नाखिंदा - अस्वलखिंडची स्वारी 

डॉ. अमर अडके  
गुरुवार, 31 जानेवारी 2019

किल्ले भ्रमंती
 

रायरेश्‍वराच्या पठारावर उभं राहिलं, की केंजळगड-कमळगडापासून ते तोरणा-राजगडापर्यंतचा केवढा सह्याद्री दोहोंबाजूला नजरेच्या टप्प्यात येतो. रायरेश्‍वराला या दऱ्याखोऱ्यांतील अनेक वाटांनी गेलो; पण रायरेश्‍वराभोवतीच्या सह्याद्रीच्या या रांगा एका वेगळ्याच कारणानं मनात रुतून बसल्या. 

रायरेश्‍वराच्या पश्‍चिम-उत्तरेच्या पायथ्याला कोकणातल्या कामथे गावापलीकडं नरवीर तानाजी मालुसरे यांचं उभं आयुष्य गेलेलं. उमरठ गाव आहे. तानाजी मालुसरे यांची समाधी याच गावात आहे. 

या डोंगररांगाकडं पाहिलं, की मनात नेहमी यायचं; नरवीरांचा देह सिंहगडावरून उमरठमधे कसा आणला असेल? कोणत्या वाटेनं आणला असेल? 

मग कुतूहल गप्प बसू देईना. सिंहगड ते उमरठ वाटेच्या शोधात मधल्या डोंगररांगा वेड्यासारखा भटकलो. या शोधातच रायरेश्‍वराच्या पायथ्याचं कुदळे गाव आणि तेथून कोकणातल्या कामथे गावापर्यंत जाणारी भर जंगलातली ‘अस्वलखिंड’ खुणावू लागली. मनानं उचल खाल्ली आणि ठरलं रायरेश्‍वर-अस्वलखिंड-कामथे...! डोंगर-दुर्ग-अरण्ययात्रा. 

रायरेश्‍वराचं दर्शन घेऊन नाखिंद्याच्या टोकाकडं निघालो. 

आम्हाला नाखिंद्याच्या बाजूनं रायरेश्‍वर पठार उतरून यायचं होतं. मोहिमेचा थरार इथूनच सुरू होणार होता. उतरण्याचे मार्ग दोन. एक नाखिंदा टोकापासून सरळ खाली पश्‍चिमेच्या बाजूला थेट अस्वलखिंडीजवळ उतरणारा; पण हा फारच अवघड. दुसरा कुदळे गावाच्या दिशेनं तीव्र उताराचा; पण कमी धोक्‍याचा. कुदळ्याच्या बाजूनं उतरण्याचा निर्णय आम्ही घेतला. यासाठी पुन्हा पठाराच्या बाजूनं येऊन पूर्ण दरीला वळसा घालून विरुद्ध बाजूच्या उताराला लागणं आवश्‍यक होतं. भर उन्हात पठाराच्या त्या टोकाला जाणं हे अनुभवायलाच हवं. अखेर एकदाचे उताराच्या प्रारंभाशी पोचलो. बरोबर तीस-पस्तीस जण. एव्हरेस्ट सर करून आलेल्यापासून ते पहिल्यांदाच दुर्ग मोहिमेला आलेल्यापर्यंत सारी आवळ्या भोपळ्याची मोट होती. चढणं जेवढं अवघड असतं, त्याहीपेक्षा उतरणं जास्त अवघड. चढताना शरीराचा कस लागतो हे जितकं खरं, तितकाच उतरताना मनाचा कस लागतो. सह्याद्रीचा डोंगर उतरणं हे येड्यागबाळ्याचं काम नव्हे. उतरणीची जंगलात शिरलेली ती वाट बघूनच काहीजणांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला. त्यांच्यातल्या हिमतीला आव्हान करून आत्मविश्‍वासाला साद घालून सगळा काफिला उताराला लावला. प्रश्‍न खरा पुढंच होता. मळलेली अशी वाट नव्हतीच, त्यात वाटाड्या नामदेव गडबडला. आता सारी जबाबदारी आपल्यावरच. सह्याद्रीला वंदन केलं. माथा टेकला. आणि निर्धारानं पुढं सरकू लागलो.. पुढं जाऊन वाट शोधायची. त्या टप्प्यापर्यंत सगळ्यांना आणायचं. पुन्हा वाट शोधायला रानात शिरायचं. उतार क्षणोक्षणी तीव्र होत होता. समोर दरी. अशा सह्याद्रीच्या आव्हानात मार्गक्रमणा सुरू होती. हिमतीचे आणि धाडसी गडी टप्प्याटप्प्यांवर उभे होते. त्यांच्या धाडसाला आणि सहकार्याला तोड नाही. 

