चिंगीचा चक्रमपणा! 

डॉ. बाळ फोंडके
गुरुवार, 3 जानेवारी 2019

कुतूहल
मुलांना कधी काय प्रश्‍न पडतील सांगता येत नाही. प्रत्येकवेळी ते प्रश्‍न वेडगळपणाचेच असतील किंवा अर्थहीन असतील असे नाही. अशा प्रश्‍नांना योग्य, गरज असेल तिथे तर्कशुद्ध, शास्त्रोक्त उत्तरे द्यायला हवीत. मुलांचे हे कुतूहल जपायला हवे...

चिंगी आमची चुणचुणीत. तशी दिसायलाही चांगली. चारचौघीत उठून दिसणारी. राहतेही नीटनेटकी. लोभसवाणं व्यक्तिमत्त्व असलेली. तरीही सगळे तिला टाळत असत. ती दुरून जरी येताना दिसली तरी लगेच दुसरीच वाट पकडत. नातेवाईक, शेजारीपाजारी, एवढंच काय पण शाळेतले शिक्षकही. घरातल्या मंडळींना तिला टाळणं शक्‍य नव्हतं. पण त्यांचीही भूमिका वेगळी नव्हती. याला कारण एकच. ते म्हणजे चिंगीची चौकस वृत्ती. त्यापायी तिला प्रश्‍न पडत. चिंगीला ते स्वाभाविक वाटत. पण इतरांना मात्र ते भलतेसलते, चित्रविचित्र; स्पष्टच बोलायचं तर चक्रमपणाचे वाटत. त्या प्रश्‍नांची उत्तरं देणं त्यांना जमत नसे. असे प्रश्‍न कोणालाही पडूच कसे शकतात, हेच त्यांना उमजत नसे. तिला पिटाळूनही लावता येत नसे. कारण ती पिच्छाच पुरवत राही. मग तिला टाळण्याशिवाय कोणता उपाय होता सगळ्यांच्या हाती! आईबाबा, ताईदादा तिला रागावत, तिच्यावर चिडत. पण त्याचा काही फारसा परिणाम तिच्यावर होत नसे. 

बंडू, चंदू, मिंटी, गोट्या या तिच्या मित्रमंडळींनाही तिच्यासारखे प्रश्‍न पडत, नाही असं नाही. पण ते विचारण्याचं धाडस कोणातही नव्हतं. चिंगीलाच ते पुढं करत. नाही म्हणायला तिच्याच इमारतीत नुकतेच राहायला आलेले नानासाहेब मात्र तिचे प्रश्‍न डावलत नसत. त्यांची पटतील अशी उत्तरं देण्याचा प्रयत्न ते करत. त्यात ते शास्त्रज्ञ असल्यामुळं आपली उत्तरं तर्कसंगत शास्त्रशुद्ध असतील यावरही त्यांचा कटाक्ष असे. प्रसंगी ते मुलांबरोबर काही प्रयोग करूनही उत्तरं मिळवत. त्यांचं इथं राहायला येणं इतरांच्या पथ्यावरच पडलं होतं. चिंगीला टाळण्याऐवजी नानांकडं पाठवून देण्याचा एक पर्याय त्यांना सापडला होता. चिंगीला त्यांनी उगीचच डोक्‍यावर चढवून ठेवलंय, अशी त्यांच्यामागं जरी ते नानांवर टीका करत, तरी त्यांनी चिंगीचा आपल्या पाठचा ससेमिरा टाळलाय, हे त्यांनाही मान्य करावंच लागे. 

त्याच दिवसाची गोष्ट. चिंगी काही तरी मागण्यासाठी आईकडं गेली. पण आई तिचं काही ऐकून न घेताच तिच्यावर डाफरली. 

‘चिंगे, माझं डोकं खाऊ नकोस. मला स्वस्थ पडू दे.’ 

हे ऐकून खरं तर चिंगीला नवाच प्रश्‍न पडला होता. डोकं कसं खाल्लं जाईल? परवाच तर आईनं कोळंबी नीट करताना तिचं डोकं काढून टाकलं होतं. ते खायचं नसतं असं तिनंच चिंगीला सांगितलं होतं आणि आता आईच म्हणतेय डोकं खाऊ नकोस म्हणून. कोळंबीचंही खात नाहीत तर माणसाचं कसं कोण खाईल! आणि तेही आईचं!  चिंगीची ही विचारांची साखळी कुठं पोचली असती सांगता नसतं आलं. पण तेवढ्यात आई परत ओरडली, 

‘तू अजून इथंच? जा म्हटलं ना. आधीच माझं डोकं जड झालंय, त्यात तू...’ 

पण पुढचं काही ऐकायला चिंगी तिथं होतीच कुठं? ती आधीच पसार झाली होती. कारण आता तिच्या मनात दुसराच एक प्रश्‍न पिंगा घालायला लागला होता. तोच तिनं आपल्या मित्रांमध्ये, शेजारीपाजारी त्यांना ‘चौकस चौकडी’ म्हणत, विचारला होता.  ‘आई आताच म्हणाली की तिचं डोकं जड झालंय. तर मला सांगा डोकं जड झालंय हे कसं ओळखायचं?’ 

‘पण जडच कशावरून? हलकंही झालं असेल. कालच माझे बाबा म्हणत होते की त्यांना अलीकडं डोकं हलकं झाल्यासारखं वाटतंय.’ गोट्या म्हणाला. 

‘हो रे!’ त्याला दुजोरा देत मिंटीनं सांगितलं. ‘शेजारच्या कर्वेकाकू म्हणत होत्या की माझं डोकं रिकामं आहे. नुसता भुस्सा भरलाय.’ ‘हेच म्हणते मी. डोकं हलकं किंवा जड झालंय, रिकामं आहे की काठोकाठ भरलेलं आहे, हे ठरवायचं तर डोक्‍याचं वजन करता यायला हवं. ते कसं करायचं?’ ‘त्यात काय आहे. आपण आपलं वजन नाही का करत?’ ‘हो पण ते सगळ्या शरीराचं करतो. इथं फक्त डोक्‍याचं करायचंय. ते वेगळं काढून त्याचं वजन केलं आणि नंतर परत जागच्या जागी ठेवलं असं तर नाही ना करता येत, बंडूराव.’ 

यावर कोणीच काही बोललं नाही. मुकाट्यानंच सर्वांनी नानांच्या घरची वाट धरली...

संबंधित बातम्या