कांचना ते रवळ्या-जवळ्या 

डॉ. अमर अडके  
सोमवार, 4 मार्च 2019

किल्ले भ्रमंती
 

एखाद्या ठसठशीत कंठहारासारखी शोभून दिसणारी नाशिक जिल्ह्याच्या भूप्रदेशावरची गिरिदुर्ग आणि देखण्या डोंगर-शिखरांची सौंदर्यशाली माला म्हणजे सातमाळ्याची डोंगररांग होय. 

नाशिकच्या उत्तरेला सापुताऱ्याजवळच्या हातगडापासून सुरू होणारी आणि सप्तशृंग, मार्कंडेया, रवळ्या-जवळ्या, धोडप, कांचनाला कवेत घेऊन थेट इंद्राई किल्ला, चांदवडच्या किल्ल्यापर्यंत पोचणारी ही डोंगररांग म्हणजे नाशिकचे अमूल्य निसर्ग लेणे. कितीही वेळा अनुभवले तरीही परत परत तिथे जावेसे वाटणारे... 

तब्बल चौदा किल्ले आणि अनेक डोंगर-शिखरांचे आव्हान सातमाळा डोंगररांगेत उभे आहे. 

सूरतेची लूट, कांचनबारीची लढाई, कव्हेर गडाची झुंज आणि रामजी पांगेऱ्यांचे हौतात्म्य अशा शिवचरित्रातील ओजस्वी घटनांची सातमाळा डोंगररांग ज्वलंत साक्षीदार आहे. 

सह्याद्रीची कातळ-शिखरे किती विलोभनीय असावीत याची मूर्तिमंत अनुभूती म्हणजे सातमाळा. कितीवेळा या डोंगररांगेतील किल्ल्यांवर गेलो. कधी एकच किल्ला, कधी एकावरून दुसऱ्यावर तर कधी त्यावरूनही पुढचा.. अनेक वाटांनी गेलो पण प्रत्येक वेळेला वेगळीच सौंदर्यानुभूती. 

सूरतेची लूट स्वराज्यात घेऊन येताना झडलेली कांचनबारीची लढाई कितीतरी काळ मनात रुंजी घालत होती. कांचन्यापासून रवळ्या-जवळ्यापर्यंत आणि पुढेही मार्कंडेय-सप्तशृंगापर्यंत या लढाईचे संदर्भ वाचनात आले होते. या देदीप्यमान लढाईचा भूगोल खुणावत होता आणि मग मनानं उचल खाल्ली, निश्‍चय झाला; या लढाईच्या भूगोलाचा मागोवा घ्यायचा! 

.. तर सुरुवात कुठून? नक्कीच कांचना! 

खरेतर कांचन्याच्या चढाईच्या वहिवाटीचा मार्ग म्हणजे, मुंबई-आग्रा महामार्गाला वडाळा-भोईला डावीकडे वळून पायथ्याच्या कांचनेवाडी गावात यायचे. तेथून उत्तरेच्या बाजूने खिंडीत येऊन मग डाव्या हाताच्या कांचन्यावर चढाई करायची. तसे कांचन्यावर या व्यतिरिक्‍त आणखी दोन मार्गांनी जाता येते. एक म्हणजे खेळदरीच्या बाजूने किंवा दक्षिणेकडून पुरी गावाच्या बाजूने.

यावेळी पुरी गावाकडून कांचन्यावर जाण्याचा बेत ठरला. कडाक्‍याच्या थंडीत भल्या पहाटे नाशिकहून निघालो. वडाळा-भोईच्या पुढे सोग्रस फाट्याला डावीकडे वळून गरमागरम पोटपूजा आवरली आणि कांचन्याच्या दक्षिण पायथ्याला पुरी या छोट्याशा गावात पोचलो. मोजक्‍या घरांची विखुरलेली, पांढऱ्या मातीच्या फुपाट्यात उभी असलेली ही गडपायथ्याची वाडी. द्राक्षांच्या बागांच्या बाजूने कांद्याचे वाफे ओलांडून गडपायथ्याशी पोचलो. समोर बेलाग कड्यांचा जोड किल्ला. उजव्या हाताचा कांचना, मधे खिंड आणि डावीकडचा अफाट भिंतीचा मंचना. पण या जोडकिल्ल्याचा सरसकट उल्लेख ‘कांचना’ असाच केला जातो. तशी चढाई उभी, घसाऱ्याचीसुद्धा. खुरट्या झुडपांच्या उघड्या डोंगरावरली! या चढाईने खिंडीत पोचायचे. निम्मी चढाई झाली. पुढच्या हंड्या शिखरापलीकडेपर्यंतच्या अपरिचित वाटेसाठी स्थानिक वाटाड्या शांताराम गावित येऊन मिळाला. 