भर मध्यान्हीचा सूर्य डोक्‍यावर आग ओकत होता. आम्ही सह्याद्रीचा एक डोंगर जवळजवळ आडवे होऊन उतरत होतो. क्षणाक्षणाला जवळचा पाण्याचा साठा संपू लागला होता. नवखे गडी हिंमत हरत होते; पण सह्याद्रीच्या या आव्हानाचा रोमांचही अनुभवत होते. पण अजूनही कुदळे ही छोटीशी वाडी दूरच होती. उतार तर संपत नव्हता आणि पाण्याच्या एकेका थेंबाची किंमत काय आहे हे प्रत्येकालाच कळलं होतं. साऱ्यांचे अवतार पाहण्यासारखे होते. अखेरीस थकलेल्या डोळ्यांना दूरवर वाडीतली घरं दिसू लागली. आशा पल्लवित झाल्या. पाण्याच्या ओढीनं का होईना अडखळणारी पावलं गती घेऊ लागली; पण सगळे भिडू विखुरलेले. मागच्यांचा पत्ताच नाही. पुढच्यांना वाडीच्या दिशेनं उताराला लावून पुन्हा वर निघालो. टप्प्याटप्प्यानं रेंगाळणारा एकेकटा भेटू लागला. त्यांना आश्‍वस्त करून मागं मागं जाऊ लागलो. तीव्र उताराच्या शेवटी प्रकाश दिसला. लंगडतोय, आधारानं उतरतोय. प्रकाश खरंतर हिमतीचा गडी. दोन्ही पायांना गंभीर दुखापत होऊनही अवघड मोहिमेत सहभाग घेणारा. आज त्याचा स्नायू दुखावला. या हळव्या मित्राजवळ गेलो. थोडं मालिश केलं. दुखावलेला स्नायू हलका केला आणि त्याच्याबरोबरच राहिलो. मोहिमांमधल्या दुर्गम स्थळी मित्रांची अशी सेवा करण्यात काय आनंद असतो कसं सांगू! 

या साऱ्या उतरंडीमध्ये चांगलाच उशीर झाला होता. दुपारचे चार वाजून गेले होते. सगळे पाण्यामुळं व्याकूळ झाले होते. जेवणाची वेळ केव्हाच टळून गेली होती. रस्त्याला लागूनसुद्धा वाडीत पोचायला बरीच पायपीट करावी लागली. अखेर कुदळ्यात पोचलो. तहानलेल्या नजरेनं मागं रायरेश्‍वराच्या उत्तुंग डोंगराकडं पाहिलं. विश्‍वास बसेना हे उतरून आलो? पाण्याचा एक घोट ओठावरून पोटात गेल्यावर साऱ्यांनाच कळलं पाण्याला जीवन का म्हणतात? क्षणभर विसावलो. डोळे मिटले. मिटल्या डोळ्यासमोर अस्वलखिंड उभी राहिली. अजून तर ती चढून जंगल उतारानं कामथे गाव गाठायचं होतं. जेवणाऱ्या सहकाऱ्यांच्या निष्पाप चेहेऱ्याकडं पाहात तसाच बसून राहिलं. 

गावकरी आमच्याकडं थोडं कुतूहलानं थोडं आश्‍चर्यानं पाहात होते. ज्यांच्या अंगणात बसलो होतो, यथेच्छ पाणी प्यायलो होतो ते म्हणाले ‘पुढं काय?’ मी समोरच्या डोंगराकडं बोट केलं आणि म्हणालो, ‘अस्वलखिंड चढून कामथे.’ तो म्हणाला, ‘आत्ता?’ म्हटलं ‘हो.’ तो म्हणाला, ‘अस्वलखिंड चढून जंगलातून खाली उतरायला तीन-चार तास लागतील.’ मी पुन्हा म्हटलं ‘होय.’ 

आमचा हा संवाद ऐकून सहकारी एकमेकांकडं आणि माझ्याकडंही पाहू लागले. त्यांना जणू जाणवलं. चढ-उताराची आणखी एक अरण्यपरीक्षा समोर आहे. काहीजण आत्तापर्यंतच्या चालीनं थकले होते. काहीजण पूर्वानुभवाअभावी आत्मविश्‍वास हरवून बसले होते; पण सरांनी म्हणजे मी चलाच म्हटलं असतं, तर त्याही परिस्थितीत आले असते. पण मी निर्णय घेतला. काही बिनीच्या सवंगड्यांसह आपण झपाट्यानं अस्वलखिंडीच्या मार्गाला लागायचं. कारण निबिड अरण्यातला तो तीव्र चढ आणि तितकाच उतार किती कठीण होता याची मला कल्पना होती. त्यात संध्याकाळचे पाच वाजलेले. अस्वलखिंड चढून जाईपर्यंत अंधार सोबतीला येणार होता. मग उतार किती खोल असतो याचा विचार न केलेलाच बरा. 

