या लेण्यांपासून आमच्याबरोबर होत्या. प्रथम आम्ही दुर्लक्ष केलं. पण आता त्याच आमच्या वाटाड्या आणि मार्गदर्शक झाल्या. कारवीच्या गच्च रानातून कुठं फिरायचं आणि काय पाहायचं हा प्रश्‍न त्यांनी सोडवला. उत्तम बांधलेली पाण्याची खांबटाकी, अनेक वीरगळी, महादेवाच्या पिंडी, गणपती, शेप, देवी इत्यादी मूर्ती, व्याल शरभांची शिल्प, कीर्तिमुखं आणि उद्‍ध्वस्त बांधकामांच्या पायांचे चौथरे असं बरचसं दाखवत त्या मुलींनी अख्खा गड लिलया फिरविला. भीमाशंकराहून इथपर्यंत आणलेला वाटाड्याही सारं पाहून चकित झाला. तोही प्रथमच हे पाहत होता. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांत असे कितीतरी प्राचीन अवशेष गतवैभवाची साक्ष देत जंगलांमध्ये विखुरून पडले आहेत. असे अनपेक्षित ते गवसतात.

एव्हाना भर दुपार झाली होती. भोरगिरी उतरून पुन्हा गावातल्या शंकराच्या मंदिरापाशी पोचलो. भीमेच्या थंडगार पाण्यात मनसोक्त डुंबलो. जवळ होती नव्हती तेवढी खाण्याची शिदोरी संपवली. क्षणभर तिथंच आडवे झालो आणि कलत्या दुपारी पुन्हा एकदा भीमाशंकराच्या दिशेनं दंडवत घालून परतीच्या प्रवासाला लागलो.

संबंधित बातम्या