पाण्याच्या रुळलेल्या वाटेऐवजी आडव्या घसाऱ्याने खिंडीअलीकडच्या पाण्याच्या टाक्‍यांपाशी पोचलो. टाकी सुकलेली पण कधीकाळी थंडगार पाण्याने तुडुंब भरलेली असावीत. या कातळ टप्प्यावर क्षणभर विसावलो. पण कांचन्याची खरी कातळ चढाई इथूनच सुरू होते. कांचन्याचा हा टप्पा चढणे याची अनुभूतीच वेगळी असते. हा कातळकडा चढून नागमोडी घसाऱ्याच्या वाटेने निवडुंग आणि खाजकुईलीच्या काट्यांमधून सावरत आपण जेव्हा कांचन्याच्या माथ्यावर पोचतो, तेव्हा सातमाळ्याची अनेक डोंगर-शिखरे कुतूहलाने आपल्याला पाहताहेत असे वाटते. माथा तसा लहान आणि अरुंद. काही त्रोटक अवशेष, नाही म्हणायला बुजलेली पाण्याची टाकी ओळखू येतात. समोरच्या मंचन्याचे लांबलचक पठार लोभसवाणे दिसते. 

सूर्य चांगलाच वर आला होता. आता कांचन्याची उतराई. खिंडीपर्यंत पोचलो. उजवीकडच्या उताराच्या वाटेने कांचने गावात पोचणे किंवा मंचन्याची कातळ भिंत उजव्या हाताला ठेवून लांबच्या वळशाने थेट कांचनबारी उतरणे असे दोन पर्याय. आम्ही दुसरा पर्याय निवडला. कारण कांचनबारीच्या लढाईचा भूगोल, मजल तशी लांबची. पुन्हा दुपारचे जेवण कांचनेवाडीतच. पण तरीही याच मार्गाने कांचनबारीत उतरलो आणि उताराच्या वाटेने कांचनवाडीत पोचलो. कांचन्याचा माथा आता अधिकच उंच वाटत होता.

कांचने गावातून दिसणारा उत्तुंग कांचना आणि मंचन्याच्या कातळ भिंतीपासून कांचनबारीपर्यंत उतरत आलेली डोंगरधार फारच विलोभनीय दिसते आणि या बाजूची छातीवरची घसारा आणि कातळ टप्प्याची कांचना खिंडीपर्यंतची चढाई अनुभवावी अशीच आहे. कांचने गावातून हंडा, लेकुरवाळा अगदी ईखाऱ्यापर्यंतची डोंगर-शिखरे निळ्या आकाशाच्या महिरपीत कोंदणात बसविलेल्या पाचूसारखे दिसतात. कांचन्याच्या इवल्याशा शाळेत बाजरीची भाकरी, वांगे - कांदा अन्‌ शेवेचा रस्सा गरमागरम भातासह आमची वाट पाहात होता. कांचन्याच्या पायथ्याच्या या जेवणाची चव अफाट डोंगराएवढीच असते. 

जेवण तर झाले. आता पुढचा टप्पा. पुन्हा कांचनबारीतून हंड्या चढायचा, की वाडीच्या घळीतून डोंगरधारेने हंड्या चढायचा नक्की केले. कांचनबारीतून हंड्या पायथा, मग या शिखराला उजवीकडे ठेवून त्याच्या बगलेतून लेकुरवाळा पार करून इखाऱ्याच्या पायथ्याशी आणि पुढे धोडप असे ठरले. कांचनबारीतून हंड्या पायथ्याला पोचलो. 