मी तणावात. कुदळे ते कामथे रस्ता नाही. मोबाईलची रेंज नाही. वाहनं कामथ्यात. चालत जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. एव्हाना बऱ्याच सहकाऱ्यांनी ठरवलं होतं, आता चालणं शक्‍य नाही. पर्याय एकच वरंध घाटातून भोरच्या बाजूनं आली तर बस किंवा खासगी वाहनानं वरंध घाटातल्या गावापर्यंत पोचायचं - पोचलो. मोबाईलची रेंज नाही. अनुभवी सहकाऱ्यांवर तिथंपर्यंत पोचण्याची जबाबदारी देऊन आम्ही घाईघाईत तणावातच खिंडीच्या दिशेनं झपाझप चालू लागलो. कारण कामथ्यात पोचायला किमान चार तास लागणार होते. आम्ही विरुद्ध दिशेनं महाबळेश्‍वर डोंगररांगांकडं चालू लागलो. आता कसलाही संपर्क होणं शक्‍य नाही. कारण आम्ही पोचणार होतो परस्परांपासून शंभर-सव्वाशे किलोमीटर दूर अंतरावर. 

गाव मागं पडलं. अस्वलखिंडीचा चढ सुरू झाला. निरेचं कोरडं पात्र ओलांडलं. चढ अधिकच खडा झाला. अंधार दाटू लागला. पश्‍चिमेचं क्षितिज लाल झालं. पावलं झपाझप, पण मूकपणं पडू लागली. जंगलात दाटलेल्या त्या उष्ण वाऱ्यात मन अधिकच कातर झालं. अस्वलखिंडीच्या माथ्यावर पोचेपर्यंत सूर्य क्षितिजाला टेकला होता. जणू पश्‍चिमेच्या दरीच्या गर्भात लुप्त होत होता. दोन्ही बाजूंचे डोंगर काळवंडत होते. झाडं विरघळून जात होती. दरीचा गाभारा उजळत होता. हे अपूर्व दृश्‍य थकलेल्या शरीर आणि मनाला वेगळीच उभारी देत होतं. किती वेळ पाहात होतो कुणास ठाऊक? दरीच्या कुशीत शिरलो. काळोखाचा भाग बनून गेलो. काळोखामध्ये दऱ्यांमधला उतार थकलेल्या गात्रांनी उतरताना सह्याद्री किती आपला वाटतो कसं सांगू? अंधारात या घनदाट अरण्यातल्या दऱ्या उतरतो आणि दूरवर जेव्हा वाडी-वस्तीचा मिणमिणता दिवा दिसतो, तेव्हा माणसाच्या अस्तित्वाची काय किंमत असते हे कळतं. अशा किती परक्‍या वाड्या माझ्या मनात घर करून राहिल्यात. दरी संपता संपेना. अंधार हटता हटेना. चालतच राहिलो. पायतळीच्या वाळलेल्या पानाचं संगीत, उसासे टाकणारा उष्ण वारा आणि दिशाभर पसरलेला सह्याद्री. चालत राहिलो. दूरवर दिसणाऱ्या दिव्यांनी भानावर आलो. मनात म्हटलं वाडी आली वाटतं. अजून जंगल उतरतोच आहे. एवढ्यात दूरवरून हाक ऐकू आली, ‘सर, डोंगर चढून वर येऊ नका. वाडीला जायची वाट उजवीकडं पाणंदीतून जाते. तिकडं या.’ आवाज ब्रम्हदेवाचा होता, आमचा ड्रायव्हर. पुन्हा हाक मारली. प्रतिसाद नाही. उजवीकडं वळलो. वाळलेल्या लाल मातीच्या फुफाट्यातून पाणंदीत शिरलो. वाट सापडेना. 

