.. म्हणून रात्री आकाश काळं! 

डॉ. बाळ फोंडके
मंगळवार, 29 जानेवारी 2019

कुतूहल
 

नानांच्या घराचं दार उघडंच होतं. त्या बरोबर भरतीच्या लाटेसारखी टोळी आत घुसली. मिळेल ती जागा पकडून बसून राहिली. नाना वळून बघतात, तो प्रश्‍नार्थक चेहरा घेऊन सगळेजण बसलेले. नानांनी त्यांच्याकडं पाहताच सगळ्यांनी एकाच वेळी विचारायला सुरुवात केली. नुसता गदारोळ माजला... 

हातानंच त्यांना थोपवून धरत नाना म्हणाले, ‘अरे कोणीतरी एकानंच विचारा ना. म्हणजे गोंधळ नाही होणार. चिंगे तूच विचार पाहू.’ 

‘मुख्य प्रश्‍न आहे, रात्री आकाश काळंकुट्ट का दिसतं हा?’ 

‘..आणि त्यावेळी आकाशात सूर्य नसतो हे माहिती आहे आम्हाला,’ गोट्या म्हणाला. 

‘पण तारे असतात अगणित. हेही...’ चिंगी म्हणाली. 

‘बरोबर आहे तुमचं. त्या ताऱ्यांचा मिळून जो प्रकाश असतो त्यानं आकाश उजळून निघायला हवं. पण मला सांगा बाहेर जो सूर्य तुम्हाला दिसतो आहे तो केव्हाचा आहे?’ 

‘केव्हाचा म्हणजे? आताचा..’ थोडं गोंधळून जात बंडूनं सांगितलं. 

‘नाही, तो आहे आठ मिनिटांपूर्वीचा. कारण त्याचा प्रकाश त्याच्या भन्नाट वेगानं..’ 

‘.. एका सेकंदात तीन लाख किलोमीटर!’ सर्वांनी कोरस करत सांगितलं. 

‘... हो, तर त्या वेगानं प्रवास करूनही त्याला आपल्यापर्यंत पोचायला आठ मिनिटं लागतात. या विश्‍वातले काही तारे तर कितीतरी दूर आहेत. आपल्या विश्‍वाचं वयच मुळी जवळजवळ पंधरा अब्ज वर्षं आहे. म्हणजे जास्तीत जास्त पंधरा अब्ज प्रकाशवर्षं इतक्‍या दूर असलेल्या ताऱ्यांचाच प्रकाश आपल्यापर्यंत पोचू शकतो. त्याहूनही दूर असणाऱ्या ताऱ्यांचा प्रकाश अजूनही आपल्यापर्यंत पोचलेलाच नाही. शिवाय अशा दूर असलेल्या ताऱ्यांचा प्रकाश कितीही प्रखर असला तरी इथवर येईपर्यंत तो मिणमिणताच झालेला असतो.’ 

‘हो नाना, रस्त्यावर आपल्यापासून दूर असलेल्या दिव्यांच्या प्रकाशापेक्षा आपल्या हातातल्या बॅटरीचा उजेड जास्त वाटतो,’ चंदूनं होकार भरला. 

‘हो नाना, पण सगळेच तारे काही इतक्‍या दूर नाहीत. काही त्याहूनही कमी अंतरावर असतीलच ना?’ चिंगीची शंका. 

‘आहेतच ना. तरीही ते सूर्यापेक्षा किती तरी जास्त अंतरावर आहेत. त्यांचा प्रकाशही असाच क्षीण होतो. शिवाय तो निरनिराळ्या कोनांमधून येतो. तो सगळा प्रकाश एकसाथ, एकसंधरीत्या येईलच असं नाही. त्यामुळं त्यांचा एकत्रित प्रकाशही भगभगीत होईल याची खात्री नाही. आणखीही एक महत्त्वाचं कारण आहे. ओळखा पाहू कोणतं ते?’ नानांनी विचारलं. 

आता सगळे बुचकळ्यात पडले. एकमेकांच्या तोंडाकडं पाहू लागले. थोडा वेळ कधी नव्हे ती शांतता पसरली. सगळी टोळी तिथं हजर असूनही! नानांनाच ती शांतता असह्य झाली. 

‘अरे सोपं आहे. तुम्हाला तो गीतेतला श्‍लोक माहिती आहे ना, ‘जातस्यहि ध्रुवो मृत्यूर्धृवं जन्म मृतस्य च।’ 

‘आहे ना..’ मिंटी म्हणाली, ‘म्हणजे जो जन्माला येतो त्याला आज ना उद्या मरण येणारच आहे आणि ज्याचा मृत्यू झालाय त्यालाही परत जन्म मिळणार आहे.’ 

‘म्हणजे पुनर्जन्म? पण...’ चिंगीनं शंका काढली. 

‘..नाही, तसा त्याचा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. पण ते पुढं सांगतोच आहे. तेव्हा हा जो निसर्ग नियम सांगितला गेला आहे तो सगळ्यांनाच लागू पडतो. माणसांना, प्राण्यांना, वनस्पतींना, एवढंच काय पण ताऱ्यांनाही!’ नाना म्हणाले. 

‘ताऱ्यांनाही?’ 

‘म्हणजे आपला सूर्यही?’ मुलांचे प्रश्‍न आले. 

‘हो अगदी आपला सूर्यही. तो एक दिवस विझून जाणार आहे. पण घाबरू नका. त्याला अजून खूप खूप वर्षं लागणार आहेत. तर हे जे सगळे तारे अवतीभवती निरनिराळ्या अंतरांवर विखुरलेले आहेत, त्यापैकी काहींचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचतो ते विझूनही गेले असतील. त्यामुळं त्यांच्या प्रकाशाचीही भर नेहमीच पडेल असं नाही,’ नानांनी समजावले. 

‘पण नाना ते विझून जातात म्हणजे चिमणीतलं तेल संपलं की ती विझते तसे?’ मिंटीनं विचारलं. 

‘तसंच म्हणायला हरकत नाही. त्यांच्यातलं इंधन संपलं, की तेही संपतात. पण त्यापायी त्यांचा स्फोट होतो. सुपरनोव्हा होतो. त्या स्फोटामुळं त्यांच्यामधले अणुरेणू इकडेतिकडे फेकले जातात. त्यांच्यापैकी काही एकत्र येऊन नव्या ताऱ्याला जन्म देतात. आपला सूर्यही असाच दुसऱ्या पिढीचा तारा आहे,’ नाना म्हणाले. 

‘थोडक्‍यात काय नाना, इतके तारे असूनही त्यांचा एकत्रित प्रकाश काही सूर्याच्या प्रकाशाइतका प्रखर होत नाही. आणि म्हणून...’ 

‘...रात्रीचं आकाश काळंकुट्ट दिसतं..’ चिंगीच्या सुरात सगळ्यांनीच आपला सूर मिसळला.

संबंधित बातम्या