कांचनबारीच्या वर हंड्या शिखराच्या पायथ्याशी निसर्गाची एक गंमत आहे. उत्तम रांगोळीचे सजीव खडक जागोजागी विखुरले आहेत. पाणी शोषून त्यांचा आकार वाढतो आणि रांगोळी पांढरीशुभ्र मिळते असा गावकऱ्यांचा समज आहे. वाड्यावस्त्यांतले लोक या रांगोळीच्या दगडांची चोरी वाचवतात. स्वच्छ सूर्यप्रकाशात वरून घट्ट काळा दिसणारा दगड पोटात पांढरीशुभ्र रांगोळी घेऊन बसलेला असतो. 

कांचनबारीतून उभ्या चढाने हंड्या शिखराच्या डोंगराची चढाई सुरू झाली. थंडीचे दिवस असले तरी भर दुपार आणि त्यात जेवण झालेले. चढाई आस्ते आस्तेच सुरू होती. या दमछाक करणाऱ्या चढाईने हंड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पठारावर पोचलो. समोर धोडपपर्यंतची डोंगररांग दिसू लागली. हंड्या शिखर उजवीकडे ठेवून घसाऱ्याच्या वाटेने इखारा शिखराच्या अलीकडची दरी ओलांडू लागलो. उजवीकडच्या लेकुरवाळ्याचे एकात एक मिसळलेले शिखर आता अधिकच वत्सल भासू लागले. हंड्या, लेकुरवाळा, इखारा या डोंगर शिखरांनी तयार केलेल्या त्रिकोणामधून दरी चढून इखाऱ्याचे पठार गाठले. तोपर्यंत दुपार टळू लागली होती. या इखारा शिखराच्या बेचक्‍यात एका गुहेत हल्ली एक आश्रम थाटला आहे. इखाऱ्याचे हे शिखर ओलांडून पुन्हा दरीत शिरलो. पश्‍चिमेकडचा सूर्य डोंगरमाथ्याच्या जवळ येऊ लागला होता. दगडांची घसाऱ्याची दरी पार करून धोडप अलीकडच्या पठारावर पोचलो. इथे एक राबता आश्रम आहे. तसा धोडप किल्ला इथून दूर, पण या परिसरात नैसर्गिक आणि बांधीव पाण्याची उत्तम व्यवस्था आहे. थोडी रुंद आणि कच्ची सडकही या आश्रमापर्यंत येते. डोंगरपायथ्याच्या कनमांडले या गावातून आश्रमापर्यंत ही सडक आलेली आहे. 

संध्याकाळची चाहूल लागली होती. धोडप तसा अजूनही तासाच्या टप्प्यावर होता. आश्रमापुढचे नैसर्गिक आणि लागवड केलेल्या झाडांचे पठार ओलांडून कठीण दगडांच्या दरीतून पलीकडे धोडपच्या माचीच्या बाजूला पोचलो. अस्ताचलाला चाललेल्या त्या सूर्यप्रकाशात धोडपची शेंडी, खिंड आणि याला सांधून पलीकडे जाणारा कातळकडा त्या रक्तवर्णी गर्भात केवढा सुंदर दिसत होता. पण त्याहीपेक्षा डावीकडच्या विलोभनीय दृश्‍याने आम्ही अक्षरशः वेडावून गेलो. धोडपच्या किंचित पश्‍चिमेच्या एका प्रशस्त पठारावर छोटा बंड्या, मोठा बंड्या या नावाने ओळखली जाणारी दोन डोंगरशिखरे आहेत. त्या डोंगरशिखरांच्या मधे अस्ताचलाला चाललेला सूर्य जणू पठाराला टेकला होता. धोडपच्या अलीकडच्या दरीच्या कडेच्या आडव्या गवताळ वाटेवर दमलेल्या अंगांनी तो सूर्यास्ताचा अपूर्व सोहळा पाहात होतो, पण तो डोळ्यात मावत नव्हता. थिजलेल्या गात्रांनी सूर्य दिसेनासा होईपर्यंत अविचलपणे ते दृश्‍य पाहात होतो. त्या संधिप्रकाशात एका विलक्षण तृप्तीने धोडपच्या पुढ्यात येऊन पोचलो. दगडांची उथळ दरी पार करून जिभीच्या बुरुजाने संरक्षण दिलेल्या उद्‌ध्वस्त आणि अस्तित्व गमावून बसलेल्या प्रवेशद्वाराने धोडप माचीवर पोचलो. (पूर्वार्ध)

फोटो फीचर

संबंधित बातम्या