डोंगराच्या दूर टोकावरून एक आवाज घुमला. एका जंगलकन्येचा. कोण होती कुणास ठाऊक? त्या डोंगर कड्यावर ती का आली कुणास ठाऊक? आम्ही आलो हे तिला कसं कळलं कुणास ठाऊक? आम्ही कुठं जाणार आहे हे ही कसं कळलं कुणास ठाऊक? आम्ही तिला कसे दिसलो हेही कळलं नाही. पण आम्ही कुठं आहोत हे तिला नक्की दिसत होतं. ती वरूनच सांगत होती, ‘उजवीकडं, बांधावर, दगडावर, उजवी वाट सोडा, डावीकडच्या पाण्याच्या वाटेनं जावा.’ चुकलो की तिला कळायचं. ती मागं या म्हणायची. आम्ही भारावल्यासारखे तिच्या आज्ञा पाळत होतो आणि त्या जंगलातून वाडीत पोचलो. उंच डोंगरकड्यावरचा तिचा आवाज बंद. त्या शून्य अंधारात आम्ही तिचं अस्तित्व शोधू लागलो. तिथूनच ओरडलो, ‘माऊली असशील तिथं उभी राहा. तुझ्या पाया पडायचंय.’ माझ्या पाठोपाठ सगळे वाकले. भूमीला माथा टेकला. जणू तिच्या पायावरच डोकं ठेवलं. असे अनेक अनुभव सह्याद्रीच्या दऱ्यादऱ्यांमध्ये येतात. ती कुठून आली कुणास ठाऊक? का आली कुणास ठाऊक? पण आईसारखं बोट धरून वाडीत सोडून गेली एवढं नक्की. वाडीत येईपर्यंत परस्परांशी एक शब्दही बोललो नाही. 

मिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशात गावकरी आमच्या आजूबाजूला जमले होते. ना कुणी परिचयातलं ना नात्यातलं. पूर्वी वाडीत येऊन गेलो होतो. पण कुणाशी ओळख असण्याचा प्रश्‍नच नव्हता. सह्याद्रीच्या पोटातली ही माणसं ओळख असण्या-नसण्याच्या पलीकडची असतात. आमची तहान त्यांना जणू कळली होती. सारवलेल्या त्या अंधाऱ्या पडवीत घागर आणि तांब्या-भांडं भरून आलं. पाण्याचा एक एक घोट नवसंजीवनी देणारा होतो. थोडं स्थिर झालो. नकळत बरोबरचे सारे भोवती गोळा झाले होते. एक स्तब्धता. आम्ही सारेच त्या अंतहीन अंधारात जंगलातली ती वाट मनी आणत होतो आणि वाटेला नमस्कार करत होतो. वातावरण भावुक बनले. का कुणास ठाऊक मिटले डोळे डबडबले. नवखा प्रतीक सामोरा आला. म्हणाला, ‘सर, फक्त एकदा पाया पडू दे’ आणि क्षणात वाकलासुद्धा. मला भरून आलं. सह्याद्रीच्या अंतरंगात असे भावनिक प्रसंग अनेकवार येतात. 

आता वरंध घाटात माझी माणसं कुठं असतील या विचारानं मनात फेर धरला. खरंतर अंधारात ते गाव सोडवत नव्हतं. काहीतरी मागं राहिल्यासारखं गाडीत बसलो. मंद चंद्रप्रकाशात सह्याद्रीच्या धारा आकाशाला टेकलेल्या दिसत होत्या. तिथूनच उतरून आलो होतो. ढवळे फाटा, उमरठ फाटा मागे पडला. कापडे गावच्या कमानीतून पोलादपूरच्या रस्त्याला लागलो. रात्रीचे दहा वाजून गेले होते. अचानक फोन वाजला. पलीकडं भोसलेसाहेबांचा आवाज, ‘सर जेवण सांगून ठेवलंय, किती वेळ लागेल?’ मी विचारलं, ‘तुम्ही?’ ते म्हणाले, ‘आम्ही जेवलोय. तुम्ही येईपर्यंत इथं गणपती मंदिरात विश्रांती घेतो.’ जीव भांड्यात पडला. उशिरा का होईना, सगळे भेटले. सुरक्षित आहेत. 

पोलादपुरात जेवण करून वरंध घाटाच्या मार्गाला लागलो. सह्याद्रीच्या माथ्यावर जाणाऱ्या या घाटातून सहकाऱ्यांच्या भेटीच्या ओढीनं अंधार कापत निघालो. दिवे दिसले, की नजर सगळ्यांना शोधायची. पुढं जात राहिलो. घाटाच्या अर्ध्या उतारावर आवेगानं हात हलवत मंडळी उभी होती. उत्तररात्री सारे भेटले. परतीच्या मार्गाला लागले. मन मात्र रायरेश्‍वराच्या उतारावरून, नाखिंद्याच्या टोकावरून, अस्वलखिंडीच्या चढावरून, कामथ्याच्या डोंगरकड्यावरच्या त्या माऊलीच्या आवाजातून बाहेर येत नव्हतं. या विचारात केव्हा डोळा लागला हे कळलंच नाही. मिटल्या डोळ्यांसमोरून सह्याद्री हटता हटत नव्हता. पुन्हा साद घालत होता पुढच्या मोहिमेसाठी!

संबंधित बातम्या