डोक्‍याचं वजन किती? 

डॉ. बाळ फोंडके
गुरुवार, 10 जानेवारी 2019

कुतूहल
 

बेल वाजली म्हणून नानांनी दार उघडलं तर चिंगी आणि तिची टोळी तिथं हजर. 
त्यांना आत घेताघेताच नानांनी विचारलं, ‘आज सगळी गॅंग इकडं कशी? काही तरी आगळीवेगळी शंका आलेली दिसतेय..’ 
‘बरोबर ओळखलंत नाना. आताच आई म्हणाली की तिचं डोकं जड झालंय. तर ते खरोखरच जड झालंय आणि असेल तर किती जड झालंय, हे ओळखायचं तर त्याचं आणि फक्त त्याचंच वजन करता यायला हवं. ते कसं करायचं?’ 

क्षणभर नाना स्मितहास्य करत सगळ्यांकडं बघत राहिले. असा प्रश्‍न मुलांना पडावा याचं त्यांना कौतुकच वाटत होतं. 

‘आहे खरा तुमचा प्रश्‍न डोकेबाज. याचं उत्तर ‘न्यू सायंटिस्ट’ या मासिकाच्या संपादकांनी एक प्रयोग करूनच दिलं. त्यासाठी त्यांनी आर्किमिडिजच्या त्या गोष्टीचा उपयोग केला.’ 
‘कोणती गोष्ट?’ 

‘ती नाही का, राजानं देवासाठी बनवलेल्या सोन्याच्या मुकुटाची. त्या मुकुटाचं वजन करण्यासाठी आर्किमिडिजनं जी क्‍लृप्ती वापरली तिचाच उपयोग या संपादकांनी केला. त्यांनी आपल्याच एका सहकाऱ्याचा साफ चमनगोटा केला. मग त्यांनी एक भलीमोठी परात घेऊन तिच्यात एक बादली ठेवली. ती पाण्यानं काठोकाठ भरली. त्यानंतर त्या सहकाऱ्याला आपलं नाक दाबून श्‍वास रोखून धरायला सांगितलं. आता त्याचं डोकं उलटं करून मानेपर्यंत त्या बादलीत बुडवलं. त्या बरोबर बादलीतलं पाणी उतू जाऊन बाहेर पडलं. ते परातीत गोळा केलं आणि त्या पाण्याचं वजन केलं.’ 
‘पण नाना, हे त्या पाण्याचं झालं. आपल्याला तर डोक्‍याचं वजन करायचंय ना!’ गोट्यानं शंका काढली. 

‘बरोबर बोललास. पण आर्किमिडिजनं काय सांगितलं होतं, की जेव्हा एखादी वस्तू पाण्यात ठेवली जाते तेव्हा ती आपल्या आकारमानाइतक्‍या वजनाचं पाणी बाजूला सारते. याचा अर्थ परातीत जे पाणी होतं त्याचं वजन त्या डोक्‍याच्या आकारमानाइतकं झालं.’ 
‘पण, पण नाना..’ त्यांना मध्येच अडवत मिंटी म्हणाली, ‘वजन आणि आकारमान या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बादलीचं आकारमान दोन किलो आहे असं नाही आपण म्हणत.’ 

‘अरे वा!’ तिच्या पाठीवर थाप देत नाना म्हणाले, ‘चांगलं सांगितलंस. पण पाण्याची घनता एक...’ 
‘... किलोग्रॅम प्रति लिटर असते,’ टोळी एका सुरात ओरडली. 

मोठ्याने हसत त्यांना दाद देत नाना म्हणाले, ‘शाब्बास! एकदम बरोबर. मग त्या पाण्याच्या वजनाइतकंच त्याचं आकारमान झालं आणि ते त्या डोक्‍याइतकं भरलं. बरोबर?’ सर्वांनी आपापलं डोकं हलवत होकार दिल्यावर नाना पुढं म्हणाले, ‘आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीत सत्तर ते ऐंशी टक्के पाणीच असतं. मेंदू तर ओलसरच असतो. त्यामुळं डोक्‍यातल्या मेंदूची घनता पाण्याइतकीच असावी असं गणित केल्यास ते फार चूक होणार नाही. डोक्‍याचं आकारमान तर आपल्याला समजलेलंच आहे आणि आता घनताही. तेव्हा सरळ हिशेब केल्यास त्या पाण्याचं वजन डोक्‍याच्या वजनाइतकंच भरेल असं म्हणता येईल.’ 

यावर टोळी गप्पच बसली. तसं त्यांच्या मनात काही तरी खदखदत असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. पण कोणीही बोलत नव्हतं. नानाही काही वेळ काहीच बोलले नाहीत. 

‘हे गणित तेवढंसं अचूक नाही असंच म्हणायचंय ना तुला चिंगी?’ 
‘हो, हो नाना.’ 

‘पण चिंगी तुझा मूळ प्रश्‍न होता की डोकं जड झालंय हे कसं ओळखायचं. तेव्हा एकदा जड झालंय असं वाटल्यानंतर अशा रीतीनं वजन करायचं आणि ते परत मूळ पदावर आलंय असं वाटल्यावर परत करायचं. त्या दोन वजनांमधल्या फरकावरून कळेल ना की ते जड झालं होतं की नाही!’ नाना म्हणाले. 

‘बरोब्बर! बरोब्बर!’ सगळे एकसाथ चीत्कारले. 

नाना म्हणाले, ‘चिंगे, डोक्‍याचं वजन कसं करायचं हा तुझा प्रश्‍न बरोबर असला तरी डोकं जड झालंय याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. डोकं दुखत असलं किंवा अस्वस्थ वाटत असलं की तसं म्हणण्याचा प्रघात आहे. अलंकारिक भाषेचा तो एक नमुना आहे. याचाही विचार करत चला. हे समजत नसेल तर मी म्हणेन की तुझं डोकं टणक झालंय, त्यात काही शिरतच नाही. झालंय का तसं?’ 

यावर सर्वच जण हसत सुटले.

संबंधित बातम्या